निवडणूक ट्रम्प यांच्यासाठी अजिबात सोपी नव्हती. मात्र 78 वर्षांच्या रांगड्या व्यक्तिमत्त्वाच्या या नेत्याने विजयश्री स्वबळावर खेचून आणली. एलॉन मस्क यांनी पाठिंबा दिला असला तरी ट्रम्प निवडणूक लढले ते स्वत:च्या हिमतीवर. प्रचारादरम्यान झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतरही त्यांचा लढवय्येपणा जराही कमी झाला नाही. प्रतिस्पर्ध्याला उघडउघड आव्हान देत, प्रतिस्पर्ध्याला शिंगावर घेत ते लढत राहिले.
अमेरिकी अध्यक्षपदाच्या बहुचर्चित निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत पराभूत झालेल्या डेमोक्रॅटिक पक्षाला आणि त्याच्या उमेदवाराला म्हणजेच कमला हॅरिस यांना जेवढे दु:ख झाले, त्याहून अधिक दु:ख वोकीजमला पाठिंबा देणार्या अमेरिकेतील डाव्यांसह जगभरातल्या तथाकथित लिबरलांना झाले. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पक्षाने हा ऐतिहासिक विजय प्राप्त केला, त्याचे अनेक दूरगामी परिणाम होणार आहेत. ते राजकीय आहेत, सामाजिक आहेत, सांस्कृतिक आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिकही आहेत.
कोविड काळातील परिस्थिती हाताळण्यात ट्रम्प यांना आलेले अपयश त्यांच्या 2020 मधील निवडणुकीतील पराभवाला कारणीभूत ठरले. शिवाय अन्य कारणेही होतीच; पण हे ठळकपणे अधोरेखित झाले. त्यानंतर डेमोक्रॅटिक पक्षाच्या म्हणजेच बायडन यांच्या हातात सत्तासूत्रे आली आणि त्यांच्या ढिसाळ कारभाराने अमेरिकन नागरिकांचा पुरता अपेक्षाभंग केला. बायडन यांच्या कार्यकाळात महागाईने गाठलेला उच्चांक आणि त्याच्या नागरिकांना बसलेल्या झळा याचा मोठा फटका डेमोक्रॅटिक पक्षाला यंदाच्या निवडणुकीत बसला.
प्रचाराच्या ऐन मध्यावर प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देऊन बायडन यांना निवडणुकीतून सक्तीने माघार घ्यायला लावली. त्यांच्या जागी उमेदवार म्हणून आल्या त्या कुठलीही पक्षांतर्गत निवडणूक न लढवलेल्या कमला हॅरिस. त्यांच्या निवडीचाही विपरीत परिणाम झाला. कमला हॅरिस या पात्रही नव्हत्या आणि त्यांची तयारीही त्या तोडीची नव्हती. मात्र त्यांना माजी अध्यक्ष बराक ओबामा, बिल क्लिंटन, तसेच हिलरी क्लिंटन यांच्यासारख्या मातबर राजकीय नेत्यांनी, त्याचबरोबर ट्रम्प यांना सोडून आलेले त्यांच्या पक्षातील नेते, सिनेउद्योग क्षेत्रातील सेलिब्रिटी आणि त्या निवडून येण्याने ज्यांचे उखळ पांढरे होणार होते अशा उद्योगसम्राटांनी पाठिंबा दिल्याने आपण ही निवडणूक जिंकल्यातच जमा आहे, अशा भ्रमात कमला हॅरिस आणि त्यांचे सहकारी होते. ट्रम्प यांच्यासारखा तगडा प्रतिस्पर्धी समोर आहे याचे भानच त्यांना नव्हते. त्यातच प्रचारादरम्यान एकाच विषयावर दोन ठिकाणी परस्परविरोधी मते व्यक्त करण्यातून त्यांचा वैचारिक गोंधळ (की अपरिपक्वता?) लोकांसमोर आला.
आणखी एक निमित्त झाले ते, वोकीजमला त्यांनी दिलेला उघड पाठिंबा. बोकाळलेल्या वोकीजमच्या माध्यमातून स्वत:च्या लैंगिक ओळखीबद्दल संपूर्ण समाजात संभ्रम निर्माण करण्याचे प्रमाण अमेरिकेत प्रचंड वाढले आहे. म्हणजे एखाद्याचा जन्म मुलगा म्हणून झाला आहे की मुलगी हे महत्त्वाचे नसून, त्याचे लिंग कोणते आहे असे त्याला जे वाटते तेच आणि तेवढेच खरे मानायची आणि तेच सर्वांवर लादायची अपप्रवृत्ती वाढीस लागली आहे. लैंगिक स्वओळखीच्या संदर्भात फक्त आणि फक्त अजाण, कोवळ्या वा किशोर वयातल्या त्या मुलाचे वा मुलीचेच मत महत्त्वाचे... त्यांचे जन्मदाते, डॉक्टर, अन्य नातेवाईक या कोणाचेही मत गृहीत धरले जाणार नाही, ही शिकवण अगदी सहा वर्षांच्या मुलालाही शाळेतून दिली जाते. हे त्याच्या घरच्यांना मान्य नसेल तर त्या मुलावर त्यांचा पालक म्हणून काही अधिकार तर राहत नाहीच, शिवाय संबंधित राज्य त्या मुलाचे पालकत्व स्वीकारेल, अशी जोरजबरदस्ती केली जाते. छद्मविज्ञानाच्या आधारे अमेरिकेतल्या काही राज्यांमध्ये हे चालू आहे. लादल्या गेलेल्या दहशतवादाच्या या नव्या प्रकारामुळे हजारो पालक धास्तावलेले आहेत. समाजाची शिवणच मुळापासून उसवण्याच्या या प्रकाराला ट्रम्प यांच्या कारकीर्दीत आळा बसेल या आशेने, या पालकांनीही डेमोक्रॅटिक पक्षाऐवजी रिपब्लिकन पक्षाला मत देण्याचे ठरवले. समाजरचनेला हादरे देणार्या या दडपशाहीमुळेच कदाचित गर्भपाताच्या कायद्यासंदर्भात ट्रम्प यांची मांडणी अनेकींना पटत नसूनही कमला हॅरिस यांच्या पारड्यात महिलांची मते फारशी पडली नाहीत. डेमोक्रॅटिकच्या पराभवाला आणखी एक महत्त्वाचे कारण ठरले ते, ट्रम्प समर्थकांची त्यांनी सातत्याने केलेली पराकोटीची हेटाळणी.
