कोकणातील कातळशिल्पे

विवेक मराठी    08-Nov-2024
Total Views |
@ऋत्विज आपटे
कोकणाला निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आहे. विस्तीर्ण समुद्रकिनारे, नारळीपोफळीची झाडे, प्राचीन मंदिरे, त्यासोबतच अजून टिकवून ठेवलेल्या सणांच्या आणि उत्सवांच्या परंपरा. भारतीय उपखंडात बाहेरच्या देशांतील येणार्‍या पर्यटकांचे मूळ आकर्षणबिंदू म्हणजे पहिले नैसर्गिक आणि दुसरे म्हणजे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक. कोकण किनारपट्टीत ही दोन्ही संसाधने मुबलक आहेत. हे पर्यटनाचे आकर्षणबिंदू असले तरी या गोष्टींच्या पल्याड जाऊन अशा अनेक ऐतिहासिक वारसा असलेल्या कित्येक गोष्टी कोकणात लुप्त होऊन बसलेल्या आता समोर येताना दिसत आहेत. त्यातील अश्मयुगीन म्हणावा असा वारसा गेल्या काही वर्षांत कोकणात समोर येताना दिसतो आहे, तो म्हणजे कातळखोद चित्र (कातळशिल्प) रूपाने. अश्मयुगीन मानवाने त्याच्या भावभावनांचा मांडलेला एक मोठा पट म्हणजे कातळखोद.
Katal Shilp Konkan
महाराष्ट्राच्या पश्चिम भागात अरबी समुद्राशी संलग्न असलेली 720 किलोमीटर लांब आणि अंदाजे 30 किलोमीटर रुंद किनारपट्टीचा भाग म्हणजेच कोकण किनारपट्टी. निसर्गसंपन्न आणि विविध सांस्कृतिक रहस्ये दडवून असलेला हा भाग म्हणजे वारसा पर्यटनासाठी एक आतापर्यंत कधीही जगासमोर न आलेला भाग आहे. कोकणातील पर्यटन हे साधारणपणे सामान्य नागरिकांसाठी समुद्रकिनारे, खाद्यसंस्कृती आणि धार्मिक बाबींवर चालणारे आहे. दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रातला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून प्रसिद्धीस आला. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आता संपूर्ण कोकण हळूहळू पर्यटनावर भर देऊ पाहात आहे जी एका दृष्टीने अत्यंत आनंदाची बाब आहे. कोकणाला निसर्गसंपन्न किनारा आहे, नारळीपोफळीचे वरदान आहे, सोबतच ह्या ठरावीक गोष्टींच्या पल्याड जाऊन अशा अनेक ऐतिहासिक वारसा असलेल्या कित्येक गोष्टी कोकणात लुप्त होऊन बसलेल्या आता समोर येताना दिसत आहेत. एवढे सगळे असूनसुद्धा म्हणावी तशी पर्यटनवृद्धी काही कोकणात झालेली नाही. आता त्यामागे अनेक कारणे आहेत. सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे स्थानिकांमध्ये जनजागृती. स्थानिकांना त्याबाबत माहिती आहे; परंतु त्याचा वापर पर्यटनवाढीसाठी कसा करावा ह्याची योग्य जाण अजून कोकणातल्या स्थानिकांना नाही.
 
शतसूर्याचे तेज – लोकमान्य टिळक
लोकमान्य टिळकांनी पाहिलेली स्वप्नं आणि आजचा भारत या विषयी चिकित्सक लेखांचा संग्रह असलेला शतसूर्याचे तेज – लोकमान्य टिळक पुस्तक आहे.
https://www.vivekprakashan.in/books/book-on-lokmanya-tilak/
 
