गोष्ट पालघरच्या पानवेलीची

विवेक मराठी    20-Dec-2024
Total Views |
@रिद्धी बांदिवडेकर
महाराष्ट्र राज्याच्या उत्तर कोकण किनारपट्टीच्या भागात वैविध्यपूर्ण शेती केली जाते. त्यामध्ये पानवेलीच्या शेतीला मोठा इतिहास आहे. ही शेती पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. एके काळी वसईच्या काळी पानाची निर्यात केली जात असे. माहिम केळव्याच्या पानाला बाजारपेठेत स्थान होते. पालघर जिल्ह्यातील पानवेलीचा एक महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे कृषिभूषण जयवंत चौधरी यांचे ‘बहुगुणी श्रीमंत पानवेल’ हे पुस्तक होय.

krushivivek
 
पालघर हा उत्तर कोकण प्रांतातला महत्त्वाचा आणि वैविध्यपूर्ण जिल्हा म्हणून परिचित आहे. सुंदर समुद्रकिनारा यामुळे पर्यटन केंद्र म्हणून या जिल्ह्याचा लौकिक वाढला असला तरी कृषी क्षेत्रात हा जिल्हा आघाडीवर आहे. डहाणू तालुक्यातील बोर्डी आणि घोलवड हे गाव भारतातील चिकू लागवडीचे केंद्र आहे, तर अवीट गोडीची वसईची ‘सुकेळी‘ (वेलची केळी) राज्यभर प्रसिद्ध आहेत. जांभळाचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘बहडोली‘ गावच्या जांभळाची चव सर्वदूर पसरली आहे. सातपाटी बंदराच्या ‘सिल्व्हर पापलेट‘ला ‘राज्य मासा‘ म्हणून दर्जा मिळाला आहे. याखेरीज पालघरच्या पानवेलीची ओळख देशभर पसरली आहे. वसईचे कृषिभूषण शेतकरी जयवंत चौधरी यांनी पानवेली शेतीमध्ये खास ओळख निर्माण केली आहे. या अनुभवातून त्यांनी पालघर जिल्ह्यातल्या पानवेलीचा इतिहास, लागवड, बाजारपेठ कशी आहे या संदर्भात एक अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले आहे. ‘बहुगुणी श्रीमंत पानवेल‘ असे या पुस्तकाचे नाव आहे. 130 पानांच्या या पुस्तकात ‘पानवेलीचा इतिहास‘, ‘वसईचा पान उद्योग‘, ‘माहिमचा पान इतिहास‘, ‘केळवे गावच्या पान संघाचा आखाती देशातला पान व्यापार‘ आणि शेवटच्या प्रकरणात ‘भारतातील पान उद्योग‘चा संक्षिप्त मागोवा घेतला आहे.
 
•
बहुगुणी श्रीमंत पानवेल
• लेखक - जयवंत मुकुंद चौधरी
• प्रकाशन ः केतन चौधरी
• पृष्ठ संख्या ः 130
• किंमत ः रु. 200
 
 
स्वातंत्र्यपूर्व काळात पालघर परिसरात कलकत्ता पान म्हणून संबोधले जाणारे काळी पाने मोठ्या प्रमाणात येत. त्याला बाजारभावही चांगला मिळत, ही गोष्ट वसईचे मोठे बागायतदार भायजी जगू राऊत व काही जाणकार बागायतदारांच्या लक्षात आली. सर्व मंडळींनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन जमीन, बियाणे, लागवडीची पद्धत, मांडव, बाजारपेठ यांचा अभ्यास केला. यानंतर 1880 च्या सुमारास प्रथम वसई पालघर जिल्ह्यात काळी पानाची लागवड केली. 1920 साली पानवेलीवर ‘मर‘ रोगाचा प्रादुर्भाव झाला. दोन-तीन वर्षांतच वसईची अर्धीअधिक पानवेल नष्ट झाली. हताश न होता शेतकर्‍यांनी पानवेलीत वसईचा लौकिक वाढवला. पुढे लोकनेते अण्णासाहेब वर्तक यांच्या पुढाकारातून 1930 साली वसईतील पान व्यापार्‍यांची ‘वसई पान मर्चंट असोसिएशन‘ची स्थापना करण्यात आली. यामुळे वसईचा पान व्यापार मोठ्या प्रमाणात वाढला. केवळ पानाच्या वाहतुकीसाठी वसई ते डेहराडून अशी स्वतंत्र बोगी रेल्वे वॅगन जोडली गेली. ही पश्चिम रेल्वेच्या इतिहासातील महत्त्वाची घटना. या काळात वसईच्या पानवेलीचा व्यापार गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब आणि पाकिस्तानमधील सिंध, लोहार, कराची व वायव्य सरहद्द प्रांतात पोहोचला होता. 1914च्या सुमारास बळवंत जगन्नाथ वर्तक यांनी वसई येथून काळी पानाचे बियाणे आणून माहिम गावी प्रथम लागवड केली. या प्रयोगानंतर इतर शेतकरीही पान लागवडीकडे वळले. वसई, माहिमनंतर केळवे येथे पानवेलीची मोठ्या प्रमाणात लागवड सुरू झाली. यानंतर ‘केळवे पान विक्रेता संघा‘ची निर्मिती झाली. साहजिकच केळव्याचा बागायतदार पानवेलीकडे मोठ्या प्रमाणात वळू लागला. (विभाजनानंतर पाकिस्तानने 1954 साली भारतीय पान आयातीवर बंदी घातली. त्यामुळे वसई व माहिम पानवेलीचा व्यापार थंडावला.) 1964-65 साली माहिम विविध कार्यकारी सहकारी संस्थेने पान व्यापार सुरू केला. काही तांत्रिक कारणांमुळे दोन वर्षांत संस्थेला पान व्यापार बंद करावा लागला. याला पर्याय म्हणून 1972 साली माहिमच्या वीस पान उत्पादकांनी एकत्रित येऊन ‘महिकावती पान संघ‘ या नावाने खासगी पान व्यापार सुरू केला. आजही हा व्यापार यशस्वीरीत्या चालू आहे.
 