अमेरिका हा स्थलांतरितांचा देश म्हणूनच ओळखला जातो. वेगवेगळ्या देशांतून इथे येऊन स्थायिक झालेल्या नागरिकांचा कल डेमोक्रॅटिक पक्षाकडे होता तो त्यांच्या ‘इमिग्रेशन’ संदर्भातील मवाळ धोरणामुळे. त्याच वेळी, सत्तेवर असताना इमिग्रेशन संदर्भात ट्रम्प यांनी अंगीकारलेले धोरण, कडक केलेले नियम यामुळे या स्थलांतरितांची त्यांच्याविषयी नाराजी होती. मात्र चार वर्षांतला डेमोक्रॅटिक पक्षाचा ढिसाळ कारभार पाहता त्यांचा कलही रिपब्लिकन पक्षाकडे वाढू लागल्याचे या निवडणुकीत दिसून आले. आपला मतदार आपल्याला सोडून जातो आहे, हे डेमोक्रॅटिक पक्षाच्या लक्षात आले नाही. कोणताही उमेदवार असला तरी विजय आपलाच, हा भ्रमच पक्षाच्या पराभवाला कारणीभूत झाला. (निवडून आलेल्यांपैकी भारतीय मुळाचे सहा जण डेेमोक्रॅटिक पक्षाचे आहेत, ही वस्तुस्थिती असली तरी हळूहळू तेथील भारतीयांचे डेमोक्रॅटिक पक्षाबाबतचे मत बदलते आहे हेही वास्तव आहे.) तात्पर्य, केवळ रिपब्लिकन विचारसरणीचा पुरस्कार करणार्यांनीच ट्रम्प यांच्या पारड्यात मते टाकली नाहीत, तर डेमोक्रॅटिक विचारसरणीच्या पुरस्कर्त्यांसह, तटस्थ/काठावर असलेल्या अनेकांनी ट्रम्प यांच्या बाजूने मतदान केले, प्रचारही केला. जगप्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क हे त्यातले एक उल्लेखनीय नाव. त्यांनी अगदी उघडपणे ट्रम्प यांची पाठराखण केली. त्यामागे त्यांचे काही निश्चित हेतू असतीलच; पण ट्रम्प येण्याची शक्यता नाही, या अपप्रचारानंतरही जाहीर भूमिका घेत त्यांनी साथ सोडली नाही. ट्रम्प समर्थकांपैकी आणखी आवर्जून दखल घ्यावी अशी आणखी तीन नावं म्हणजे, उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार असलेल्या जे.डी. व्हॅन्स यांच्या पत्नी उषा, पूर्वाश्रमीच्या डेमोक्रॅट तुलसी गॅबर्ड आणि कट्टर ट्रम्प समर्थक विवेक रामस्वामी.
राष्ट्रवादाचे कट्टर पुरस्कर्ते असलेले, देशहित प्रथम मानणारे ट्रम्प जानेवारी महिन्यात पुन्हा एकदा देशाची सूत्रे हाती घेतील. ‘मी युद्धखोर नाही, मला युद्ध थांबविण्यात रस आहे,’ असे जाहीरपणे सांगणारे ट्रम्प संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय असलेली, दीर्घकाळ चालू असलेली दोन युद्धे थांबविण्याच्या दृष्टीने काही जागतिक नेत्यांच्या सहकार्याने ठोस पावले उचलतील, असा अंदाज आहे.
वास्तविक ही निवडणूक ट्रम्प यांच्यासाठी अजिबात सोपी नव्हती. मात्र 78 वर्षांच्या रांगड्या व्यक्तिमत्त्वाच्या या नेत्याने विजयश्री स्वबळावर खेचून आणली. एलॉन मस्क यांनी पाठिंबा दिला असला तरी ट्रम्प निवडणूक लढले ते स्वत:च्या हिमतीवर. प्रचारादरम्यान झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतरही त्यांचा लढवय्येपणा जराही कमी झाला नाही. प्रतिस्पर्ध्याला उघडउघड आव्हान देत, प्रतिस्पर्ध्याला शिंगावर घेत ते लढत राहिले.
ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षाचा झालेला विजय भारतासाठी अनेक कारणांनी महत्त्वाचा आहे. अमेरिकेतील राष्ट्रप्रमुख कोणत्याही पक्षाचे असले तरी भारतातील सत्ताधार्यांनी त्यांच्याशी कायमच सौहार्दाचे संबंध ठेवले आहेत. गेल्या दहा वर्षांत झालेली प्रगती आणि जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा उंचावल्यानंतरही या धोरणात बदल झाला नाही. बराक ओबामा, ट्रम्प आणि बायडन या तिघांशीही पंतप्रधान मोदींचा सुसंवाद असला तरी ट्रम्प यांच्याशी त्यांचे स्नेहाचे नाते आहे. दोघांमधला हा स्नेह उभय देशांसाठी अधिक लाभदायी ठरेल, अशी आशा आहे.