@मिलिंद प्रभाकर सबनीस
एखादी कविता एक अलौकिक तेज घेऊन जन्माला येते आणि आपल्या प्रभेने पुनःपुन्हा ती सारी धरती उजळवून टाकू लागते. असे ‘वंदे मातरम्’ हे गीत राष्ट्रभक्तीचे स्फुरण जागविणारे आहे. आजही त्यावर वादंग होतात, चर्चा झडतात. देशातही विशिष्ट धर्मीयांकडून बंदी हुकूम काढले जातात; पण या सगळ्या आगीतून सोन्याप्रमाणे अधिक तेज:पुंज होऊन ‘वंदे मातरम्’ प्रत्येक वेळा पुनःपुन्हा अवतीर्ण होत राहते. या गीताच्या निर्मितीला 150 वर्षे पूर्ण होत आहेत; पण अजूनही या शब्दांचा प्रभाव कमी झालेला नाही. या गीताच्या जन्मकथेचा धांडोळा यानिमित्त घेत आहोत.
काव्य हा एक अद्भुत वाङ्मय प्रकार आहे. मोजक्या शब्दांच्या नादबद्ध समूहात विविध भावभावनांचा आविष्कार करू शकण्याचं सामर्थ्य यात आहे. कधी छंदबद्ध, तर कधी मुक्तछंद. कधी मोरोपंतांसारख्या पंडित कवींचं शब्दांबरोबरचं पांडित्यपूर्ण मांडणे असेल, तर कधी शाहिरांच्या शब्दांमधून रक्त उसळवून वीरवृत्ती जागृत करण्याचं बळ असेल.
प्रत्येक भाषेमध्ये त्या भाषेचं वेगळं असं सौंदर्याचं लेणं घेऊन कविता जन्माला येतात. वाचकांच्या, श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य करतात. आधी शब्द, मग संगीत, नाद-लयीबरोबर खेळ खेळत एक सुंदर शब्दस्वरचित्र उभं राहातं.
साहित्यातले नऊ रस वेगवेगळ्या स्वरूपांत कवितेमधून भेटीला येतात. त्या त्या रसाच्या वैशिष्ट्याप्रमाणे कवितेतले शब्द, वातावरण निर्माण करतात आणि वाचकांना वेगळ्या सृष्टीत घेऊन जातात, त्यामुळेच ’जे न देखे रवि, ते देखे कवी’ अशी म्हण प्रचलित झाली असावी.
भारतात भाषा, पोशाख, आहार, संस्कृती या सर्वांमध्ये भरपूर वैविध्य आहे. संस्कृतसारख्या प्राचीन भाषेचं अधिष्ठान भारतातल्या अनेक भाषांना लाभले आहे. त्याच्या प्रभावातून दक्षिण भारतातल्या काही भाषांचा उदय झाला. मराठी म्हणजे प्राकृत भाषेचा इतिहास आणखीन वेगळा. मराठी प्राकृत भाषेतला ’चामुंडराजे करवियले’ हा पहिला शिलालेखसुद्धा काव्यात्म भाषेतला.
प्राचीन भारतीय वाङ्मयातील बहुतांश वाङ्मय हे काव्यात्मकच आहे. रामायण, महाभारतापासून भवभूती, कालिदास आणि नंतरच्या काळातील संतांनीही आपला उपदेश काव्यातूनच केला आणि या प्राचीन वाङ्मयाच्या अभ्यासातून आधुनिक काळात भारतीय कवींची काव्यवृत्ती जोपासली जाऊ लागली. अगदी कळत्या वयात संस्कृत काव्याचे संस्कार झालेला एक बंगाली तरुण मोठी वाङ्मयनिर्मितीची सुरुवात काव्यापासूनच करतो; पण पुढे मात्र कादंबरी, ललितलेखन यात प्रतिभेची उंच शिखरं गाठताना त्याचं काव्यलेखन काहीसं मागं पडतं आणि मग अचानक एखादी वीज लखलखावी तशी एक कविता तो लिहून जातो.
