@डॉ. मधुश्री संजीव सावजी
दिव्यांगांच्या आयुष्यात बदल घडविणारा एक प्रकल्प म्हणजे ‘विहंग’ जो बालक-पालक-शिक्षक-संचालक ही चौकट मजबूत करणारा ठरत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात रोल मॉडेल ठरेल असे आणि ‘दिव्यांगांसाठी एक शाळा’ यापलीकडचा विचार, एक तपाहून अधिक काळ जगलेल्या विहंग नावाच्या प्रकल्पाच्या नवीन वास्तूचे नुकतेच 12 डिसेंबरला उद्घाटन झाले, एका अर्थाने ते ‘विहंग’चे विहंगावलोकन.
महाराष्ट्रातील छ. संभाजीनगरमध्ये शैक्षणिक क्षेत्रात पूर्वप्राथमिक विषयात अव्वल असलेली व मातृभाषेतून शिक्षण देणारी ओंकार बालवाडी 1996 साली सुरू झाली. साल साधारण 2007 असावे. एका वकिलाची धर्मपत्नी आणि पाच वर्षांच्या दिव्यांग बाळाची आई सहकार नगर येथे स्थित ओंकार बालवाडीत प्रवेशासाठी आली. बालवाडीची सेवाव्रती माधुरी आफळे हिच्या तद्नुभूतीने त्याचा प्रवेश झाला. एका आईचे प्रेम आणि त्या मुलाच्या जीवनाप्रति असलेली बांधिलकी बघून बालवाडीच्या बैठकीत विषय आला- आपण याबाबत काही करू शकतो का? आपण म्हणजे कोण? कोण जबाबदारी घेणार? काय करावे लागेल यासाठी? प्रश्न पडत गेले आणि मग उत्तराची दिशा सापडत गेली. तोपर्यंत घोर अज्ञानच होते. पुस्तक वाचून आम्ही कदाचित सर्वसमावेशी शिक्षणात पडलो नसतो; पण एका आईने/पालकाने आम्हाला समाजाचे दर्शन घडवले होते. दिव्यांगातील देवत्व बघण्याची अनुभूती दिली.
आतापर्यंत बालवाडीत सशक्त आणि सुदृढ मुले प्रवेश घेत होती. 15 मुलांमागे एका दिव्यांग मुलाचा प्रवेश हा विहंगचा प्रारंभ होता. हळूहळू असे लक्षात आले की, या मुलाकडे वेगळे लक्ष देणे शक्य होत नाही. मग ओंकार बालवाडीत कार्यरत असलेल्या अनिता जोशी आणि अपर्णा वैद्य यांनी 2010 साली एका वर्षाचे विशेष प्रशिक्षण घेतले. 2011 साली वेगळा वर्ग काही वेळेसाठी असावा असे ठरले आणि त्यात प्रवेश झाले चार दिव्यांगांचे, प्रत्येक मूल वेगळे. अर्णव गतिमंद, अदिती mild to moderate MR, प्रथमेश CP, तर आभा Autistic. या चौघांसाठी वेगवेगळ्या कृतींसह अभ्यासक्रम आखावा लागला आणि इथूनच शिक्षिकेची खरी कसरत सुरू झाली. कारण सर्वसामान्य मुलांना शिकविणे आणि दिव्यांग मुलांना शिकविणे यात जमीन-अस्मानचा फरक होता; परंतु ही जबाबदारी त्यांनी व्यवस्थित पेलली. एक मुलगा वर्गात अनोळखी कुणीही आले तरी रडायचा. अदिती मनाविरुद्ध काही झालं, की जोरात रडायची; पण केवळ निरीक्षणाने लक्षात आले की, तिला गाणे खूप आवडते म्हणून अनिताताई गाणे लावायच्या. असे असंख्य अनुभव विहंगला समृद्ध/विकसित करत होते. अंध- अंशतः वा पूर्ण कर्णबधिरत्व, वाचादोष, अस्थिव्यंग, मानसिक आजार, अध्ययन अक्षम, मेंदूचा पक्षाघात, स्वमग्नता, बहुविकलांग, कुष्ठरोग, बुटकेपणा, बौद्धिक अक्षमता, अविकसित मांसपेशी, मज्जासंस्थेचे तीव्र आजार, multiple sclerosis, thalassemia, haemophilia, सिकल सेल डीसीज, आम्ल हल्ला पीडित व कंपवात रोग हे 21 अपंगत्वाचे प्रकार आहेत. त्यात काही सामान्यपणे आढळणारे आहेत.
