जैन स्थापत्य

विवेक मराठी    08-Nov-2024
Total Views |
आशुतोष बापट
8605018020
धर्मप्रसारासाठी सतत भ्रमंती करणार्‍या साधकांना, पावसाळ्यात म्हणजेच वर्षाऋतूमध्ये राहण्यासाठी निवास असावा, या हेतूनेच लेण्यांची निर्मिती झाली. या लेण्यांना ‘वस्सा वास’ असेही म्हटले गेले आहे. जैन साहित्यामध्ये आलेल्या प्रसंगांचे शिल्पपट या लेण्यांमध्ये पाहायला मिळतात. पाले, मांगी-तुंगी, अंजनेरी, खरोसा, पार्श्वनाथ टेकडी-वेरूळ, पाटणे, मोहिंडे, भामेर, भामचंद्र महादेव डोंगर या सर्वच ठिकाणी कमीअधिक प्रमाणात सुबकपणे कोरलेली जैन लेणी पाहता येतात. त्यांचे पर्यटन नक्कीच आनंददायी ठरते. त्यातल्या काही जैन लयन स्थापत्याची ही धावती भेट...
 
Jain architecture
 
लयन स्थापत्य अर्थात पाषाणात खोदलेली लेणी भारतात खूप मोठ्या संख्येने पाहायला मिळतात आणि त्यातल्या जवळजवळ 80 टक्के लेणी ही एकट्या महाराष्ट्रात आहेत. ‘सुंदर देशा... कणखर देशा... दगडांच्या देशा’ असं जे वर्णन महाराष्ट्राचं केलं जातं त्याचं कारणच मुळात इथे असलेला बेसाल्ट जातीचा टणक असा खडक. सह्याद्री, सातपुडा या डोंगररांगा आणि त्या रांगांमध्ये खोदल्या गेलेल्या विविध धर्मीयांच्या लेणी यांनी महाराष्ट्र समृद्ध झालेला आहे. बौद्ध आणि हिंदू लेण्यांबरोबरच महाराष्ट्रात जैन लेणीसुद्धा कोरलेली आढळतात. धर्मप्रसारासाठी सतत भ्रमंती करणार्‍या साधकांना, पावसाळ्यात म्हणजेच वर्षाऋतूमध्ये राहण्यासाठी निवास असावा, या हेतूनेच या लेण्यांची निर्मिती झाली. या लेण्यांना ‘वस्सा वास’ असेही म्हटले गेले आहे. नागरी वस्तीच्या किंचित बाहेर आणि डोंगराच्या मध्ये अशा ठिकाणी सर्वसाधारणपणे या लेण्या आढळून येतात. आपले राहते घर जसे आपण विविध रंगांनी, निरनिराळ्या चित्रांनी सजवतो तशीच सजावट या लेण्यांमध्ये दिसू लागते. जैन लेण्यांमध्ये तीर्थंकरांच्या प्रतिमा या अगदी प्रकर्षाने कोरलेल्या दिसतात.
 

Jain architecture 
 
पाले लेणी (जि. पुणे)
 
महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या जैन लेण्या म्हणजे जैन धर्माचा महाराष्ट्रात झालेला प्रसार याची प्रतीकं आहेत. विद्वानांच्या मते सर्वात प्राचीन जैन लेणी पुणे जिल्ह्यातील कामशेतजवळ असलेल्या पाले या गावातील लेणी होय. हे साधे शैलगृह आहे; परंतु याचे अनन्यसाधारण महत्त्व असे की, या साध्या लहान लेण्यात ‘नमो अरिहंताण’ हा मंगलाचरण असलेला जैन शिलालेख आढळला. कै. डॉ. शोभना गोखले यांनी या शिलालेखाच्या अक्षरधाटणीचा अभ्यास करून हा शिलालेख इ.स.पूर्व पहिल्या शतकातील असावा, असे मत व्यक्त केले आहे. तसेच हा शिलालेख महाराष्ट्रातील जैन शिलालेखांमध्ये सर्वात प्राचीन असल्याचे सांगितले जाते. पाले शैलगृहामध्ये डाव्या अंगाला छोटा निवासी कक्ष असलेले हे शैलगृहसुद्धा महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन जैन लेणे समजले गेले आहे. बाजूलाच एक छोटीशी पोढी म्हणजे पाण्याचे टाके असून पाले गावामागे असलेल्या डोंगरात हे लेणे खोदलेले आहे.
 
