आंबा मोहोर व्यवस्थापन

18 Dec 2024 15:25:20
@डॉ. महेश कुलकर्णी 9422633030
 आंबा या वृक्षाचे वार्षिक चक्र समजून घेऊन त्याची जोपासना करणे आवश्यक आहे. मोहोर येण्यासाठी पालवी आली पाहिजे आणि पालवी येण्यासाठी काढणीपश्चात छाटणी करणे गरजेचे आहे. बदलत्या वातावरणात दोन ते तीन वेळा मोहोर येताना आढळतो. अशा वेळी कीडरोगांची लागण होण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी खात्रीशीर उत्पन्न मिळण्यासाठी झाडांवर औषध फवारणी अभ्यासपूर्वक करावी.

mango
 
आंबा हे फळ आवडत नाही असा जगाच्या पाठीवर कोणीच नसेल. 111 देशांत लागवड असलेल्या आंब्याचे 40 टक्के क्षेत्र एकट्या भारतात आहे. आंबा मुळातच आपला. त्यामुळे त्याला खाण्याचा हक्कसुद्धा आपलाच नाही का? जगाच्या पाठीवर सर्वात जास्त पैसे देऊन हंगामाच्या सुरुवातीला आंबा खाणारे आपण भारतीय आहोत. बाकीच्या देशांत आंबा हा फळ म्हणून खाल्ला जात असेल, मात्र भारतात ’चवीने खाणार त्याला देव देणार’ या म्हणीला योग्य तो न्याय देत भारताच्या अनेक प्रांतांत जातींची नावे घेऊन वेगवेगळे पदार्थ बनवून खाल्ला जातो. आपण मराठी भाषिक मोजून दहा जाती खातो; पण भारतात 60 हून अधिक विक्री होणार्‍या जाती, तर 30 हून अधिक संकरित जाती आहेत आणि या लेखाचा उद्देश म्हणजे आंबा जरी तुम्हाला एप्रिल-मे महिन्यांत मिळणार असला तरी आंब्याचा मोहोर चार महिने अगोदर म्हणजेच डिसेंबर-जानेवारीत येऊ घातला आहे आणि त्याची काळजी घेणे आपल्यासाठी खूपच गरजेचे आहे.
 
आंबा या वृक्षाचे वार्षिक चक्र समजून घेऊन त्याची जोपासना करणे आवश्यक आहे. मोहोर येण्यासाठी पालवी आली पाहिजे आणि पालवी येण्यासाठी काढणीपश्चात छाटणी करणे गरजेचे आहे. एखाद्या फांदीवर फळ धरले, की सभोवतालची पाने जोमाने काम करतात. फळे काढणीपर्यंत काळी पडतात आणि पुढच्या वर्षी पुन्हा मोहोर देण्याची त्यांची शक्ती नसते, त्यामुळे पुन्हा पालवी टाकतात व एक वर्ष थांबून पुन्हा नवीन पालवी मोहोर टाकायला सज्ज होते. या सगळ्या गणितात एखाद्या वाढीच्या काळामधील एखादे संजीवक वापरले गेले की आर्थिक चक्र बदलते आणि गणित फसू शकते. त्यामुळे संजीवकाचा वापर अभ्यासपूर्वक करायला हवा.
 

