न थकणारा एक आदर्श स्वयंसेवक

विवेक मराठी    11-Nov-2024
Total Views |
@रतन शारदा
संघकार्य हा विमलजींचा मूळ पिंड आहे. रोजच्या शाखा आणि संघटनेच्या कामापेक्षा त्यांच्यासाठी उत्साहवर्धक अन्य काही नाही. ‘मी फक्त आठ तास व्यवसायासाठी देईन, बाकीचा वेळ संघकार्यासाठी असेल.’ या प्रतिज्ञेशी त्यांनी तडजोड केली नाही. खर्‍या अर्थाने विमलजी हे गृहस्थी प्रचारक आहेत. विमलजींच्या मनात कधीही कल्पना आणि नवकल्पनांची कमतरता नसे. ‘लोकांशी संपर्क साधा आणि लोकांना जोडा, बाकी सर्व काही होईल,’ हा त्यांचा सर्वात महत्त्वाचा मंत्र आहे.
 
 
rss
 
मी येणार नव्हतो; परंतु काय करणार, विमलजींनी बोलावले त्यामुळे यावे लागले! - आपल्यापैकी अनेकांना संघशाखेवर वर्षानुवर्षे न आलेल्या किंवा सक्रिय नसलेल्या मित्रांकडून हे वाक्य ऐकायला मिळते. कोणताही प्रचारक नसलेल्या किंवा अखिल भारतीय स्तरावर अधिकारी नसलेल्या; परंतु आपल्यानिःस्वार्थ प्रेमाने माणसांना जोडून ठेवणार्‍या, फक्त एखाद्या कामासाठी आपली आठवण न काढणार्‍या; परंतु आपल्या सर्व समस्यांची जाणीव ठेवून ती सोडवण्याचा प्रयत्न करणार्‍या व्यक्तीबद्दलचा हा आदर असतो. कोणत्याही आदर्श स्वयंसेवकासाठीचा हा संघस्पर्श आणि संघटनसूत्र असतो.
 
पुन्हा अखंड भारत कसा निर्माण होईल? त्याची संकल्पना काय? अतिशय महत्त्वाचा आणि आपल्या विचारधारेचा हा विषय समजून घेण्यासाठी...

https://www.vivekprakashan.in/books/akhand-bharat/

 
 
विमलजी पार्ल्याला आले तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. माझे मोठे बंधू प्रेमजी यांनी भरविलेल्या पहिल्या तरुण शाखेचे ते स्वयंसेवक होते. मी त्या वेळी किशोरवयीन कार्यकर्ता होतो. मी त्यांच्या शाखेचा कधीही स्वयंसेवक नव्हतो किंवा त्या मंडलात नव्हतो. मात्र मला चांगले मार्गदर्शक नाहीत, ही गोष्ट ओळखून ते त्यांच्या हनुमान सायंशाखेत जेव्हा जेव्हा चांगला कार्यक्रम असेल तेव्हा मला बोलवत असत, अगदी बैठकांनाही. ते मला त्यांच्या घरगुती कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेत, मी काय करतोय याची खबरबात ठेवत तसेच माझे संघकार्य चांगले होण्यासाठी सूचना करत. मी जसजसा प्रगल्भ होत गेलो तसतसे त्यांच्या या लक्ष देण्याचे महत्त्व माझ्या लक्षात आले. दुर्लक्ष झाल्यामुळे मी बाजूला पडू नये याची काळजी ते घेत होते. हे अबोल पालकत्व होते. मी पार्ल्याहून पवईला गेलो तेव्हा ते माझी माहिती ठेवत असत, विचारपूस करीत असत. विभाग संघचालक म्हणून माझी नियुक्ती झाली तेव्हा ते माझ्या कार्य आणि प्रवासाबद्दल चौकशी करत असत. माझ्या प्रवासादरम्यान आपल्या विभागात कुठेही त्यांच्याबद्दल बोलणे, ही माझ्यासाठी आनंदाची आणि भावुक करणारी गोष्ट होती. अगदी वीस वर्षांनंतरही त्यांनी घरी येऊन भेट दिल्याची आठवण लोक प्रेमाने काढत. महानगर सहकार्यवाह आणि कार्यवाह म्हणून आपल्या कार्यकाळात संपूर्ण मुंबईत त्यांनी जेवढा प्रवास केला आणि हजारो लोकांच्या जीवनाला स्पर्श केला तसे कोणी कार्यकर्त्याने केले असेल असे मला वाटत नाही.
 
