करीअरच्या वाटेवर घोडदौड करत असताना बर्याचदा आवडीला मुरड घालावी लागते. मात्र, काही जण आवड आणि करीअर यांमधला समन्वय सेतू उत्तमरीत्या पार करतात. रुग्णसेवा करतानाच एक डॉक्टर चतुरांचाही ‘डॉक्टर’ झाला. चतुर आणि टाचणीसारख्या दुर्लक्षित प्रजातींवर संशोधन करून सहा नव्या प्रजातींचा त्यांनी आजवर शोध लावला आहे. शहरातील धकाधकीच्या जीवनापासून दूर जात कोकणात विसावण्याचा सध्या ते प्रयत्न करत आहेत. चतुरांच्या विश्वात रंगणार्या डॉ. दत्तप्रसाद अविनाश सावंत यांच्याविषयी...
चतुर किंवा टाचणीच्या शेपटीला धागा बांधून, त्यांना सारथी करून त्यांच्या मागे मागे धावण्याचा आनंद दत्तप्रसाद यांनी त्यांच्या बालपणी लुटला होता. मात्र, त्या वेळी त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती की, भविष्यात आपण जगासाठी नवीन असणार्या चतुर आणि टाचण्यांच्या अनेक प्रजातींचा उलगडा करणार आहोत. ते डॉक्टर, रुग्णांच्या सेवेत झटणारे. मात्र, रुग्णालयातील औषधांच्या अंगभर भिनभिनणार्या दर्पाबरोबरच हा माणूस जंगलातील मातीच्या गंधातदेखील मिसळतो. रुग्णसेवा करतानाच त्यांनी आपली वन्यजीवांची आवड जपली, ती फुलवली आणि त्यातील दुर्लक्षित घटकांवर संशोधन केले. ’सिंधुदुर्ग मार्श डार्ट’ यांसारख्या चतुर आणि टाचणीच्या सहा नव्या प्रजातींचा शोध लावला. नुकतेच डॉ. दत्तप्रसाद मुंबई सोडून कोकणात स्थायिक झाले असून त्या ठिकाणी आपले बस्तान बसविण्याचा प्रयत्न करत आहेत. सोबत ‘सिंधुदुर्गातील चतुर’ या पुस्तकाचे लिखाणदेखील करत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमधला दि. 1 जानेवारी 1993 सालचा दत्तप्रसाद यांचा जन्म. प्राथमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणही तिथलेच. लहानपणापासूनच ते हुशार, शांत आणि मृदुभाषी. त्यांच्यासाठी त्यांच्या देवगडच्या घराबाहेरचे आवार जणू छोटे जंगलच होते. ऋतूनुसार त्या जंगलात बदलणारा निसर्ग ते पाहायचे. घराच्या अंगणात बागडणारी फुलपाखरे त्यांना आकर्षित करायची. सुरुवातीला चित्रकलेत रमणार्या दत्तप्रसाद यांना पुढे छायाचित्रणाची ओढ निर्माण झाली. महाविद्यालयीन वयात हाती कॅमेरा आल्यावर त्यांनी फुलपाखरांची छायाचित्रे काढण्यास सुरुवात केली. मात्र, ही फुलपाखरे कोणती, त्यांची जात कोणती, त्यांना कसे ओळखावे यासंबंधी त्यांना मार्गदर्शन करणारे कोणीच नव्हते. म्हणून फुलपाखरांची ओळख पटविण्यासाठी दत्तप्रसाद यांनी टिपलेली ही छायाचित्रे समाजमाध्यमांवर टाकण्यास सुरुवात केली. समाजमाध्यमामुळे त्यांची ओळख निरनिराळ्या लोकांबरोबर झाली. त्यातील एक नाव म्हणजे फुलपाखरू तज्ज्ञ संशोधक कृष्णमेघ कुंटे. फुलपाखरांबरोबरच दत्तप्रसाद चतुर आणि टाचण्यांचेही निरीक्षण करू लागले. वन्यजीवांची ही आवड रुजत असताना शैक्षणिक पातळीवर मात्र वैद्यकीय शिक्षण घेण्याचे त्यांच्या मनी पक्के होते. त्यामुळे दत्तप्रसाद बारावीनंतर ’एमबीबीएस’चे शिक्षण घेण्याकरिता मुंबईत आले.
