रत्न हरपले

10 Oct 2024 19:35:33
  

tata
उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक प्रगतीला सातत्याने हातभार लावणारे उद्योजक सर्वसामान्यांसाठी कौतुकाचा विषय असतात. तसेच त्यांचे राहणीमान, त्यांच्या आवडीनिवडी आदी गोष्टींविषयीही लोकांना अपार कुतूहल असते. असे असले तरी त्यांच्याविषयी निस्सीम आदराची आणि आपुलकीची भावना असतेच असे नाही. मात्र नुकतेच निवर्तलेले ज्येष्ठ उद्योजक, दोन दशकांहून अधिक काळ टाटा समूहाचे समर्थ नेतृत्व करणारे रतन टाटा लोकादराचे धनी होते. ते दैनंदिन कामातून दूर झाल्यावरही भारतीयांच्या कधी विस्मरणात गेले नाहीत, हे विशेष!
टाटा समूह हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून या देशात उद्योजकतेचेबीजारोपण करणारा आणि कार्यशैलीत राखलेल्या सचोटीच्या परंपरेमुळे कायम नावाजला गेलेला असा भारतीय उद्योगसमूह. या समूहाची धुरा जे.आर.डी. टाटा यांच्याकडून 1991च्या दरम्यान रतन टाटा यांच्याकडे आली. जे.आर.डी. यांनीही आपल्या कारकीर्दीवर कर्तृत्वाचा ठसा उमटवला होताच; पण त्या वेळी या समूहाने देशाची वेस ओलांडली नव्हती.जे.आर.डीं.च्या या उत्तराधिकार्‍याने- रतन टाटा यांनी देशाच्या सीमा ओलांडून टाटा समूहाचा विस्तार केला. म्हणूनच त्यांच्यासारख्याचे जाणे ही घटना केवळ टाटा समूहाची वा भारतीय उद्योगसमूहाची हानी करणारी नाही, तर देशाचेही मोठे नुकसान झाल्याची करोडो भारतीयांची भावना आहे.
 
गेली काही वर्षे दैनंदिन कामात नसलेल्या त्यांच्या जाण्याने देशातल्या तरुण पिढीलाही हळहळ वाटली. त्यापैकी अनेकांनी समाजमाध्यमांमधून श्रद्धांजली वाहत, त्यांच्याविषयीच्या भावनांना वाट करून दिली. ही खूप मोठी कमाई आहे. एका उद्योजकाने सर्वसामान्यांच्या मनात असे नितांत आदराचे आणि आपुलकीचे स्थान मिळवणे ही साधी गोष्ट नाही.
 
देशाची वेस ओलांडत रतन टाटा यांनी टाटा समूहातर्फे टेटले, जग्वार लँड रोव्हर आणि कोरससारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यवसाय टाटा समूहात समाविष्ट करून घेतले आणि भारतीय उद्योजकांची प्रतिष्ठा जगात उंचावली. हे करत असताना समांतरपणे अस्सल भारतीय बनावटीची उत्पादने तयार करण्याचेही काम केले. टाटा नॅनो हे त्याचे एक चपखल उदाहरण. सर्वसामान्य भारतीयाला परवडेल आणि छोट्या कुटुंबीयांसाठी सोयीची ठरेल अशी गाडी हे रतन टाटांचे स्वप्न होते. नॅनोच्या रूपात ते साकार झाले.
 
अनेक क्षेत्रांत टाटा समूहाचा विस्तार करताना प्रत्येक उद्योगाने समूहाचा भाग म्हणून जी मूल्ये जपणे अपेक्षित आहे, ती जपली जाण्याबाबत रतन टाटा आग्रही होते. सचोटी हे आपले सगळ्यात मोठे भांडवल आहे यावर त्यांची श्रद्धा होती. ती त्यांनी प्राणपणाने जपली आणि आपल्या सहकार्‍यांच्या माध्यमातून समूहातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत रुजवायचा प्रयत्न केला. टाटा समूहाचे प्रमुख या नात्याने कारभार पाहताना विश्वस्त वृत्ती जपणारा आणि उद्योगविस्ताराची पाहिलेली भव्य स्वप्ने प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्नशील राहणारा महत्त्वाकांक्षी उद्योजक म्हणजे रतन टाटा, या शब्दांमध्ये त्यांची नेमकी ओळख करून देता येईल.
 
