सृष्टिनिर्मितीच्या वेळी देवीच्या मुखकमलातून बाहेर पडलेल्या ‘सर्वं खल्विदम् इव अहं नान्यदस्ति सनातनम्।’ या अर्धश्लोकाचेच नाव ‘श्रीमद्देवीभागवत’ असे आहे. हा श्लोकच देवी भागवताचा महामंत्र आहे. देवीने वटपत्रावर पहुडलेल्या विष्णुरूपी बालकाला सर्वप्रथम या महामंत्राचा उपदेश केला होता, ज्यातूनच सृष्टिनिर्मिती झाली, असा देवी भागवतात उल्लेख आहे. देवी भागवताच्या उपासनेने मनुष्य ‘सर्वज्ञ’ होतो, ही देवी भागवताची सर्वोत्तम फलश्रुती आहे. या शारदीय नवरात्रीनिमित्त ‘देवी भागवत’ या महापुराणाची यथामती ओळख करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.
आपल्या भारत राष्ट्रात पुरातन कालापासून आसेतुहिमाचल भगवती जगदंबेची आराधना अत्यंत श्रद्धेने अखंड केली जाते. देवीच्या शारदीय (आश्विन महिन्यातील), वासंतिक (चैत्र महिन्यातील) आणि शाकंभरी (पौष महिन्यातील) नवरात्रींच्या कालखंडात देवीची उपासना विशेषत्वाने, मोठ्या प्रमाणात आपण करतो. त्यासाठी आदिशक्तीचे स्वरूप, सामर्थ्य आणि पराक्रमांचे वर्णन करणारी श्रीसूक्तासारखी सूक्ते, स्तोत्रे, अष्टोत्तरशतनाम (108 नावे) व ललिता सहस्रनामासारख्या भवानी, सरस्वती, लक्ष्मी, काली अशा अनेक सहस्रनामावल्या, भजने, प्रासादिक आख्याने आणि पोथ्या-ग्रंथ प्राचीन वाङ्मयांत उपलब्ध आहेत. व्यक्तिगत आणि सामूहिक पातळ्यांवर कुंकुमार्चन, जोगवा, गोंधळ इ. उपासना पद्धती प्रचलित आहेत. भगवतीने महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वतीच्या सगुण रूपांमध्ये अवतरून सत्प्रवृत्तींचे - सत्धर्माचे प्रतिपालन करण्यासाठी असत् प्रवृत्तींचे आणि त्यानुसार वर्तन करणार्या मदोन्मत्त दैत्यांचे कशा प्रकारे निर्दालन केले हा इतिहास ‘श्रीदुर्गा सप्तशती’ या मार्कंडेय पुराणातील निश्चितपणे ईप्सितप्राप्ती करणार्या उपासनेद्वारे आपल्याला समजतो.
भारतीय संस्कृतीतील ब्रह्म, पद्म, विष्णू (श्रीमद्भागवत), वायू, नारद, मार्कंडेय, अग्नी, भविष्य, ब्रह्मवैवर्त, वराह, लिंग, स्कंद, वामन, कूर्म, मत्स्य, गरुड, ब्रह्मांड, देवी या अठरा पुराणांपैकी अतिशय महत्त्वाचे मानले गेलेले एक पुराण म्हणजे ‘देवी भागवत’ होय. त्याशिवाय, श्रीविष्णुधर्मोत्तर, आदि, गणेश, नरसिंह, कपिल, कालिका, वरुण, कल्की, हरिवंश अशी काही उपपुराणेही आहेत. काही विद्वान लोक देवी भागवताला महापुराण मानत नाहीत, तर उपपुराण मानतात. शाक्तभक्त मात्र देवी भागवतास ‘महापुराण’ मानतात. आदिनारायण श्रीविष्णूंच्या अवतारांचे, कार्याचे, पराक्रमकथांचे वर्णन करणारे, लोकप्रिय असे ‘श्रीमद्भागवतपुराण’ आणि आदिशक्तीच्या विविध रूपांचे, लीलांचे, उपासनांचे वर्णन करणारे ‘श्रीमद्देेवीभागवत’ ही दोन महापुराणे एकाच निर्गुण परमात्म तत्त्वाच्या पुरुष आणि प्रकृती यांच्या सगुण स्वरूपांचे आविष्कार आहेत. या दोन्हीही महापुराणांमध्ये बाराच स्कंध आणि अठरा हजारच श्लोक आहेत. या दोन्हीही महापुराणांचे रचयिते कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास हेच आहेत. या दोन्हीही महापुराणांचे लक्ष्य जीवाला अभ्युदय (ऐहिक सुखोपभोग) म्हणजेच धर्माच्या पायावर आधारित अर्थ आणि काम या पुरुषार्थांची प्राप्ती करून देऊन निःश्रेयस (पारमार्थिक कल्याण) म्हणजेच आत्मसाक्षात्कार/आत्मज्ञान/मोक्षप्राप्तीसाठी प्रेरित करण्याचे आहे, असे दिसून येते. त्यापैकी ‘अभ्युदय’ हा मायेच्या अधीन असतो, तर ‘निःश्रेयस’ ब्रह्माच्या अधीन असते.