 
वेरूळची इंद्रसभा (लेणे क्र. 32)
 
वेरूळ या छ. संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या लेणीसमूहात आपल्याला हिंदू, बौद्ध आणि जैन अशा तीनही लेणी पाहायला मिळतात. त्यापैकी जैन लेण्यांचा विचार करता ‘इंद्रसभा’ हे एक अत्यंत देखणे आणि कलात्मक लेणे म्हणून अवश्य पाहिले पाहिजे. इथे जाण्यासाठी प्रथम एका गोपुरातून प्रवेश करावा लागतो. गोपूर ओलांडून आत गेले की, प्रांगणाच्या मधोमध मंदिराची प्रतिकृती असून बाजूला हत्ती आणि एक स्तंभ दिसतो. डाव्या भागात एका दगडात कोरलेला सुंदर स्तंभ दिसतो. याला लागूनच एकामागे एक अशी तीन मंदिरे आहेत. ही मंदिरे या प्रांगणाच्या डाव्या बाजूला आहेत; परंतु इथे असणारे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य
 


Jain architecture
वेरूळमधील यक्ष मूर्ती
 
 म्हणजे या प्रांगणाच्या मध्यभागी सर्वतोभद्र जिनमूर्ती असलेली मंदिराची प्रतिकृती होय. या मंदिराच्या शिखराचे कैलास लेणीच्या शिखराशी खूप साधर्म्य आहे. हे एक दुमजली लेणे आहे. खालच्या मजल्यावर तीर्थंकरांच्या दोन मूर्ती दिसतात; परंतु इथले वरच्या मजल्यावरील मंदिर अत्यंत उल्लेखनीय आहे. पूर्वेकडील जिने चढून आपण वर आलो की, वरील मंडपाच्या दोन भिंतींमध्ये असलेल्या देवकोष्ठामध्ये दोन शिल्पपट कोरलेले दिसतात. व्हरांड्याच्या बाजूंवर अंबिका आणि सर्वानुभूती यक्ष दाखवला आहे. मुख्य गर्भगृहाचा मंडप हा बारा भव्य स्तंभांवर तोललेला असून मधोमध सर्वतोभद्र प्रतिमा ठेवण्यासाठी असलेले पीठ आहे. या वरच्या मजल्यावरचे सौंदर्य कशात आहे, असे विचारले तर इथे असलेले भव्य खांब नि इथे असलेली तीर्थंकरांची मूर्तिशिल्पे. शिवाय सगळ्यात सुंदर म्हणजे पुढच्या व्हरांड्यात असलेली खूप मोठ्या आकाराची सर्वानुभूती यक्ष आणि अंबिका यांची शिल्पे हे होय. सुबकता आणि रेखीवपणा, शिल्प चौकटीत समतोल साधलेल्या घटकांची योजना, मूर्तींच्या चेहर्‍यावरील भाव या वैशिष्ट्यांमुळे पार्श्वनाथ, बाहुबली यांचे शिल्पपट आणि अंबिका व यक्ष यांची शिल्पे ही अत्यंत उत्कृष्ट ठरली आहेत. इथले अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथल्या छतावर रंगचित्रे असून या रंगचित्रांमध्ये विविध अलंकरणे तसेच जैन धर्मातील अनेक कथानकातील दृश्ये चित्रित करण्यात आली आहेत.
 
 
अंकाई-टंकाई जैन गुंफा
 
नाशिक जिल्ह्यातल्या मनमाडजवळच अंकाई-टंकाई असे जुळे किल्ले आहेत. इथे याच नावाचे रेल्वे स्टेशनसुद्धा आहे. या किल्ल्यांच्या दक्षिणेकडील प्रवेशद्वाराकडे जाताना किल्ल्याच्या चढणीवर एक लेण्यांचा समूह दृष्टीस पडतो. याच त्या प्रसिद्ध जैन लेणी होत. वरच्या रांगेत आठ आणि त्याखाली दोन अशी एकूण 10 लेणी इथे आहेत. इथे आढळणारे शिलालेख, घडीव पाषाणाच्या मूर्ती यावरून इ.स.चे 10वे ते 13वे शतक म्हणजे यादवकाळात या लेण्यांची निर्मिती झाल्याचे सांगितले जाते. इथले गुंफासमूह हे दिगंबरपंथीय उपासकांच्या देणग्यांतून निर्माण झालेले आहेत; परंतु इथल्या मूर्तींच्या अलंकरणावर गुजरात-राजस्थान शिल्प परंपरेचा ठसा स्पष्ट दिसतो. स्थापत्याचे विविध प्रकार आणि वेगवेगळ्या मूर्तींमुळे हा लेणीसमूह आवर्जून पहावा असा आहे.
 