 
गुरुजी गोळवलकर जीवनचरित्र
@रंगा हरी
गोळवलकर कुलवृत्तांतापासून त्यांच्या पूर्णाहुतीपर्यंत विस्तृत माहिती या जीवनचरित्रात वाचायला मिळते.
https://www.vivekprakashan.in/books/shri-guruji-golwalkar-biography/
 
 
एका मारवाडी कुटुंबातील तरुण इंजिनीयर मुलाने व्यवसायात हातभार लावायला सुरुवात केली तेव्हा एक प्रतिज्ञा केली, मी फक्त आठ तास व्यवसायासाठी देईन, बाकीचा वेळ संघकार्यासाठी असेल. आपला हा व्यवसाय मुलगा आणि पुतण्याच्या हाती सोपवेपर्यंत त्यांनी कधीही या प्रतिज्ञेशी तडजोड केली नाही. खरे तर व्यवसायासाठीचा वेळ कमी-कमीच होत गेला. विवाहानंतर संघाबद्दल काहीही माहिती नसलेल्या आपल्या पत्नीला त्यांनी सांगितले, की संघकार्यासाठीच्या आपल्या समर्पणामुळे आठवड्यातून केवळ तीन-चार तास ते त्यांना देऊ शकतील आणि एवढी वर्षे त्यांनी अत्यंत नेटाने तो वेळ वहिनी व कुटुंबासाठी दिला आहे. त्यांच्या मोठ्या भावाने जेव्हा त्यांना सांगितले, आपला व्यवसाय एवढा उत्तम चालू आहे, तो तू वाढवत का नाहीस? विमलजी अत्यंत सहजपणे म्हणाले, तुम्ही जरूर वाढवा; परंतु मी जास्त वेळ देऊ शकणार नाही. त्यांच्या या कटिबद्धतेमुळेच विनोद तावडे म्हणाले, विमलजी हे गृहस्थी प्रचारक आहेत.
 

vimal kediya 
 
इतर कार्यकर्त्यांप्रमाणे मलाही संघकार्यात चढ-उतार पाहावे लागले आहेत. माझ्या व्यवसायाच्या अत्यंत कठीण काळात मी संघाचे दैनंदिन काम सोडून दिले होते. मी पैसे कमावण्यात व्यग्र आहे, असे गृहीत धरून बहुतेक कार्यकर्त्यांनी मला वार्‍यावर सोडून दिले होते. वास्तवात मी पैसे गमावण्यात बुडालो होतो. माझी व्यथा फक्त विमलजींनाच समजली. ’कुछ भी जरूरत हो बता देना’ हे त्यांचे अत्यंत मोजके शब्द मला पुढे नेण्यासाठी पुरेसे होते. फक्त फोन कॉल केला की निधीची व्यवस्था होईल. ते मला भेटायला बोलवायचे ते केवळ मी कसा आहे, यावर लक्ष ठेवण्यासाठी. ते कधीही स्वयंसेवकाला सोडून देत नाहीत. त्याच्यासाठी ’काम का नहीं रहा’, ’इसमें यह या वह कमी है, छोड़ दो’ असे शब्द त्यांच्या शब्दकोशात नसतात. अनेक विद्वान माणसे हा मंत्र उद्धृत करतात - ’अमंत्रम् अक्षरं नास्ति, नास्ति मूलम् अनौषधः। अयोग्यः पुरुषः नास्ति, योजकस्तत्र दुर्लभः॥’ निरुपयोगी असा कोणताही शब्द, वनस्पती किंवा व्यक्ती नसते, फक्त चांगला संघटक सापडणे कठीण असते. हा मंत्र त्यांनी आत्मसात केला. एखाद्या स्वयंसेवकाला कधीही सोडून द्यायचे नाही, हे मीही त्यांच्याकडून शिकलो.
 
 
कोणत्याही स्वयंसेवकातील गुण हेरून त्यांचा संघकामासाठी उपयोग करून घेण्याची त्यांची क्षमता सर्वज्ञात आहे. एखाद्या व्यक्तीच्या क्षमतेचा अंदाज घेतल्यानंतर ते पूर्ण विश्वासाने त्याच्यावर जबाबदारी सोपवतात. हा विश्वास कोणालाही त्यांच्या विश्वासास पात्र सिद्ध होण्यासाठी कठोर परिश्रम करण्यास भाग पाडतो. संघ कार्यकर्ता म्हणून माझा बहुतेक यशस्वी कार्यकाळ हा त्यांच्यामुळे होता. अनेक दायित्वांपैकी नगर कार्यवाह, इ.स. 2000 चे विश्व संघ शिबीर आणि 2003 मधील प्राचीन सभ्यतांमधील ज्येष्ठांची आंतरराष्ट्रीय परिषद हे उल्लेखनीय आहेत. संपूर्ण व्हीएसएसमध्ये ते आघाडीवर असले तरी ते माझ्यावर विश्वास टाकू शकतात, हे त्यांना माहीत होते.
 
