height of Everest
@डॉ. श्रीकांत कार्लेकर
हिमालयाच्या ह्या भागात कोसी नदीतून अधिक पाणी वाहून गेल्यामुळे तिची क्षरणशक्ती वाढली आणि खोर्यातील माती आणि गाळ ती आपल्यासोबत घेऊन गेली. यामुळे अधिकाधिक जमीन वाहून गेल्याने, एव्हरेस्ट प्रदेशात उत्थानाचा दर वाढला आणि पर्वताचे शिखर उंचावले. अरुण नदीची धूप व कोसी नदीने केलेले तिच्या पाण्याचे अपहरण आणि पृथ्वीच्या कवचावरील ऊर्ध्वगामी दाब यांच्यातील संतुलन प्रक्रियेमुळे माऊंट एव्हरेस्ट नेहमीपेक्षा जास्त वेगाने वर ढकलला जातो आहे.
सन 1852 मध्ये एव्हरेस्टची उंची मोजण्याचा पहिला प्रयत्न करण्यात आला होता. मात्र त्यावर चढाई करण्याचे स्वप्न 1953 पर्यंत साकार होऊ शकले नव्हते. त्यानंतर चिनी तज्ज्ञांनी शिखराची नेमकी उंची मोजण्याचा प्रयत्न केला आणि ह्या शिखराची उंची 3.7 मीटरने कमी झाल्याचे त्यांनी म्हटले होते. सन 1852 मध्ये भारतीय सर्वेक्षण विभागाने नेपाळच्या बाजूकडून उंची मोजली. त्या वेळी ही उंची 29,002 फूट असल्याचे नक्की झाले. 1855 च्यासर्वेक्षणानुसार ही उंची 29,028 फूट (8848 मीटर) होती.
भारतीय सर्वेक्षण विभागानेच 1954 मध्ये पुन्हा एकदा एव्हरेस्टची उंची मोजली. त्या वेळीही ही उंची 29,028 फूट (8848 मीटर) भरली. यात 10 फूट कमी-जास्त फरक असेल असेही त्या वेळी निश्चित झाले. सन 1975 मध्ये चायनीज स्टेट ब्युरो ऑफ सर्व्हेइंग अँड मॅपिंग या संस्थेने तिबेटच्या बाजूने एव्हरेस्टची उंची मोजली, ती 8848.13 मीटर भरली. यातही 35 सेंटिमीटरचा कमी-जास्त फरक असेल, असे म्हटले गेले. उंची मोजण्याच्या सर्व जुन्या पद्धती व आत्ताच्या आधुनिक त्रिमित सर्वेक्षण पद्धतीत खूपच फरक आहे. आत्ताच्या पद्धती जास्त अचूक आहेत आणि त्यात जागतिक स्थाननिश्चिती प्रणालींचा (GPS) उपयोग केला जातो.
5 मे 1999 रोजी जीपीएस वापरून शिखर प्रदेशात नेपाळी वेळेनुसार सकाळी 10 ते 11 या वेळेत उंचीची नोंद करण्यात आली; पण या वेळी शिखरावर बर्फाचा जाड थर होता. नेपाळी वेळेनुसार सकाळी साडेदहा वाजता या दिवशी ही उंची 8850 मीटर (+/- 2 मीटर) एवढी होती. या थराची जाडी मोजण्याचे प्रयत्न मात्र असफल झाले. 5 मे 1999 ची ही माहिती वापरून डब्ल्यूजीएस-84 जिऑइडच्या साह्याने एव्हरेस्टच्या बर्फाच्छादित शिखराची उंची 8848 मीटर नक्की करण्यात आली. तोपर्यंत माहिती असलेली ही सर्वात अचूक उंची होती. शिखर बर्फाच्छादित नसताना ही उंची (रॉक हाइट) 8843. 43 मीटर असते.
25 एप्रिल 2015 रोजी नेपाळमध्ये झालेल्या 7.8 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे एव्हरेस्टची उंची कमी होत असल्याचे संकेत मिळत आहेत, असे त्या वेळी वाटत होते. एव्हरेस्टची त्या वेळेपर्यंत मान्य असलेली आणि भारतीय सर्वेक्षण विभागाने 1954 मध्ये निश्चित केलेली उंची समुद्रसपाटीपासून 29028 फूट (8848 मीटर) इतकी होती. मात्र उपग्रहांनी मिळविलेल्या माहितीनुसार ही उंची एक इंचाने म्हणजे 2.54 सें.मी.ने कमी झाली आहे, असा दावा करण्यात आला होता. नेपाळमध्ये 2010 मध्ये आलेल्या 7.8 स्केलच्या भूकंपामुळे काठमांडूजवळील काही पर्वतांची उंची कमी झाल्याचे भूशास्त्रीय सर्वेक्षणातून समोर आले होतेच. ’एव्हरेस्ट’च्या उंचीवरही त्या भूकंपाचा परिणाम झाला असावा, अशी शक्यता भूगर्भशास्त्रज्ञ वर्तवत होते. मात्र माऊंट एव्हरेस्टची उंची गेल्या 66 वर्षांत 86 सेंटिमीटरने वाढली असल्याचे नव्या सर्वेक्षणातून आता समोर आले होते. नेपाळ आणि चीनने संयुक्तपणे हे सर्वेक्षण केले होते. ’एव्हरेस्ट’ची समुद्रसपाटीपासूनची उंची आता 8848.86 मीटर झाली असल्याचे दोन्ही देशांनी 8 डिसेंबर 2020 रोजी जाहीर केले होते.
