@रवींद्र माधव साठे
मुंबई परिसरातील संघकार्य व संघसंबंधित संस्थांच्या विकासात विमलजींचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. तसेच मुंबईतील संघकामास व विशेष करून केशवसृष्टीला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी ज्या काही व्यक्तींनी प्रयत्न केले आहेत त्यात विमलजींचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. विमलजी आयुष्याची 75 वर्षे पूर्ण झाली तरी त्यांच्याकडील ऊर्जेचा स्रोत किंचितसुद्धा कमी झालेला नाही. म्हणूनच म्हणावेसे वाटते की, विमलजी केडिया हे अखंड ऊर्जेचा स्रोत आहेत.
विमलजी आणि माझा परिचय 1985 पासूनचा. मी त्या वेळी गोव्यात प्रचारक होतो. विमलजी यांच्या विलेपार्ले येथील संघकार्यातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यापूर्वी ऐकले होते. संघाच्या प्रांताच्या बैठकीत त्यांची नियमित भेट होत असे. जुलै 1992 मध्ये प्रचारकी जीवनास मी विराम दिला व गृहस्थी होण्याचा निर्णय घेतला. आता पुढे काय करायचे याबद्दल मुंबईतील संघ अधिकार्यांशी चर्चा करत होतो. मुंबई महानगर हे त्या वेळी संघरचनेतील एक ‘युनिट’ होते. स्व. वसंतराव तांबे यांच्याकडे महानगर कार्यवाह व विमल केडिया यांच्याकडे सहकार्यवाह अशी जबाबदारी होती. तांबे यांच्याशी चर्चा करताना त्यांनी मला रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे काम करण्यासंदर्भात आग्रही सूचना केली होती. त्याच वेळी विमलजींनीही मला पार्ले येथील घरी बोलावले होते व मी काय करावे याबाबत पर्यायही सुचविले होते. वसंतराव तांबे यांनी सुचविलेला पर्याय जेव्हा मी केडिया यांना सांगितला, त्यावर ते लगेच म्हणाले की, तांबेजीने आप को जो सुझाव दिया हैं उसका शीघ्र स्वीकार करो - इसके दो प्रमुख कारण है, एक तो प्रबोधिनी के अध्यक्ष प्रमोद महाजन है, और दूसरा यह कि इस संस्था को भविष्य हैं. पुढे विमलजी असेही म्हणाले की, प्रबोधिनी में जाने के बाद यदि आपको कभी भी महसूस हुआ कि मेरा नही जम रहा है तो बिना संकोच मेरे पास आओ, हम फिरसे विचार करेंगे. विमलजींचा प्रचारक संस्थेकडे बघण्याचा हा जो दृष्टिकोन होता, त्याचे हे एक द्योतक आहे. विमलजींनी मुंबईतील अनेक प्रचारक व संघ कार्यकर्त्यांना व्यावहारिक जीवनात स्थिरता लाभावी म्हणून उत्तम मार्गदर्शन व सहयोग दिला आहे व काहींना त्यांनी प्रत्यक्षात सामावून घेतले आहे. विमलजीस्वतःविषयी सांगताना एकदा मला म्हणाले की, रवी, मेरे जीवन की तो कहानी ऐसी है कि वैसे मैं शिक्षा से सिव्हिल इंजिनीयर हूँ. बर्मा से हम मुंबई आये तब घर की आर्थिक परिस्थिती उतनी ठीक नहीं थी, मैंने इंजिनीअर की डिग्री प्राप्त की थी, हमारे उपर कर्जे का बोज था इसीलिए मैंने नौकरी ढूंढने का मनोदय माँ के पास व्यक्त किया, तो माँ मुझे बोली, विमल, पागल हो क्या, नौकरी मत करो, व्यवसाय करो. ये लो मेरे गहने, उन्हें गिरवी रखो, लेकिन नौकरी मत करो.