त्या विद्युल्लतेच्या तेजानं त्या वेळी काही क्षण बंगाल उजळला असेलच; पण त्याचं तेज क्षणात लोप पावलं नाही. त्या विद्युल्लतेचा दाह इथे राज्य करणार्या इंग्रजांच्या लंडनमधल्या सिंहासनाला बसला. भारतीयांनी मात्र ती विद्युल्लता एका शस्त्राप्रमाणे हाती घेतली.
जे दिव्य दाहक म्हणूनी असावयाचे ।
बुद्धयाचे वाण धरिले करि हे सतीचे ॥
असे म्हणत क्रांतिकार्याच्या निखार्यावरनं चालणार्या क्रांतिकारकांना ही शब्दरूपी विद्युल्लता वरदानच ठरली.
एरवी वीज क्षणभर चमकून जाते, मोठा आवाज करते, ढगांचा गडगडाट होतो आणि मग मुसळधार पाऊस सुरू होतो. सारी सृष्टी चिंब होऊन जाते. लखलखलेल्या वातावरणात ढगाळ वातावरणात चमकलेल्या विजेने सारे वातावरणच बिघडून जाते. कडक उन्हाळ्यानंतर दाटून आलेल्या मेघातून चमकलेल्या विजांनंतर बरसलेल्या पावसानं सारी सृष्टी समृद्ध होऊन जाते. तसंच काहीसं या शब्दरूपी विद्युल्लतेमुळे झाले.

वर्षानुवर्षं या समृद्ध देशावर आक्रमणं होत राहिली. आक्रमकांनी या भूमीला कंगाल करायला सुरुवात केली. दीर्घकाळ आलेल्या पारतंत्र्यामुळे इथल्या जनतेलाही दुष्काळाची सवय झाली. 1857 चे काळे मेघ स्वातंत्र्याचे वारे घेऊन आले. घनघोर तांडवही झालं; पण स्वातंत्र्य मिळालंच नाही. हे तांडव पाहणार्या 20 वर्षांच्या एका कवीच्या मनात वेगळंच विचारांचं युद्ध चालू होतं. संस्कृत काव्याच्या अभ्यासानं त्याच्या मनाची मशागत केली होती. तसा वारसाही त्याच्या माता-पित्याकडून आला होता. नुकत्याच स्थापन झालेल्या कोलकाता विद्यापीठाचा तो पहिला पदवीधर होता. या तरुणाचा म्हणजे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय याचा पहिला काव्यसंग्रह ’ललिता - ओ - मानस’ हा नुकताच प्रकाशित झाला होता. इंग्रजांची नोकरी करायची की नाही, असं द्वंद्व त्याच्या मनात चालू होतं. अखेर निश्चय झाला. नोकरी स्वीकारली आणि त्या नोकरीतील उच्च पदाचा उपयोग सर्वसामान्य गरीब जनतेसाठी बंकिमचंद्र करू लागले. वेळप्रसंगी जुलमी इंग्रज अधिकार्यांनाही शिक्षा ठोठावण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. नोकरी आणि लिखाण दोन्ही एकाच वेळी सुरू झालं. कादंबरी हा नवा वाङ्मय प्रकार बंकिमचंद्रांनीच विकसित केला आणि रुळवला. काव्य थोडं मागे पडलं. हा कादंबरीकार कधीकाळी कविता लिहीत होता हेही आठवू नये इतका मागे पडला. लेखणीतून उतरली नाही तरी कविता त्यांच्या मनात होतीच. इतर कवींविषयी ते आपल्या ’बंगदर्शन’मधून भरभरून लिहायचे. 1868 मध्ये कोलकात्याच्या हिंदू मेळ्यात सत्येंद्रनाथ ठाकूर यांच्या
मिले सब भारतसंतान
एकतान मन प्राण
गाओ भारतेर यशोगान ॥ धृ ॥
या कवितेविषयी बंकिमचंद्रांनी लिहिले. ‘हे महागीत अखिल राष्ट्राचे गीत बनो. हिमालयाच्या दर्याखोर्यांतून त्याचे प्रतिध्वनी उमटू लागोत. गंगा, यमुना, सिंधू, नर्मदा, गोदावरी यांच्या तीरावरील वृक्षराजीतून ते मर्मरित होवो. पूर्व-पश्चिम सागरांच्या गंभीर लाटांतून त्याचा सतत उद्घोष होत राहो. या कवितेचा असा गौरव करणार्या बंकिमचंद्रांनी अवघ्या सात वर्षांनंतर ’वंदे मातरम्’ या महामंत्राला जन्म दिला.