 
अंजनेरी (जि. नाशिक)
 
नाशिक-त्रिंबकेश्वर रस्त्यावर नाशिकपासून 20 कि.मी.वर अंजनेरी हे गाव लागते. गावामागेच असलेल्या किल्ल्यावरून या गावाला अंजनेरी नाव पडले असावे. हनुमानाचा जन्म याच ठिकाणी झाल्याचे सांगतात. या गावात अनेक प्राचीन मंदिरे असून त्यात जैन मंदिरसुद्धा आहे. इ.स.च्या 11 व्या शतकातील, दुसर्‍या सेऊणचंद्र राजाच्या काळातला एक शिलालेख इथे मिळाला असून त्यात जैन मंदिराला दान दिल्याचा उल्लेख आहे. याच अंजनेरी डोंगरात एक जैन लेणे असून त्यात मुख्य देवता म्हणून पार्श्वनाथाची मूर्ती आहे. पार्श्वनाथाच्या प्रत्येक बाजूस एक असे दोन तीर्थंकर इथे दाखवले आहेत. यक्ष आणि यक्षी हेसुद्धा यांच्या बाजूला कोरलेले दिसतात.
 
 
दक्षिणेचे संमेदशिखर - मांगी-तुंगी
 
उंच डोंगरावर वसलेली आणि अत्यंत सुंदर अशी जैन लेणी पाहायची असतील तर नाशिक जिल्ह्यातील सेलबारी रांगांकडे जावे लागेल. साल्हेर-सालोटा हे देखणे दुर्ग याच सेलबारी-डोलबारी रांगेमध्ये वसले आहेत आणि त्यांच्याच समोर आहेत हे मांगी-तुंगीचे जुळे डोंगर. लांबून पाहतानासुद्धा हे अत्यंत आकर्षक असे दोन सुळके दिसतात. या मांगी-तुंगीच्या जुळ्या डोंगरांमध्ये जैन लेणी खोदलेली आहेत. मध्ययुगीन जैन स्थापत्याचा हा एक अजोड नमुना म्हणावा लागेल. सटाणा तालुक्याच्या पश्चिम सीमेवर लागून असलेला हा परिसर आहे. नाशिक-सटाणा-ताहराबादमार्गे इथे जाता येते. या लेणींशिवाय इथे आता एक अजून मोठे ठळक वैशिष्ट्य आहे आणि तेसुद्धा मानवनिर्मित आहे. ते म्हणजे इथे उभारलेली 108 फूट उंचीची एकाच सलग दगडात घडवलेली ऋषभदेव या पहिल्या तीर्थंकरांची भव्य प्रतिमा. गुरुवार, 16 फेब्रुवारी 2016 रोजी याचे अनावरण करण्यात आले. मांगी-तुंगीच्या सौंदर्यात याने अजून मोठी भर पडली आहे.
 