 
rss
 
जेव्हा मी फक्त छंद म्हणून सहज लिहीत होतो आणि पुस्तकांचे संपादन करत होतो तेव्हा लेखक म्हणून माझ्यातील प्रतिभा ओळखणारे ते सर्वात पहिले होते. उषा वहिनींना जेव्हा काही लिहायचे होते, तेव्हा ते मला सहज म्हणाले, रतन, उषाने कुछ लिखा है, छापना है, जरा देख लो. त्यानंतर पुस्तकाचे काम कसे चालू आहे, अंतिम डिझाईन कोणती आहे, वगैरे एकही प्रश्न त्यांनी मला विचारला नाही. वहिनींसाठी मी चार पुस्तके संपादित करून डिझाईन केली आणि त्याला त्यांचा निर्विवाद पाठिंबा होता. त्यानंतर त्यांच्या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन व्हावे यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. लालकृष्ण अडवाणी, ज्यांना ते प्रेमाने दादा म्हणतात, त्यांचाही त्यामध्ये समावेश होता. ते नसते तर मी कदाचित लेखक झालो नसतो.
 
 
त्यांच्या माझ्यावरील विश्वासाचा आणखी एक प्रसंग आठवतो. एके दिवशी अचानक विमलजींचा फोन आला. ते मला म्हणाले, मी माननीय रंगा हरीजींसोबत बसलो आहे. श्रीगुरुजींविषयीची त्यांची दोन पुस्तके हिंदीतून इंग्रजीत अनुवादित व्हावीत, अशी त्यांची इच्छा आहे. आतापर्यंत आलेल्या भाषांतराच्या तीन नमुन्यांवर ते समाधानी नाहीत. तुला ते करावं लागेल. मी स्तब्ध झालो. हरीजींच्या बुद्धिमत्तेबद्दल आणि लिखाणाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर होता. संस्कृतनिष्ठ अत्यंत ’शुद्ध’ हिंदीत ते लिहीत असत. अर्थात इंग्रजीसह सात भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्याचे झाले असे, की विमलजी उषा वहिनींसोबत सुट्टीवर गेले होते आणि कोची कार्यालयात हरीजींना भेटायला गेले होते. तेव्हा हरीजींनी सहज ओघात आपली समस्या सांगितली. जिथे इतर अपयशी ठरले तिथे एवढी मोठी जबाबदारी स्वीकारण्याची मला काळजी वाटत होती. तेव्हा मी त्यांना म्हणालो, मला 30-40 पाने करून पाहू द्या. हरीजींनी मान्य केले तर मी काम पूर्ण करीन. नंतर घडले असे, की हरीजी माझ्या कामावर खूप खूश झाले. त्यामुळे श्रीगुरुजींचे चरित्र आणि त्यांचे ’दृष्टी आणि ध्येय’ हे पुस्तक मला यशस्वीरीत्या पूर्ण करता आले. हरीजींचे भरभरून कौतुक आणि त्यांच्याशी असलेले वैयक्तिक नाते यांचा आशीर्वाद मला लाभला, हे सर्व विमलजींमुळे झाले.
 
 
पुन्हा अखंड भारत कसा निर्माण होईल?
त्याची संकल्पना काय?
अतिशय महत्त्वाचा आणि आपल्या विचारधारेचा हा विषय समजून घेण्यासाठी ‘अखंड भारत का आणि कसा? पुस्तकाची प्रत आजच नोंदवा.
https://www.vivekprakashan.in/books/akhand-bharat/
 
 
 