बंकिमचंद्रांनी पुढे लिहिलेल्या ’वंदे मातरम्’ या गीताचा कदाचित मेघगर्जनेच्या वातावरणाशी जवळचा संबंध असावा, कारण 1872 साली या ’वंदे मातरम्’ गीतातील पहिल्या दोन शब्दांचे बीजारोपण झाले तेही अशाच पावसाळी वातावरणात. त्याचं वर्णन स्वतः बंकिमचंद्रांनीच लिहून ठेवलं आहे. वर्षाऋतूच्या त्या संध्याकाळी त्यांच्या नैहाटी या मूळ गावाला जोडून असलेल्या गंगा नदीच्या बरोबर पलीकडच्या तीरावर चिचूडा नावाच्या गावातील नदीतीरावर व्हरांड्यात ते बसले होते. ते लिहितात-

’वर्षा ऋतूतील एके दिवशी मी गंगा नदीच्या तीरावरील त्या घराबाहेर बसलो होतो. अंधार पडलेल्या संध्याकाळच्या वेळी चंद्राच्या प्रकाशात विस्तीर्ण भागीरथीच्या लाटांवर लक्ष लक्ष तारका चकाकत होत्या आणि क्षणात अदृश्यही होत होत्या. मी नदीकडील बाजूच्या व्हरांड्यात बसलो होतो. पावसाची मंदशी सर येईल, असे वाटत होते. आकाशात नक्षत्रे, नदीमध्ये लहरणार्या नौकांमधला अस्फुट प्रकाश आणि गंगेच्या लाटांवर चंद्ररश्मी! काव्य लिहिण्यासाठी अत्यंत अनुकूल असे वातावरण होते. मी विचार करत होतो. काही कविता सुचावी, असे मनापासून वाटत होते. इंग्रजी कवितेचा आधार घेऊन चालणार नाही, कारण गंगेविषयी इंग्रजीमध्ये काहीच नाही. संस्कृतमधील कालिदास आणि भवभूती हेही दूर राहिले. मधुसूदन, हेमचंद्र, नवीनचंद्र यांच्या बंगाली काव्यांचा विचारही मनाची तृप्ती करणारा नव्हता; पण समाधान होईना. मग मात्र शांतपणे बसून विचार करीत राहिलो आणि त्याच वेळी गंगा नदीच्या पात्रातून कोळ्यांची एक नाव येताना दिसली. ते मासेमारी करणारे कोळी गात होते.
’साधो आछे, मा, मने ।
दुर्गाबले प्राण त्यजिब जाह्नबी जिबने ॥’
’प्राण तृप्त झाले. मनाला सूर सापडला. बंगाली हृदयाची आकांक्षा बंगाली भाषेतच ऐकायला मिळाली. हा गंगेचा (जान्हवीचा) जलप्रवाह दुर्गास्वरूप मानून त्यासाठी आपण मनुष्यप्राणी प्राणत्याग करण्याच्या पात्रतेचे आहोत, हे लक्षात आले आणि मग त्या वेळी ती सुशोभित जान्हवी-गंगा आणि सारे सौंदर्यसंपन्न जग मला आपलेसे वाटू लागले.’