देवी भागवतात धनसंपत्ती प्राप्त करून देणारी ‘लक्ष्मी’, विद्या प्रदान करणारी ‘सरस्वती’, स्त्रियांना पातिव्रत्याचा लाभ व्हावा म्हणून पूजिली जाणारी ‘पार्वती’, सर्वत्र मंगलत्वाचे साम्राज्य निर्माण व्हावे यासाठीची ‘मंगळागौर’, मनासारखा पती मिळण्यासाठी कठोर तप:साधना करणारी ‘अपर्णा’, यमापासून पतीचे प्राण बुद्धिचातुर्याने परत मिळवणारी ‘सावित्री’, अन्नसमृद्धी करणारी गणेशाबरोबरची ‘गौरी’, प्रापंचिक संकटांपासून रक्षण करणारी ‘दुर्गा’, दुष्टांचा संहार करण्याची ख्याती असलेली ‘काली’ यांच्या कथा तर आहेतच, शिवाय, ‘दुर्गा’ हेच विश्वातील परम (श्रेष्ठ) तत्त्व आहे असे मानून मूलप्रकृतीपासून मणिद्वीपात निवास करणार्या भुवनेश्वरीपर्यंत देवीच्या अनंत रूपांच्या अनंत अद्भुतरम्य कथा वर्णिलेल्या आहेत. गंगा (नदी), रेवती (नक्षत्र), तुलसी, षष्ठी (सटवाई), पुष्टी, तुष्टी, संपत्ती यांनाही दुर्गेचीच रूपे मानून त्यांच्या उत्पत्तीकथा व उपासना सांगितल्या आहेत.
पृथ्वी, सुरभी (गोमाता), राधा, दुर्गा, गायत्री, समुद्रमंथनातून प्रकट झालेली लक्ष्मी, अग्निपत्नी स्वाहा आणि स्वधा, दक्षिणादेवी, मंगलचंडी, मनसादेवी, जिवंतिका (जिवती, मनुष्याच्या गर्भ, शिशू, बालक, कुमार, युवक, प्रौढ, वृद्ध या सप्त अवस्थांचे प्रतीक असलेल्या सात बालकांची माता), विन्ध्यनिवासिनी (श्रीकृष्णाची अनुजा, कंसाच्या हातून निसटून विजेसारखी आकाशात विलीन झालेली नंद-यशोदेची कन्या), भुवनेश्वरी देवी यांच्या कथा व कार्य ‘देवी भागवतात’ सांगितले आहे. या चराचर जगतात ज्या ज्या सजनशील शक्ती आहेत, ती सर्व दुर्गेचीच रूपे मानली आहेत. या निकषानुसार आई, बहीण, पत्नी, मुलगी, वहिनी, मैत्रीण ही सारीदेखील दुर्गेचीच रूपे मानणे ही आजच्या काळाची नितांत गरज आहे. शक्तीशिवाय शिव म्हणजे कोणतेही पुरुष रूप अपूर्ण आहे, असे देवी भागवताचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन आहे.