 
भारतीय उपखंडात बाहेरच्या देशांतील येणार्‍या पर्यटकांचे मूळ आकर्षणबिंदू हे दोन आहेत. एक म्हणजे नैसर्गिक आणि दुसरं म्हणजे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक. नशिबाने कोकण किनारपट्टीला ह्या दोन्ही संसाधनांचा उत्तम वरदहस्त लाभलेला आहे. नैसर्गिक समुद्रकिनारे, धबधबे, फुलं वगैरे गोष्टी तर आहेतच; पण सोबतीने गणेशोत्सव, शिमगा, नवरात्री, दिवाळी ह्या सणवार आणि उत्सवांचीसुद्धा मोठ्या प्रमाणावर रेलचेल असते. सोबतच नृत्य, नाट्य ह्यांच्या संगमाने युक्त असे अनेक नृत्यनाट्याविष्कार जसे की नमन, जाखडी, दशावतार वगैरे सांस्कृतिक बाबी अजून तरी कोकणात जपून ठेवण्यात स्थानिक लोक यशस्वी झालेले दिसून येतात. कोकणातला हा अमूर्त वारसा दशावतार, नमन आणि गणेशोत्सवाच्या माध्यमांतून जगभरात पोहोचला; पण कोकणातल्या मूर्त वारशाचे काय? मुळात आधी वारसा म्हणजे काय ते आपण जाणून घ्यायला हवे. थोडक्यात सांगायचे झाल्यास वारसा म्हणजे आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या मूर्त आणि अमूर्त संकल्पना, गोष्टी. ह्यामध्ये अगदी छोट्याशा कागदापासून एखादा मोठा सणवार, उत्सव तसेच पाषाणात कोरलेल्या मूर्तीसुद्धा येतात. हा मिळालेला वारसा जपावा, त्यात आपल्या परीने भर घालावी आणि तो पुढच्या पिढीच्या हाती सोपवावा हे सामान्यपणे पिढ्यान्पिढ्या चालत आलेले असते. एखादी वास्तू वारसा म्हणून सांगताना त्या वास्तूमुळे त्या भौगोलिक भागावर पडलेला प्रभाव, त्या वास्तूचे राजकीय किंवा सामाजिक स्थान, या गोष्टींचा विचार केला जातो. त्याशिवाय ती त्या त्या काळातील विचारशैलीचे; धार्मिक, सामाजिक अभिसरणाचे, समृद्धीचे, विचारप्रवाहांचे प्रतिनिधित्व करतात. अशा प्रकारचा विविध कालखंडांतील वारसा कोकणात मूर्त आणि अमूर्त दोन्ही प्रकाराने दिसून येतो.
 
 
अमूर्त वारसा तर आपण पाहिलाच. आता मूर्त वारसा पाहताना कोकण किनारपट्टी ही फार पूर्वीपासून व्यापाराचे एक महत्त्वाचे केंद्रस्थान म्हणून गणली गेलेली आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा भागांतील अनेक ऐतिहासिक शहरे, त्यात तयार होणार्‍या वस्तू ह्यांचा व्यापार हा कोकण किनारपट्टीवरून विविध देशांत केला जात असे. ह्या काळात व्यापार्‍यांना राहण्यासाठी म्हणून तयार केलेल्या अनेक लेण्या कोकणात कोरलेल्या दिसतात. ह्या लेण्या कोण्या एका धर्माशी किंवा कोण्या एका राजघराण्याशी संबंधित नसून विविध कालखंडांत विविध राज्यांनी विविध धर्म आणि संस्कृतींच्या उद्धारासाठी ह्या बांधलेल्या दिसतात. मुंबईत असणार्‍या कान्हेरी लेण्या, एलिफंटा लेणी, रायगड जिल्ह्यातील कुडा,रत्नागिरीमधील पन्हाळेकाजी, खेडच्या लेण्या, लांजा येथील कातळगांव, सोबतच सिंधुदुर्गात असलेले विमलेश्वर इत्यादी लेण्या ह्या वारसा पर्यटनासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा आहेत. हल्लीच राजापूर तालुक्यात अनेक ठिकाणी जांभा दगडातील एकाश्म मंदिरेसुद्धा समोर येत आहेत. लेण्यांबरोबरच अनेक जुनी काळ्या पाषाणात विविध राजवटींत बांधलेली मंदिरे कोकणात दिसून येतात, त्यामध्ये कसबा संगमेश्वर आहे, कुणकेश्वर आहे, कनकादित्य मंदिर आहे, तसेच मराठाकालीन उतरत्या छपराची जवळपास 1000 छोटीमोठी मंदिरे कोकणात विविध ठिकाणी दिसून येतात.मराठाकालीन मंदिरांच्या बरोबरीने त्याच काळातील अनेक गड आणि किल्ले कोकणात दिसतात. त्यात अगदी प्रबळगडासारखा वनदुर्गपण आहे आणि मुरुड जंजिरा, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्गसारखेसमुद्री किल्लेसुद्धा आहेत. ह्या प्रकारचा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा हा पर्यटनाला चालना देण्यासाठी पुष्कळ आहे; परंतु ह्याच्यापल्याड जाऊन अगदी अश्मयुगीन म्हणावा असा वारसा गेल्या काही वर्षांत कोकणात समोर येताना दिसतो आहे, तो म्हणजे कातळखोद चित्र (कातळशिल्प) रूपाने.
 
