@पौर्णिमा भोसले-शिरगावकर
पर्यावरणाचे दैनंदिन व्यवहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वच्छ पर्यावरण ही माणसाची मूलभूत गरज आहे. आपले दैनंदिन व्यवहार पृथ्वी, जल, अग्नी, हवा, आकाश या पंचतत्त्वांशी निगडित आहेत. आपल्या दैनंदिन व्यवहारामुळे ही पंचतत्त्वे बिघडू नयेत याची काळजी आपणच घेऊ. पर्यावरण संतुलित राहावं म्हणून आपल्या जीवनशैलीत थोडासा बदल केल्यास पर्यावरण राखण्यास आणि सुदृढ ठेवण्यास मदत होईल.
आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात अनेक वस्तू वापरतो, त्या सर्व वस्तू नैसर्गिक संसाधनांचा उपयोग करून बनविल्या जातात. दैनंदिन व्यवहार करण्यासाठी आपल्या जीवनशैलीत थोडासा बदल केल्यास पर्यावरण राखून, सुदृढ ठेवण्यास मदत होईल, जे आपल्या पूर्वजांनी राखलेले आहे. आपण आपल्या भविष्यातील पिढीसाठी राखणे ही आपली जबाबदारी आहे. आता थोडासा बदल कोणता? तर मी पाण्याचा वापर जबाबदारीने करीन, मी कचर्याचे वर्गीकरण करीन, मी विजेचा वापर कमी करीन. या सर्वांचा अवलंब केल्यास नक्कीच नैसर्गिक संसाधन टिकण्यास मदत होईल.
दैनंदिन व्यवहारात वापरले जाणारे एकल प्लॅस्टिक आज कितीही बंदी आली तरी बाजारात दिसतेच; परंतु मी प्लॅस्टिकचा वापर करणार नाही, हे ठरवलं व पालन केलं तर प्लॅस्टिकचा वापर किमान आपल्यापुरता तरी बंद होईल. मी बाजारात जाताना कापडी पिशवी घेऊन जाते. हे माझं सातत्य कधी सवयीत बदललं हे कळलंच नाही. प्लॅस्टिकसंदर्भात अजून एक उदाहरण देते. गेल्या वर्षी पर्यावरण दिनानिमित्त बीट प्लॅस्टिक पोल्युशन या कॅम्पेनमार्फत ‘सोल्युशन टू प्लॅस्टिक पोल्युशन’ ही थीम होती. पर्यावरण शाळेतर्फे प्लॅस्टिक जनजागृतीची अनेक सत्रे घेण्यात आली. त्यातील शिव समर्थ शाळेतील सातवीच्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक सांगायला आवडेल. त्या विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिक जनजागृती करत असताना जे सांगितलं होतं त्याचे प्रात्यक्षिक केले. घरामध्ये येणार्या दुधाच्या पिशव्या आणि त्या कापल्यानंतर त्रिकोणाकृती फेकला जाणारा छोटासा तुकडा पाण्यासोबत वाहून जातो. तो प्लॅस्टिकच्या बाटलीत गोळा करा हे सांगितलं होतं. बघता बघता एका महिन्यात चाळीस विद्यार्थ्यांनी अर्धा लिटरची गच्च दुधाच्या पिशव्याच्या तुकड्यांनी भरलेली बाटली मला पुढील सत्रात दाखवली. मी शिकवलेलं विद्यार्थी प्रत्यक्षात करत आहेत याचा मला खूप आनंद झाला. अशा प्रकारचा अवलंब करा, हे विद्यार्थ्यांमार्फत घरात पोहोचले, मग समाजात पोहोचले. पर्यावरणाचा विचार समाजामध्ये पोहोचवणं गरजेचं आहे. खरं तर आज पर्यावरण दक्षता मंडळातर्फे पर्यावरण संवर्धनाचे धडे समाजात पोहोचलेले आहेत, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीची आवश्यकता भासते हे दिसून येतं. दैनंदिन व्यवहारात थोडंसं लक्ष दिल्यास पर्यावरणातील संसाधने नक्कीच आपल्या भविष्यातील पिढीसाठी राखली जातील.
