@कौमुदी परांजपे 9405307941
सलग दुसर्या वर्षीसुद्धा आयाम, नाशिक त्याच जोमाने आपल्यासमोर अनेक तज्ज्ञ मंडळींचे विचारधन नाशिककरांना देणार आहे. या वर्षी प्रसिद्ध पत्रकार रुबिका लियाकत आणि आनंद नरसिंहन, लेखिका आणि सोशल मीडिया इन्फ्लुइन्सर शेफाली वैद्य, लेखक अभिजित जोग, लेखक व इतिहास अभ्यासक विक्रम संपत, ब्लॉगर ओंकार दाभाडकर, लेखक व अभिनेते दीपक करंजीकर, आशीष सोनावणे अशी विविध क्षेत्रांतील दिग्गज अभ्यासक मंडळी वेगवेगळ्या विषयांवर आपले अभ्यासपूर्ण मत सगळ्यांसमोर ठेवणार आहेत.
गेली अनेक वर्षे भारत म्हणजे निरक्षरांचा, बेरोजगारांचा, अंधश्रद्धांचा, गरिबांचा देश आहे, हीच आपली जागतिक प्रतिमा होती. भारताबद्दल अनेक नकारात्मक गोष्टी जागतिक पटलावर पसरलेल्या होत्या. आपण भारतवासीसुद्धा या नकारात्मकतेच्या ओझ्याखाली दबलो होतो, आपली खरी ओळख विसरलो होतो. खरे तर भारत स्वतंत्र होऊन जवळजवळ आठ दशके होत आली, तरी आपण परकीयांच्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडलो नाही. आपल्या सहिष्णू वृत्तीला आपली दुर्बलता समजले जात होते.
हळूहळू भारतियांना जाग येते आहे. दहा वर्षांत बदललेली राजकीय परिस्थिती आणि भारतीयत्वाची ओळख करून देणार्या संस्था-संघटना यामुळे हे घडत आहे. आपल्या भारतीय संस्कृतीची खरी ओळख दाखवण्याचे काम करणारी नाशिकमधील संस्था म्हणजे ‘आयाम’. ‘राष्ट्र प्रथम’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून भारतीय संस्कृती, साहित्य, कला, शिक्षण याविषयी सत्य आणि योग्य विमर्श समाजासमोर ठेवणारी संस्था म्हणजे ‘आयाम, नाशिक!’
इतकी वर्षे आपल्या देशाकडे काय नाही, याचा ऊहापोह आपण करत होतो. आपल्याकडे काय आहे? आपली बलस्थाने कोणती? हे समाजासमोर आणण्याचे काम ‘आयाम’ करत आहे. गेल्या 8-10 वर्षांत भारताचे चित्र थोडे बदलले आहे. भारतीय मनगटाच्या जोरावर आपण काय काय करू शकतो, याचे चित्र आपल्यासमोर आता स्पष्ट होऊ लागले आहे. तरीही कला, संस्कृती, साहित्य आणि शिक्षण यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे खोटा विमर्श पसरवला जात आहे. ह्या क्षेत्रात अजूनही काम करण्याची गरज आहे. ही गरज ओळखून या क्षेत्रात काही तरी वेगळे करण्याच्या उद्देशाने 2018 मध्ये काही समविचारी लोकांनी एकत्र येऊन ‘आयाम, नाशिक’ची स्थापना केली.
आयाम, नाशिकच्या माध्यमातून आजपर्यंत विविध विषयांवर कार्यक्रम केले गेले ज्याचे मूळ कायम भारतीयत्व, भारतीय संस्कृती, आपला इतिहास असेच होते. आयाम अक्षरबाग - वाचनकट्टा, आयाम - जागर, आयाम - मंथन, आयाम दुर्ग-दुर्गा इत्यादी त्यातील काही उल्लेखनीय कार्यक्रम. या सगळ्या कार्यक्रमांना नाशिककरांनी कायम भरभरून प्रतिसाद दिला. ह्या उपक्रमांबरोबरच मागील वर्षापासून नाशिककरांसाठी नाशिकचा स्वतःचा लिटफेस्ट सुरू करण्याचा मानसुद्धा आयाम, नाशिकने पटकावला आहे. शब्दांच्या माध्यमातून आपले विचार, संस्कृती आणि त्यातून खरा विमर्श पोहोचविण्यासाठी ’गोदावरी संवाद’ हा उपक्रम सुरू झाला. या एकदिवसीय उपक्रमात विविध सत्रांमधून भारतीय संस्कृती, साहित्य, इतिहास, भारताची भविष्यातील वाटचाल असे विभिन्न विषय चर्चिले जातात. उत्तर महाराष्ट्रातील ही पहिली वैचारिक चळवळ आयामने उभी केली आहे. समाजमाध्यमातून, विविध स्तरांवरून लादल्या जाणार्या खोट्या प्रचारामुळे भारतीय अखंडता, संस्कृती धोक्यात आहे की काय, ही शंका उपस्थित होते. ‘गोदावरी संवाद’सारख्या अनोख्या उपक्रमातून समाजाला सजग करणे हाच हेतू आहे.