 
गेल्या दहाएक वर्षांत अश्मयुगीन मानवाने त्याच्या भावभावनांचा मांडलेला एक मोठा पट जो कातळखोद चित्रांच्या रूपाने आता जगासमोर आणला जात आहे. मी आणि माझे सहकारी गेली काही वर्षे ह्या चित्रांवर अभ्यास करतो आहोत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत 110 गावांमध्ये 150 ठिकाणी 2000 हून अधिक चित्रे आढळून आली आहेत. ही चित्रे कोकणातल्या सड्यावर म्हणजेच आडव्या पसरलेल्या जांभ्या दगडाच्या पठारावर कोरलेली आहेत.
 


Katal Shilp Konkan  
 
हा आडवा पसरलेला जांभा दगडाचा सडा गेली अनेक वर्षे अनेक गुपिते आपल्या पोटात ठेवून आहे. त्यातलाच एक भाग म्हणजे ही कातळखोेद चित्रे. 2012 साली आडवळणावरच कोकण ह्या संकल्पनेतून चालू झालेला आडवळणावरचा प्रवास आज युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ होण्याच्या दिशेने निघालेला आहे. आता नक्की ही कातळखोद शिल्पे म्हणजे काय? तर हा प्रागैतिहासिक मानवाच्या कलेचा एक भाग आहे. प्रागैतिहासिक भित्तिचित्र ह्या प्रकारात तीन महत्त्वाचे भाग आहेत.
 
 
पिक्टोग्राफ- चित्ररंगांचा वापर करून
 
पेट्रोग्लीफ- दगडावर कोरणे
 
जिओग्लीफ/अर्थ फिगर- आडव्या जमिनीवर कोरणे
 
आता ह्या तीन भागांपैकी तिसरा भाग हा कोकणात जांभ्या दगडाच्या सड्यावर आढळून येतो. 2000 हून अधिक चित्रांची नोंद करताना अनेक संदर्भांचा मागोवा घेत राहिलो होतो. त्यानंतर मग ह्या एवढ्या चित्रांची त्यांच्या आकारानुसार विभागणी केली. तेव्हा आढळून आले की, ह्यामध्ये मानवी आकृती आहे, भौगोलिक आकृत्या आहेत तसेच सोबतीने अनेक प्राणी आणि पक्ष्यांचेसुद्धा अंकन केलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ह्यामध्ये जे काही प्राणी कोरले आहेत ते एक तर आकाराने जेवढे असतात तेवढे आहेत किंवा त्याहून जास्त मोठे दाखवले गेले आहेत. आता ह्यामध्ये एकशिंगी गेंडा, हत्ती, हरिण वर्गातील प्राणी, विविध पक्षी, जलचर, उभयचर असे विविध प्रकार दिसून येतात. ह्या चित्रांसोबतच त्या काळी मानवाने शिकार करण्यासाठी बनवलेली हत्यारेसुद्धा आढळून येत आहेत. ह्याच्या कालखंडाबाबत जरी आता काही निश्चित माहिती हातात नसली तरी समोर येणारे पुरावे हेच सांगतात की, ही चित्रे कोकणात राहणार्‍या अश्मयुगीन माणसाने कोरलेली असावीत. ह्यातीलच नऊ साइट्स आता जागतिक वारसा म्हणून युनेस्कोच्या प्रस्तावित यादीत नोंदवल्या गेल्या आहेत. त्यातील सात ह्या रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. एक सिंधुदुर्गातील आणि एक गोव्यातील आहे.
 