Jain architecture 
 
समुद्रसपाटीपासून 1326 मीटरवर असलेली ही दोन्ही शिखरे एका अरुंद नैसर्गिक धारेने जोडलेली आहेत. दोन्ही शिखरे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे अगदी लांबूनसुद्धा ओळखता येतात. पायथ्यापासून इथे जाण्यासाठी अंदाजे 3000 पायर्‍या चढून जावे लागते. कमी उंचीच्या आणि टप्प्याटप्प्यावर विश्रांतीची सोय असलेल्या या पायर्‍या चढणे तुलनेने खूपच सोपे आहे. ज्या भक्तांना हे चालणे जमत नाही त्यांच्यासाठी इथे काही पैसे भरून डोलीची व्यवस्था केली जाते. दोन्ही कातळशिखरांवर काही जैन लेणी आणि बरीच जैन शिल्पे कोरली गेलेली आहेत. ह्या लेणी आणि त्यावरील जैन शिल्पे इ.स.च्या 9 व्या शतकापासून ते इ.स.च्या 15 व्या शतकापर्यंत कोरली जात होती. मांगी या शिखराच्या दक्षिण बाजूच्या कातळावर जवळजवळ 80 जैन प्रतिमा कोरलेल्या दिसतात. डोंगर चढून गेले की आपण मांगी या सुळक्याच्या पायथ्याशी जाऊन पोहोचतो. या सुळक्यावर सर्व बाजूंनी जवळजवळ 135 जैन प्रतिमा कोरलेल्या दिसतात. दोन्ही सुळक्यांना जोडणार्‍या एका अरुंद वाटेने आपण तुंगी या सुळक्याकडे गेलो, की तिथे दोन गुहा असून त्या सुळक्यावर आठ प्रतिमा कोरलेल्या आहेत. मांगी सुळक्याच्या खालच्या अंगाला असलेल्या गुहेला स्थानिक भाषेमध्ये ‘श्री शुद्धबुद्धमुनिराज गुहा’ असे म्हटले जाते. इथे एक छोटीशी मार्गिका आणि एक लहान सभागृह एवढेच कोरलेले दिसते. या गुहांमध्ये अनेक जैन प्रतिमांची अगदी रेलचेल आढळते. गुहेच्या भिंतींवर तीर्थंकर, सर्वानुभूती-अंबिका या यक्ष-यक्षी, चक्रेश्वरी, ऋषभनाथ आणि सरस्वती या सर्व प्रतिमा अंकित केलेल्या दिसतात. त्याचप्रमाणे इथे कमठाने पार्श्वनाथांवर केलेला हल्ला, 23 तीर्थंकर, बाहुबलीची तपश्चर्या इत्यादी प्रसंगांचे अंकन केलेले शिल्पपट दिसतात. सुळक्यावरील गुहा म्हणजे सध्या मोकळ्या खोल्या असून छताला आधार देण्यासाठी काही कच्चे दगडी खांब कोरलेले दिसतात. मांगी सुळक्यावरील दोन गुहा तर निसर्गनिर्मित असून त्यामध्ये काही डागडुजी केलेली दिसते. या गुहांना सध्या महावीर गुंफा, शांतीनाथ गुंफा, श्री आदिनाथ गुंफा, पार्श्वनाथ गुंफा आणि बलभद्रस्वामी गुंफा अशा नावांनी ओळखल्या जातात. गुहेमधील प्रतिमा तसेच गुहेच्या बाहेरील खडकाच्या पृष्ठभागावरील प्रतिमा म्हणजे जैन ऋषी आणि भक्तांच्या रांगाच्या रांगाच दिसतात. खडकाच्या पृष्ठभागावरील प्रतिमा पाहण्यासाठी तिथे उपलब्ध असलेल्या एका अरुंद अशा मार्गाचाच अवलंब करावा लागतो. सध्या या मार्गाच्या बाजूला संरक्षक कठडे बसवलेले आहेत. दोन्ही सुळक्यांवरच्या जवळजवळ सर्व गुहा आणि त्यांच्या बाह्यांगावरील प्रतिमा या उत्तराभिमुख अथवा पूर्वाभिमुख कोरलेल्या दिसतात. शक्यतो या ठिकाणी सूर्योदयाच्या पूर्वी पोहोचावे म्हणजे सूर्याची पहिली किरणे जेव्हा या गुहांवर आणि त्याच्या बाह्यांगावर असलेल्या प्रतिमांवर पडतात तेव्हाचा दिसणारा नजारा हा केवळ अवर्णनीय असतो. सह्याद्रीच्या अजस्र रांगा आणि मोसम व पांजरा नद्या आणि त्यांच्यामुळे सुपीक झालेली जमीन या डोंगरावरून पाहणे हे केवळ अविस्मरणीय असते.
मांगी-तुंगी डोंगर हे इ.स.च्या 12 व्या शतकापासून एक महत्त्वाचे आणि अत्यंत लोकप्रिय असे दिगंबर जैन तीर्थ आहे. या ठिकाणाला सिद्धक्षेत्र असे म्हटले जाते आणि या ठिकाणाबाबतची दंतकथा अशी की, या ठिकाणी जवळजवळ 99 कोटी जैन मुनींना निर्वाण अवस्था प्राप्त झाली. या ठिकाणाचे उल्लेख अनेक मराठी आणि संस्कृत साहित्यांमध्ये आलेले आढळतात. भारतातील गिरनार, शत्रुंजय, पावापुरी या जैन तीर्थक्षेत्रांसोबतच या ठिकाणालासुद्धा अनेक यात्रेकरूंनी भेट दिलेली आहे. बिहारमधील सुप्रसिद्ध आणि पवित्र अशा संमेदशिखरावरून मांगी-तुंगी या स्थानाला दक्षिणेचे संमेदशिखर असे नाव जैन मंडळींनी दिलेले आहे.
 