ते अतिशय मितभाषी आहेत आणि सहसा आपली भावनिक बाजू लोकांच्या नजरेपासून दूर ठेवतात. एकदा मी माझ्या पुस्तकाबद्दल चर्चा करत असताना त्यांनी मला संघगीत हे खरोखर संघकार्याच्या विविध टप्प्यांचे प्रतिनिधित्व कसे करते हे सांगितले. ध्येय आणि जनतेशी घट्ट भावनिक नाते असल्याशिवाय कोणीही 55 वर्षांहून अधिक काळ अविरतपणे, कधीही विश्रांती न घेता काम करू शकत नाही. शेवटी, वर्षातून एखाद्या वेळेस शरीर हार मानते. मग ते हलकेच म्हणतात, डॉक्टर (त्यांचा धाकटा भाऊ राजू), बस कहीं नहीं जाना, तीन दिन रेस्ट लो, कोई दवाई की जरूरत नहीं. इसलिए घर पर हूं. शस्त्रक्रियेशिवाय पर्यायच उरला नाही तोपर्यंत त्यांनी तीव्र पाठदुखीही हलक्यातच घेतली. मणक्याचे ऑपरेशन झालेल्या अन्य कोणाहीपेक्षा ते त्वरेने बरे झाले. एखाद्या स्वयंसेवकाच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असतानाही ते कार्यकर्तेच असतात. आमचा लाडका भाऊ शरद बोडस अनपेक्षितपणे आम्हाला सोडून गेला तेव्हा त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळलेले मी पाहिले. सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीला एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा विमलला मोठा धक्का बसला होता, कारण असं होईल हे कुणालाच वाटलं नव्हतं, असं जग्गू बालिगा यांनी मला सांगितलं होतं.
 
 
 
संघकार्य हा विमलजींचा मूळ पिंड (अंगभूत स्वभाव) आहे. रोजच्या शाखा आणि संघटनेच्या कामापेक्षा त्यांच्यासाठी उत्साहवर्धक अन्य काही नाही. अभिमन्यू प्रभात शाखेतील त्यांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. या वयातही त्यांनी आखलेल्या भरगच्च शाखा कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी दररोज येणारे तरुण स्वयंसेवक त्यांनी मोठ्या संख्येने गोळा केले आहेत. आणीबाणीच्या काळात शाखा बंद पडल्या, तेव्हा ते आम्हाला वेगळ्या मैदानात नेत असत आणि शाखेशिवायच्या अन्य खेळांची मजा आम्ही अनुभवत असू. म्यानमारच्या काळात त्यांनी शिकलेला एक खेळ रिंग आणि काठीने खेळायचा होता. आम्ही त्याला ’रिंग-ओ-स्टिक’ हे नाव दिले होते. तो इतका लोकप्रिय झाला की, मी तो गेल्या वर्षी जैसलमेरमध्ये आणि परदेशातही पाहिला. ते सामाजिक काम आपल्याकडे येण्याची वाट पाहत नाहीत, ते स्वतः ते काम हाती घेतात. त्यांना कोणीही ग्राऊंडपासून दूर ठेवू शकत नाही. संघाच्या जबाबदार्‍यांतून मुक्त झाल्यावर पूर्ण जोमाने पुढे जात त्यांनी केशवसृष्टीला नवे आयाम दिले. केशवसृष्टीचे काम उत्तम असले तरी ते रखडले आहे, असे वाटल्यावर ते गावोगावपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि अशा प्रकारे केशवसृष्टीचा ग्रामविकास प्रकल्प जन्माला आला. सहा वर्षांत त्यांनी हा प्रकल्प 175 गावांपर्यंत पोहोचवला असून 30 गावे ’आदर्श ग्राम’ म्हणून जाहीर झाली आहेत. संघाला 100 वर्षे पूर्ण होत असताना 100 गावांना आदर्श ग्राम बनविण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
 
 
त्यांच्याबरोबर काम केलेल्या प्रत्येक व्यक्तीप्रमाणे, मीदेखील त्यांचे काटेकोर वेळ व्यवस्थापन, त्यांच्या डायरी आणि आपल्या विशिष्ट कार्यशैलीद्वारे शेकडो कुटुंबे आणि हजारो व्यक्तींशी संपर्क साधण्याच्या क्षमतेबद्दल बोलू शकलो, ज्यामुळे त्यांचे दिवस इतके फलदायी बनतात. याबद्दल अनेक लेखक सांगतील, याची मला खात्री आहे. आपल्याला सहसा दिसणार्‍या त्यांच्या गंभीर चेहर्‍यामागे एक हसतीखेळती व्यक्ती आहे. आजही त्यांच्यासोबत प्रवास करताना हा अनुभव येतो.
 
