भारताची पहिली महिला कमर्शियल पायलट
(17 जानेवारी 1910 - 22 डिसेंबर 1992)
प्रेम माथुरच्या आधी दुसरी कुणीही महिला व्यावसायिक वैमानिक झालेली नसल्याने सर्वच्या सर्व एअरलाइन्स कंपन्या तिला ठेवून घ्यायला तयार होईनात. काही कंपन्यांनी तर तुम्ही महिला आहात, अशा स्पष्ट शब्दांत नकार कळवला होता. तुम्ही वैमानिक आहात असं कळलं तर प्रवासी आमच्या विमानात बसायला तयार होणार नाहीत; पण प्रेम माथुर या हरणार्या वा नाउमेद होणार्या नव्हत्या. त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले. अखेरीस डेक्कन एअरवेज या हैदराबादच्या विमान कंपनीने त्यांना होकार कळवला. मुलाखत झाली, आवश्यक चाचण्या घेण्यात आल्या. प्रेम माथुर सर्व परीक्षांत उत्तीर्ण झाल्या. भारताला पहिली महिला कमर्शियल पायलट मिळाली.
नोव्हेंबर 2024 मध्ये संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना नागरी विमान उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देशातील महिला वैमानिकांची संख्या 15 टक्क्यांवर पोहोचली असल्याचे सांगितले. लोकसंख्येतील महिलांच्या टक्केवारीचा विचार करता हे प्रमाण कमी असले तरी जगभरात हे प्रमाण सर्वाधिक आहे; प्रगत अमेरिकेपेक्षाही अधिक आहे. अर्थात या क्षेत्राची मुहूर्तमेढ जिने भारतात रोवली तिचे नाव होते प्रेम माथुर.
भारतात कमर्शियल पायलट्सच्या क्षेत्रात महिलांचे प्रमाण आहे अवघे 15 टक्के; पण जगाचा विचार करता हे प्रमाण सर्वाधिक आहे. या क्षेत्राची मुहूर्तमेढ भारतात रोवली ती प्रेम माथुर या तरुणीने. वडिलांची नोकरी बदल्यांची असल्याने माथुर कुटुंब तिच्या लहानपणीच अलाहाबादला रवाना झाले आणि पुढे अलाहाबाद हीच तिची कार्यभूमी बनली. तिची आई, प्रेम सहा महिन्यांची असतानाच निवर्तली, त्यामुळे तिला मातृसुख असे मिळालेच नाही. प्रेमचा जन्म झाला अलीगडमध्ये; परंतु तिच्या जन्मवर्षाविषयी वाद आहेत, संकेतस्थळांवर ते विविध ठिकाणी आणि विविध वर्षांत प्रतिबिंबित झाले आहेत. 1910, 1919 आणि 1924 अशी ती तीन वर्षे; पण 1947 साली प्रेमला व्यावसायिक विमानोड्डाणाचा परवाना मिळाला यावर सर्वांचे एकमत आहे. तसे असेल तर 1924 हेच तिचे जन्मवर्ष खरे असावे असे मानावे लागते.
प्रेम मिळून एकूण पाच भावंडे. त्यातला एक व्यावसायिक, तर एक वैमानिक प्रशिक्षक. प्रेम सर्वात लहान. भावांबरोबरच वाढल्याने पुरुषी आवडीनिवडी तिच्यातही उत्पन्न झाल्या आणि त्यातूनच ती पुरुषी मक्तेदारी मानल्या जाणार्या विमानोड्डाणासारख्या क्षेत्राकडे आकर्षित झाली. या भावाने दुसर्या महायुद्धात वापरलेली काही विमाने खरेदी केली होती आणि श्रीलंकेला विकली होती. ही विमाने श्रीलंकेला घेऊन जायची जबाबदारी त्याने कॅप्टन अटल याच्यावर सोपवली होती. त्यांच्याबरोबर प्रेमने काम करावे, अशी विनंती त्याने केली होती. अटलना काही हरकत नव्हती. दोघे मिळून श्रीलंकेला गेले. या प्रवासादरम्यान अटल यांनी प्रेमचे कौशल्य जाणले आणि तू वैमानिक का होत नाहीस, असे तिला विचारले.