 
Jain architecture
 
ओडिशामधील जैन लेणी - उदयगिरी आणि खंडगिरी
 
ओडिशाची राजधानी असलेल्या भुवनेश्वरच्या जवळच असलेली उदयगिरी आणि खंडगिरी या शेजारी शेजारी असलेल्या जुळ्या टेकड्यांवरील जैन लेण्या ह्या खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या लेणी आहेत. या लेण्या मुख्यत्वे जैन साधुमुनींच्या निवासासाठी, तसेच प्रार्थना आणि ध्यानधारणेसाठी खोदल्या गेल्या. स्थापत्यदृष्ट्या अत्यंत साधेपणाने या लेणी खोदल्या आहेत. या लेण्यांमधील दालनांची उंचीदेखील फार नाही. कदाचित तीन किंवा चार मुनींना राहता यावे असे एक दालन अशा हिशेबाने ही दालने खोदलेली आहेत. दालने आतून शिल्पांनी सजवलेली नाहीत; परंतु त्या दालनांच्या दरवाजावर तोरणे तसेच जैन शुभचिन्हे कोरलेली दिसतात. तसंच राजदरबारातील प्रसंग, राजाची विजयी मिरवणूक, शिकारीचे प्रसंग अशी काही कथनशिल्पे या दालनांच्या दरवाजांवर विपुल प्रमाणात कोरलेली आहेत. इथे या जुळ्या डोंगरांवर खोदलेली विविध वैशिष्ट्यपूर्ण लेणी आणि या ठिकाणी असलेला तत्कालीन राजा खारवेल याचा शिलालेख या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या 17 ओळींच्या ब्राह्मी लिपीमधील शिलालेखांत अनेक ऐतिहासिक घटनांचे वर्णन आहे.
 
 
उदयगिरी टेकडी
 
जिथे आपण वाहन उभे करतो तिथून उजवीकडे असलेल्या ठिकाणी ही उदयगिरी टेकडी असून तिची उंची 110 फूट आहे. यावर 15 विविध गुंफा किंवा लेणी कोरलेली दिसतात. यातली काही लेणी ही नैसर्गिक, तर काही मानवनिर्मित आहेत. खंडगिरीच्या तुलनेत इथले जैन लयनस्थापत्य जास्त समृद्ध आणि जास्त चांगल्या स्थितीत राहिलेले पाहायला मिळते. एकूण 18 विविध लेणी किंवा गुंफा असलेल्या या टेकडीवर ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा तीन गुंफा आहेत. राणी गुंफा, गणेश गुंफा आणि हाथी गुंफा या त्या तीन गुंफा होत.
 
 
राणी गुंफा
 
इथे या टेकड्यांवर काही गुहा या नैसर्गिक आहेत, तर बाकीच्या गुहा या खोदलेल्या दिसतात. बरीचशी लेणी ही जैन मुनी, आचार्यांसाठी बांधलेली वसतिगृहे या प्रकारचीच आहेत. उदयगिरी येथे 18 लेणी, तर खंडगिरीला 15 लेणी आहेत. या सर्व लेण्यांमधील उदयगिरी डोंगरावरील दुमजली असलेली राणी गुंफा ही अतिशय देखणी गुंफा आहे. त्यावर केलेले शिल्पकामसुद्धा प्रेक्षणीय आहे. स्थापत्यदृष्ट्या ही काही वैशिष्ट्यपूर्ण लेणी आहे असे काही नाही; परंतु राणी गुंफा ही त्यावर केलेल्या नाजूक शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे. राणी गुंफेच्या दाराशीच असलेला एक देखणा द्वारपाल आणि त्याच्या हातात असलेले शस्त्र अगदी तो जिवंत असल्याचा भास होण्याइतपत सुंदर कोरलेले आहे.
 