मुख्य विषय ‘देवीमाहात्म्य’ कथन करता करता श्रीकृष्णचरित्राचा, श्रीरामचरित्राचा काही भाग, महाभारत-रामायणातील काही कथा, देव-दानवांच्या युद्धांमध्ये देवीने केलेले साहाय्य; वृत्रासुर, नहुष राजा, लक्ष्मीपुत्र एकवीर, च्यवन मुनी (ज्यांनी च्यवनप्राशाची निर्मिती केली), सत्यवचनी राजा हरिश्चंद्र, शंखचूड राक्षस (पूर्वाश्रमीचा सुदामा), वेदवती (सीतेची छाया, जी रावणाच्या कैदेत सीतेऐवजी राहिली होती आणि श्रीव्यंकटेशावतारात पद्मावती रूपात पत्नी म्हणून विष्णूंनी जिचा स्वीकार केला, ती.), सत्यवान-सावित्रीच्या कथेतील सावित्रीने धर्मराजाशी (यमाशी) केलेली बौद्धिक चर्चा, गायत्री पुरश्चरण कसे करावे, सारस्वत बीजमंत्राचे (ऐं) चे महत्त्व, नवरात्र व्रत विधी, चित्तशुद्धी कशी होते, त्रिविध कर्म, युगधर्म म्हणजे काय, तीर्थ आणि तीर्थक्षेत्रांचे महत्त्व, व्रते-उत्सव-पूजनाचे प्रकार, सदाचार वर्णन, जगदंबेच्या दुर्गा, शताक्षी, शाकंभरी या नावांचा इतिहास, एकावन्न शक्तिपीठांची नावे, स्थाने व कथा, नरकाचे वर्णन आणि तिथल्या शिक्षा, ग्रह, सप्तपाताळे, मानवी शरीरातील सप्तचक्रांमध्ये वसत असलेल्या ‘क ते ज्ञ’पर्यंतच्या वर्णांचे स्थान, वर्णोपासनेतून कुंडलिनी जागृत करण्याचे तंत्र, योगासने, प्राणायाम, ध्यान या साधनांविषयीचा देवीचा ज्ञानोपदेश, ब्रह्मस्वरूपाचे प्रतिपादन, वय वर्षे 2 ते 10 च्या कन्यांचा अनुक्रमे कुमारी, त्रिमूर्ती, कल्याणी, रोहिणी, कालिका, चंडिका, शांभवी, दुर्गा, सुभद्रा या नावांनी करावयाचा ‘कुमारीपूजन’ विधी, दुर्गा सप्तशतीतील महिषासुर, चंड-मुंड, शुंभ-निशुंभ, धूम्रलोचन, रक्तबीज आणि हजारो राक्षसांच्या निःपाताचे देवीच्या पराक्रमांचे वर्णन, मणिद्वीप (भगवतीचे निवासस्थान) आणि शेवटी देवी भागवताच्या पठण-श्रवणाची फलश्रुती असे ‘देवी भागवताचे’ थोडक्यात स्वरूप सांगता येईल.
‘देवी भागवतातून आपण काय शिकायचे’ हे पाहू या - देवी भागवतातील पाचव्या स्कंधात श्रीदुर्गासप्तशतीचा सर्व कथाभाग आला आहे. याकडे केवळ पोथिनिष्ठेने न पाहाता त्यातील उदात्त तत्त्वे घेण्याचा प्रयत्न करू या -
1) ब्रह्मदेवाने योगनिद्राशक्तीचे स्तवन करून विष्णूंना जागे केले आणि विष्णूंनी मधु-कैटभ राक्षसांचा विनाश केला. समाजपुरुषाची सत्त्वशक्ती (श्रीविष्णू हे त्या शक्तीचे प्रतीक) जेव्हा निद्रिस्त होते, तेव्हा आसुरी शक्ती (मधु-कैटभ राक्षस) माततात. ही सत्त्वशक्ती जागृत करण्याचे काम यथाशक्ती करून त्या सत्त्वशक्तीला मदत करणे, ही खरी शक्ती उपासना आहे.