अवयवच नसणे किंवा तो कार्यरत नसणे, बुद्धिमंद वा गतिमंद असणे अशा अनेक प्रकारच्या दिव्य अंग लाभलेल्या लाखो मुलांसाठी अख्खे आयुष्य पणाला लावावे लागते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिव्य दृष्टीने आपण ‘विकलांग’ मुलांना ‘दिव्यांग’ संबोधण्यास सुरुवात केली आणि समाजाचे लक्ष वेधले गेले. सरकार आणि समाज त्यांना सुविधा, आरक्षण, निधी अशा अनेक प्रकारे आर्थिक मदत देत आहे. गरज आहे ती दिव्यांगांतील देवाची पूजा करण्याची; त्यांच्यासाठी समर्पित आयुष्य जगण्याची. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि समर्पण हे यांना वेगळे करत येत नाही. या संघविचाराने 1987 ला छ. संभाजीनगरमध्ये डॉ. हेडगेवार रुग्णालय उभे राहिले. वैद्यकीय सेवेबरोबर समाजमन जाणण्यासाठी आणि त्यात समरस होण्यासाठी सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ ही संलग्न संस्था 1989 ला सुरू झाली. त्यातून अनेक उपक्रमांना समर्पित व्यक्ती मिळाल्या आणि त्यातून मोठे प्रकल्प उभे राहिले आहेत. भारतीय दर्शनात आणि दृष्टिकोनात मातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा माता लोकमाता होते तेव्हा प्रकल्प उभे राहतात. एका दिव्यांग मुलाची आई असलेली अदिती शार्दूल अनेक दिव्यांग मुलांच्या मातांचे नेतृत्व करणारी ‘लोकमाता’ झाली. 2012 पासून विहंग प्रकल्पाची धुरा तिने सांभाळण्यास सुरुवात केली.
दिव्यांग मुलांना हवी तशी ओंकार बालवाडीची इमारत नव्हती; पण तरीही ओंकार बालवाडीसाठी बांधलेल्या जागेत विहंगने 12 वर्षे स्वतःला वसविले, अभ्यासक्रम तयार केला, पालकांचा समर्पित चमू तयार केला, समाजात विविध प्रकारचे जाणीव-जागृतीचे उपक्रम घेतले. त्यात एक दिवस दिव्यांगांबरोबर गा-नाचा, पालक व दिव्यांगांतर्फे स्वच्छता अभियान, दिव्यांग आणि कलाकार एका रंगमंचावर, पालक शाळा, पालक सहल, व्याख्याने, अनेक विशिष्ट दिवस साजरे करणेे, अनेक लेख लिहिणेे, पंचकोश आधारित अभ्यासक्रम तयार केला. दिव्यांगांसाठी असलेल्या ‘सक्षम’सारख्या अखिल भारतीय संघटनेशी जोडून घेतले. सरकारी PWD (Person With Disability ) कडे नोंदणी झाली. U-DISE (Unified District Information System for Education) क्रमांक मिळवला. समुपदेशक, मानसिक रोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, स्पीच थेरपिस्ट, फिजिओ थेरपिस्ट, तज्ज्ञ शिक्षक यांचा चमू तयार झाला. अनेक स्पर्धांमध्ये मुलांनी बक्षिसे मिळवली. अनेक शिक्षकांना गौरव प्राप्त झाला. 