सर्जन-सौंदर्याचा उत्सव

विवेक मराठी    07-Oct-2024
Total Views |
 
@अमृता खंडेराव
 
उत्सव मनुष्याच्या मनात नवचैतन्य जागवतात. प्रत्येक उत्सवाचे एक वेगळे वैशिष्ट्य असते. दैनंदिन रटाळ आणि कंटाळवाण्या जीवनात उत्सव म्हणजे चैत्रपालवी. अमूर्ताला वेगवेगळ्या रूपांत साकार करून त्याचे पूजन करण्यासाठी देवतांची निर्मिती झाली असावी. मनुष्य सकारात्मक प्रवृत्तींना दैवताचे रूप देतो आणि साकार स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करतो. उत्सवात रांगोळी, वेगवेगळ्या प्रकारची सजावट, मूर्ती घडविणे अशा वेगवेगळ्या कलांमधून मनातले सौंदर्य बाहेर काढले जाते. उत्सव म्हणजे सौंदर्याची पूजा. नवरात्र उत्सव याला अपवाद कसा असेल.

Yawatmal
 
नवरात्र हा सर्जनाचा उत्सव आहे. मुबलक पावसानंतर जमीन थंड होते आणि तिच्या पोटातील उष्णता बाहेर पडते तो हा ऋतू. या काळात बीज उगविण्यासाठी अतिशय पोषक वातावरण असते. काळ्या मातीच्या मध्यभागी मातीचाच कलश ठेवून त्या मातीत बीजारोपण केले जाते. मातीच्या कलशातून झिरपणार्‍या पाण्याने नऊ दिवसांत अंकुर तरारून येतात आणि सर्जनाचा हिरवागार सोहळा डोळ्यादेखत पार पडतो.
 
 
मातीच्या उदरात बीज टाकल्यानंतर ते हिरव्यागार रोपाच्या रूपात तरारून बाहेर येणे ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सुंदर आणि आश्वासक असते. शेतकरी बारा महिने खपून हा उत्सव साजरा करत असतो; परंतु ज्यांच्याकडे शेती नाही त्यांना घरात डोळ्यासमोर हिरवं धान उगवताना पाहून समाधान मिळतं ते नवरात्रात.
 
 
रसमयी लता
विनिता तेलंग लिखित लतादीदींनी गायिलेल्या नवरसांवरील गाण्यांच्या रसास्वादाचे पुस्तक…
 
साहित्य, संगीत क्षेत्राची आवड असलेल्यांसाठी खास मेजवानी…
 
पुस्तकाच्या मॅटर सहित लतादीदींचे सुंदर पोट्रेट, लतादीदींच्या विविध भावमुद्रांची रंगीत चित्रं आणि हार्डबाऊंडिंग कव्हर ही या पुस्तकाची खास वैशिष्टये…
 
 
 
या सणाचा मातृशक्तीशी संबंध जोडलेला आहे. मातृत्व इतकं महत्त्वाचं का मानलं गेलं आहे? आपल्या जीवासारखा नवा जीव उत्पन्न करण्याची क्षमता ज्या शरीरात आहे त्या शरीराचे आकर्षण आणि मोल मनुष्याच्या मनाला सदैव वाटले आहे. जीव जन्माला आल्यानंतर पहिल्यांदा मातेचे दूध प्राशन करतो. आईचे दूध हे पहिले अन्न असते. त्यामुळे दूध देणारी माता ही अन्नपूर्णा मानली गेली आहे.
अपत्य जन्माला घालणारी, स्वत:च्या दुधाने त्याची भूक भागविणारी, अन्न तयार करून घरादाराचे पोट भरणारी अशी, त्याग-माया आणि करुणेची मूर्ती म्हणून स्त्रीला देवीच्या रूपात पूजले जात असावे. देवीचे पूजन करण्याच्या अनेक पद्धती आहेत. तिला दुर्गा आणि सरस्वती दोन्ही रूपांत पूजले जाते. नवरात्रात नऊ दिवस तिची नऊ रूपे साकार केली जातात.