ऑक्टोबर 2019 मध्ये नेपाळ आणि चीनने एव्हरेस्ट शिखराची उंची नव्याने मोजण्याचा करार केला. या करारानुसार दोन्ही देशांच्या सर्वेक्षकांनी त्रिकोणमिती पद्धत (Triangulation) आणि जागतिक स्थाननिश्चिती म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) वापरून एव्हरेस्टचे नव्याने सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानुसार एव्हरेस्टची सध्याची उंची 8848.86 मीटर निश्चित करण्यात आली असून, 1954 मध्ये भारताने केलेल्या सर्वेक्षणाच्या तुलनेत ती 86 सेंटिमीटरने जास्त आहे. भूतबकांच्या (Tectonic Plates) हालचालीमुळे ही वाढ झाली असल्याची शक्यताही त्या वेळी व्यक्त करण्यात आली होती.
पूर्वीच्या पद्धतीत एव्हरेस्टच्या शिखराकडे पाहताना होणारे कोन फार दूर अंतरावरून मोजावे लागत. एव्हरेस्टपासून 200 ते 300 मैल अंतरावरून व 10 ते 12 हजार फूट कमी उंचीवरून घेतलेले हे कोन अगदी अचूक असणे शक्य नव्हते. ज्या ज्या वेळी एव्हरेस्ट शिखराची उंची मोजली गेली त्या त्या वेळी शिखरावर असणारी बर्फाच्या थराची जाडी वेगवेगळी होती. दुसरे असे की, भारतीय सर्वेक्षण विभागाने 1852 व 1954 मध्ये संदर्भपातळी म्हणून जी सरासरी समुद्रपातळी वापरली, ती दोन्ही वेळा एकच नव्हती. त्यामुळे ज्या उंचीपासून शिखराची उंची मोजली त्यातच फरक असल्यामुळे एव्हरेस्टच्या उंचीतही फरक पडला होता.
भारतीय सर्वेक्षण विभागाने लांबी व उंचीदर्शक जे परिमाण वापरले होते ते ’भारतीय फूट’ होते. ’चिनी फुटापेक्षा’ किंवा ब्रिटिश, मलेशियन, अमेरिकन व आंतरराष्ट्रीय फुटापेक्षा ते थोडेसे वेगळे होते. सन 1998 मध्ये नॅशनल जिओग्राफिक सोसायटीमार्फत नेपाळ बाजूकडून, ’काला पत्थर’ आणि ’साऊथ कोल कॅम्प साइट’वरून व अन्य अनेक ठिकाणांहून जीपीएसच्या साह्याने उंची संदर्भात बरीच माहिती मिळवली गेली. नेमक्या एव्हरेस्ट शिखरावरून ही माहिती मिळवता आली नसली, तरी शिखराच्या थोडेसे खाली ’बिशप लेज’ नावाच्या खडक प्रदेशात ही उंची नक्की करता आली. त्याच वेळी जीपीएसच्या साह्याने तिबेटमधल्या पाच ठिकाणांहून उंचीची निश्चिती केली गेली. यामुळे एव्हरेस्टच्या आजूबाजूच्या प्रदेशांच्या उंचीचे एक उत्कृष्ट जाळे करता आले.
जागतिक त्रिमितीसंदर्भात ही उंची नक्की केली गेल्यामुळे सरासरी समुद्रपातळीशी या गणनेचा काहीही संदर्भ नव्हता. मूळ शिखराची उंची कळण्यासाठी त्यावरील बर्फाच्या जाडीचे नेमके मोजमाप होणे अजूनही गरजेचे आहे. आजपर्यंत उपलब्ध असलेल्या या सर्व माहितीवरून एव्हरेस्टची उंची वाढत असल्याचे निश्चित संकेत मिळत असले तरी ती नेमकी कशामुळे वाढते आहे याचे समाधानकारक उत्तर मात्र मिळत नव्हते. मात्र त्या दिशेने एक मोठे पाऊल आता पडले आहे, असे म्हणायला हरकत नाही.
युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडनच्या 30 सप्टेंबर 2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार माऊंट एव्हरेस्टच्या जवळच असलेले एका नदीचे पात्र एव्हरेस्टच्या शिखराला वर ढकलत आहे. जवळच असलेल्या नदीच्या घळईच्या होत असलेल्या झिजेमुळे होणार्या उत्थापनामुळे माऊंट एव्हरेस्टच्या शिखराची उंची जवळपास 15 ते 50 मीटरने वाढली असून ती अजूनही सातत्याने वाढतेच आहे, असे संशोधकांनी केलेल्या या नवीन अभ्यासात आढळून आले आहे.
‘नेचर जिओसायन्स’मध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात असे आढळून आले आहे की, माऊंट एव्हरेस्टपासून सुमारे 75 किलोमीटर अंतरावरील अरुण नावाच्या नदीखोर्यातील नदीमार्गांचे एक जाळे मोठ्या प्रमाणात धूप घडवून नदीची घळई तयार करीत आहे. यामुळे हा पर्वत वर्षाला दोन मिलिमीटरने उत्थापित (Uplift) होत आहे म्हणजे वर येत आहे आणि गेल्या 89,000 वर्षांमध्ये त्याची उंची 15 ते 50 मीटरने वाढली आहे. आता या पर्वताची उंची 8848.86 मीटर आहे. 8,849 मीटर उंचीवरील, माऊंट एव्हरेस्ट, ज्याला तिबेटीमध्ये चोमोलुंगमा किंवा नेपाळीमध्ये सागरमाथा म्हणून ओळखले जाते, हा पृथ्वीवरील सर्वात उंच पर्वत आहे आणि हिमालयातील त्यानंतरच्या सर्वात उंच शिखरापेक्षा जास्त उंच आहे. एव्हरेस्ट पर्वताची ही उंची आजूबाजूच्या इतर पर्वतांच्या उंचीशी विसंगत आहे, कारण पुढील तीन सर्वात उंच शिखरे- माऊंट के 2 (8611 मी.), कांचनजंगा (8586 मी.) आणि ल्होत्से (8516 मी.) ह्या सर्व शिखरांची उंची एकमेकांपासून साधारण 100 मीटरपेक्षाही कमी आहे. या विसंगतीचा एक महत्त्वाचा भाग पृथ्वीच्या कवचाच्या खाली असलेल्या दाबामुळे उद्भवलेल्या उत्थापन शक्तीद्वारे स्पष्ट केला जाऊ शकतो. जवळच्या नदीने मोठ्या प्रमाणात खडक आणि माती नष्ट केल्यानंतर हा दाब निर्माण झाला आहे. संतुलन प्रतिस्कंद (Isostatic rebound) नावाची ही प्रक्रिया आहे. यात पृथ्वीच्या कवचाच्या ज्या भागाचे वस्तुमान झिजेमुळे कमी होते तो विस्तारतो आणि वरच्या बाजूस उंचावला जातो, कारण वस्तुमान कमी झाल्यानंतर त्याखाली असलेल्या द्रव प्रावरणाचा (Mantle) तीव्र दाब वरून येणार्या गुरुत्वाकर्षणाच्या बलापेक्षा जास्त असतो.
प्रदेशाचे उत्थापन ही साधारणपणे वर्षातून फक्त काही मिलिमीटर वेगाने होणारी एक मंद प्रक्रिया आहे; परंतु ती दीर्घकाळ चालू राहिल्यास पृथ्वीच्या पृष्ठभागावर लक्षणीय बदल घडतात. संशोधकांना असे आढळून आले की, या प्रक्रियेमुळे जवळची अरुण नदी, कोसी नदी प्रणालीत विलीन झाल्यामुळे माऊंट एव्हरेस्टची उंची गेल्या 89,000 वर्षांत सुमारे 15 ते 50 मीटरने वाढली आहे. म्हणजे इतक्या वर्षांपूर्वी माऊंट एव्हरेस्टची उंची 8799 ते 8834 मी. असावी. अरुण नदी ही नेपाळमधील कोशी किंवा सप्त कोशी नदी प्रणालीचा भाग असलेली सीमापार नदी आहे. हिचा उगम तिबेट प्रदेशात नीलम (Nylam county) प्रदेशात 3742 मी. उंचीवर गुस्तो (Gusto) या ठिकाणी होतो. कट्टीके घाट (365 मी.) आणि अरुण ब्रिज इथून वाहत येत ही नदी संकोशी (133 मी.) च्या दक्षिणेला कोसी नदीला मिळते. एव्हरेस्ट पर्वताच्या जवळचे अरुण नदीचे पात्र जसजसे खोलवर खोदले जात आहे, तसतशी नदीपात्राची झीज होऊन तयार झालेले दगडगोटे आणि गाळ निघून गेल्यामुळे पर्वत उंच उचलला जातो आहे, असे या संशोधनाचे सहलेखक, पीएचडीचे विद्यार्थी डम स्मिथ यांचे मत आहे. आज अरुण नदी माऊंट एव्हरेस्टच्या पूर्वेस आणि थोड्या अंतरावर दक्षिणेकडे वाहते आणि मोठ्या कोसी नदी प्रणालीमध्ये विलीन होते. हजारो वर्षांहून अधिक काळ झीज करून, अरुण नदीने तिच्या पात्रात एक खोल दरी खोदली आहे. यामुळे अब्जावधी टन माती आणि गाळ पुढे कोसी नदी प्रणालीत वाहून गेला आहे, असे त्यांचे निरीक्षण सांगते.
