सजग रहो निरंतर... अविराम... अथक...

विवेक मराठी    28-Nov-2024
Total Views |
@ऋतुराज कशेळकर  - 7057472683
राजकीय पटलावरचा हा विजय अंतिम नाही. यापुढेही वरवर आकर्षित करणारे; पण मुळात समाज तोडण्यासाठी, एकतेची वीण उसवण्यासाठी तयार केलेले विमर्श मांडले जातील. बुद्धिभेदाचे नवनवे डाव रचले जातील. त्यासाठी डावी इकोसिस्टीम जोरात कामाला लागेल. तेव्हा यापुढेही ‘सजग रहो’ अभियानाची प्रासंगिकता आणि आवश्यकता राहणारच आहे. समाज जागा ठेवणारे हे सारे प्रयत्न जागल्या म्हणून करावे लागतील. त्यासाठी सजग राहायला हवे.
rss
 
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निकालाने अनेक राजकीय अभ्यासक, विश्लेषक, पत्रकार, इतकंच नव्हे तर दस्तुरखुद्द राजकीय पक्षदेखील हतबुद्ध झाले. निखिल वागळे एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “ही लाट नाही, लाटेपेक्षाही वरचं काही तरी झालंय.”
 
महाराष्ट्राच्या आजवरच्या राजकीय इतिहासात अनेक प्रस्थापितांना धक्का देणारी, महाराष्ट्राची यापुढची राजकीय दशा आणि दिशा बदलवून टाकणारी, भारताच्या भविष्यकाळावर दूरगामी परिणाम करणारी ही निवडणूक होती, याबाबत कुणालाही शंका नसावी.
 
पाच महिन्यांपूर्वीच मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदान करताना महाराष्ट्राच्या जनतेने हात आखडता घेतला होता. परिणामी भाजप बहुमतापासून दूर राहिला. मतदारांच्या उदासीनतेमागे तीन जागतिक महाशक्ती होत्या, असं अभ्यासक सांगतात आणि ते सत्यही आहे.
 
पालावरचं जिणं या पुस्तकातून पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी भटके-विमुक्त समाजाचे जीवन समाजापुढे आणले आहे.


 
 
डीप स्टेटची ढवळाढवळ
 
भारताचं पूर्ण बहुमताचं, राष्ट्रीय विचारांनी निर्णय घेणारं आणि भारताला स्व-आधारित विकासाच्या मार्गावर नेणारं विद्यमान सरकार ही अमेरिकेच्या आर्थिक, भूराजनैतिक आणि जागतिक वर्चस्ववादी महत्त्वाकांक्षेसाठी चिंतेची बाब होती. लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेलं सरकार अराजक माजवून उलथवून टाकायचं आणि एक नामधारी पंतप्रधान नियुक्त करायचा, ही डीप स्टेटची कार्यप्रणाली आहे. अराजक माजवण्यासाठी कुठलाही स्थानिक मुद्दा घेऊन आंदोलन उभं करायचं, त्याची प्रसिद्धी करण्यासाठी इथल्या डाव्या संघटना, पत्रकार, तथाकथित विचारवंत, बुद्धिवादी लोक, आंतरराष्ट्रीय मीडिया हाऊसेस आदींना हाताशी धरायचं, जनतेत रोष पेरायचा आणि विद्यमान सरकारविषयी सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करून देशाच्या सर्वोच्च स्थानावर सुनियोजित हल्ला करायचा, अशा प्रकारे डीप स्टेट काम करतं. हेच बांगलादेशात काही दिवसांपूर्वी घडलं. असंच घडवण्याचा प्रयत्न भारतात किसान आंदोलन, शाहीनबाग या वेळेस झाला. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच किसान आंदोलन दिल्लीत धडकणं आणि लाल किल्ल्यावर हल्ला होणं, हे सहजासहजी घडत नसतं. अशा घटना घडवून आणल्या जातात.
 
vivek 
 
याच डीप स्टेटचा प्रचंड पैसा वापरून भारतात तिसर्‍यांदा राष्ट्रीय विचारांचं सरकार येऊ नये म्हणून मोर्चेबांधणी केली गेली. अनेक खोटे विमर्श प्रस्थापित केले गेले. संविधान बदल, आरक्षण या कळीच्या विषयांचं खोटं नॅरेटिव्ह तयार केलं गेलं.
 