 
आता युनेस्कोसारख्या संस्थेनेसुद्धा ज्यांची दखल घेतली त्या कातळखोद चित्रांत एवढे काय वेगळेपण आहे? किंवा त्यांचे पुरातत्त्वीयदृष्ट्या महत्त्व काय? ते आपण जाणून घेऊ. कोणत्याही ठिकाणी पुरातत्त्वीय अभ्यास करताना विविध गोष्टी विचारात घेऊन तो अभ्यास करायला लागतो. आधीच सांगितल्याप्रमाणे मंदिरे, एकाश्म मंदिरे ह्यांची बांधणी कधी केली गेली, कोणी केली वगैरे बर्‍यापैकी बाबी लिखित स्वरूपात उपलब्ध असतात; पण जेव्हा एखादा पुरातत्त्वज्ञ त्याच्यापल्याड जाऊन अजून जुन्या गोष्टींचा अभ्यास करतो तेव्हा त्याबाबतचे पुरावे त्या भागात सापडणे गरजेचे असते. हे पुरावे सापडणे हे पुन्हा एकदा त्या भागाच्या पर्यावरणीय आणि वातावरणातील बदलांवर अवलंबून असते. भारतातील सगळ्यात जुने पुरावे हे राजस्थानमध्ये सापडतात, कारण तेथील वातावरण लाखो वर्षे जुन्या पुराव्यांना शाबूत ठेवण्यासाठी योग्य म्हणजेच शुष्क, कोरडे आहे. कोकणात ह्याच्या आत्यंतिक विरुद्ध परिस्थिती आहे. प्रचंड प्रमाणात पाऊस आणि उष्ण कटिबंधीय भाग. कोकणात पुरातत्त्वीय अभ्यास न होण्याचे हे एक खूप महत्त्वाचे कारण आहे. कोकणातील कातळखोद चित्रे एवढ्या प्रतिकूल वातावरणात राहिली कशी, ह्याचेही उत्तर त्या जांभ्या खडकात आहे. जांभा दगडाला सच्छिद्रता असल्या कारणाने नैसर्गिक झीज अत्यंत कमी आहे म्हणूनच एवढी हजारो वर्षे ही चित्रे टिकून राहिली असावीत. वर लिहिल्याप्रमाणे चित्रांसोबत आम्हाला काही दगडी हत्यारेसुद्धा सापडली. त्याचा शोध मात्र फारच कठीण होता; पण त्याने एक गोष्ट नक्की केली, की इसवीसनपूर्व 20,000-5000 ह्या कालखंडातमानवाचे कोकणातल्या सड्यावर वास्तव्य नक्की होते; पण माणसाला जगायला ज्या प्रकारचे वातावरण लागते, तसे वातावरण तेव्हा होते का? कसा जगला माणूस आणि सोबतच ही चित्रांमधून दिसणारी जीवसृष्टीसुद्धा? ह्या सगळ्यांची उत्तरे कातळखोद चित्रांमधून आपल्याला मिळतात आणि हेच ह्या कातळखोद चित्रांचे वैशिष्ट्य आहे जे जगाला आता दिसून येते आहे.

