@रश्मी मंडपे 9630270145
साबरमती एक्स्प्रेस बोगी नंबर S6 मध्ये झालेले जळितकांड म्हणजे एक सामान्य दुर्घटना असल्याचे भासवत मीडियाने सत्य कसे लपवले, या आजवरच्या अनुत्तरित प्रश्नाला ‘द साबरमती रिपोर्ट’ स्पर्श करतो. काही गोष्टी उघडपणे मांडत, तर काही सांकेतिक रूपात दाखवत प्रेक्षकांच्या विवेकबुद्धीवर सोडून देतो. हा चित्रपट आजच्या युवा पिढीला त्यांच्या आजूबाजूच्या जगाची, त्या जगात कसे खोटे नॅरेटिव्ह उभे करून बुद्धिभेद केला जातो आणि डोळ्यासमोर ढळढळीत दिसत असणार्याही सत्याला झाकण्याचे प्रयत्न किती उद्दामपणे केले जातात ह्याची जाणीव करून देतो. तसेच मनात असंख्य प्रश्न निर्माण करतो आणि त्यांची उत्तरे शोधायलाही प्रवृत्त करतो. हा चित्रपट समाजातल्या एका मोठ्या गटाने पांघरलेला धर्मनिरपेक्षतेचा बुरखा थोडा बाजूला करून या घटनेमागचे मोठे षड्यंत्र दाखवतो.
‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच हा चित्रपट पाहण्याचे नक्की केले होते. त्यामुळे तो प्रदर्शित झाल्यावर लगेचच पाहिला आणि या चित्रपटाने मनात खोलवर दाबून टाकलेले प्रश्न पुन्हा जागे केले. 27 फेब्रुवारी 2002 ला गुजरातमधील गोधरा रेल्वे स्थानकावर साबरमती एक्स्प्रेसच्या बोगी नंबर S6 मध्ये आग ‘लागून’ जिवंत जळून ठार झालेले ते 59 लोक कोण होते? ते अयोध्येला कारसेवेला चाललेले कारसेवक होते हे सर्वांनाच ठाऊक आहे. तेव्हा या गाडीतील नेमक्या त्याच बोगीला आग कशी लागली? कुठलाही रेल्वे अपघात झाल्यावर त्याची पूर्ण चौकशी केली जाते आणि त्याचे तार्किक कारण शोधून काढले जाते; परंतु साबरमती एक्स्प्रेसची एक अख्खी बोगी जळून त्यात इतकी मोठी जीवितहानी झाली असूनही चौकशीसाठी नेमलेल्या समितीने जे अहवाल दिले, आग लागायची जी काही कारणे सांगितली गेली, ती तार्किक, सुसंबद्ध किंवा निःपक्षपाती का नव्हती? आणि सर्वात मुख्य म्हणजे ही घटना लोकांच्या स्मृतीतून नाहीशी होईल, लोकांनी त्यावर काही बोलू नये यासाठी काही माध्यमकर्मी, काही स्वयंसेवी संस्था (एन.जी.ओ.) आणि सामाजिक कार्यकर्ते सतत का प्रयत्न करत होते, किंबहुना आजही एका विशिष्ट विचारसरणीच्या गटाचा तोच प्रयत्न का चालू आहे? असे अनेक प्रश्न या चित्रपटामुळे उफाळून वर आले. या जळितकांडानंतर प्रतिक्रियास्वरूप उसळलेल्या जनक्षोभाचे रूपांतर 2002 च्या गुजरात दंगलीत झाले. त्याबद्दल बोलताना व लिहिताना मात्र ही मंडळी आजही अतिशय हिरिरीने पुढे असतात आणि त्यातील एकही जण गोधरा जळितकांडाचा अगदी पुसटसा उल्लेखही करत नाही. या लोकांमुळेच 2002 नंतर जन्मलेल्या पिढीला गुजरात दंगल नीट माहीत आहे; परंतु त्याआधी घडलेल्या साबरमती एक्स्प्रेस अग्निकांडाबद्दल फारशी माहिती नाही. या घटनेवर सातत्याने पांघरूण घातले गेले. त्यामुळे माझ्यासारख्या असंख्य लोकांना अनेक प्रश्न भेडसावत होते.