कवितेचा अंकुर फुटला खरा, बीजारोपण झालं; पण या भूमीतून रोपाप्रमाणे वर यायला अजून तीन वर्षे गेली. 1875 च्या आश्विन महिन्यात बंकिमचंद्र आपल्या जन्मगावी नैहाटी कांटालपाडा येथे आले होते. त्यांच्या घरचा उत्सव सार्या पंचक्रोशीत प्रसिद्ध होता. अष्टमीच्या रात्री भजन, कीर्तन झाल्यानंतर बंकिमचंद्र मंडपात बसले होते. समयांच्या प्रकाशात देवीची मूर्ती उजळून निघाली होती आणि अचानक बंकिमचंद्रांना त्या मूर्तीत भारतमाता दिसू लागली. पायी तुडवल्या जाणार्या महिषासुराच्या रूपात इंग्रज दिसू लागले. बंकिमचंद्राच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. कवीचा भावावेग अनावर झाला. शेजारी बसलेल्या थोरल्या बंधूंनी त्यांची अवस्था ओळखून त्यांच्या खांद्यावर हात ठेवत त्यांना सावरलं. थोड्या वेळात बंकिमचंद्र उठले आणि त्या प्रचंड गढीच्या एका कोपर्यात असणार्या बैठ्या इमारतीतील आपल्या खोलीत जाऊन त्यांनी लेख लिहून पूर्ण केला. त्या लेखाचे नाव होते ’आमार दुर्गोत्सव’!
लेख अवघा दीड-दोन पृष्ठांचा; पण त्याची भाषा काव्यात्म, मातेचं वात्सल्य, पुत्राची व्याकूळता, दुर्गेचं वीररूप, शत्रुमर्दनाची विरूपता, त्यातून झालेली अद्भुत रसाची निर्मिती! जणू नवरस या छोट्या लेखात एकत्रित आले. अतिशय सुंदर रूपकं बंकिमचंद्रांनी यात वापरली.

हा लेख बंकिमचंद्रांच्या प्रतिभेचा अलौकिक आविष्कार आहे. केवळ ’वंदे मातरम्’चे पूर्वस्वरूप एवढेच याचे महत्त्व नाही, तर त्याच्या अप्रतिम भाषावैशिष्ट्यांमध्ये आणि मातृभूमीला दिलेल्या वैशिष्ट्यपूर्ण उपमांमध्ये आहे. ’वंदे मातरम्’मध्ये ’दशप्रहरणधारिणी, कमला कमलदलविहारिणी, वाणी विद्यादायिनी, बहुबलधारिणीं, रिपुदलवारिणीं’ असे अनेक वैशिष्ट्यपूर्ण शब्द आलेले आहेत. असेच शब्द या लेखात आहेत. नवरागरंगिणी, नवलधारिणी, नवस्वप्नदर्शिनी, नगांकशोभिनी, धनधान्यदायिनी, असे शब्द आले आहेत. विशेषत: सिंधुसेवी, सिंधुपूजित, सिंधुमंथनकारिणी, अनंतकालस्थायिनी हे शब्द दुर्गेपेक्षाहीमातृभूमीचेच वर्णन करणारे आहेत. भाषासौंदर्याच्या दृष्टीने हा लेख म्हणजे बंकिमचंद्रांच्या साहित्यातील चमत्कार आहे. बंकिमचंद्रांच्या अनेक कादंबर्यांमधील वर्णने उत्कंठावर्धक, वाचकांना खिळवून ठेवणारी, चमत्कृतिपूर्ण - आजच्या भाषेत सिनेमॅटिक आहेत; तरीही या लेखाचा बाज त्यांच्या नेहमीच्या कादंबरीलेखनापेक्षा पूर्ण वेगळा आहे. बंकिमचंद्रांच्या कादंबर्या दीर्घ आहेत, घटनांची रेलचेल आहे. इथे मात्र हा लेख अगदी छोटा असतानाही, त्याचा आवाका पाहून इतक्या छोट्या प्रसंगातही बंकिमचंद्रांनी वाचकांना मंत्रमुग्ध केले आहे. हा लेख वाचताना अत्यंत सहजपणे वाचकांच्या मनात देशभक्तीचे तरंग उठलेच पाहिजेत, हा बंकिमचंद्रांचा हेतू साध्य होतो.
