विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद मिळण्याइतकेही संख्याबळ यांच्यापैकी एकाही पक्षाकडे नाही. इतक्या दारुण अवस्थेला आपण का व कशामुळे पोहोचलो यावर विचार आणि काम करायचे सोडून अतिशय उत्तम कामगिरी करणार्या यंत्रणेविषयी तसेच जिंकलेल्या युतीविषयी समाजात संभ्रम निर्माण करण्याचे कुटिल उद्योग चालू आहेत
नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर ते ‘अनाकलनीय’ असल्याची प्रतिक्रिया मविआतील घटक पक्षांच्या नेत्यांसहित अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दिली. महायुतीच्या पारड्यात सुस्पष्ट बहुमत टाकत या राज्यातील जनतेने मोठ्या विश्वासाने सत्तासूत्रे महायुतीच्या हाती सोपवली आहेत. मतदारांचा हा विश्वास महायुतीने गेल्या अडीच वर्षांच्या परिणामकारक कारभारातून कमावला आहे. तसेच, प्रचारादरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वाखाली तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये दिसलेले कौतुकास्पद समन्वय-सामंजस्य आणि सर्वांनी निवडून येण्यासाठी घेतलेले योजनाबद्ध कष्ट यामुळेही महायुतीला यशाला गवसणी घालता आली आहे. याला जोड होती ती, राष्ट्रभावनेने समाजात कार्यरत असलेल्या विविध संस्था-संघटनांनी आणि खुद्द निवडणूक आयोगाने केलेल्या जनजागरणाची. मतटक्का वाढण्यासाठी आणि मतटक्का वाढणे राष्ट्र म्हणून किती गरजेचे आहे, हे मतदारांच्या गळी उतरविण्यासाठी तीन महिने अविश्रांत मेहनत या मंडळींनी घेतली. त्यामुळे मरगळ, उदासीनता झटकून, निवडणूक गांभीर्याने घेत लोक मतदानासाठी बाहेर पडले. परिणामी मतटक्का वाढला आणि महायुतीच्या हाती सत्तासूत्रे आली.
या सगळ्याकडे कानाडोळा करत, ज्यांनी राष्ट्रहितापेक्षाही ठरावीक वर्गाचे लांगूलचालन करून निवडणूक जिंकण्याचे धोरण आखले व राबवले, त्यांना जनतेने जागा दाखवून दिली. मतदारांची होत असलेली जागृती लक्षात न घेता, प्रचारकाळात हे पक्ष स्वत:च्याच धुंदीत राहिले. त्यांची धुंदी उतरली ती एकदम निकालानंतरच. अर्थात ती अजूनही पूर्णपणे उतरलेली नाही, कारण तसे होते तर त्यांना आत्मपरीक्षण करावेसे वाटले असते. त्याऐवजी लागलेले निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय आहेत, असे म्हणत मतदारांचा बुद्धिभेद करण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांनी सुरू ठेवला आहे. निकालाच्या माध्यमातून प्रकट झालेले लोकशाहीचे सामर्थ्य समजून घेणे त्यांच्या आकलनापलीकडचे आहे. या अर्थाने घडले ते त्यांच्यासाठी अनाकलनीय आहे.
या पराभूत पक्षांना मतदार सुजाण झाला आहे, जागा होतो आहे, विचार करतो आहे... त्याचा हा परिणाम आहे, हे वास्तव पचवणे जड जाते आहे. त्यामुळे दरवेळेप्रमाणेच आपल्या अपयशाचे खापर ईव्हीएमवर फोडण्याचा प्रयत्न चालू झाला आहे. यासाठी ‘भारत जोडो’ यात्रेसारखी यात्रा काढण्याचाही विचार चालू आहे. थोडक्यात, या अपयशाने शहाणपण येण्याऐवजी आपापल्या पक्षाच्या मुळावरच हे नेते घाव घालताहेत. त्यातूनच, निवडणुकीत ईव्हीएमऐवजी बॅलट पेपरचा म्हणजे मतपत्रिकांचा वापर व्हावा, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. ती याचिका फेटाळून लावताना अतिशय स्पष्ट शब्दांत या याचिकाकर्त्यांना फटकारत त्यांच्या दुटप्पीपणाची जाणीव न्यायालयाने करून दिली.