 
Jain architecture
 
गणेश गुंफा
 
गणेश गुंफा (लेणी क्र. 10) ही उदयगिरीमधील एक महत्त्वाची लेणी आहे. याला गणेश गुंफा असे नाव मिळण्याचे कारण म्हणजे याच्या उजव्या दालनातील एका भिंतीवर गणपतीचे शिल्प कोरलेले दिसते. तज्ज्ञांच्या मते हे शिल्प नंतरच्या काळात कोरले गेले असावे. या लेणीच्या बाहेर दोन अजस्र हत्तींची सुंदर शिल्पे आहेत. ते दोन हत्ती आपल्या सोंडेमध्ये हार घेऊन उभे असल्याचे दाखवले आहे. त्याचप्रमाणे या लेणीच्या तोंडाशीच असलेले दोन द्वारपालसुद्धा अत्यंत देखणे आहेत. या लेणीवर असलेल्या कथनशिल्पामधून कौसंबीचा राजा उदयन आणि उज्जैनची राजकन्या वासवदत्तेची कहाणी सांगितलेली दिसते.
 
 
 
हाथी गुंफा
 
हाथी गुंफा (लेणी क्र. 14) ही उदयगिरी येथील ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाची लेणी आहे. उदयगिरी टेकडीच्या दक्षिणेच्या बाजूला असलेली ही गुहा नैसर्गिक असून याच्या बाहेरच्या बाजूला भिंतीवर खारवेलाचा तो ऐतिहासिक शिलालेख कोरलेला आहे. केवळ याच शिलालेखाच्या आधारे राजा खारवेल, त्याचे कार्यकर्तृत्व इत्यादी गोष्टी उजेडात येऊ शकल्या. या शिलालेखाचा ऊन-वारा-पाऊस यापासून बचाव व्हावा म्हणून पुरातत्त्व विभागाने त्याच्या बाजूने उत्तम असा एक अर्धमंडप बांधून काढलेला आहे. 17 ओळी असलेला ब्राह्मी लिपीमधील हा शिलालेख सम्राट खारवेलाचा कालावधी, त्याचे कर्तृत्व, त्याने सातवाहन राज सातकर्णी, यवन राजा दिमित्रियस, शुंग राजा पुष्यमित्र यांच्याशी झालेल्या लढायांचे वर्णन करतो. त्याचबरोबर तो जैन धर्माचा कसा पालनकर्ता आहे याचेही वर्णन इथे येते. मगधनरेश नंद याने पळवून नेलेली जिनप्रतिमा ही सम्राट खारवेलाने पुन्हा आणून त्याची इथे प्रतिष्ठापना केली याचीसुद्धा नोंद या शिलालेखात केलेली आहे. या शिलालेखाची सुरुवात ‘णमो अरिहंतानं.... णमो सवसिधानं’ या जैन णमोकार मंत्रांनी केलेली आहे.
 
 
खंडगिरी टेकडी
 
उदयगिरी टेकडीच्या समोरच आहे खंडगिरी टेकडी. भुवनेश्वरकडून आल्यावर ही टेकडी डाव्या हाताला आहे. इथे वरती चढून जाण्यासाठी मोठ्या पायर्‍या खोदलेल्या दिसतात. एका ठरावीक उंचीवर गेल्यावर मग इथे गुहा खोदलेल्या दिसतात. खंडगिरीला एकूण 15 लेणी आहेत. खंडगिरी टेकडीची उंची 123 फूट एवढी असून एका शिलालेखात याचा उल्लेख ‘खंडित गिरी’ असा आला आहे. इंद्रकेसरी गुहा तिथेच असून त्याच्या मागे असलेल्या गुहेत 24 तीर्थंकरांच्या प्रतिमा कोरलेल्या दिसतात. या टेकडीवर तातोवा गुंफा, अनंत गुंफा, बाराभुजी गुंफा अशा छोट्या छोट्या लेण्या खोदलेल्या आहेत.
 