mango 
आंबा मोहोर यायला सर्वात महत्त्वाचे काय? याचा अभ्यास करताना मला असे आढळले की, पाऊस जाऊन उष्णता वाढली की जमीन तापते, वरचे पाणी उडून जाते व झाडाला ताण बसतो. अशा वेळेला आंब्याची नवीन आलेली काडी जुनी झाली असेल तर थंडी पडून आर्द्रता वाढू लागली की, रात्रीच्या तापमानात 15 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त फरक पडला की, तापमान 16 अंश ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिले, की आंब्यामध्ये योग्य ते बदल होताना दिसतात. पानाचे देठ डोळ्याच्या रेषेत खाली उतरते. डोळे फुगून मोहोर तयार होतो आणि पुन्हा थोडी उष्णता मिळाली की मोहोर फुटतो. पारखी नजर असलेल्या शेतकर्‍यांना ही जादू दरवर्षी पाहायला मिळते आणि मग मोहोराच्या काळजीची लगबग सुरू होते. आंब्याचा मोहोर आला, की तो आकर्षक दिसतो. थंडीनुसार तो उमलायला सात ते 15 दिवस घेतो. नंतर परागीभवन आणि छोटी कळी दिसायला लागते. या कालावधीत झाडाला अन्नद्रव्याची, पाण्याची आणि कीडरोगापासून वाचवण्याची गरज असते. जशी प्रसूतीच्या वेळी काळजी घेतो तशीच काळजी घेणे आवश्यक असते. एखादा डोस चुकला किंवा अधिक झाला, तर आंबा पीक हातचे जाऊ शकते. बर्‍याच कंपन्या त्यांचे औषध आंब्यासाठी म्हणून सांगतात; पण चलाखीने लेबल क्लेम (सीआयबीआरसीकडे एखाद्या फळपिकासाठी शिफारस असल्याचा दावा मान्य असणे) मात्र घेत नाहीत. लेबल क्लेम म्हणजे त्यांचे औषध आंब्यासाठी आहे याचे प्रमाणीकरण. माणसाच्या कमतरतेमुळे किंवा ज्ञात-अज्ञात कारणांमुळे या औषधांची विक्री कायदा असूनही कोणी थांबवत नाही. आपणही अज्ञानामुळे ही औषधे विकत घेतो, कोणी तरी सांगतो म्हणून अनेक औषधे एकत्रित करून मारतो; पण नेमके संशोधन काय आहे, हे आपण अभ्यासत नाही. वेगवेगळ्या रंगांच्या बाटलीतून एकच औषध दहा वेळा मारून कीडरोग नियंत्रण होत नाही म्हणून हताश होतो. यापेक्षा आपण अभ्यासपूर्ण औषधे मारली पाहिजेत आणि एकत्रित उपाययोजना केल्या पाहिजेत.
 
 
आंब्याच्या झाडावर कीडरोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर एक टक्का बोर्डो मिश्रणाचे द्रावण खोडाला भेगा गेल्या आहेत तिथपासून ते सर्व झाडावर, पानांवर फवारावे, जेणेकरून खोडांच्या भेगांमध्ये, पानावर, पानाखाली लपलेल्या बुरशीचा नाश होण्यासाठी मदत होते. फवारणी करण्यापूर्वी कुंपणाजवळील झाडांची छाटणी करावी, जेणेकरून शेजारून येणार्‍या कीडरोगांवर नियंत्रण मिळवणे सोपे जाते. मोहोराचे डोळे फोडण्याच्या तयारीत असताना आर्द्रता असल्यामुळे पाच ग्रॅम प्रति लिटर वर्टिसिलियम लेकानी या बुरशीचे बीचकण पाण्यातून फवारले असता रस शोषणार्‍या किडींचे नियंत्रण होऊ शकते. गरज पडल्यास पोपटी रंगाच्या पालवीवर मोहोर येण्यापूर्वी डेल्टामेथ्रिन 2.8 टक्के प्रवाही 9 मिली 10 लिटर पाण्यात व बुरशी असल्यास पाच टक्के एक्साकोनोझोल 5 मिली 10 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी. मोहोरापूर्वी झाडावरील फांद्या गच्च होऊन झाडात काळोख निर्माण झाल्यास पंधरा टक्क्यांपर्यंतच फांद्या काढून मध्यभागी उजेड तसेच उष्णता निर्माण करावी, त्यामुळे कीडरोगांचे प्रमाण कमी होईल, फवारणी कमी होईल व प्रकाश संश्लेषण वाढवून आतल्या भागातही फळे लागतील.
 