निसर्गनियमांचे पालन निसर्गातील इतर सजीव अगदी चोख करतात, मात्र अतिशय बुद्धिमान माणूस निसर्गनियमांना विसरलेला आहे. अगदी ऊर्जेचे बघा ना! ‘प्रदूषणविरहित वाहन‘ असे वाहनावर लिहिलेलं आपण वाचतो. मी अनेक जणांना बोलताना ऐकलं आहे; पण मग प्रश्न असा पडतो की, हे वाहन चालतं कसं? मग उत्तर मिळतं की, हे वाहन विजेवर चालतं. आता मला सांगा, वीज बनविताना प्रदूषण होत नाही का हो? याचं उत्तर शोधणे गरजेचे आहे. आपल्याकडील वीज विद्युत प्रकल्पात बनली आहे. आपल्या घरी पोहोचेपर्यंत विजेची वितरण क्षमता कमी होते, त्यामुळे दैनंदिन व्यवहारात विजेचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. आपल्या घरी विजेची उपकरणे गरज नसल्यास बंद करून ठेवावी. ऊर्जा बचतीची विद्युत उपकरणे बाजारात मिळतात. त्यांचा वापर करावा. फ्रिज उघडताना फ्रिजचा दरवाजा पूर्ण उघडला जातो, तो दरवाजा ठरावीक कोनात उघडला तर ऊर्जेची बचत होईल.
आपल्या दैनंदिन व्यवहारात स्वयंपाकघराचे विशेष स्थान आहे. स्वयंपाकघरात दिवसभर काही ना काही आपण खायला बनवत असतो. हे पदार्थ बनविल्यानंतर कचरा निर्माण होतो. हा बराचसा ओला कचरा असतो; परंतु काही प्रमाणात सुका कचराही तयार होतो. या कचर्याचे योग्य वर्गीकरण करावे. ओल्या कचर्याच्या व्यवस्थापनासाठी माझ्या घरामध्ये छोटीशी पिशवी ठेवली आहे. त्याच्यापासून मी खतनिर्मिती गेली अनेक वर्षे करत आहे. फळाच्या साली, भाज्यांची देठं, चहाचा गाळ, नारळाची किशी, झाडांची पडलेली पानं हे सगळं मी खतनिर्मितीच्या पिशवीत टाकते. खतनिर्मितीच्या पिशवीत असलेली गांडुळे त्या कचर्याचे रूपांतर खतामध्ये करतात. या सूत्रांचे नित्यनियमाने पालन केल्यास आपल्या घरातून येणारा कचरा खूप कमी होईल. तसेच आपल्या घरात निर्माण झालेले खत आपल्या झाडांसाठी टाकल्यास ती झाडे आपल्याला छान फुलं व फळं देतील. फक्त त्यामध्ये सातत्य असणे गरजेचे आहे. दैनंदिन व्यवहारातील आपल्या घरात गोळा होणारा इतर कचरा, त्यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या, प्लॅस्टिकचे डबे, प्लॅस्टिकची वेष्टनं, पुट्ठे, कागद, काचेच्या बाटल्या, घरातील जैववैद्यकीय कचरा, त्यात वाया गेलेली औषधे व गोळ्या यांचेही वर्गीकरण करून कचरा विल्हेवाट केंद्राकडे पाठवला तरी आपण पर्यावरण संवर्धनास हातभार लावू शकतो.

पर्यावरणाविषयी विचार समाजात पेरल्यानंतर होणारा बदल हा संथ आहे; पण हा बदल होताना मात्र दिसून येतोय हे मान्य करावेच लागेल. अगदी उदाहरणासह सांगायचे झाले तर गणेश उत्सवाचे बघा ना? आज समाजामध्ये पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करावा याचा अवलंब होताना दिसून येत आहेच. एका बाजूला आलेले कायदे, विविध संस्थांनी केलेली जनजागृती आणि मनुष्याने पर्यावरणाबाबत केलेला सकारात्मक विचार या सगळ्यांच्या एकत्रीकरणामुळे हा बदल घडला असे मला वाटते. त्यामुळे दैनंदिन व्यवहार आणि पर्यावरण यांचा एकत्र मेळ साधायचा असेल तर सर्व पातळ्यांवर काम करणे आवश्यक आहे. पर्यावरणीय दृष्टी ठेवून आपण काय करू शकतो? काय टाळू शकतो? याचा दैनंदिन व्यवहारामध्ये विचार करणे गरजेचे आहे. आपल्याला हे सहज जमेल ज्यात पर्यावरणहित आहे, अशा प्रकारचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे. दैनंदिन व्यवहारात मनुष्याला केवळ लोभी वृत्ती ठेवून चालणार नाही याचे भान राखलेच पाहिजे. पर्यावरणाचा मानवावर परिणाम होतो तसेच मानवाचाही पर्यावरणावर परिणाम होतो. आजूबाजूचं वातावरण स्वच्छ आणि चांगलं असल्यास आपल्याला ऊर्जा मिळते; आपल्याला प्रसन्न असल्यासारखं वाटतं; परंतु हेच वातावरण प्रदूषित असेल तर आपल्याला बेचैन वाटतं, करमत नाही, असं वाटतं. म्हणजेच काय, बाहेरील वातावरणाचा तथापि पर्यावरणाचा मानवावर प्रभाव पडतो आणि म्हणूनच दैनंदिन व्यवहारात पर्यावरण संतुलित ठेवणं गरजेचं आहे.