Katal Shilp Konkan  
कोकणात आतापर्यंत आम्हाला 2500 च्या सुमारास चित्रे आढळून आली आहेत, त्यामध्ये विविध प्रकार आढळून आलेले आहेत. जसे की मानवाकृती, भौमितिक आकृत्या आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे अनेक प्रकारचे प्राणी आणि पक्षी. काही पुराजीव अभ्यासकांच्या आणि चित्रकार कलाकार लोकांच्या म्हणण्यानुसार ही काढलेली चित्रे ही first hand drawing ह्या सदरात मोडणारी अशी आहेत, मेमरी drawing नव्हेत. म्हणजेच माणूस कुठे तरी एखादा प्राणी बघून आला आणि मग आठवून आठवून त्याचे चित्र काढले, अशी ही चित्रे नव्हेत. जे काही प्राणी, पक्षी तो माणूस दररोजच्या व्यवहारात पहात होता, अनुभवत होता, ते प्राणी त्याने अत्यंत बारीक बारकाव्यानिशी कोरलेले दिसतात. येथे हत्ती दिसतो. साधारणपणे बाराएक ठिकाणी हत्तीचे अंकन आहे. विविध आकार पाहता ते विविध वयांतील असावेत असे वाटते. सद्यःस्थितीत हत्ती कोकणात अस्तित्वात नाही. हा आदि दक्षिणेकडे सिंधुदुर्ग गोवा आणि कोल्हापूर बॉर्डरवर दोडामार्ग वगैरे भागांत दिसतात तेवढेच. रत्नागिरीत तर नक्कीच नाहीयेत. अशीच बाब एकशिंगी गेंड्याच्या बाबतीत. एकशिंगी गेंडा जो आता फक्त आसाममध्ये दिसून येतो, त्याच्या आतापर्यंत सहा आकृत्या रत्नागिरी जिल्ह्यात आढळून आलेल्या आहेत. साधारणपणे इसवीसनपूर्व 2000 पर्यंत गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर महाराष्ट्र भागात गेंड्याचे अस्तित्व होते असे पुरावे विविध रूपांत आढळले आहेत; पण कोकणात गेंडा राहत होता ह्याचा पुरावा हा ह्या कातळखोद चित्रांच्या रूपाने समोर आला आहे. ह्या दोन महत्त्वाच्या प्राणांच्या आकृतीसोबतच एक आकृती मात्र अत्यंत कोड्यात टाकणारी आहे ती म्हणजे कशेळी येथे सापडलेली पाणघोडासदृश आकृती. काही पुराजीव अभ्यासकांच्या मते ते 12 फूट लांब आणि 5 फूट उंचीचे चित्र हे पाणघोड्याचे असावे. आता पाणघोड्याच्या अस्तित्वाचा शेवटचा म्हणजेच उशिरात उशिराचा पुरावा हा लातूरमधल्या मांजरा नदीच्या खोर्‍यात करण्यात आलेल्या उत्खननातून मिळतो. तेथे पाणघोड्यासोबत गेंडा, मगर वगैरे इतर प्राण्यांचेसुद्धा जीवाश्म सापडले आहेत ज्याचा कालखंड साधारणपणे 25-40000 वर्षे एवढा मागे जातो. महाराष्ट्राच्या दक्षिणेला गेंड्याचे पुरातत्त्वीय पुरावे नाही सापडलेत. फक्त बेळगावला 1860 मध्येे रॉबर्त ब्रूस फूट ह्या भूगर्भ अभ्यासकाला गेंड्याचे जीवाष्म सापडल्याचे उल्लेख आहे. आता तसे पाहायला गेले तर मग कोकणात सापडलेली ही गेंडा, पाणघोडा ह्यांची चित्रेसुद्धा एवढीच जुनी आहेत का?
 
 
कोकणात ही चित्रे सापडली आहेत हे खरे. अगदी ती चित्रे ज्याने कोरली आहेत, जशी कोरली आहेत, त्यावरून वाटते की, ह्या प्राण्यांच्या सहवासात तो कलाकार असावा; पण ह्याच्या पल्याड पुरातत्त्वीयदृष्ट्या प्राथमिक म्हणता येतील असे पुरावे कोकणात अजून आढळलेले नाहीत. आता प्राथमिक पुरावे म्हणजे काय? तर ह्या चित्रांमध्ये असलेल्या प्राण्यांचे जीवाश्म किंवा उत्खननात त्यांची हाडे सापडणे जशी त्या मांजरा नदीच्या किनारी सापडली आहेत. तशा प्रकारचा पुरावा कोकणात सापडणे हे जवळपास अशक्य आहे. त्याचे कारण एकतर कोकण किनारपट्टीचे वातावरण आणि हा जांभा दगड हाच आहे. जरी प्राथमिक पुरावा नसला तरी ह्याच वातावरणाचा अभ्यास करून अन्य काही पुरावे समोर आले आहेत. अन्य पुरावे म्हणजे पुरा पर्यावरणाचा अभ्यास.
 