 
देशात व राज्यातही मांडव उभारूनच पानवेलची लागवड केली जाते. बदलत्या काळात शेतमालाचा दर्जा, बाजारपेठेतील मागणी, बाजारभाव, आधुनिक तंत्रज्ञान हे सर्व गणित लक्षात घेेऊन केळवे, तागजिण-पालघर येथील अभ्यासू शेतकरी दीपक वर्तक व नयत घरत यांनी पॉली हाऊसमध्ये पानाची लागवड करण्याचा अभिनव प्रयोग हाती घेतला आहे. यामुळे पारंपरिक मांडवातील पानापेक्षा ‘पॉली हाऊस‘मधील पानाचा आकारमान वाढतो. शिवाय पानाचा दर्जा, पानाचे वजन, वेलीची वाढ जोमाने झाल्याचे दिसून आले आहे. महत्त्वाचे म्हणजे कीटकांचा प्रादुर्भाव व बुरशीजन्य रोग यावर बर्‍यापैकी नियंत्रणात मदत मिळाली आहे. एकूणच पारंपरिक मांडव पद्धतीपेक्षा ‘पॉली हाऊस‘मधील पान लागवड निश्चितच फायदेशीर असल्याचे लेखक जयवंत चौधरी सांगतात.
 
 
उत्तर भारतातील बाजारपेठेत आजही वसई-केळवा-माहिमच्या पानाला मोठी मागणी असली तरी आज मजुरांची कमतरता, उत्पादन खर्च आणि बाजारमूल्य आदी कारणांमुळे पानवेल व्यवसायाला उतरती कळा लागली आहे, असे चौधरी सांगतात. पानातील विविध गुणांमुळे त्यापासून औषधनिर्मिती शक्य आहे. सुगंधी पान मसाले, अर्क, तेल पदार्थ बनवून शेतकरी समृद्ध होऊ शकतात, असेही त्यांनी भविष्य वर्तवले आहे.
 
 
पानवेल हे कमी जागेत जास्त उत्पन्न देणारे पीक आहे. पानवेलीची लागवड एकदा केली की, नैसर्गिक आपत्ती न आल्यास पंधरा ते वीस वर्षे बाग टिकून राहते. भारतातील दहा राज्यांत 43 पानांच्या जातींची लागवड केली जाते. महाराष्ट्रात देशी पान- काळी पान (वसई, केळवे, माहिम), काळी पान-कपुरी (पश्चिम महाराष्ट्र), नावकर-नाळेकर (वसई, केळवे, माहिम), कुर्‍हे-कपुरी (पुणे), बंगला-कपुरी (पुणे), कुपरी-देशी (विदर्भ) या जातींच्या पानांची लागवड केली जाते. लागवडीसाठी पाच ते सहा लाख रुपये खर्च येतो. दुसर्‍या व तिसर्‍या वर्षापासून उत्पन्नात 50 ते 60 टक्के नफा मिळतो, असे चौधरी यांनी पुस्तकाच्या शेवटी पानवेलीचे अर्थशास्त्र उलगडून सांगितले आहे.
 
 
सहजसोपी भाषाशैली हे या पुस्तकाचे मुख्य वैशिष्ट्य. पानवेलीचे आकर्षक छायाचित्र हे पुस्तकाचे आणखीन एक बलस्थान. त्यामुळे सामान्य शेतकर्‍यांना व वाचकांना सहज आकलन होईल, असे हे पुस्तक आहे. त्यामुळे विषयाच्या वेगळेपणामुळे हे पुस्तक कृषी वाङ्मयात निश्चितच भर घालणारे ठरेल, यात तिळमात्र शंका नाही.