सर ज. जी. रुग्णालयाच्या ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांचे ’एमबीबीएस’चे शिक्षण सुरू झाले. शिक्षणाबरोबरच त्यांनी मुंबईत फुलपाखरांच्या शोधार्थ भटकंती सुरू केली. दक्षिण मुंबईतील हँगिंग गार्डन फुलपाखरांसाठी पिंजून काढले. या भटकंतीदरम्यान काढलेले फोटो ’आय फाऊंड बटरफ्लाय’ या संकेतस्थळावर टाकण्यास सुरुवात केली. त्या माध्यमातून मिळणार्या माहितीमुळे फुलपाखरांवरदेखील अभ्यास करता येऊ शकतो, ही बाब त्यांच्या लक्षात आली. मधल्या काळात 2017 मध्ये गोव्यामधील ’चतुर’ या प्रजातीवर झालेल्या चर्चासत्रात ते सहभागी झाले होते. या बैठकीत घडलेल्या चर्चेअंती त्यांना चतुर आणि टाचण्यांमध्ये रस निर्माण झाला. वर्षातील काही काळ जेव्हा फुलपाखरे दिसत नाहीत, तेव्हा त्यांनी चतुरांची छायाचित्रे टिपण्यास सुरुवात केली. त्यांच्या लक्षात आले की, चतुर आणि टाचण्या वर्षाच्या बारा महिने आढळतात. त्यामुळे दत्तप्रसाद यांनी त्यांच्या निरीक्षणास सुरुवात केली. असेच एकदा 2017 मध्येच सुट्टीच्या काळात दत्तप्रसाद देवगडला गेले असता, विमलेश्वर गावात त्यांनी एका टाचणीचे छायाचित्र काढले. प्रथमदर्शी त्यांना ही टाचणी वेगळी भासली. म्हणून संशोधक शंतनु जोशी यांच्या मदतीने
त्यांनी या टाचणीचे नमुने बंगळुरू येथील ’नॅशनल सेन्टर फॉर बायोलॉजिकल सायन्स’ (एनसीबीएस) या संस्थेत तपासणीकरिता पाठवले. ‘आकारशास्त्रा’च्या (मार्फोलॉजी) आधारे निरीक्षण केल्यानंतर ही प्रजात तिच्या पोटजातीमधील इतर प्रजातींपेक्षा स्पष्टपणे वेगळी असल्याचे दिसले. त्यामुळे तिच्यावर शोधनिबंध लिहून तो ’जर्नल ऑफ थ्रेअटेन्ड टॅक्सा’ या संशोधन पत्रिकेकडे पाठविण्यात आला. अखेरीस दत्तप्रसादने शोधून काढलेली प्रजात जगाकरिता नवीन असल्याच्या शोधावर ’जर्नल ऑफ थ्रेअटेन्ड टॅक्सा’ने शिक्कामोर्तब केले. पुढच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मदतीने त्यांनी राज्याच्या सागरी जिल्ह्यांमध्ये आढळणार्या पाणथळींचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये आढळणार्या जैवविविधतेेची नोंद केली. बक्सा व्याघ्र प्रकल्पामध्ये त्यांनी टिपलेली ’कामासिनिया हार्टेर्टी’ (हिमालयन रेड नाइट) ही जवळपास हाताच्या पंजाएवढी चतुराची जात भारतात 100 वर्षांनी दिसून आली आहे. त्यामध्येही दत्तप्रसाद यांनी टिपलेले मादीचे छायाचित्र हे या प्रजातीच्या मादीचे एकमेव छायाचित्र आहे. याशिवाय त्याने हँगिंग गार्डनमधील फुलपाखरांची आणि गोरेगावमधल्या आरे वसाहतीतील तलावामधून नोंदवलेल्या चतुरांच्या प्रजातींची चेकलिस्ट प्रसिद्ध केली. सिंधुदुर्गातील आंबोली गावात सापडणार्या चतुर आणि टाचण्यांची यादीदेखील प्रकाशित करण्यात आली आहे. दत्तप्रसाद यांनी पश्चिम घाटामधून चार आणि अरुणाचल प्रदेशमधून चतुर आणि टाचणीच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लावला आहे.