आताच मी गावाकडे गेले होते, तेथे माझ्या मावसबहिणीच्या घरी जाण्याचा योग्य आला. तिचं छोटंसं, पण सुबक मातीचं घर बघून मी सुखावले. कारण आता कुठं दिसतात अशी मातीची घरं. हे घर असंच राखा, असा सल्लाही तिला दिला. मी असं काही सांगतेय याचं तिला नवल वाटलं. कारण माझा सल्ला इतरांच्या पेक्षा वेगळाच होता. ती हसली आणि बोलता बोलता ती सहज म्हणाली, दर दिवशी फरशी पुसण्यापेक्षा महिन्यातून एकदा सारवलं की झालं. खर्चही नाही आणि वेळही वाचतो. बघा ना! आपल्या पूर्वजांची पारंपरिक जीवनशैली पर्यावरणहित साधणारी आहे. याउलट शहरात आज कोणाच्याही घरी जा, आपल्याला मोठ्या प्रमाणात बाथरूममध्ये किंवा एका विशेष ठिकाणी रसायनांनी भरलेली टॉयलेटरी किट्स, डिटर्जंट, हँडवॉश, डिशवॉश लिक्विड ठेवलेली दिसतात. आपण त्याचा वापर फरशी पुसण्यासाठी, ओटा साफ करण्यासाठी व इतर साफसफाईसाठी वारंवार करत असतो. साफसफाई झाल्यानंतर ते पाणी बाथरूम किंवा बेसिनमध्ये सहज टाकले जाते. आपल्या दैनंदिन व्यवहारातील हे रसायनयुक्त पाणी आपल्या गटारात जाते आणि मग पुढील जलस्रोताला मिळते. अशा प्रकारे स्वच्छ, सुंदर जलस्रोत प्रदूषित होतो. एकीकडे आपण मात्र रसायनाच्या वापरण्यामुळे घरामध्ये छान सुगंध पसरला, फरशी स्वच्छ झालीय याने खूश असतो; परंतु आपल्या दैनंदिन वापरातील रसायनांमुळे प्रदूषण होत आहे, आपल्या घरात रसायनांचा मारा होत आहे, याबाबत आपण अनभिज्ञ असतो. हे टाळण्यासाठी आपल्याकडे असणार्या पारंपरिक गोष्टींचा जसे की, बाजारात मिळणार्या पर्यावरणपूरक टॉयलेटरी किट्स याचा अवलंब करणे. ही किट्स रिठा, कडुनिंब अर्क, बेसन, गोमूत्र, विविध पानांच्या अर्कापासून बनलेली असतात व पर्यावरणास हितकारकही आहेत. अगदी साध्या पाण्याने जरी आपण फरशी पुसली तरी फरशी साफ होते आणि त्यामुळे रसायने आपल्या घरामध्ये घरामंध्ये येत नाहीत, हा माझा अनुभव आहे.
दरवर्षी पर्यावरण दिन, वन महोत्सव सप्ताह जवळ आला की, आपल्याला झाड लावायचं सुचतं. या विशेष दिवसाच्या निमित्ताने वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. माझ्या मते वृक्ष लागवडीसोबत झाडांना वाढवणे, त्यांची काळजी घेणे आता गरजेचं आहे. एकीकडे झाडे लावली जात आहेत, तर दुसर्या बाजूला अमाप जंगलतोड/वृक्षतोड होत आहे. हे समीकरण जुळताना दिसत नाहीये. खरं तर जंगलात झाडं आपोआपच वाढतात, त्यांची काळजी आपण कुठे घेतो? ती झाडं स्वतःहून आपली काळजी घेतात आणि वाढत असतात. झाडासोबतच इतर सजीव आनंदाने नांदत असतात; परंतु मनुष्य आपले दैनंदिन व्यवहार पूर्ण करण्यासाठी वृक्षतोड करतो, निसर्गनियमाचे पालन करत नाही. निसर्गातील नियमांचे पालन इतर सजीव करताना दिसतात. त्यांना जेवढं आवश्यक आहे ते घेतात आणि आपलं जीवनचक्र पूर्ण करतात. या सर्व सजीवांप्रमाणेच मनुष्यानेसुद्धा केलं तर जंगल अबाधित राहील. पर्यावरण टिकविण्यासाठी खूप काही करण्याचीही गरज नाही. आपल्या ठिकाणी सोसायटीच्या आवारात शक्य तितकी जास्त झाडे लावा, घरात जिथे जिथे शक्य असेल तिथे झाडे लावा, गच्चीवर शेती फुलवा व शहरी परिसंस्था जपण्यास हातभार लावा. हे तर नक्कीच शक्य आहे. या सर्वामुळे तर पर्यावरण बनते. या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आनंदही देतील आणि पर्यावरण राखण्यास मदतही करतील.