फवारणी करताना सकाळी 12 वाजण्यापूर्वी व दुपारी 3 नंतर करावी. प्रवाही औषध मारताना झाडावरील पानांच्या खालील बाजूने सूक्ष्म फवारा घ्यावा. आवश्यकता भासल्यास स्टिकर किंवा स्प्रेडरचा वापर करावा. परागीभवन होऊन गेल्यावर ते फळकाढणीला एक महिना अगोदरपर्यंत विद्यापीठाने शिफारस केलेल्या वेळापत्रकामधील कीटकनाशकांच्या प्रमाण दिल्याप्रमाणे फवारण्या कराव्यात. तक्त्यामधील प्रमाण गटूर पंपासाठी असून एचडीपी पंपाने फवारणी करत असल्यास प्रमाण दुप्पट करणे आवश्यक आहे. बदलत्या वातावरणात दोन ते तीन वेळा मोहोर येताना आढळतो. अशा वेळी बागेत वेळापत्रकानुसार निवडक झाडांवर फवारणी झाली असली तरी 50 टक्क्यांहून अधिक झाडे पूर्णपणे मोहोरल्यावर संपूर्ण बागेत फवारणी घ्यावी. फवारणी करताना तेलवर्गीय कीटकनाशकांची फवारणी केल्यास किडी चिकटून बसतात, प्रजनन मंदावते व आपोआप संख्या कमी होते. थ्रिप्स (फूलकिड) सारख्या किडींवरती कीटकनाशकांप्रमाणेच निळ्या रंगाचे चिकटसापळे उपयोगी पडतात.
 
 
आंबा फळ वाटाण्याच्या आकाराचे झाल्यावर त्यावर वीस पीपीएम नॅपथॅलिक अ‍ॅॅसिटिक अ‍ॅॅसिडची 200पीपीएम (200 तास प्रति 10 लिटर) पाण्यातून फवारणी घ्यावी व पुन्हा पंधरा दिवसांनी अजून एकदा फवारणी घ्यावी. त्यामुळे फळगळ कमी होते. फळधारणा झाल्यावर नियंत्रित पाणी सुरू करावे तसेच फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती आकाराची असताना एक टक्का पोटॅशियम नायट्रेटची किंवा पन्नास टक्के मोहोर फुलल्यावर, गोटीच्या व अंडाकृती आकाराची फळे असताना एनएटका 10 टक्के व फॉलिक अ‍ॅसिड 0.2 टक्के घटक असलेल्या संजीवकाची फवारणी अनुक्रमे एक मिली, दीड मिली व दोन मिली प्रति लिटर प्रमाणात फळगळ कमी करण्यासाठी तसेच फळाचा आकार व दर्जा सुधारण्यासाठी आणि साक्याचे प्रमाण कमी करण्यासाठी करावी. त्याचप्रमाणे डागविरहित फळे मिळवण्यासाठी फळे गोटीच्या आकाराची झाल्यावर घरच्या घरी स्वतः तयार केलेली वर्तमानपत्राची 20 बाय 28 सेंटिमीटर आकाराची कागदी पिशवी वापरावी. तसेच फळाचे वजन वाढवण्यासाठी साका व देठकुज कमी करण्यासाठी, काढणीपूर्व फळ अंड्याच्या आकाराचे झाल्यावर बाजारात उपलब्ध बाहेरून तपकिरी व आतून काळ्या रंगाच्या कागदी पिशवीचे आवरण घालावे व 50 दिवसांनी काढावे. अभ्यासू शेतकर्‍यांनी बागेत तापमान व आर्द्रता दाखवणारा डाटा लोगर बसवणे व त्यानुसार घटनांची नोंद ठेवणे सुरू केले की, आपोआपच गोष्टी घडू लागतील. प्रश्न विचारत असताना नेमकी अडचण समजेल. योग्य वेळी योग्य नियंत्रण होऊन खर्चात बचत होईल. खात्रीशीर दर्जेदार उत्पन्न मिळेल.
 
 
- लेखक दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या उद्यानविद्या महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
Powered By Sangraha 9.0