संघशाखांचा विस्तार जसा महाराष्ट्रात होत होता, तसा तो महाराष्ट्राबाहेर म्हणजे परप्रांतातही होत होता. तेथील कार्यकर्त्यांना संघशाखा विस्तारासाठी आणि येणार्या समस्यांवर उपाययोजनासंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. हेडगेवार नेहमीच पत्रव्यवहार करीत असत.
डॉ. हेडगेवारांनी लिहिलेल्या पत्रांचे वाचन करताना बनारसच्या प्रा. सदगोपालजी यांना हिन्दी भाषेत पाठविलेले पत्र आढळले. त्याचे झाले असे की, बनारसला संघकार्य विस्तारासाठी नवनवीन कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी नागपूरच्या उन्हाळ्यातील ट्रेनिंग कैंपसारखा वर्ग तेथे आयोजित करण्यात आला.
डॉ. हेडगेवारांची अनुमती न घेता एकाच कालखंडात नागपूर व बनारस (काशी) ला वर्ग आयोजित करण्यात आला आहे, याची माहिती असलेल्या एका कार्यकर्त्याने डॉ. हेडगेवारांसोबत या संदर्भात काहीही न बोलता परस्पर प्रा. सदगोपालजींना सांगितले की, आपल्या या निर्णयामुळे डॉ. हेडगेवार नाराज झाले आहेत.
त्यामुळे व्यथित अंतःकरणाने प्रा. सदगोपालजी, बनारस, यांनी आपल्या वेदना डॉ. हेडगेवारांना पत्र पाठवून कळविल्या.
या पार्श्वभूमीवर डॉ. हेडगेवारांनी लिहिलेले हिन्दी भाषेतील पत्र येथे नमूद करीत आहे.