चायना युनिव्हर्सिटी ऑफ जिओसायन्सेसचे सहलेखक डॉ. जिन-जेन दाई म्हणतात की, एव्हरेस्ट प्रदेशात अरुण ही एक विलक्षण वेगळी नदी प्रणाली आहे. अरुण नदी तिच्या वरच्या टप्प्यात उच्च उंचीवर पूर्वेकडे वाहते. या टप्प्यात तिचे खोरे तुलनेने अधिक सपाट आहे. 160 कि.मी.नंतर ती अचानक दक्षिणेकडे वळते. दक्षिणेकडे वळल्यावर ती कमी उंचीवरून वाहते; पण तिचा मार्ग अधिक तीव्र उताराचा बनतो. असे नदीपात्र अस्थिर स्थितीचे सूचक आहे आणि कदाचित एव्हरेस्टच्या अत्यंत जास्त उंचीशी ही अस्थिरता संबंधित आहे. हे उत्थापन केवळ माऊंट एव्हरेस्टपुरते मर्यादित नाही आणि ल्होत्से आणि मकालू या अनुक्रमे जगातील चौथ्या आणि पाचव्या सर्वोच्च शिखरांसह शेजारच्या शिखरांवरही या उत्थापनाचा प्रभाव दिसून येतो. संतुलन प्रतिस्कंद (Isostatic rebound) प्रक्रियेमुळे या शिखरांची उंची एव्हरेस्टच्या समान प्रमाणात वाढते. अरुण नदीच्या सर्वात जवळ असलेल्या मकालूचा उंचावण्याचा दर मात्र किंचित जास्तच आहे. या संशोधनातील सहलेखक डॉ. मॅथ्यू फॉक्स यांच्या म्हणण्यानुसार, माऊंट एव्हरेस्ट आणि त्याच्या शेजारची शिखरे उंचावत आहेत, कारण आयसोस्टॅटिक रिबाऊंड त्यांच्या जवळपासच्या प्रदेशाच्या झिजेच्या वेगापेक्षा जास्त वेगाने त्यांना वर ढकलत आहे. वर्षाला सुमारे दोन मिलिमीटर वेगाने ही उंचावण्याची क्रिया चालू आहे. आता जीपीएस उपकरणांमुळे हे निरीक्षण अधिक अचूक होते आहे.
अरुण, कोसी आणि या प्रदेशातील इतर नद्यांचे धूप दर पाहून, संशोधक हे नक्की करण्यात यशस्वी झाले की, सुमारे 89,000 वर्षांपूर्वी अरुण नदी, कोसी नदीच्या जलवाहिन्यांच्या जाळ्यात सामील झाली आणि कालांतराने त्यात विलीन झाली. या प्रक्रियेला जलापहरण (Drainage piracy) म्हणतात. या प्रक्रियेत मोठी नदी तिला येऊन मिळणार्या लहान नदीतील पाण्याचे अपहरण करते. हिमालयाच्या ह्या भागात कोसी नदीतून अधिक पाणी वाहून गेल्यामुळे तिची क्षरणशक्ती वाढली आणि खोर्यातील माती आणि गाळ ती आपल्यासोबत घेऊन गेली. यामुळे अधिकाधिक जमीन वाहून गेल्याने, एव्हरेस्ट प्रदेशात उत्थानाचा दर वाढला आणि पर्वताचे शिखर उंचावले. अरुण नदीची धूप व कोसी नदीने केलेले तिच्या पाण्याचे अपहरण आणि पृथ्वीच्या कवचावरील ऊर्ध्वगामी दाब यांच्यातील संतुलन प्रक्रियेमुळे माऊंट एव्हरेस्ट नेहमीपेक्षा जास्त वेगाने वर ढकलला जातो आहे.