प्रेमचा वैमानिक बनण्याचा प्रवास इथून सुरू झाला. दुसरं महायुद्ध 1942 मधलं. प्रेमच्या भावानं विमानं खरेदी केली ती या युद्धातली. युद्धानंतर अटल आणि प्रेम ती घेऊन श्रीलंकेला गेले, तो काळ अर्थातच 1942 नंतरचा, साधारण 1943-44 चा. अटलनं प्रेमला विमानोड्डाणाबद्दल विचारलं, तिला प्रशिक्षण घ्यायला सांगितलं, ते घेऊन तिनं अलाहाबाद फ्लाइंग क्लबकडून परवाना मिळवला आणि प्रेम वैमानिक झाली. ही प्रक्रिया लक्षात घेता 1947 हे तिचं व्यावसायिक विमानोड्डाणाचं वर्ष हे योग्यच वाटतं.
प्रेम वैमानिक झाली खरी; पण ते होण्यात खरा संघर्ष नव्हताच, संघर्ष होता तो वैमानिक झाल्यानंतर नोकरी मिळवतानाचा. खरं तर 1949 सालीच प्रेमनं कोलकाता येथे झालेली राष्ट्रीय हवाई शर्यत जिंकली होती आणि आपलं नैपुण्य सिद्ध केलं होतं. प्रेमनं पायलटपदासाठी त्या काळच्या सर्व महत्त्वाच्या आठ विमान कंपन्यांकडे अर्ज केला; पण प्रेमच्या आधी दुसरी कुणीही महिला व्यावसायिक वैमानिक झालेली नसल्याने सर्वच्या सर्व एअरलाइन्स कंपन्या तिला ठेवून घ्यायला तयार होईनात. काही कंपन्यांनी तर तुम्ही महिला आहात, अशा स्पष्ट शब्दांत नकार कळवला होता. एका एअरलाइननं तर असंही कळवलं की, तुम्ही वैमानिक आहात असं कळलं तर प्रवासी आमच्या विमानात बसायला तयार होणार नाहीत; पण प्रेम माथुर या हरणार्या वा नाउमेद होणार्या नव्हत्या. त्यांनी प्रयत्न सुरू ठेवला.
अखेरीस डेक्कन एअरवेज या हैदराबादच्या निजामाच्या विमान कंपनीने प्रेम माथुर यांना होकार कळवला. मुलाखत झाली, आवश्यक चाचण्या घेण्यात आल्या. प्रेम माथुर सर्व परीक्षांत उत्तीर्ण झाल्या. भारताला पहिली महिला कमर्शियल वैमानिक मिळाली. याआधी सरला ठुकराल यांनी असं प्रशिक्षण घेतलं होतं; परंतु युद्ध सुरू झाल्यानं त्यांना व्यावसायिक वैमानिक बनता आलं नव्हतं आणि युद्ध संपेपर्यंत त्या आई बनल्या होत्या, त्यामुळे त्यांना हा पर्याय सोडून चित्रकारितेकडे वळावं लागलं होतं.
डेक्कन एअरवेजमधील कारकीर्दीत त्यांनी इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री, लेडी माऊंटबॅटन यांच्यासारख्या अतिविशिष्ट व्यक्तींना घेऊन उड्डाण केले होते; पण प्रेम माथुर यांनाही दुय्यम दर्जाच्या वागणुकीला सामोरे जावे लागलेच. त्यांना कॉकपिटची संपूर्ण सूत्रे डेक्कन एअरवेजने दिली नाहीतच. अखेरीस त्या दिल्लीला गेल्या, घनश्यामदास बिर्ला यांच्या खासगी जेट वैमानिक बनल्या आणि 1953 मध्ये इंडियन एअरलाइन्समध्ये कॅप्टन पदावर रुजू झाल्या. या पदावर नियुक्त होणार्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. तब्बल तीस वर्षांची हवाई कारकीर्द प्रेम यांच्या वाट्याला आली. भारतातील महिला पायलट्सच्या एका पिढीसमोर त्यांचं नाव आणि कर्तृत्व आदर्श म्हणून राहिलं. प्रेम यांनी अलाहाबादच्याच हरी कृष्ण माथुर यांच्याशी लग्न केलं आणि त्यांच्यापासून त्यांना सहा मुलं झाली. 1984 साली त्या निवृत्तही झाल्या आणि अवघ्या आठ वर्षांत, वयाच्या अडुसष्टाव्या वर्षी 22 डिसेंबर 1992 रोजी त्यांचं निधनही झालं.