दैनंदिन व्यवहारात पर्यावरणाची आपण काळजी घेतो का? हे चाचपण्यासाठी तुम्ही आपल्या आजूबाजूच्या परिसराचे निरीक्षण करा. तसेच शक्य असेल तर जवळच्या वाहत्या जलाशयांना भेट द्या. आपल्यालाच कळेल की, आपण आपला परिसर, वाहते जलाशय किती दूषित केले आहेत. जरा बारकाईने लक्ष दिले तर त्या ठिकाणी आपल्या घरातील सगळ्या वस्तू अगदी ब्रश, प्लॅस्टिकच्या पिशव्या, खाद्यपदार्थ, तंबाखू-गुटखा पाकीट, फुलांचे हार, चपला हा सगळा कचरा दिसून येईल. याचाच अर्थ घरात दैनंदिन जीवनात तयार होणारा कचरा योग्य विल्हेवाट लावून केंद्राला न दिल्यामुळे वाहत्या जलाशयात जातो. शेवटी हा सर्व कचरा महासागरात जात आहे. आज महासागरात प्लॅस्टिकच्या कचर्याचे डोंगर बनत आहेतच. हे कमी करण्याच्या दृष्टीने मनुष्याचे दैनंदिन व्यवहार आणि पर्यावरण यांच्यातील समतोल राखण्यासाठी वैयक्तिक, संस्थात्मक आणि सरकारी पातळीवर विविध पर्यावरण संरक्षण कार्यक्रम राबविण्याची गरज आहे. प्रदूषण, कचरा विल्हेवाट इत्यादीसारख्या पर्यावरणीय समस्यांकडे तातडीने स्थानिक पातळीवर, अगदी वैयक्तिक पातळीवर लक्ष देण्याची गरज आहे.
पर्यावरणाचे दैनंदिन व्यवहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वच्छ पर्यावरण ही माणसाची मूलभूत गरज आहे. आपले दैनंदिन व्यवहार पृथ्वी, जल, अग्नी, हवा, आकाश या पंचतत्त्वांशी निगडित आहेत. आपल्या दैनंदिन व्यवहारामुळे ही पंचतत्त्वे बिघडू नयेत याची काळजी आपणच घेऊ. पर्यावरण संतुलित राहावं म्हणून दैनंदिन जीवनातील व्यवहारात आवश्यक त्या वस्तूचीच खरेदी करा, नैसर्गिक संसाधनांचे जतन करा, कचर्याचा पुनर्वापर करून पुनर्चक्रीकरणासाठी द्या, घरच्या घरी असलेल्या जागेत बाग फुलवा, कापडाचा वापर करा, कागदाचा वापर टाळा, जैवविविधता समजून घ्या व जतन करा; माती, पाणी, वीज वाचवा, सार्वजनिक वाहनांचा वापर करा, शक्य असेल तेथे चालत जा, विद्युत उपकरणात बिघाड झाला तर उपकरणे दुरुस्त करून वापरा, पर्यावरणास अनुकूल पद्धतींचा अवलंब करा. असे घरच्या घरी अगदी छोटे छोटे उपाय करता येतील.
एके काळी जैवविविधतेने समृद्ध असलेला आपल्या आजूबाजूचा परिसर आत्ता पाहिल्यास उजाड, भयावह आणि सिमेंटने जखडलेल्या इमारतीने झाकलेला दिसून येतो. या परिस्थितीतही पर्यावरण जपण्यासाठी स्वतः कृतिशील व सकारात्मक राहा, इतरांना शिक्षित करा, पर्यावरण जतनासाठी पुढाकार घ्या. नैसर्गिक संसाधने मर्यादित आहेत हे ध्यानात ठेवायलाच हवे. माझ्या मते पर्यावरण जपण्यासाठी सातत्याने चांगल्या सवयींकडे जाणे हे तत्त्व पाळल्यास नैसर्गिक संसाधनांवरील भार कमी होईल आणि आपले दैनंदिन व्यवहार व पर्यावरण यांची सांगड घालता येईल.
लेखिका पर्यावरण दक्षता मंडळात निसर्ग अभ्यासक म्हणून कार्यरत आहेत.