विमलजींनी आपल्या आईचे म्हणणे ऐकले आणि तिचे शब्द खरे करून दाखवले. पुढील काळात विमलजी एक उत्तम असे यशस्वी उद्योजक बनले. ते आपल्या उद्योगात यशस्वी झाले यामागे त्यांच्या आईचा वाटा आहेच; परंतु विमलजींची मेहनत, उद्योगी स्वभाव आणि त्यांच्या कारखान्यामधील मशीनच्या प्रत्येक छोट्या स्क्रूपासून सर्व मशिन्सची इत्थंभूत माहिती, कोरोगेटेड शीट्स तयार होेण्याची प्रक्रिया, सर्व कर्मचार्यांशी असलेला जिवंत संपर्क, त्यांच्या क्षेमकुशलाची काळजी याही गोष्टी तितक्याच कारणीभूत आहेत. विमलजींनी आपल्या कोरोगेटेड बॉक्सेस व शीट्सच्या व्यवसायाच्या आधारे अनेक संघसंबंधित छोट्या उद्योजकांना या क्षेत्रात उभे केले.
विमलजींचा संपर्क व्यापक आहे. यात संघ स्वयंसेवक, संघ अधिकारी, उद्योजक, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते आदींचा समावेश आहे. गुणग्राहकता हे विमलजींचे एक वैशिष्ट्य. एखादी व्यक्ती संपर्कात आली की, त्या व्यक्तीमधील विशेष गुण ओळखून संघकामासाठी तिचा कसा आणि कुठे उपयोग करून घेता येईल, याचे विचारचक्र विमलजींच्या डोक्यात त्वरित सुरू होते. विमलजी एक विशिष्ट प्रकारची डायरी बाळगतात. व्यक्तीचे नाव व दूरध्वनी क्रमांक याची नोंद ते लगेच करतात. त्यांच्या डोक्यात एकदा नवीन व्यक्ती फिट बसली की, त्याला किंवा तिला विमलजींनी संघ किंवा संबंधित संस्थेत अडकवलेच म्हणून समजा. नवीन व्यक्तींचा कायम शोध घेणे आणि त्यास त्याच्या रुचीनुसार कामास जोडणे यात विमलजी वाकबगार आहेत. त्यांच्या डोक्यात कायम संघ असतो व त्या विषयांचे चिंतन चालू असते. कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी कामाचे स्वामित्व (ownership) घेण्याची आवश्यकता असते. विमलजींचा स्वभाव हा अशाच प्रकारचा आहे. ज्या कामाची ते जबाबदारी घेतात ते पूर्णपणे सफल कसे होईल यासाठी त्यांचे नेहमी प्रयत्न व परिश्रम असतात आणि त्याची ओनरशिपसुद्धा ते घेतात. निर्णयक्षमता आणि कामाचा लवकरात लवकर निपटा कसा होईल यासाठी ते कायम तत्पर असतात. अनेकदा सार्वजनिक कार्याच्या बैठकांमधून केवळ भरपूर चर्चा होत असते; परंतु निर्णय न झाल्यामुळे ते काम मार्गी लागत नाही. विमलजींचा स्वभाव मात्र नेमका या विरुद्धचा. विमलजी बैठकीत असले की निर्णय न होता बैठक संपली असे सहसा होत नाही. बैठक घेण्याची त्यांची एक विशिष्ट शैली आहे. बर्याचदा त्यांच्या व्यावसायिक दृष्टीचे प्रतिबिंब त्यांच्या बैठक संचालनात व निर्णयक्षमतेत दिसते, त्यामुळे कार्यवाहीत गतिमानता येते. कामाचे सूक्ष्म नियोजन हा विमलजींचा आणखी एक प्रमुख गुण. ते आपल्या डायरीत छोटी-छोटी कामे लिहून काढतात. कौटुंबिक जबाबदारी असो वा संघकामाची बैठक असो वा कोणताही कार्यक्रम असो, त्याचे तपशिलात नियोजन केल्याशिवाय विमलजींना चैनच पडत नाही. वेळेचे व्यवस्थापन कसे करायचे हे विमलजींकडून शिकावे. अनेकदा वेळ वाचवण्यासाठी ते कार्यकर्त्यांना आजही आपल्या घरी न्याहारीस किंवा गोरेगाव येथील त्यांच्या व्यावसायिक कार्यालयात भेटावयास बोलावतात. कार्यालयात एकीकडे व्यवसायाशी संबंधित बाबींकडे त्यांचे लक्ष असतेच; परंतु त्याच वेळी समोरच्या कार्यकर्त्याबरोबर ठरविलेल्या विषयांचीही ते चर्चा करत असतात. इंग्रजीत ज्याला ‘मल्टिटास्किंग’ म्हणतात असा विमलजींचा अंगभूत गुण आहे.