भारतीय निवडणूक यंत्रणेने बजावलेल्या कामगिरीबद्दल तिचे आंतरराष्ट्रीय स्तरावरून जाणकारांकडून कौतुक होत असताना, त्याविषयी अभिमान बाळगण्याऐवजी तिच्याबाबत अविश्वास दाखविण्याचा कर्मदरिद्रीपणा हे विरोधी पक्ष करत आहेत. मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी नाकारतानाच, सर्वोच्च न्यायालयाने, ‘मतपत्रिकेवर मतदान घेतल्याने काय होते ते आम्ही अद्याप विसरलेलो नाही’ असे स्पष्ट शब्दांत सुनावले आहे. तरीही रडीचा डाव खेळण्याची विरोधकांची मानसिकता ओसरलेली नाही. ‘जिथे तुम्ही जिंकता तिथे तुम्हाला ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबाबत शंका नसते, जिथे हरता तिथे शंका उपस्थित करता,’ असे म्हणत न्यायालयाने त्यांचे दुटप्पीपण उघड केले आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद मिळण्याइतकेही संख्याबळ यांच्यापैकी एकाही पक्षाकडे नाही. इतक्या दारुण अवस्थेला आपण का व कशामुळे पोहोचलो यावर विचार आणि काम करायचे सोडून अतिशय उत्तम कामगिरी करणार्या यंत्रणेविषयी तसेच जिंकलेल्या युतीविषयी समाजात संभ्रम निर्माण करण्याचे कुटिल उद्योग चालू आहेत. अमेरिका आणि इंग्लंडमध्ये मतपत्रिकेवर होणार्या मतदानाची उदाहरणे देताना लोकसंख्येत असलेली प्रचंड तफावत नजरेआड करण्यात त्यांना गैर वाटत नाही.
प्रत्येक वेळी निवडणुकीनंतर ईव्हीएमबद्दल अविश्वास व्यक्त करण्याचा रडीचा डाव खेळला जातो. मात्र, दोन वर्षांपूर्वी या शंका सप्रमाण सिद्ध करण्याची निवडणूक आयोगाने दिलेली संधी विरोधकांना पेलता आली नव्हती.
ईव्हीएमवर आधारित चालणार्या भारतातील निवडणूक प्रक्रियेचा आज जगभरात बोलबाला आहे. त्याची तांत्रिक माहिती सर्वसामान्यांना नसते, याचा फायदा घेत त्याविषयी अपप्रचार केला जातो. सर्वसामान्यांची ही अनभिज्ञताच पराभूतांना ईव्हीएमविषयी शंका घेण्यास बळ देते. भारतीय निवडणूक आयोग वेळोवेळी आपल्या संकेतस्थळावर त्याविषयी देत असलेली माहिती वाचण्याचे कष्ट जरी सर्वसामान्यांनी घेतले तरी त्यांच्या मनात या संदर्भात कोणतेही किल्मिष राहणार नाही आणि न्यायालयासारखेच जनतेकडूनही असे रडीचा डाव खेळणार्यांना फटकारले जाईल.
या निवडणुकीने मतदानाची ताकद राज्यकर्त्यांना जशी दाखवून दिली तशी ती मतदारांच्याही लक्षात आली आहे. संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करत त्यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. हे असे का घडले यावर अंतर्मुख होऊन विचार करण्याऐवजी त्यावर अनाकलनीय असा शिक्का मारणे, हा सुबुद्ध जनतेचा व निवडणूक आयोगाचा अपमान तर आहेच, शिवाय विरोधकांच्या बौद्धिक दिवाळखोरीचेही ते उदाहरण आहे.