वामपंथी संघटनांची निवडणुकीत सक्रियता
 
समाजाला वेगवेगळ्या गटांमध्येे विभाजित करून त्या गटांना सतत संघर्षरत ठेवणे आणि त्यातून देशातल्या सगळ्या लोकशाही व्यवस्था लोकशाहीच्याच आधारे पोखरून टाकणे, ही या शक्तीची कार्यप्रणाली आहे. संविधान धोक्यात आहे आणि नागरिक भयग्रस्त आहेत, या सूत्रावर ‘निर्भय बनो’ नावाचा खेळ महाराष्ट्रात खेळला गेला. यातल्या सगळ्यांचे सूर डीप स्टेटचाच राग आळवत होते. या सभांमुळे महाराष्ट्रात लोकसभेला इंडिया आघाडीच्या अधिक जागा निवडून आल्याचा दावा या सभा घेणारी मंडळी करत असत.
 -------------------------------
लेख वाचा...
दुसर्‍याच्या दु:खात आनंद मानणार्‍या प्रवृत्तीचा पराभव
https://www.evivek.com/Encyc/2024/11/28/Shiv-Sena-UBT-Faces-Major-Setback-in-Assembly.html
 ----------------------------------------
 
जिहादी इस्लामी संघटना
 
लोकसभेच्या वेळी मशिदी, मदरसे भाजपविरोधात एकगठ्ठा मतदानाचे फतवे काढत होते. ’व्होट जिहाद’ या संकल्पनेचा जाहीरपणे उच्चार सलमान खुर्शीद यांची पुतणी मारिया आलम खान हिने भर सभेत केला होता. ‘बहुत खामोशी की साथ, एक साथ होकर वोटों का जिहाद करो। क्यों की हम सिर्फ वोटों का जिहाद कर सकते है और इस संघी सरकार को भगाने का काम कर सकते है।’ हे त्यांचं वक्तव्य फारूखाबादच्या सभेतलं आहे. हे वक्तव्य केलं गेलं तेव्हा स्वतःला संविधानाचे रक्षक समजणारे राहुल गांधी मंचावर उपस्थित होते. या व्होट जिहादच्या फतव्यामुळे धुळे, मालेगाव मध्य अशा ठिकाणी भाजप महायुतीला फटका बसला.
 
 
लोकसभा निवडणुकीच्या खूप आधीच या तीनही शक्ती सक्रिय झाल्या होत्या. यातून मतांचे ध्रुवीकरण होऊन त्याचा फायदा काँग्रेसप्रणीत आघाडीला झाला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडत होत्या.
 
 
महाराष्ट्राची निवडणूक - देशासाठी महत्त्वाची
 
महाराष्ट्र हा कायमच देशाचे खड्गहस्त राहिलेला आहे. देशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा 23 टक्के सहभाग आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या आणि अशा अनेक बाबींमुळे महाराष्ट्राची विधानसभा या अराजकवादी शक्तींना जिंकता आली असती, तर ती भारताच्या एकात्मता आणि अखंडतेसाठी भयघंटा होती. जर महाराष्ट्र जिंकता आला तर या विजयातून भारत सरकार कोलमडून पडेल, अशी वक्तव्यं जिहादी नेत्यांनी केली होती. त्यामुळे महाराष्ट्राची निवडणूक ही राज्यापुरती मर्यादित न राहता तो राष्ट्रीय मुद्दा झाला.
 
 
महाराष्ट्रामध्ये जातीय विद्वेषाला खतपाणी घालणार्‍या अनेक संघटना लोकसभा निवडणुकीपासूनच अधिक सक्रिय झाल्या होत्या. या सगळ्या जातीय विद्वेषातून आपली राजकीय पोळी भाजून घेणार्‍यांची संख्या वाढत होती. त्यामुळे ही विधानसभा निवडणूक भाजपप्रणीत महायुतीसाठी आव्हानात्मक होती. असं असूनदेखील महायुतीला इतक्या मोठ्या प्रमाणात जनाधार कसा मिळाला, याची गणिते सोडवण्यात महाराष्ट्रातील तथाकथित विचारवंत, राजकीय विश्लेषक आणि दुकानदारी धोक्यात आलेले तथाकथित डावे पर्यावरणतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ इ. इ. गुंतले आहेत. महाराष्ट्र विधानसभेतदेखील डीप स्टेट, जिहादी आणि वामपंथ या तीनही शक्ती पूर्वीइतक्याच सक्रिय होत्या; परंतु या वेळेस या सर्वांना समाजमनाचा अंदाज घेता आला नाही. एकदा चाललेलं चुकीच्या विमर्शाचं ’टूलकिट’ पुन्हा काम करेल, अशा भ्रमात राहिल्यामुळे इतका मानहानीकारक पराभव काँग्रेसप्रणीत महाविकास आघाडीला पाहावा लागला.
 