मुंबई परिसरातील संघकार्य व संघसंबंधित संस्थांच्या विकासात विमलजींचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. मुंबईतील संघ कार्यालय (विशेष करून यशवंत भवन), विलेपार्ले येथील उत्कर्ष मंडळ, भारतीय विचार दर्शन या संस्थांच्या विकास प्रक्रियेचे ते साक्षीदार राहिले आहेत. केशवसृष्टी प्रकल्पातील कृषी, वनौषधी, वृद्धाश्रम व राम रत्ना विद्यामंदिर यांसारखे प्रकल्प, या संस्थांचा विकास, त्यासाठी लागणारी साधनसंपत्ती, मनुष्यबळ आदी गोष्टी उपलब्ध करून देण्यात विमलजींचा सिंहाचा वाटा आहे. केशवसृष्टीतील या संस्था लौकिकार्थाने स्वतंत्र व स्वायत्त असल्या तरी त्या सर्वांच्या व्यवस्थापनावर रा. स्व. संघाची छाप आणण्यास विमलजी विसरत नाहीत. संघकामास व संघसंबंधित संस्थांच्या प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली पाहिजे, हा त्यांचा नेहमी आग्रह असतो. विमलजी स्वतः कल्पक आहेत. 2001 साली केशवसृष्टीत झालेले विश्व संघ शिबीर, 15 वर्षांपासून सुरू असलेला केशवसृष्टी पुरस्कार, प्रतिवर्षी होणारी सत्यनारायण महापूजा, वार्षिक चिंतन बैठक या उपक्रमांमागे विमलजींचा पुढाकार आहे.
विमलजी या संस्थांमध्ये विद्यमान स्थितीत कोणत्याही पदावर नाहीत; परंतु केशवसृष्टीसाठी ते नेहमीच पालक, मार्गदर्शक व एक आधारस्तंभ म्हणून भूमिका सांभाळत आहेत. विमलजींचे सफल अशा सामाजिक जीवनात त्यांची पत्नी उषा केडिया यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. विमलजी उषा वहिनींच्या योगदानाचा नेहमी विशेषत्वाने उल्लेख करतात.
मुंबईतील संघकामास व विशेष करून केशवसृष्टीला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी ज्या काही व्यक्तींनी प्रयत्न केले आहेत त्यात विमलजींचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. विमलजी यांच्या आयुष्याची 75 वर्षे पूर्ण झाली तरी त्यांच्याकडील ऊर्जेचा स्रोत किंचितसुद्धा कमी झालेला नाही.
काही वर्षांपासून विमलजींकडे संघाची दैनंदिन कामाची पूर्वीसारखी जबाबदारी नाही; परंतु स्वस्थ बसण्याचा त्यांचा स्वभाव नव्हे. मधमाशी जशी अखंड कार्यरत असते तसेच विमलजी अखंड कार्यरत व कार्यमग्न असतात. केशवसृष्टीचे काम केवळ भाईंदरपुरते मर्यादित न ठेवता त्याच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यात वाडा तालुक्यात केशवसृष्टी ग्राम विकास प्रकल्प विमलजींच्या पुढाकाराने सात वर्षांपूर्वी सुरू झाला. विमलजींनी या प्रकल्पासाठी स्वतःस वाहून घेतले आहे. शिक्षण, आरोग्य, कृषी आणि उद्योग या विषयांत हा प्रकल्प काम करत असून विद्यमान स्थितीत 160 गावांमध्ये तो पोहोचला आहे.
संघनिष्ठा आणि संघशरणता हा विमलजींमधील विलक्षण गुण. विलेपार्ले भागातील नगर कार्यवाहपासून त्यांनी प्रांत स्तरावरील जबाबदार्या विनासायास आणि प्रभावीपणे पार पाडल्या. संघ अधिकारी जे सांगतील आणि देतील ते काम करण्याची त्यांची नेहमी मानसिकता राहिली. विमलजींच्या आचार, विचार व व्यवहारात शत-प्रतिशत संघ आहे याची प्रचीती त्यांच्याबरोबर काम केलेल्या प्रत्येकास येते. विमलजींबरोबर काम करण्याची मलाही संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. विमलजींची वयाची 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांना पुढील काळात निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना व त्यांचे मनःपूर्वक अभीष्टचिंतन!
- लेखक महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती आहेत आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठानाचे सचिव आहेत.