दत्तप्रसाद यांनी आपल्या वैद्यकीय कामाची सुरुवात परळच्या के.ई.एम. रुग्णालयात कनिष्ठ निवासी डॉक्टर पदापासून केली. त्याच दरम्यान त्यांनी ’प्रतिबंधात्मक आणि सामाजिक औषध वैद्यकशास्त्र’ या विषयात ’एम.डी.’चे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी शीवच्या लोकमान्य टिळक सर्वसामान्य रुग्णालयात विशेषज्ञ म्हणून वर्षभर काम केले. या ठिकाणी काम केल्यानंतर त्यांनी आपल्या मोर्चा पुन्हा आपल्या गावी देवगडकडे वळवला. सिंधुदुर्गातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये साहाय्यक अध्यापक म्हणून काम केले. सध्या ते पूर्णवेळ देवगडमध्ये स्थायिक झाले असून शाकंभरी नावाने स्वत:चा दवाखाना सुरू केला आहे. वैद्यकीय शास्त्रामधील त्यांचे दोन संशोधन निबंधदेखील प्रकाशित झाले आहेत. या सगळ्या व्यापातही त्यांनी निसर्गाचा पाठलाग सोडलेला नाही. बंगळुरूच्या ’एनसीबीएस’ या संस्थेत ते ’रीसर्च असोसिएट’ म्हणून काम पाहत आहेत. सिंधुदुर्गात आढळणार्या चतुरांविषयीच्या पुस्तकाचेदेखील लिखाण करत आहेत. दत्तप्रसाद यांच्यासारखी ध्येयवेडी माणसे फार मोजकीच आहेत. करीअरच्या वाटेवर मार्गक्रमण करत आपल्या आवडीच्या क्षेत्रात यशाचे उत्तुंग शिखर गाठण्याचे स्वप्न पाहणार्यांसाठी डॉ. दत्तप्रसाद सावंत हे आदर्शच आहेत!
सिंधुदुर्ग मार्श डार्ट
2017 मध्ये टाचणीच्या या प्रजातीला दत्तप्रसाद यांनी सर्वप्रथम विमलेश्वर गावात छायाचित्रित केले होते. त्यानंतर या प्रजातीमधील नर आणि मादीचा नमुना गोळा करून शंतनु जोशी यांच्या मदतीने त्यांना ’एनसीबीएस’ या संस्थेत चाचणीकरिता पाठवले. तपासणीअंती ही प्रजात जगासाठी नवीन असल्याचे लक्षात आल्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नावे तिचे नामकरण ’सिंधुदुर्ग मार्श डार्ट’ असे करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे ही प्रजात केवळ गोड्या पाण्यात आढळते. गोड्या पाण्याचे जलस्रोत प्रदूषित झाल्यास या टाचण्या त्या ठिकाणी अधिवास करत नाहीत. साचून राहिलेल्या गोड्या पाण्यात किंवा भाताच्या शेतीसाठी साचून ठेवलेल्या पाण्याच्या आसपास ही प्रजात आढळते. जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा ते सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ’सिंधुदुर्ग मार्श डार्ट’ टाचणी दिसून येते. यामधील नर हा हळदीसारखा पिवळसर रंगाचा साधारण 3.9 सेंटिमीटर आकाराचा असतो, तर मादी त्यापेक्षा किंचित लहान 3.7 सेंटिमीटरची असून हिरवट पिवळ्या रंगाची असते. ही प्रजात अंडी, अळी, कोश आणि कीटक अशा अवस्थांमधून विकसित होते. डासांच्या अळ्या, डास, छोटे कीटक हे त्यांचे मुख्य खाद्य आहे.
पश्चिम घाटामधील तीन नव्या टाचण्या
’प्रोटोस्टिक्टा स्यानोफिमोरा’, ’प्रोटोस्टिक्टा मायरिस्टिकेन्सिस’, ’प्रोटोस्टिक्टा शोलाई’ या तीन नव्या टाचण्यांचा शोध दत्तप्रसाद यांनी पश्चिम घाटामधून लावला. ’प्रोटोस्टिक्टा स्यानोफिमोरा’ ही टाचणी शेंदुरणे वन्यजीव अभयारण्य, कोलम, केरळ आणि कलक्कड मुण्डनथुराई व्याघ्र प्रकल्प, तमिळनाडू येथून शोधण्यात आली. पायावर असणार्या चमकदार निळ्या रंगावरून या टाचणीला ’स्यानोफिमोरा’ हे नाव देण्यात आले. ’प्रोटोस्टिक्टा मायरिस्टिकेन्सिस’ ही टाचणी कथलेकन, शिमोगा, कर्नाटक येथील मायरिस्टिकाच्या जंगलातून शोधण्यात आली. ’प्रोटोस्टिक्टा शोलाई’ ही टाचणी मेघमलाई वन्यजीव अभयारण्य, तमिळनाडू येथील शोला गवताळ प्रदेशात सापडली.
(लेखक दै. ’मुंबई तरुण भारत’मध्ये वरिष्ठ पर्यावरण प्रतिनिधी पदावर कार्यरत आहेत.)