साबरमती एक्स्प्रेसच्या त्याच बोगीला इतकी मोठी आग कशी लागली, त्यात मृत्यू पावलेले लोक कोण होते, त्या घटनेच्या मागे किती मोठे नियोजन होते, स्वयंसेवी संस्था आणि विशिष्ट समाजाच्या लोकांनी त्या घटनेत खोटे साक्षीदार कसे उभे केले आणि ते जळितकांड म्हणजे एक सामान्य दुर्घटना असल्याचे भासवत मीडियाने सत्य कसे लपवले, या आजवरच्या अनुत्तरित प्रश्नांना ‘द साबरमती रिपोर्ट’ स्पर्श करतो. काही गोष्टी उघडपणे मांडत, तर काही सांकेतिक रूपात दाखवत प्रेक्षकांच्या विवेकबुद्धीवर सोडून देतो. उत्तर देत असतानाही प्रेक्षकांना असे वाटावे की, हे उत्तर त्याचे त्यांनी शोधले आहे अशी या कथानकाची मांडणी केली आहे. हा चित्रपट थेट निष्कर्ष काढून समोर ठेवत नाही; पण तरीही निष्कर्ष काय आहे ते प्रेक्षकांना सहज कळेल अशा पद्धतीने कथानक उलगडते.
‘द साबरमती रिपोर्ट’ आणखी एक गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित करतो ती म्हणजे आजही निखळ सत्य सांगताना त्याला धर्मनिरपेक्षतेची फोडणी दिल्याशिवाय बॉलीवूड कुठलीही कहाणी सांगूच शकत नाही, साबरमती एक्स्प्रेसबद्दल ‘हा सूर्य, हा जयद्रथ’ इतक्या स्पष्टपणे बोलता येईल इतके तथ्य आता पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे. तरीही त्या तथ्यात धर्मनिरपेक्षतेचे पाणी घातले गेले आहे. खरे तर त्याची गरज नव्हती. त्यामुळे ’इमानदार लोग दोनों तरफ होते हैं’ यांसारखे संवाद ऐकून चीड येते. या घटनेच्या संदर्भात हाताच्या बोटावरही मोजण्याइतके लोकही इमानदारीने वागलेले नसताना त्यांचा सतत उल्लेख करून अर्धवट सत्य सांगायचा केलेला प्रयत्न म्हणजे सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाने केलेली काहीशी बेइमानीच म्हणावी लागेल. साबरमती एक्स्प्रेसचे सत्य आणि सत्यच ‘द साबरमती रिपोर्ट’मध्ये दाखवले जाणे अपेक्षित होते. मात्र ते जळजळीत सत्य सांगायची अजून तरी बॉलीवूडमध्ये हिंमत नाही हेच खरे! हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
तरीही हा चित्रपट पाहून अपेक्षाभंग अजिबात होत नाही. उलट हा चित्रपट सगळ्यांनी बघावा, विशेषतः आपल्या किशोरवयीन आणि युवा मुलांबरोबर बघावा, असे आवर्जून सुचवावेसे वाटते. हा चित्रपट या पिढीला त्यांच्या आजूबाजूच्या जगाची, त्या जगात कसे खोटे नॅरेटिव्ह उभे करून बुद्धिभेद केला जातो आणि डोळ्यासमोर ढळढळीत दिसत असणार्याही सत्याला झाकण्याचे प्रयत्न किती उद्दामपणे केले जातात ह्याची जाणीव करून देतो. हा चित्रपट मनात असंख्य प्रश्न निर्माण करतो आणि त्यांची उत्तरे शोधायलाही प्रवृत्त करतो. हा चित्रपट समाजातल्या एका मोठ्या गटाने पांघरलेला धर्मनिरपेक्षतेचा बुरखा थोडा बाजूला करून या घटनेमागचे मोठे षड्यंत्र दाखवतो. धर्मनिरपेक्षतेने वागणार्या बहुतांश हिंदूंच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालण्याचे काम करतो.
म्हणूनच मनापासून असे वाटते की, ‘द साबरमती रिपोर्ट’ जरी पूर्ण सत्य दाखवू शकला नसला तरी असे चित्रपट चालले पाहिजेत, आपण त्यांना व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी केले पाहिजेत, कारण हिंदू समाजासाठी हे चित्रपट अतिशय महत्त्वाचे ठरतात. गेल्या दहा वर्षांत अशा विषयांवर आलेले चित्रपट मोजकेच असले तरी त्यांनी हिंदूंना जागे करण्याचे काम केले आहे. ‘बुद्धा इन ट्रॅफिक जाम’, ‘उरी’, ‘द कश्मीर फाइल्स’, ‘द केरला स्टोरी’, ‘आर्टिकल 370’ याच मालिकेतला ‘द साबरमती रिपोर्ट’ आहे. असे चित्रपट आर्थिकदृष्ट्या यशस्वी होऊ लागले तरच कधी तरी कोणी तरी पूर्ण सत्य सांगायची हिंमत करेल; तीही कुठल्याही फिल्टरशिवाय आणि धर्मनिरपेक्षतेची सवंग फोडणी न देता. सत्य बघण्याची आणि स्वीकारण्याची प्रेक्षकांची तयारी आहे, हा संदेश बॉलीवूडमधील या विचारधारेच्या लोकांना मिळाला, तर तेही जे सत्य आहे तसे सांगण्याचे- दाखवण्याचे धाडस करतील. इतक्या संवेदनशील विषयावरील चित्रपटात विक्रांत मेसीची मुख्य भूमिका आणि आतापर्यंत फक्त विशिष्ट प्रकारची चित्रपटनिर्मिती करणार्या एकता कपूर यांचा हा चित्रपट आहे. तेव्हा मूळ विषयाला वामपंथी वळण देऊन पुन्हा एकदा सत्य झाकण्याचा, बळी गेलेल्या लोकांनाच दोषी ठरवण्याचा प्रयत्न होईल की काय, अशी काही लोकांच्या मनात भीती होती. धर्मनिरपेक्षतेचे समर्थन करताना मारलेल्या काही माकडउड्या पाहून ती भीतीच खरी ठरते की काय, असे काही काळ वाटून जाते; परंतु शेवटी मात्र तसे न झाल्याने मनाला दिलासा मिळतो.