 
गेंडा, पाणघोडा, हत्ती, इतर हरीण वर्गातील प्राणी ह्यांची चित्रे आपल्याला कोकणात दिसतात म्हणजेच ते प्राणी कधी ना कधी तरी कोकणात अस्तित्वात होते. त्यांच्या अस्तित्वासाठी लागणारे वातावरण कसे असते? ते तेव्हा होते का? कसे होते? ह्या अभ्यासावर आमचा आता भर आहे. साधारणपणे ह्या मोठ्या प्राण्यांना आवडणारे वातावरण म्हणजे सदाहरित गवताळ भाग हवा असतो जिथे मुबलक प्रमाणात पाण्याचे साठे आहेत आणि तेही छोट्या छोट्या आकाराचे असे. आता सद्यःस्थितीला आपण कोकणात पाहायला गेलो तर हे असे वातावरण दिसत नाही. जेवढा पाऊस इथे पावसाळ्यात पडतो तेवढाच उकाडा हा उन्हाळ्यात असतो; परंतु तेव्हा म्हणजेच जेव्हा हे प्राणी अस्तित्वात होते तेव्हा असे वातावरण नसावे असे वाटते. आता पुरातत्त्वाचा अभ्यास करताना प्राचीन पर्यावरणाची पुनर्बांधणी हा एक फार महत्त्वाचा भाग असतो. त्याचा वापर आम्ही इथे करतो आहोत. 2012 च्या आसपास पुण्यातील आगरकर संस्थेतल्या काही अभ्यासकांना कांगवाई ह्या दापोली तालुक्यातील गावात एका विहिरीचे खोदकाम चालू असताना एका पानाचे जीवाष्म आढळून आले. जीवाश्म ह्यांचा कालखंड विविध तांत्रिक पद्धतीने काढता येतो. त्याचा कालखंड के. पी. कुमारन, शरद राजगुरू ह्या अभ्यासकांनी साधारणपणे 44000 वर्षे ते 20000 वर्षे एवढा जुना काढला. त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या पानाचे हे जीवाष्म आहे ते पान किंवा ती वनस्पती साधारणपणे अशा ठिकाणी सापडते जेथे तलाव किंवा छोट्या छोट्या आकारांचे पाणीसाठे आहेत. आता ह्याच प्रकारचे वातावरण आपल्या हत्ती आणि गेंडा यांसारख्या मोठ्या जीवांच्या आवडीचे आहे. सोबतच मघाशी वर सांगितल्याप्रमाणे आम्हाला जी काही दगडी हत्यारे मिळाली आहेत तीसुद्धा ह्याच कालखंडाशी मिळत्याजुळत्या कालखंडातील आहेत. तदनंंतर मात्र वातावरणात अनेक बदल झाले असावेत असे वाटते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोवा ह्यांचे माजी संचालक राजीव निगम ह्यांनी नंतर समुद्राच्या पाण्याच्या पातळीचा अभ्यास केला आणि अंदाज बांधला की, आताची समुद्राची पातळी ही साधारणपणे इसवीसनपूर्व 2000 च्या आसपास स्थिरावली आहे. तत्पूर्वी ती सतत कमीजास्त होत होती. ज्या कालखंडाचा आपण विचार करतो आहोत त्या कालखंडात समुद्राची पातळी खूप मागे म्हणजेच आत असावी. त्यामुळे माणसाला आणि प्राण्यांना वावरायला जागासुद्धा मुबलक प्रमाणात उपलब्ध असावी. त्यानंतर समुद्राच्या पाण्यात झालेली वाढ मात्र त्या वेळचे अनेक पुरावे आपल्यासोबत खोल समुद्रात घेऊन गेली आहे. सिंधुदुर्गात मालवण भागात पुन्हा एकदा आगरकर संस्थेच्या कुमारन सरांना अशाच काहीखारफुटी वनस्पतीवर लागणार्‍या बुरशीचे जीवाश्म मिळाले आहेत अशा ठिकाणी जिथे आता खारफुटीची झाडे दिसत नाहीत. ह्याचा अर्थ समुद्र बर्‍यापैकी आत गेला आहे. त्याचा कालखंड हा साधारणपणे इसवीसनपूर्व 12000-10000 आहे. ह्याचे कालखंडाशी समांतर जाणारे पुरावे जळगाव तालुक्यातील पटणे गावातून येतात. प्रा. साळी ह्यांना तेथे उत्खननात शहामृगाच्या अंड्यांचे तुकडे आढळून आले. आता शहामृगसुद्धा कोणे एके काळी महाराष्ट्रात होते आणि त्याला लागणारे पर्यावरण मात्र गेंडा आणि हत्ती ह्यांच्यापेक्षा पूर्ण वेगळे असते. तसाच काहीसा प्रकार इकडे एका चित्रात दिसून येणार्‍या एलीफंट बर्ड ह्या पक्ष्याचा. हा पक्षी जगातून नाहीसा होऊन 5000 वर्षे उलटली. मादागास्कर आणि आजूबाजूच्या परिसरांत सापडणारा हा उडता न येणारा पक्षी गवताळ प्रदेशात रमणारा. शहामृगापेक्षा जवळपास दोनेएक फूट उंच आणि पायात प्रचंड ताकद असणारा हा पक्षी भारतात होता ह्याचे पुरावे अजून सापडले नाहीयेत; पण कोकणात एक आकृती आहे जी 13 फूट उंच आहे आणि ह्या एलीफंट बर्डच्या शारीरिक रचनेशी मेळ खाणारी अशी आहे.

