12 डिसेंबर 2024. भारताच्या बुद्धिबळ इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद करावी असा दिवस. 11 वर्षांनी भारताला पुन्हा एकदा बुद्धिबळाचा जगज्जेता मिळाला. अठरा वर्षांच्या गुकेशने हा पराक्रम केला. जगज्जेतेपदापर्यंतचा गुकेशच्या प्रवासाचा थोडक्यात घेतलेला हा आढावा.
बुद्धिबळ खेळाला भारतात अनेक वर्षांची परंपरा आहे; पण स्पर्धात्मक खेळाचा विचार केला तर विश्वनाथन आनंद हे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. अगदी अलीकडेपर्यंत हे एकच नाव भारतीय बुद्धिबळाची ओळख मानलं जात होतं. आनंदव्यतिरिक्त आणखी खेळाडू नव्हते असं नाही; पण आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने भारताचा तिरंगा फडकवण्याचं काम आनंदनेच केलं. 1988 मध्ये आनंदच्या रूपात भारताला पहिला ग्रँडमास्टर मिळाला. यशाचं एक एक शिखर पार करत आनंद जगात सर्वोच्च स्थानी पोहोचला. तब्बल पाच वेळा जगज्जेतेपद, सलग 21 महिने जागतिक मानांकनात अग्रस्थानी राहण्याची कामगिरी त्याने केली. याशिवाय असंख्य विजेतेपदे त्याच्या नावावर जमा आहेत. भारताचा तिसर्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार ‘पद्मविभूषण’ आनंदला मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवणारा तो पहिलाच खेळाडू होता. लेखाची सुरुवात गुकेशपासून झाली आणि पुढे आनंदबद्दल इतकं का लिहिलं, असा प्रश्न मनात आला का? त्याला कारणही तसंच आहे. आनंदची नवी ओळख आहे ‘फादर ऑफ इंडियन चेस’. त्याच्या कामगिरीमुळे प्रेरित होऊन अनेक मुले या खेळाकडे वळली, त्याचा आदर्श ठेवून मार्गक्रमण करू लागली. गुकेश दोम्माराजू हे त्यातीलच एक नाव.
गुकेशचे बालपण
गुकेशचे कुटुंब मूळचे आंध्र प्रदेशातील; पण त्याचे वडील वैद्यकीय शिक्षणासाठी चेन्नईत आले आणि नंतर तिथेच स्थायिक झाले. गुकेशचा जन्म 29 मे 2006 रोजी चेन्नईत झाला. त्याचे वडील रजनीकांत हे कान-नाक-घसातज्ज्ञ, तर आई पद्मा ही मायक्रोबायोलॉजिस्ट आहे. वयाच्या सातव्या वर्षी गुकेशची ओळख बुद्धिबळ खेळाशी झाली आणि पुढे हा खेळच त्याचं आयुष्य झालं. शाळेने आयोजित केलेल्या उन्हाळी शिबिरामध्ये गुकेश पहिल्यांदा बुद्धिबळ खेळला. गुकेशची शाळा वेल्लामल विद्यालय. या शाळेने आत्तापर्यंत अनेक खेळाडू घडवले आहेत. गुकेशची खेळातील प्रगती पाहून शाळेतील शिक्षकांनी त्याच्या आईवडिलांना एक सल्ला दिला, त्यानुसार खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी गुकेशला वेळ मिळावा या उद्देशाने त्याचे शालेय शिक्षण थांबवण्याचा निर्णय त्याच्या घरच्यांनी घेतला. 2013 मध्ये चेन्नईत विश्वनाथन आनंद आणि मॅग्नस कार्लसन ह्या दोघांमध्ये जगज्जेतेपदाचा सामना झाला होता. हा सामना पाहणार्या प्रेक्षकांमध्ये सात वर्षांचा छोटा गुकेशही होता. मॅग्नसकडून आनंद पराभूत झाला होता; पण त्याच वेळी गुकेशच्या मनात मात्र भविष्याचं स्वप्नरंजन सुरू झालं होतं.
सुरुवातीच्या वर्षांमधील काही ठळक नोंदी
2015 मध्ये नऊ वर्षांखालील वयोगटात आशियाई शालेय बुद्धिबळ स्पर्धेत त्याने सुवर्णपदक मिळवलं. 2017 मध्ये गुकेशने इंटरनॅशनल मास्टर (IM) हा नॉर्म मिळवला. 2018 मध्ये जागतिक युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत बारा वर्षांखालील गटातही त्याला सुवर्णपदक मिळालं.