जे.आर.डी. टाटांनी जागतिक दर्जा मिळवू शकणार्‍या आणि जागतिक पातळीवरच्या स्पर्धात्मक वातावरणातही पाय घट्ट रोवून उभ्या राहतील अशा कंपन्या स्थापन केल्या. रतन टाटा जे.आर.डीं.च्याच मार्गाने, पण त्यांच्या समकालीन उद्योजकांच्या कित्येक पावले पुढे गेले. त्यांनी समूहाची सूत्रे हाती घेतली तेव्हा जागतिकीकरणाचे, मुक्त अर्थव्यवस्थेचे वारे जोरात वाहू लागले होते. या बदलाचा नेमका वेध घेत रतन टाटांनी समूहाच्या मनोवृत्तीत आणि धोरणात बदल केले. उद्योगाचे पंख विस्तारत जागतिक स्तरावर स्थान निर्माण केले. नुसते निर्माणच केले नाही तर ते पक्के केले. एक भारतीय उद्योजक काय करू शकतो याची जाणीव जगाला करून दिली.
 
समूहाचे समर्थ नेतृत्व केले तसे या देशातल्या नवउद्योजकांच्या पाठीशी उभे राहण्याचे कामही रतन टाटांनी केले. केवळ आपल्या समूहाचा विस्तार पुरेसा नाही, तर नवनव्या क्षेत्रात नव्या दमाचे उद्योजक उभे राहायला हवेत, अशी त्यांची धारणा होती. ओला, पेटीएम अशांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कंपन्यांच्या मागे रतन टाटा यांनी भक्कम आर्थिक पाठबळ उभे करत त्या नवउद्योजकांंच्या स्वप्नांना बळ दिले. आर्थिक पाठबळ देतानाच वेळोवेळी मार्गदर्शनही केले. आपल्या प्रदीर्घ उद्योजकीय अनुभवाच्या आणि त्यावर केलेल्या सखोल चिंतनाच्या बळावर ते जे मार्गदर्शन करत त्याला सुविचाराचे मोल येई. अनेक नवउद्योजकांसाठी ते प्रेरणेचा स्रोत ठरले ते त्यांच्या या स्वभाववैशिष्ट्यामुळे. रूढार्थाने त्यांचे कोणी रक्ताचेवारसदार नाहीत; पण त्यांच्या वाटेवर चालतील असे... आणि त्यातून देशाची मान उंचावतील असे अनेक वारसदार त्यांनी आपल्या कार्यकाळात घडवले आहेत.
 
दानशूर वृत्ती त्यांना कौटुंबिक वारशात मिळाली होती. या दानशूर वृत्तीला त्यांच्या सहसंवेदनशीलतेचे कोंदण होते. 26/11 च्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याच्या वेळी त्याचे दर्शन जगाला घडले. या दहशतवादी हल्ल्याने मुंबईची शान समजल्या जाणार्‍या टाटा समूहाच्या ताज हॉटेलची दुर्दशा केली. हॉॅटेलचे काही कर्मचारी, आलेल्या ग्राहकांपैकी काही ग्राहक आणि लगतच्या परिसरातील काही फेरीवाले या हल्ल्यात मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेने व्यथित झालेल्या रतन टाटांनी आपल्या मृत कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांच्या योगक्षेमाची तर काळजी घेतलीच; पण दुर्दैवी फेरीवाल्यांची कुटुंबे शोधून त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी आर्थिक बळ दिले.
 
टाटा समूहाचा कारभार 80हून अधिक देशांत पोहोचवण्यामागे होती ती त्यांची दूरदृष्टी, महत्त्वाकांक्षा, पाहिलेले स्वप्न साकार करण्याची धमक आणि सर्वात महत्त्वाचे होते ते - प्रत्येक कृतीतून डोकावणारे स्वदेशावरचे प्रेम. ही सगळी गुणवैशिष्ट्ये त्यांच्या आजवरच्या कृतीतून, त्यांच्या देहबोलीतून पोहोचल्याने ते भारतीयांचे आदरणीय आणि लाडके उद्योजक ठरले. म्हणूनच त्यांचे जाणे अकाली नसले तरीही त्यांच्या नसण्याचे अपार दु:ख प्रत्येक भारतीयाला झाले. त्याला कारण त्यांचा जीवनप्रवास आहे. कृतीतून मूल्यांचा आविष्कार करणारे त्यांचे जगणे प्रत्येक भारतीयाच्या मन:पटलावर कोरले गेले आहे.
अशा या द्रष्ट्या उद्योजकाला ‘विवेक समूहा’तर्फे आदरांजली.
Powered By Sangraha 9.0