भारताचा इतिहास, सद्यपरिस्थिती, भारतासमोरील आव्हाने ह्या सगळ्यांविषयीचे अभ्यासपूर्ण विवेचन ठेवणे, ह्या उद्देशाने गतवर्षीच्या ‘गोदावरी संवादा’त भारतभरातून ‘राष्ट्र प्रथम’ ह्या विचारसरणीचे पाईक आणि नवीन पिढीशी वेगवेगळ्या पातळ्यांवर संवाद साधू शकणार्या अभ्यासकांनी हजेरी लावली, ज्यात प्रामुख्यानेसर्वोच्च न्यायालयातील वकील आणि लेखक जे. साई दीपक, अभ्यासक विष्णू जैन, लेखक अभिजित जोग, लेखक आणि सोशल मीडिया इन्फ्लुइन्सर शेफाली वैद्य, तुषार दामगुडे, लेखक भरत अमदापुरे होते. पहिल्याच वर्षीच्या लिटफेस्टमध्ये ‘भारत एक सोच‘, ‘भारतातील मंदिरांची तोडफोड’, ‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’, ‘वक्फ बोर्ड’ असे सगळे विषय सखोलपणे मांडले गेले. ही सगळी सत्रे कुठल्याही पद्धतीने निर्णय लादणारी नसून ती विचारधन पुरवणारी ठरली. ‘गोदावरी संवाद’ ह्या लिटफेस्टचे दुसरे आकर्षण म्हणजे ह्या माध्यमातून दिला जाणारा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सन्मान’. सावरकरांचे विविध पैलू जसे की, साहित्य, विज्ञान, अस्पृश्यता निवारण, देशाभिमान, देशसेवा, समाजसेवा अशा सगळ्यांत जीव ओतून काम करणार्या एका व्यक्तीला हा सन्मान देण्याचा संकल्प आयामने केला. आयामतर्फे दिला जाणारा हा प्रथम ‘सावरकर सन्मान’ लेफ्ट. जनरल डॉ. दत्तात्रय शेकटकर ह्यांना प्रदान करण्यात आला.
सलग दुसर्या वर्षीसुद्धा आयाम, नाशिक त्याच जोमाने आपल्यासमोर अनेक तज्ज्ञ मंडळींचे विचारधन नाशिककरांना देणार आहे. या वर्षी प्रसिद्ध पत्रकार रुबिका लियाकत आणि आनंद नरसिंहन, लेखिका आणि सोशल मीडिया इन्फ्लुइन्सर शेफाली वैद्य, लेखक अभिजित जोग, लेखक व इतिहास अभ्यासक विक्रम संपत, ब्लॉगर ओंकार दाभाडकर, लेखक व अभिनेते दीपक करंजीकर, आशीष सोनावणे अशी विविध क्षेत्रांतील दिग्गज अभ्यासक मंडळी वेगवेगळ्या विषयांवर आपले अभ्यासपूर्ण मत सगळ्यांसमोर ठेवणार आहेत.
या उदात्त विचारानेच आयाम, नाशिक कार्यरत आहे. आपल्या अनेकतेतील एकतेचे सामर्थ्य दाखवून देण्याचे शिवधनुष्य आयाम, नाशिकने लीलया पेलले आहे. समाजात एक विश्वास निर्माण केला आहे आणि यापुढेही ‘गोदावरी संवाद’ आणि इतर दर्जेदार उपक्रमांतून हा विश्वास वृद्धिंगत होणार आहे.