गुकेशच्या ह्या वाटचालीत सर्वात मोठा वाटा त्याच्या पालकांचा आहे. भारतीय मानसिकतेनुसार आधी शिक्षण व त्यानंतरच इतर सगळ्या गोष्टी किंवा जमल्यास अभ्यास आणि खेळ यात मुलांनी समतोल साधणं अपेक्षित असतं. मुलाला मोकळेपणाने खेळता यावं यासाठी चौथी इयत्तेतच त्याची शाळा बंद करणारे पालक तसे दुर्मीळच. गुकेशच्या पालकांनी मात्र हा धाडसी निर्णय घेतला होता. 2017-18 मध्ये त्याच्या डॉक्टर वडिलांनी स्वतःचं काम बंद करून पूर्णपणे गुकेशबरोबर राहण्याचं ठरवलं. ग्रँडमास्टर पदापर्यंत पोहोचण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याशिवाय पर्याय नव्हता. गुकेशला वेगवेगळ्या स्पर्धांसाठी घेऊन जाण्याची जबाबदारी वडिलांनी सांभाळली; तर त्याच वेळी घराचा आर्थिक भार त्याच्या आईने उचलला. जसजसे परदेश प्रवास वाढू लागले तशा आर्थिक अडचणी वाढू लागल्या. गुकेश सातत्याने चांगली कामगिरी करत होता; पण अजूनही त्याच्याकडे प्रायोजक नव्हता, त्यामुळे परदेश दौर्यांचा खर्च करणं अवघड होऊन बसलं. ह्या अडचणीच्या वेळी गुकेशच्या वडिलांच्या मित्रांनी आर्थिक मदत केली. गुकेश त्याच्या प्रत्येक मुलाखतीत ह्या सर्वांबद्दल कायम कृतज्ञता व्यक्त करतो. 2019 मध्ये ग्रँडमास्टर नॉर्म मिळवून गुकेशने कारकीर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा गाठला.
प्रशिक्षण
गुकेशने 2017 पासून ग्रँडमास्टर विष्णू प्रसन्नाकडे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. बुद्धिबळ प्रशिक्षणात/सरावात संगणकाची मदत घेणं ही अगदी सामान्य गोष्ट आहे; पण इथेच विष्णू प्रसन्नाने प्रशिक्षक म्हणून त्याचं वेगळेपण दाखवलं. संगणकाचा वापर टाळून मानवी मेंदूवर जास्त विश्वास ठेवून त्याप्रमाणे सराव सुरू ठेवला. कोविडकाळात संपूर्ण जग ठप्प झालं होतं त्याही वेळी गुकेशने जास्तीत जास्त वेळ बुद्धिबळ पटाबरोबरच घालवला होता. ह्याचं फळ त्याला 2022 मध्ये चेन्नईत झालेल्या ऑलिम्पियाडमध्ये मिळालं. त्याचा समावेश असलेल्या भारताच्या पुरुष संघाने कांस्य पदक मिळवलं; पण गुकेशला वैयक्तिक सुवर्ण पदक मिळालं होतं.
2023 मध्ये पहिल्यांदाच विश्वनाथन आनंदला मागे सारून गुकेश भारताचा पहिल्या क्रमांकाचा खेळाडू झाला. त्यानंतर मात्र गुकेशचा फॉर्म हरवला आणि कॅण्डिडेट्स स्पर्धेची पात्रता मिळवण्याचं स्वप्न अपूर्ण राहणार असं वाटू लागलं. कॅण्डिडेट्स स्पर्धेतून जगज्जेतेपदाचा उमेदवार निवडला जातो, त्यामुळे ही स्पर्धा खूप महत्त्वाची असते. ह्या स्पर्धेच्या पात्रतेचे वेगवेगळे निकष जागतिक बुद्धिबळ संघटनेने निश्चित केले आहेत. ह्या परिस्थितीत एक संधी गुकेशसमोर चालून आली. चेन्नईमध्ये ‘चेन्नई ग्रँडमास्टर्स’ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. ह्या स्पर्धेसाठी गुकेशला तिसरं मानांकन मिळालं होतं; पण गुकेश ही स्पर्धा जिंकला आणि कॅण्डिडेट्स पात्रतेची ही शेवटची संधी त्याने हातातून निसटू दिली नाही. ह्या स्पर्धेची पात्रता मिळवणारा गुकेश जगातील आत्तापर्यंतचा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला. पुढे गुकेश कॅण्डिडेट्स स्पर्धा जिंकला आणि सज्ज झाला चीनच्या ग्रँडमास्टर डिंग लिरेनचा सामना करण्यासाठी...
वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप 2024
कॅण्डिडेट्सचा अडथळा गुकेशने पार केला होता; त्यामुळे आता 2023च्या जगज्जेत्याशी त्याचा सामना होणार होता. ह्या स्पर्धेच्या आयोजनासाठी सिंगापूरसह भारतातील चेन्नई आणि दिल्ली ह्या शहरांनीही बोली लावली होती. ठिकाण निश्चित झालं सिंगापूर. बुद्धिबळ खेळाच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन आशियाई खेळाडू जगज्जेतेपदासाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार होते. अफाट लोकसंख्येच्या दोन देशांचे हे प्रतिनिधी- चीनचा डिंग लिरेन आणि भारताचा गुकेश. लिरेनचा हरवलेला फॉर्म आणि त्याचदरम्यान आधी कॅण्डिडेट्स, मग चेस ऑलिम्पियाडमध्ये सांघिक आणि वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवून जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला गुकेश, ह्यामुळे सुरुवातीला स्पर्धा एकतर्फी होईल, असा अंदाज अनेकांनी वर्तवला होता.
जगज्जेतेपदाच्या सामन्याचे स्वरूप
ह्या सामन्यात एकूण 14 क्लासिकल बुद्धिबळ डाव खेळले जाणार होते. सर्वात आधी 7.5 गुण मिळवणारा खेळाडू विजेता ठरणार होता. बरोबरी झाल्यास पुढे जलद बुद्धिबळाचे टाय ब्रेकर्स खेळावे लागले असते. एक विजेता मिळेपर्यंत हा सामना सुरूच राहतो.
पहिल्याच डावामध्ये डिंगने गुकेशला पराभूत केलं आणि सर्वांच्या लक्षात आलं, की सामना चुरशीचा होणार. पुढचा डाव अनिर्णित संपला. तिसर्या डावामध्ये जिंकून गुकेशने त्याच्या चाहत्यांना दिलासा दिला. त्यानंतर पुढील सात डाव अनिर्णित राहिले. अकराव्या डावामध्ये गुकेश जिंकला; पण लगेच बाराव्या डावामध्ये डिंगने गुकेशला अजिबात संधी दिली नाही आणि पुन्हा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये बरोबरी झाली. तेरावा डाव पुन्हा बरोबरीत संपला. चौदावा डाव बरोबरीत सुटेल अशी शक्यता वाटत होती; पण गुकेशचे इरादे वेगळेच होते. ह्या सामन्यात गुकेशने वेळेचा वापर अगदी योग्य प्रकारे करून खूप वेळ स्वतःकडे राखून ठेवला होता, त्याच वेळी डिंग मात्र नेहमीप्रमाणे वेळेच्या दबावाखाली येणार अशी चिन्हे दिसू लागली. कदाचित ह्यामुळेच डिंग एक चुकीची चाल खेळला आणि अगदी अनपेक्षितपणे गुकेशसमोर विजेतेपदाची संधी चालून आली. गुकेशने अगदी शांतपणे आपल्या चाली खेळून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं. डिंग आपल्या चुकीची जाणीव होऊन हताश झाला होता; त्याच वेळी गुकेश स्वप्नपूर्तीचा आनंद अनुभवत होता.
वयाच्या अकराव्या वर्षी एका मुलाखतीत गुकेश म्हणाला होता, की त्याला सर्वात युवा जगज्जेता व्हायचं आहे. हे स्वप्न तर बहुतेक सगळेच खेळाडू बघतात; पण तिथपर्यंत पोहोचणं सगळ्यांनाच साध्य होत नाही. गुकेश मात्र त्याचं स्वप्न प्रत्यक्षात जगत होता. डिंगने चुकीची चाल खेळली त्या वेळी गुकेश थोडासा आश्चर्यचकित झाला होता, मात्र त्याने स्वतःला शांत ठेवलं आणि कुठलीही गडबड न करता पुढील चाली खेळल्या. डिंग पराभवानंतर हात मिळवून निघून गेला. त्यानंतरची गुकेशची कृती सर्वांची मने जिंकून गेली. एकाच वेळी चेहर्यावर हसू आणि डोळ्यांत आनंदाश्रू दिसत होते; पण त्या आनंदाच्या प्रसंगीही त्याने आधी दोन्ही बाजूंनी बुद्धिबळ पट व्यवस्थित मांडून ठेवला, नमस्कार केला, खुर्ची योग्य जागी सरकवून ठेवली आणि त्यानंतरच तो बाहेर पडला. खेळाबद्दलची निष्ठा, आदर आणि प्रेम ह्याच गोष्टी गुकेशला खूप पुढे घेऊन जातील, अशी भावना ह्या प्रसंगामुळे सर्वांच्या मनात निर्माण झाली.