 
अगदी कोविडच्या काळातही लॉकडाऊनमुळे त्यांची शारीरिक हालचाल मर्यादित झाली असली तरी त्यांचे मन शांत राहू शकले नाही. आपल्या अनेक वर्षांच्या संघकार्याच्या आठवणी त्यांनी मोबाइलवर लिहायला सुरुवात केली. ते फक्त आपल्या असंख्य व्हॉट्सअ‍ॅप कॉन्टॅक्ट्सना त्या ते पाठवत असत. पुरेशा संख्येने त्यांनी या अत्यंत प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी कथा पोस्ट केल्या तेव्हा मी त्यांना म्हणालो, विमलजी, मला माहीत आहे की, तुम्ही तुमचे चरित्र किंवा संघकार्याच्या अनुभवांवर कोणतेही पुस्तक कधीही लिहिणार नाही. आम्ही तुमच्या या आठवणी पुस्तकरूपात मांडू शकतो. स्वयंसेवक कार्यकर्ता कसा विकसित होतो याची ही उत्तम उदाहरणे आहेत. जे लोक संघाला ओळखत नाहीत, त्यांच्यासाठी प्रत्यक्षात आपण जे परिणाम पाहतो त्यासाठी एक कार्यकर्ता किती मेहनत घेतो याचा धडा ठरेल. त्यांना लक्ष वेधून घेण्याची किंवा कौतुकाची सवय नसल्यामुळे ते त्याबद्दल समाधानी नव्हते. ही 2021 मधील घटना आहे. उषा वहिनी मला फोन करायच्या, रतन भाईसाहेब, आपके भैय्या माने की नहीं? उनको मनाओ. मैं कहती हूं तो टाल देते हैं. मी त्यांच्यामागे आहे, असे आश्वासन मी त्यांना देत असे. दर काही महिन्यांनी मी त्यांना आठवण करून द्यायचा प्रयत्न करायचो; पण ते एवढंच म्हणायचे, देखते हैं. अखेर त्यांच्या 75 व्या वाढदिवसाची बातमी पसरताच ते राजी झाले. त्यामुळे चार वर्षांच्या पाठपुराव्यानंतर ’संघ- जीवन की पाठशाला’ साकार झाले. हे पुस्तक वाचल्यावर लक्षात येतं की, विमलजी त्यांना भेटणार्‍या प्रत्येक व्यक्तीमध्ये गुण तर शोधतातच, पण प्रत्येक अधिकारी आणि कार्यकर्त्याचा प्रत्येक गुण आत्मसात करतात. अगदी त्यांच्या कनिष्ठांचाही, जेणेकरून अधिकाधिक शिकता यावं आणि त्याला आपल्या कामाचा भाग बनवता यावं.
 
 
विमलजींच्या मनात कधीही कल्पना आणि नवकल्पनांची कमतरता नसते. शाखा वार्षिकोत्सव असो किंवा त्यांच्या शाखेचे हस्तलिखित नियतकालिक असो किंवा राष्ट्रसेविका समितीच्या कार्यकर्तीला सायंशाखा उत्सवात बौद्धिकांसाठी बोलावणे असो किंवा संघाच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या नगरातील 50 वस्तींमध्ये 50 शाखांचे आयोजन करणे असो किंवा महानगर स्तरावर विशेष संपर्क योजना असो, संघाने विचार मांडण्यापूर्वीच ते ती राबवतात. विश्व संघ शिबिरासाठी आलेल्या स्वयंसेवकांसाठी यजमान कुटुंबांची कल्पना असो, शहरी तरुणांना ग्रामीण युवकांशी जोडून ग्रामीण उत्थानासाठी एकत्र काम करणे असो; ही यादी कितीही वाढविता येऊ शकते - ते कधीही दुसर्‍याला अचंबित करणे थांबवत नाहीत.
 
 
’लोकांशी संपर्क साधा आणि लोकांना जोडा, बाकी सर्व काही होईल,’ हा त्यांचा सर्वात महत्त्वाचा मंत्र आहे. लोकांना प्रकल्पात घेऊन जा आणि ते वेळ, सल्ला किंवा निधी देऊन नक्कीच योगदान देतील. खरोखरच त्यांच्या या दृष्टिकोनामुळे ते एक दंतकथास्वरूप निधी संकलक बनले आहेत. एखाद्या कारणासाठी योगदान देण्याकरिता एखाद्या अनोळखी व्यक्तीलादेखील पुढे येण्यास ते प्रवृत्त करू शकतात. मग ते डॉ. हेडगेवार हॉस्पिटल असो, केशवसृष्टी असो किंवा एकता सेवा संघ संचालित वैभव अशोक फाऊंडेशन असो; त्याचा हा एकच मंत्र आहे.
 
 
माझ्या मोठ्या बंधूंसोबत इतकी दशके काम करणे आणि खूप काही शिकणे, ही माझ्यासाठी आशीर्वाद स्वरुप आणि भाग्याची गोष्ट आहे.
 
 
अनुवाद : देविदास देशपांडे