83 मुलांची नोंदणी झाली. ऑनलाइन शाळा/विशेष विषय सुरू झाला. गृहशाळा (home schooling) पर्याय पालकांना उपलब्ध झाला. पालक-अभ्यासक्रम तयार झाला. बालक-पालक-शिक्षक-संचालक ही चौकट मजबूत झाली. भविष्याकडे पाहण्याची दृष्टी होतीच; पण आता दमदार पाऊल टाकण्याचे ठरवले. दिव्यांगांच्या आयुष्यात बदल घडविणारा एक प्रकल्प जो बालक-पालक-शिक्षक-संचालक यात उत्कृष्टता आणत भारतात एक प्रतिमान (रोल मॉडेल) स्थापित करेल असा मानस पक्का केला. दिव्यांगांना सर्व अत्याधुनिक साधनांबरोबर अगदी स्विमिंग पूलमधील हायड्रोथेरपीसहित साधनाविना करता येणारे योग, मंत्र, भजन, वंदना/प्रार्थना यांचीही जोड देण्याचे ठरविले. कौशल्य विकासाबरोबर व्यवसाय शिक्षण कोणकोणते द्यावयाचे हे पक्के केले. समाजासमोर दिव्यांगांच्या प्रस्तुतीसाठी सुविधाजनक हॉल आणि अॅम्फिथिएटरचीही कल्पना केली. दिव्यांगांच्या सुरक्षित स्वास्थ्य सेवेची व्यवस्था करत वाहन आणि संकुलातील रस्ताही आखला. अंधत्व सोडून विविध प्रकारच्या दिव्यांगांना ब्लॅक रूमसहित लागणार्या विविध खोल्यांची रचना तयार झाली. संस्था पाठीशी उभी राहिली. संस्थेकडून डॉ. प्रसन्न पाटील यांनी नेतृत्व केले, तर विहंगच्या चमूकडून अदिती शार्दूल यांनी नेतृत्व केले. अनेक कंपन्या, संस्था आणि व्यक्ती यांनी भरभरून दिले. छ. संभाजीनगरातील डझनभर नामवंतांनी प्रकल्पासाठी अक्षरश: दिवसरात्र वेळ दिला आणि चौदा महिन्यांतच विहंग प्रकल्पाची भव्य आणि सुगम अशी वास्तू उभी राहिली. 48000 चौरस फूट बांधकाम, 180 दिव्यांगांचे शिक्षण-उपचार, समुपदेशन यांच्या व्यवस्था, सौर ऊर्जा आणि जल पुनर्भरणासह हरित परिसर इत्यादी अनेक वैशिष्ट्यांसह या नव्या वास्तूचे नुकतेच उद्घाटन संपन्न झाले. ‘विहंग’ नावच सांगते की, व्यक्तीने आकाशात भरारी आणि मुक्त संचार करण्यासाठी हा प्रकल्प आहे.
प्राचीन इतिहास याचा पुरावा देतो अष्टावक्र ऋषींच्या रूपाने. जो बालक जनकपुरीतील वेदेह गावात कहोदा-सुजाताच्या पोटी जन्माला आला, मिथिला नगरीतील आरुणी-उद्दालकाच्या आश्रमात ज्याने ज्ञान संपादन केले, जो अष्टावक्र नावाप्रमाणे आठ शारीरिक व्यंग घेऊन जन्माला आला होता त्याने ‘अष्टावक्र गीता’ लिहिली, शास्त्रार्थ केला आणि एक ऋषी म्हणून प्रसिद्ध झाला.
आजच्या जगात आपण स्टीफन हॉकिंग असा जागतिक दर्जाचा व्यक्ती बघितला ज्याला motor neuron disease होता. त्याचप्रमाणे भारतातील अंध क्रिकेटर शेखर नाईक, पोलिओग्रस्त पत्रकार व संगीतकार जैन, चित्रकार महिला धांद जे शारीरिक आणि बौद्धिक अक्षम होते; पण त्यांच्यातील चैतन्य जागृत होते आणि त्यानेच त्यांनी भारताचा गौरव वाढविला आहे.
भारतात तीन कोटी दिव्यांग मुले आहेत. त्यांना आशा दाखविणारा ‘विहंग’ हा दिवा आहे. भारतातला या क्षेत्रात उत्तमतेचा ध्यास घेतलेला हा आकाशकंदील आहे, जो अनेक घरांत दीपावलीचे तेज प्रकाशित करेल.
‘दिव्यत्वाची जेथे प्रचीती, तेथे कर माझे जुळती’