 
परिणामकारक ‘सजग रहो’ अभियान
 
या विधानसभा निवडणुकीआधी सुरू झालेलं ’सजग रहो’ अभियान आणि त्याची परिणामकारकता हादेखील या विजयातील महत्त्वाचा घटक आहे.
  
या अभियानाची आवश्यकता लोकसभा निवडणुकीच्या वेळेस लक्षात आली होती. राष्ट्रीय विमर्श स्थापित करण्यासाठी, एखाद्या विषयाची सत्यता समोर आणण्यासाठी, ‘सजग रहो’सारख्या मंचाची आवश्यकता होती. समाजाचा विचार करणारे अनेक विचारवंत या खोट्या विमर्शांबाबत चिंतित होते, अस्वस्थ होते. मात्र केवळ अस्वस्थ आणि चिंतेत न राहता या अस्वस्थतेला काही प्रयत्नांची जोड द्यावी, असा विचार या समविचारी मंडळींनी केला. संघ स्वयंसेवकांच्या पुढाकाराने आणि समविचारी असलेल्या विविध संस्था-संघटनांच्या मदतीने हा उपक्रम सुरू झाला. नागरिक आणि मतदारांना जागृत करण्याचा, सावध करण्याचा हेतू असल्याने या अभियानाला ’सजग रहो’ हे नाव देण्यात आले. कोणत्याही विशिष्ट पक्षासाठी वा चिन्हासाठी प्रचार असं त्याचं स्वरूप न ठेवता, राज्याच्या सद्यःस्थितीची ससंदर्भ पण सोप्या शब्दात माहिती देण्यावर भर होता. उपस्थितांच्या शंकांचं समाधान करणारी उत्तरं संबंधितांकडून दिली जात होती. मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीवरचा विश्वास वाढवला पाहिजे; महाराष्ट्राच्या हितासाठी, त्याला श्रेष्ठ बनविण्यासाठी शंभर टक्के मतदान केले पाहिजे, अशी लोकांची मानसिकता बनविण्यात यश मिळालं. ‘सजग रहो’मध्ये लोकसहभाग वाढत गेला तसा त्याचा परिणाम मतटक्का वाढीवरही झाला. अराजकतावादी पिछाडीवरच राहतील हे पाहतानाच दुसर्‍या बाजूला महाराष्ट्रहिताचे विकसित भारताच्या स्वप्नाशी असलेले नाते सुनिश्चित करणे यासाठी ‘सजग रहो’ अभियानांतर्गत ‘शिवप्रेरणा जागर’ ही मोहीम घेण्यात आली.
 
 
या अभियानांतर्गत राज्याच्या अनेक शहरांत स्थानिक संस्थांच्या मदतीने शिवप्रेरणा जागर सभा आयोजित करण्यात आल्या. वेगवेगळ्या सामाजिक घटकांसोबत कामाचा दीर्घ अनुभव असणारे अनेक जण पुढे आपणहून सरसावले. ’धर्माचे पालन। करणे पाखंड खंडन॥’ या जगद्गुरू तुकोबारायांच्या उक्तीचे वाहक असलेले तुकोबांचे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज मोरे, दलित चळवळीतले क्षितिज टेक्सास गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार उदयजी निरगुडकर, चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक अविनाशजी धर्माधिकारी, विदर्भातले ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री नामदेवराव कांबळे, मातंग साहित्य परिषद या संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे, दलित चेंबर ऑफ कॉमर्सचे मिलिंद कांबळे अशा अनेक विचारवंत मान्यवर मंडळींनी हे जनजागरण आपलं कर्तव्य आहे, या भावनेने अभियानात पुढाकार घेतला.
 