या लेखामध्ये कमलाकान्ताला दिसणारी ही प्रतिमा अचानक अंतर्धान पावते; पण कमलाकान्त निराश होत नाही. नुकत्याच झालेल्या दर्शनामुळे तो अत्यंत उत्साहित झालेला आहे. मातृभूमीच्या भक्तीने भारावलेला आहे. क्षणभर तो रडतोही; पण ते दुःख बाजूला ठेवून तो आपल्या बांधवांना आवाहन करतो,
’कालसमुद्रात अंतर्धान पावलेल्या मातृभूमीच्या त्या सुवर्णमयी प्रतिमेला आपण सर्व मिळून त्या कालसमुद्रात उडी घेऊन बाहेर काढू या. वाद्ये वाजवून सनईच्या सुरात तिची पूजा करू या. तिला आई म्हणून साद घालू या.’
या लेखाच्या शेवटी ते एक संस्कृत गीत उद्धृत करतात. वीस ओळींचे हे संस्कृत गीत स्वतः बंकिमचंद्रांनीच केलेले आहे. यामध्ये ’वंदे मातरम्’प्रमाणे बंगाली शब्दांचे मिश्रण नाही. एखाद्या स्तोत्राप्रमाणे त्याची रचना आहे. या गीताच्या शेवटी पुन्हा देवीचे वर्णन करणारा पाच ओळींचा एक पारंपरिक श्लोक आहे.
हे गीत पूर्णतः संस्कृतमध्ये असल्यामुळे कदाचित ’वंदे मातरम्’ इतके सहजासहजी सर्वसामान्य वाचकांच्या हृदयाचा ठाव घेऊ शकले नसावे. अर्थात त्यामुळे त्याचे महत्त्व बिलकूल कमी होत नाही. या गीतामुळे या लेखाच्या सौंदर्याचा आणि त्यातील मातृभूमीच्या भक्तीचा परमोच्च बिंदू या लेखात साधला आहे. ते गीत असे आहे-
जय जय जय जय जगद्धात्री ।
जय जय जय बंग जगद्धात्री ।
जय जय जय सुखदे अन्नदे ।
जय जय जय वरदे शर्म्मदे ।
या कवितेत देवीचे स्वरूप ’बंग जगद्धात्री’ असे असले, तरी पाठोपाठ लिहिलेल्या ’वंदे मातरम्’मध्ये ती बंगालच्या सीमा पार करून संपूर्ण भारतमातेच्या रूपात साकार झाली आहे.
कमलाकान्त या त्यांच्या मानसपुत्रातून स्वतः बंकिमचंद्रच आपल्या मनातील भावभावना व्यक्त करीत राहतात. विश्रांतीसाठी दीर्घकाळाची रजा घेऊन ते नैहाटीला आलेले होते. आश्विन शुद्ध नवमीच्या पहिल्या प्रहरात हा लेख लिहिला. त्यानंतर बरोबर एक महिन्यानी कार्तिक शुद्ध नवमीच्या दिवशी बंकिमचंद्रांनी या लेखरूपी रोपातून उमललेल्या अतीव सुंदर अशा पुष्पाला जन्म दिला, ते पुष्प होते ’वंदे मातरम्’ हे काव्य.