2) स्वतःतील सुप्त शक्तीही जागृत केल्याशिवाय कोणतेही कार्य होणार नाही. त्यासाठी कठोर तपःसाधना केली पाहिजे. ‘सामर्थ्य आहे चळवळीचे। जो जो करील तयाचे। परंतु तेथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे’॥ हे समर्थवचन आपण जाणतोच. प्रत्येक देवाने, एवढेच नव्हे तर दानवांनीही ध्येयपूर्तीसाठी आधी तपश्चर्या करून मग पराक्रम केले आहेत. असे पुष्कळ दाखले पौराणिक वाङ्मयात आढळतात.
3) पाशवी शक्तीवर बुद्धिकौशल्याने मात करता येऊ शकते.
4) जेव्हा देव राक्षसांशी एकेकटे लढत होते, तेव्हा ते असुरांकडून पराजित होत होते; परंतु ते जेव्हा संघटित झाले, तेव्हा त्यांचे क्रोधतेज एकवटून महालक्ष्मी नावाची शक्ती निर्माण होऊन तिने महिषासुराचा (तामसी शक्तीचा) वध करून विजय मिळवला. आजही आपल्याला देव, देश अन् धर्मासाठी संघटित होऊन, आपले तपोबल वाढवून व्यावहारिक पराक्रमही करण्याची गरज निर्माण झाली आहे.
5) शुंभ-निशुंभांचे निर्दालन करण्यासाठी देवांनी पार्वतीची प्रार्थना केल्यावर तिच्या शरीरातून ब्राह्मी, वैष्णवी, माहेश्वरी, कौमारी, ऐंद्री, नारसिंही, वाराही या शक्ती बाहेर पडल्या. कोणत्याही चांगल्या कार्यासाठी एखादी शक्ती जेव्हा पुढे येऊन कामाला सुरुवात करते, तेव्हा इतर अनेक प्रकारच्या शक्ती आपोआप ‘सह वीर्यं करवावहै’ म्हणजे ‘एकत्र पराक्रम करू या’ या न्यायाने तिच्या साहाय्यासाठी धावून येतात.
6) नवरात्री काळात ‘कुमारीपूजन’ अवश्य करावे; पण व्यवहारात वागतानाही कोणत्याही वयाच्या प्रत्येक स्त्रीचा सन्मान करावा. देवी भागवत आपल्याला संघशक्ती, श्रद्धा, विवेक, संयम, सामंजस्य, बुद्धिचातुर्य आणि स्त्री सन्मान अशी उदात्त असंख्य नीतिमूल्ये शिकवते.
देवी भागवतात याज्ञवल्क्यरचित सरस्वती कवच, गायत्री सहस्रनाम तसेच दुर्गा, भुवनेश्वरी, मधुमती (भगवान दत्तात्रेयांची शक्ती जिला अनघाही म्हणतात), पृथ्वी, राधा, तुलसी, सावित्री, सुरभी, महालक्ष्मी, स्वाहा (देवांना अग्नीद्वारे आहुती पोहोचवणारी देवता), स्वधा (पितरांना अग्नीद्वारे आहुती पोहोचवणारी देवता), मनसादेवी, गायत्री, आदिशक्ती, विष्णू या देव-देवतांची स्तोत्रे समाविष्ट केली आहेत. सृष्टिनिर्मितीच्या वेळी देवीच्या मुखकमलातून बाहेर पडलेल्या ‘सर्वं खल्विदम् इव अहं नान्यदस्ति सनातनम्।’ या अर्धश्लोकाचेच नाव ‘श्रीमद्देवीभागवत’ असे आहे. हा श्लोकच देवी भागवताचा महामंत्र आहे. देवीने वटपत्रावर पहुडलेल्या विष्णुरूपी बालकाला सर्वप्रथम या महामंत्राचा उपदेश केला होता, ज्यातूनच सृष्टिनिर्मिती झाली, असा देवी भागवतात उल्लेख आहे. देवी भागवताच्या उपासनेने मनुष्य ‘सर्वज्ञ’ होतो, ही देवी भागवताची सर्वोत्तम फलश्रुती आहे.