चित्रपटाच्या केंद्रस्थानी एखादी महत्त्वाची, सनसनाटी घटना असली, की बाकी सगळे दुय्यम होऊन जातात. या चित्रपटातही तेच झाले. प्रत्येक कलाकाराने आपली भूमिका चोख बजावली असली तरी साबरमती एक्स्प्रेस बोगी नंबर S6 ला लागलेली आग आणि त्यामागचे कांड कोणाच्याही अभिनयापेक्षा अधिक लक्षात राहते, हेच या चित्रपटाचे यश आहे.
हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मुख्य भूमिका करणार्या विक्रांत मेसीला जर धमक्या येत असतील, घाबरवण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर साबरमती एक्स्प्रेसचे सत्य दाबण्याचा अजूनही किती प्रयत्न केला जातोय हे स्पष्ट होते आणि हे प्रयत्न का केले जाताहेेत याचे उत्तर ‘द साबरमती रिपोर्ट’ देतो.
डाव्यांच्या अधीन झालेल्या मीडियाने जेव्हा गोधराचे सत्य झाकायचा प्रयत्न केला तेव्हा मीडियातील काही लोकांचा अंतरात्मा जागृत होता. अशांनी त्यांना शक्य होते ते सर्व तथ्य त्यांच्या ताकदीनुसार सर्वांसमोर आणायचा प्रयत्न केला. त्याचे डॉक्युमेंटेशन आणि चित्रांकन करून ठेवले म्हणून दोन दशकांनी का होईना चित्रपटातून गोधराचे सत्य मांडायला तथ्याचा ठोस आधार मिळाला. त्या वेळी एक वेगळाच नॅरेटिव्ह उभा करायचा इतका प्रचंड प्रयत्न चालला होता की, तो मान्य नसणार्या लोकांचे म्हणणे कुणी ऐकूनच घेत नव्हते. या चित्रपटानंतर मात्र असे अनेक साक्षीदार समोर येण्याची शक्यता आहे ज्यांनी तिथली परिस्थिती स्वत: बघितली होती, पोलिसांचे आणि लोकांचे वागणे बघितले होते आणि त्यांच्याशी चर्चा केली होती. या चित्रपटात एक संवाद आहे- ’इमानदार लोग दोनों तरफ होते हैं’, ते मीडियाच्या बाबतीतही सत्य आहे. काही इमानदार लोक मीडियातही आहेत. आजपर्यंत साबरमती जळितकांडावर बेइमान लोक भरपूर बोलले आहेत. आता इमानदार लोकांची बोलायची वेळ आहे. हा चित्रपट अशा लोकांना गोधरावर बोलायची हिंमत देईल. समाजमाध्यमातील ‘एक्स’वर या चित्रपटाच्या संदर्भात कुणी तरी केलेल्या एका पोस्टला रिपोस्ट करत फेक नॅरेटिव्ह नेहमी राहत नाही, सत्य कधी तरी समोर येतेच, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. त्यांचे हे विधान अतिशय बोलके आहे. साबरमती एक्स्प्रेस जळितकांडानंतर उसळलेल्या दंगलीच्या आगीत खोटे नॅरेटिव्ह उभे करून नरेंद्र मोदींना खलनायक ठरविण्याचा खूप मोठा प्रयत्न आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेला आपण सर्वांनी पाहिला आहे. ज्याच्यासाठी हा सगळा लढा होता, ज्याच्यासाठी हे जीव गेले, त्या रामरायांच्या साकार मूर्तीपेक्षाही चित्रपटगृहातून बाहेर निघताना लोकांच्या मनात फक्त ती आग लागलेली बोगी असते, जळून कोळसा झालेले मृतदेह असतात आणि या कारसेवकांनी असा काय अपराध केला होता म्हणून त्यांना अशा प्रकारचा मृत्यू आला याचे उत्तर असते.