कार्तिक शुद्ध नवमी 7 नोव्हेंबर 1875. त्या दिवशीच्या संध्याकाळी नदीकाठी फेरफटका मारून परत आलेल्या बंकिमचंद्र यांनी लगबगीने जाऊन आपापल्या खोलीत लेखणी उचलली. जणू नुकत्याच गंगातीरावरून परत आल्यामुळे त्या नदीच्या उसळणार्या लाटांचे तरंग त्यांच्या शब्दांमधून उठू लागले. शांत जलाशयातून धीरगंभीर वातावरणातून हळूहळू रौद्र स्वरूप धारण करून उंच लाटा उसळाव्यात, एकच कल्लोळ व्हावा असं जणू झालं. शब्द कागदावर उमटू लागले-
’वंदे मातरम्
सुजलाम्, सुफलाम्, मलयजशीतलाम्
शस्यश्यामलाम् मातरम्
शुभ्रज्योत्स्ना...’
इथं बंकिमचंद्र शब्दांना शांत रसानं न्हाऊ घालताहेत. भारतमातेचं शांत, पण पारतंत्र्यामुळे क्लांत स्वरूप ते रेखाटतात. त्यात विद्यादायिनी सरस्वती प्रगट होते. मग कमला कमलदल विहारिणी लक्ष्मीही दिसू लागते; पण बंकिमचंद्रांना लक्षात येतं, आता या देशाला आवश्यकता आहे ती असुरमर्दिनी दुर्गेची, कालीची. दशप्रहरणधारिणी अशा या दुर्गेला अबला कोण म्हणेल? कारण तिचं रक्षण करण्यासाठी कोटी कोटी संतानांचे बाहू आहेत. कोटी कोटी मनांच्या मंदिरात वसणारी तिची प्रतिमा आता साक्षात रणरागिणीचे रूप धारण करते आहे. आता विलंब कसला? अशा या मातेचं स्मरण करून, तिचा जयजयकार करून, तिला वंदन करून या नव्या संग्रामाला सुरुवात करू या, असे बंकिमचंद्र सुचवतात. या महायज्ञात आपली आहुती अर्पण करण्याचेच ते सुचवतात आणि अवघ्या 25 ओळींचं ते काव्य महाकाव्याचा आशय घेऊन या भूमीवर अवतीर्ण झालं.
1875 मध्येे लिहिलेलं हे गीत त्या काळी पटकन लोकांच्या मनात रुजलं नाही. त्या वेळी बंकिमचंद्र आपल्या मित्राला म्हणालेही- ’आज लोकांना वंदे उदरम्’ची भ्रांत आहे तेव्हा ’वंदे मातरम्’ कसे लक्षात राहील?’ पण प्रत्येक गोष्टीला एक वेळ यावी लागते आणि तसंच झालं. 1880 मध्ये ’आनंदमठ’ कादंबरी क्रमश: प्रकाशित होऊ लागली आणि या कादंबरीत बंकिमचंद्रांनी ’वंदे मातरम्’ अतिशय सुंदर प्रकारे गुंफलं. जणू काही ‘आनंदमठ’साठीच ’वंदे मातरम्’ लिहिलं असावं.
’वंदे मातरम्’चे अभ्यासक रंगा हरिजी लिहितात - वंदे मातरम्बरोबर आनंदमठ आणि आनंदमठबरोबर वंदे मातरम्! दोघांचे एकत्रीकरण एक अनन्यसाधारण आहे. जसे पाण्यामुळे कमळ, कमळामुळे पाणी आणि पाणी आणि कमळ यामुळे शोभून दिसणारा जलाशय तेच नातं आनंदमठ आणि वंदे मातरम् या गीताचं आहे.
संन्याशांनी स्वातंत्र्यासाठी हातात शस्त्र उभारून दिलेल्या लढ्याचं वर्णन या कादंबरीत आहे. या कादंबरीनं स्वातंत्र्यलढ्यातील अनेकांना नवी प्रेरणा दिली आणि वंदे मातरम् या गीतानं तर इतिहासच घडवला. 1894 मध्ये बंकिमचंद्रांचं निधन झालं.