 
जैन मंदिर स्थापत्य
 
जैन मंदिरांचा आढळ भारतभर सर्वत्र दिसून येतो. स्थापत्यशास्त्रानुसार जैन मंदिरांचे स्थापत्य वेगळेपण असे नाही. ती मंदिरे हिंदू मंदिरांसारखीच आहेत. त्या मंदिरावर असलेल्या मूर्तींवरून आपल्याला बोध होतो की हे जैन मंदिर आहे. अन्यथा जैन मंदिरांचे निराळे स्थापत्य असे नाही. तरीही आवर्जून बघावीत अशी जैन मंदिरे म्हणजे खिद्रापूर इथले जैन मंदिर, फलटणचे जबरेश्वर मंदिर, बेळगाव इथे असलेले कमलबसदी, गदगजवळच्या लक्कुंडी इथे असलेले ब्रह्मजिनालय, खजुराहो इथली आदिनाथ आणि पार्श्वनाथ ही जैन मंदिरे. कर्नाटकात जैन बसदी म्हणजेच मंदिरे मोठ्या संख्येने बघायला मिळतात. या मंदिरांमध्ये असलेल्या तीर्थंकरांच्या मूर्तीवरून आणि मंदिरावरील इतर शिल्पांवरून ही जैन मंदिरे असल्याचे समजून येते. असेच एक सुंदर जैन मंदिर गिरनार पर्वत चढताना वाटेत लागते. जैनांमधील तीर्थंकर, यक्ष-यक्षी तसेच सरस्वती, लक्ष्मी या देवतासुद्धा जैनांमध्ये पूजनीय आहेत. त्याचे अंकन मंदिरावर केलेले दिसते. खजुराहोच्या मंदिरावर बलराम आणि त्याची पत्नी रेवती यांचे शिल्पसुद्धा बघायला मिळते. मंदिरात प्रवेश करताना दरवाजाच्या वर एक चौकट असते. त्या चौकटीमध्ये ज्या संप्रदायाचे ते मंदिर आहे त्या संप्रदायातील देवतेची मूर्ती असते. त्या मूर्तीला ललाटबिंब असे म्हणतात. ललाट म्हणजे कपाळ आणि बिंब म्हणजे मूर्ती. दरवाजाच्या मस्तकावर असलेली मूर्ती ती ललाटबिंब. जैन मंदिरात प्रवेश करताना या ललाटावर विशेषकरून तीर्थंकरांची मूर्ती कोरलेली दिसून येते. खजुराहोच्या मंदिराच्या ललाटावर चक्रेश्वरी देवीची मूर्ती कोरलेली आहे. या मूर्तींमुळे ते देऊळ जैन मंदिर आहे हे बाहेरूनसुद्धा समजते.
 
 
सुंदर, देखणी आणि कमालीची शिल्पकला केलेली जैन मंदिरे बघायची असतील तर राजस्थानातील अबू पर्वतावर असलेली दिलवाडा मंदिरे बघायलाच हवीत. इ.स.च्या 11 व्या शतकापासून ते 15 व्या शतकापर्यंत याची निर्मिती होत होती. ही मंदिरे संगमरवर या दगडात बांधलेली आहेत आणि संगमरवरात काय कमालीचे कोरीव काम करता येते याचा वस्तुपाठ या जैन मंदिरांनी घालून दिला आहे. मरू गुर्जर स्थापत्यशैलीत बांधलेल्या या मंदिरांचे छत अतिशय कोरीव नक्षीकामाने सजवले आहे. मंदिराचे खांब आणि त्यावर असलेल्या कोरीव मूर्ती बघून आश्चर्याने थक्क व्हायला होते. खूप मोठ्या प्रमाणावर आणि अतिशय बारीक कलाकुसर असलेले हे कोरीवकाम बघून त्या कलाकारांबद्दल असलेला आदर शतगुणित होतो. सोनार जसे अगदी बारीकसारीक तपशिलासह दागिने घडवतो अगदी तसेच कोरीवकाम या मंडळींनी दगडात करून दाखवले आहे. अप्रतिम शिल्पकला ही दिलवाडा मंदिरांची खासियत आहे. वेळ काढून ही सगळी कला बघायला हवी. जैन लेणी आणि जैन मंदिरे ही जैन मंडळींची श्रद्धास्थाने आहेत. त्यांनी आपल्या देवतेच्या स्मरणार्थ या अप्रतिम कलाकृती दगडात घडवल्या. त्या शेकडो वर्षे जशाच्या तशा राहिल्या आहेत. मुसलमानी विध्वंसाचा फटका यांनासुद्धा बसला आहे; पण तरीही आजमितीस उभे असलेले हे स्थापत्यवैभव डोळे भरून बघायला हवे आणि इतरांनासुद्धा दाखवायला हवे.
 
 
समृद्ध भारताचा हा समृद्ध वारसा आहे. त्याची ओळख आपण स्वतः करून घेऊन त्याचा प्रसार आणि प्रचार करणे हे आपले कर्तव्य आहे. या कर्तव्याचे आनंदाने पालन करायला हवे. आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या या परंपरा, हा स्थापत्य वारसा जतन करून, संवर्धन करून त्याची ओळख जगाला करून द्यायला हवी.