पुढील वाटचाल
जगज्जेतेपदाचं स्वप्न फारच लवकर पूर्ण झालं आहे. सर्वात युवा जगज्जेता होण्याचा मान गुकेशने मिळवला आहे; पण ही फक्त सुरुवात आहे. स्पर्धेनंतरच्या पत्रकार परिषदेत गुकेश म्हणाला, की त्याला जगातील सर्वोत्कृष्ट बुद्धिबळपटू व्हायचं आहे आणि दीर्घकाळ त्या स्थानी राहायचं आहे. तो पुढे असंही म्हणाला, की हा सामना मी जिंकलो असलो, तरी आजही जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू मॅग्नस कार्लसनच आहे. लहान वयात मिळालेल्या यशाने हुरळून जाणारे खेळाडू आपण इतर खेळांमध्ये नक्कीच पाहिले आहेत; पण गुकेशच्या बाबतीत असं काही होण्याची शक्यता अजिबात वाटत नाही. आयुष्यात काय करायचं आहे हे त्याला माहिती आहे. त्याची आई म्हणाली होती, माझा मुलगा चांगला खेळाडू म्हणून ओळखला जाईल तेव्हा मला नक्कीच आनंद होईल; पण त्याच वेळी तो चांगला माणूस म्हणून ओळखला गेला तर मला त्याचा जास्त आनंद होईल. गुकेश आईची ही इच्छा नक्कीच पूर्ण करेल.
वेस्टब्रिज आनंद चेस अकादमी (WACA)
2020 मध्ये ह्या अकादमीची स्थापना झाली. गुकेश आणि त्याचा पहिला प्रशिक्षक विष्णू प्रसन्ना कोविडकाळात ह्याच अकादमीत सराव करत होते. सुरुवातीला आनंद गुकेशसाठी एक प्रेरणास्थान होता; पण वाकामुळे तो गुकेशचा प्रत्यक्ष मार्गदर्शकही झाला. फक्त खेळच नाही, तर इतर अनेक गोष्टींमध्ये आनंद आणि त्याची पत्नी अरुणा ह्या दोघांनी गुकेशच्या वडिलांना मदत केली आहे. गुकेशचे वडील रजनीकांत एके ठिकाणी म्हणाले होते, की काहीही अडचण आली की मी अरुणा मॅडमना फोन करतो, त्या कायम मदतीसाठी तत्पर असतात.
वेस्टब्रिजने गुकेशचं प्रायोजकत्वही स्वीकारलं आणि त्यामुळे त्याची आर्थिक अडचण दूर झाली. काही दिवसांपूर्वी आरबीएल बँकेने गुकेशला करारबद्ध केलं आहे. जगज्जेतेपदानंतर आता आणखी कंपन्या त्याच्याकडे नक्कीच येऊ शकतात. भारतात जाहिरातींच्या माध्यमातून फक्त क्रिकेटपटू पैसे कमावू शकतात, हा समज नीरज चोप्राने बदलला होता. ऑलिम्पिक सुवर्ण पदकानंतर नीरज अनेक ब्रँड्सचा लाडका चेहरा झाला होता, आता गुकेशच्या कामगिरीमुळे आणखी बदल बघायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको. केवळ पैशांअभावी अनेक खेळाडू खेळ सोडून देतात; पण गुकेशसारख्या खेळाडूंमुळे अनेक सकारात्मक बदल नजीकच्या काळात घडून येतील अशी परिस्थिती आहे. वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप - 2024 चं मुख्य प्रायोजकत्व गूगलने स्वीकारणं हेही जागतिक पातळीवर ह्या खेळाची लोकप्रियता वाढत असल्याचं द्योतक आहे.
बुद्धिबळ खेळाची भरभराट
ह्या वर्षात बुद्धिबळ खेळामुळे भारताला अनेक आनंदाचे प्रसंग अनुभवता आले. चेस ऑलिम्पियाडमधील घवघवीत यशाबद्दल आधीच लिहून झालंय. त्याव्यतिरिक्त अर्जुन एरिगेसीने फिडेकडून दर महिन्याला प्रसिद्ध होणार्या अधिकृत यादीत 2800 रेटिंग पॉइंट्सचा टप्पा ओलांडला. विश्वनाथन आनंदनंतर अशी कामगिरी करणारा अर्जुन हा केवळ दुसरा भारतीय खेळाडू आहे. कोलकात्याच्या अनिष सरकार ह्या छोट्याशा मुलाने जगातील सर्वात लहान फिडे रेटेड खेळाडू होण्याची कामगिरी केली आहे. हे रेटिंग मिळवताना त्याचं वय होतं तीन वर्षे, दोन महिने.
येणार्या काळात भारतीय खेळाडूंची यशस्वी आगेकूच अशीच सुरू राहू दे, ह्या सदिच्छा. जगज्जेत्या गुकेशचं मनापासून अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!