 
महाराष्ट्रातील काही स्वयंसेवी सामाजिक संस्था, राज्याच्या सर्व भागातील विचारवंत, लेखक आणि तत्सम मान्यवरांनी ही जागरणाची मोहीम हाती घेतली. राष्ट्रीय सकस विचार घेवून जेंव्हा काही गोष्टी घडतात तेंव्हा त्यात संघ स्वयंसेवक सहभागी होणे स्वाभाविक असते पण ह्याचा असे अभियान संघ चालवत आहे; असे म्हणणे योग्य ठरणार नाही किंबहुना संघाचा पण तसा दावा नाही हे येथे लक्षात ठेवावे लागेल. राष्ट्रीय कर्तव्य म्हणून स्वयंसेवक स्वयंस्फूर्तपणे या सक्रिय होते. 
 
 
rss 
 
फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, एक्स ही समाजमाध्यमे विमर्श प्रस्थापित करण्यात भूमिका निभावत असतात. ‘सजग रहो’ अभियानाचा या समाजमाध्यमांमधला प्रभावही लक्षणीय होता. अन्य समाजमाध्यमांमध्ये समाजाचा प्रतिसादही असाच अभूतपूर्व होता. संविधानाचे मारेकरी कोण? अराजक आणि राष्ट्रीयतेपैकी समाज काय निवडणार? पूर्वी घडलेल्या अराजकाच्या घटना लक्षात आहे ना? या प्रश्नांनी समाजमन सजग होऊन विचारप्रवण झालं, असा अभिप्राय मतदान करायला आलेल्या नागरिकांनी बोलून दाखवला.
 
 
अनेक ठिकाणी मायमाऊलींनी दिवाळीच्या निमित्ताने ‘सजग रहो’च्या बोधचित्राची रांगोळी रेखाटली. अनेक संस्थांनी आपल्या सभासदांना या अभियानांतर्गत मतदानाचे आवाहन केले. कुणी गाणी रचली, कुणी गायली. पनवेल शहरातल्या एका कॉलेज कट्ट्यावरच्या तरुणांनी पुढाकार घेऊन काही दुकानदारांशी संवाद साधला. त्या दुकानदारांनी ‘सजग रहो’चे पोस्टर्स दुकानावर लावून ग्राहकांना मतदानाचे आवाहन केले. मतदान करणार्‍या ग्राहकांना त्या दिवशी सवलत योजना जाहीर केली. असेच प्रयत्न घाटकोपरमध्ये एकलव्य सामाजिक प्रतिष्ठान, वराह व्यापारी संघ या संस्थांनी केले. बसमध्ये आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी जमेल तितकी चर्चा नागरिकच घडवून आणत होते. हा जगन्नाथाचा रथ ओढण्यासाठी सगळ्यांनी आपापला वाटा उचलल्याने, संघ स्वयंसेवकांच्या पुढाकाराने सुरू झालेलं ‘सजग रहो’ हे अभियान संपूर्ण समाजाचं अभियान बनलं. या अभियानामुळे समाज नक्कीच सजग झाला. समाज सुज्ञ आहेच, त्याला सजगतेची जोड मिळाली की काय होऊ शकतं, याचा प्रत्यय या निकालांनी दिला.
 
 
मात्र राजकीय पटलावरचा विजय अंतिम नाही. यापुढेही वरवर आकर्षित करणारे; पण मुळात समाज तोडण्यासाठी, एकतेची वीण उसवण्यासाठी तयार केलेले विमर्श मांडले जातील. बुद्धिभेदाचे नवनवे डाव रचले जातील. त्यासाठी डावी इकोसिस्टीम जोरात कामाला लागेल. तेव्हा यापुढेही ‘सजग रहो’ अभियानाची प्रासंगिकता आणि आवश्यकता राहणारच आहे. समाज जागा ठेवणारे हे सारे प्रयत्न जागल्या म्हणून करावे लागतील. विचारवंत, लेखक, पत्रकार, अभिनेते, कलासाधक अशा समाजजीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात काम करणार्‍या मंडळींनी या समाजाला सजग करण्याच्या कामात आपलं योगदान यापुढेही द्यायला हवं, कारण विमर्शाचं हे युद्ध चालूच राहणार आहे. जोवर सगळे राष्ट्रविघातक विमर्श पुसले जाऊन केवळ आणि केवळ राष्ट्रीय विचारच जनमानसात प्रस्थापित होत नाहीत, तोवर हे युद्ध संपणार नाही. तेव्हा,
 
सजग रहो
निरंतर... अविराम... अथक...