Katal Shilp Konkan  
 
कोकणात सड्यावर फिरताना नैसर्गिकरीत्या तयार झालेली अनेक छोटीमोठी तळी आता आम्ही अभ्यासत आहोत. त्यात काही जुन्या मातीचे किंवा वनस्पतीजन्य जीवांचे किंवा पानांचे अवशेषमिळतात का ह्याचा शोध घेणे चालू आहे; परंतु हा एवढा मोठा विषय अभ्यासायचा म्हणजे काही सोप्पे काम नव्हे. गोष्टी शोधायच्या, गोळा करायच्या, मग त्याचा अभ्यास करून निष्कर्ष काढायचा, ही खूप लांबलचक, मोठी आणि थकवणारी प्रोसेस आहे. सोबतच कातळचित्रांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. प्रत्येक नवीन साइटवरून नवीन माहिती समोर येते आहे. कर्नाटक,केरळमधूनसुद्धा आता चित्रे समोर येत आहेत. तिथे मात्र कुठेही गेंडा किंवा हत्ती ह्यांचे चित्रण दिसत नाही. त्यामुळे वातावरणातले बदल हे फक्त महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीपुरते मर्यादित होते, की पूर्ण पश्चिम किनारपट्टी त्यातून गेली होती ह्यावर अभ्यास चालू आहे. प्राचीन काळात माणूस हा नैसर्गिक बदलांसाठीचा मूलस्रोत नव्हता. निसर्गात नैसर्गिक पद्धतीने होणारे बदल हे सावकाश होत असत आणि त्याच वेगाने तो माणूस ते बदल आत्मसात करून त्यानुसार आपली जीवनशैली आखत होता. त्यामुळे संतुलन व्यवस्थित राखले जात होते. नंतरच्या कालखंडात माणसाने प्रगती केली आणि निसर्गाच्या विरोधात जाऊन त्याला ओरबाडायला सुरुवात केली. होणारे बदल स्वीकार करायलासुद्धा माणसाला वेळ मिळेनासा झाला आहे. नैसर्गिक संसाधनांचा अयोग्य वापर करून माणूस आपली प्रगती साधत आहे जी पर्यावरणासाठी अत्यंत धोकादायक आहे. पुरातत्त्वाचा अभ्यास करताना अशा अनेक गोष्टी समोर येतात आणि भूतकाळ आपल्याला काय काय देऊन गेला आहे ह्याची जाणीव होते, सोबतच आपण आता वर्तमानातून काय काय हरवून बसत आहोत आणि भविष्यात काय काय दवडणार आहोत ह्याची जाणीव करून देतो. शेवटी आपण जे काही करतो ते आपल्या भविष्यासाठी; पण तेच जर आता आपण चुकीच्या पद्धतीने करत असू तर त्यावर वेळीच निर्बंध घालायला हवेत एवढे नक्की.