Yawatmal 
 
यवतमाळचा नवरात्रोत्सव हा कोलकात्याच्या खालोखाल मानला जातो. अनेक वर्षांपूर्वी बंगालमधले लोक इथे येऊन स्थायिक झाले आणि त्यांनी दुर्गापूजेची सुरुवात केली, असे सांगितले जाते. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे गणेशोत्सवात वेगवेगळ्या आरास केल्या जातात त्याप्रमाणे यवतमाळमध्ये दुर्गापूजेच्या मंडपात वेगवेगळ्या आरास केल्या जातात. नऊ दिवस संपूर्ण यवतमाळ रात्री देवी पाहायला निघते. आबालवृद्धांना या मूर्तींचे आणि उत्सवाचे मोठे आकर्षण वाटते. यवतमाळच्या मूर्तिकारांनी तयार केलेल्या मूर्ती या इतक्या जिवंत असतात, की समोर खरोखर कोणी कारुण्यरूपिणी स्त्री उभी आहे असे वाटते. दुर्गापूजा उत्सवाच्या निमित्ताने मूर्तिकारांपासून ते मंडप सजावट करणार्‍यांपर्यंत हजारो हातांना रोजगार मिळतो. गोरगरिबांना मोठे अन्नदान केले जाते. लोक देवीला साडी अर्पण करतात. अनेक मंदिरे आणि मंडळांतर्फे या साड्यांची नंतर विक्री करतात. भाविक आणि श्रद्धाळू लोक या साड्या विकत घेतात. मी काही मंडळांकडून साड्या मागून गरीब व गरजू महिलांना वाटल्या आहेत.
 
 
उत्सव मनुष्याच्या मनात नवचैतन्य जागवतात. प्रत्येक उत्सवाचे एक वेगळे वैशिष्ट्य असते. दैनंदिन रटाळ आणि कंटाळवाण्या जीवनात उत्सव म्हणजे चैत्रपालवी. अमूर्ताला वेगवेगळ्या रूपांत साकार करून त्याचे पूजन करण्यासाठी देवतांची निर्मिती झाली असावी. मनुष्य सकारात्मक प्रवृत्तींना दैवताचे रूप देतो आणि साकार स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करतो. उत्सवात रांगोळी, वेगवेगळ्या प्रकारची सजावट, मूर्ती घडविणे अशा वेगवेगळ्या कलांमधून मनातले सौंदर्य बाहेर काढले जाते. उत्सव म्हणजे सौंदर्याची पूजा. नवरात्र उत्सव याला अपवाद कसा असेल.
 
 
 
पंचमहाभूतांचे अव्याहतपणे फिरणारे निसर्गचक्र हा प्रत्येक सर्जनामागचा कार्यकारणभाव असतो.
 
यवतमाळमध्ये वेगवेगळ्या मंडपांत गरबा, दांडिया-रास खेळला जातो. हजारो तरुणी नटूनथटून खेळाचा आनंद लुटतात. टिपर्‍यांच्या तालावर बेधुंद होऊन नाचतात. नृत्य हासुद्धा एक तालबद्ध खेळ आहे. गणेशोत्सवात कोकणात ज्याप्रमाणे वेगवेगळी लोकनृत्ये सादर केली जातात त्याप्रमाणे नवरात्रातही गरब्याचे महत्त्व आहे.
 
 
अखेर उत्सव म्हणजे जगण्याची ओढ बळकट करण्याची साधने आहेत. सामाजिक सलोखा, संघवृत्ती, अनुशासन, सामाजिक सहकार्य आणि सौहार्द, समायोजन, खेळ, कौशल्ये, व्यापार, कला या सर्वांचा सुखकर मेळ म्हणजे उत्सव. नवरात्र उत्सव याला अपवाद कसा असेल...