त्यापूर्वी बंकिमचंद्र म्हणाले होते- काही वर्षांनी हे गीत केवळ बंगालच नव्हे तर सारा देश डोक्यावर घेऊन नाचेल. आपले भाचे शचिंद्रनाथ यांनाही त्यांनी सांगितले- माझे सारे लिखाण गंगेत बुडवले तरी चालेल; परंतु हेच एक शाश्वत उरेल. हे महान गीत होईल आणि देशाचे हृदय जिंकेल.
बंकिमचंद्रांच्या निधनानंतर बरोबर अकरा वर्षांनी आणि या गीताच्या निर्मितीनंतर तीस वर्षांनी 1905 मध्ये बंगालच्या फाळणीच्या निमित्ताने या गीताचे रूपांतर एका राष्ट्रघोषात झाले. भारतीय स्वातंत्र्यलढ्याला युद्धमंत्र मिळाला. मराठ्यांचा ‘हर हर महादेव’, रजपूतांचा ‘जय एकलिंगजी’, शिखांचा ‘सत् श्री अकाल’ याप्रमाणे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ‘वंदे मातरम्’ ही युद्धगर्जना मिळाली. एका गीताचे रूपांतर एका राष्ट्रमंत्रात झाले. एक अलौकिक तेज घेऊन आलेल्या शब्दांनी ब्रिटिश शासनाला त्रस्त करून सोडले. खरं तर ‘माते, तुला वंदन असो!’ इतका साधा आशय असलेल्या या गीताची इंग्रजांनी एवढी धास्ती का घ्यावी? सर्वसाधारण दृष्टीने पाहता ते एक साधे काव्य, त्यातही कोणतेही मन भडकवणारे शब्द नाहीत. तरीही असे काय सामर्थ्य या सार्या गीतात असावे. सार्या जगामध्ये असे भाग्य कुठल्याच गीताला लाभले नसेल, असे भाग्य ‘वंदे मातरम्’ला लाभले आहे.
आज या गीताला 150 वर्षे याच्या निर्मितीला होत आहेत; पण अजूनही या शब्दांचा प्रभाव कमी झालेला नाही. आजही त्यावर वादंग होतात, चर्चा झडतात. देशातही विशिष्ट धर्मीयांकडून बंदी हुकूम काढले जातात; पण या सगळ्या आगीतून सोन्याप्रमाणे अधिक तेज:पुंज होऊन ’वंदे मातरम्’ प्रत्येक वेळा पुनःपुन्हा अवतीर्ण होत राहते, कारण या गीतात आपल्या देशाला जगातील सर्वात मोठी उपमा दिली आहे ती म्हणजे मातेची - शंकराचार्य म्हणतात त्याप्रमाणे - ’कुपुत्र असू शकतो; पण कुमाता नाही.’
एखादी कविता एक अलौकिक तेज घेऊन जन्माला येते आणि आपल्या प्रभेने पुनःपुन्हा ती सारी धरती उजळवून टाकू लागते. ’वंदे मातरम् हे त्याचे चपखल उदाहरण आहे.
‘वंदे मातरम्’ अर्थात ’माते, तुला वन्दन असो’... एवढाच अर्थ या शब्दांत आहे का? हे शब्द कालातीत होते, आहेत आणि राहतील. कारण या शब्दांत आमची संस्कृती, आमचं विश्व सामावलं आहे. या दोन शब्दांनी जगन्मातेच्या चरणांवर सर्वस्व समर्पणाची जी भावना उत्पन्न होते त्याचं वर्णन शब्दात कसं करणार? कारण ’वंदे मातरम्’ आमची प्रत्येक भारतीयाची जणू जीवनप्रणालीच झाली आहे.
’वंदे मातरम्’!