भल्याभल्यांना संपूर्ण हयात घालवूनदेखील न येणारी संगीताची समज झाकीरभाईंना तरुण वयातच आलेली होती. त्यात दुग्धशर्करा योग म्हणजे त्यांच्या अलौकिक गुणांना आकर्षक व्यक्तिमत्त्वाचीदेखील जोड होती. सर्व योग व्यवस्थित जुळून आले होते. अल्पावधीत झाकीरभाई आसेतुहिमाचल प्रसिद्ध झाले. संपूर्ण भारतवर्षातील तालवेड्या तरुणाईला त्यांनी वेड लावले. तबलावादनात त्यांचे स्थान ध्रुवतार्यासम अढळ आहे.
तालाची आवड मला लहानपणापासून होती. गिरगावातल्या चाळीत राहत असताना वाडीत कच्छीबाजा वाजायला लागला किंवा गल्लीच्या नाक्यावरच्या गंधर्व ब्रास बँडच्या तालमीत गाण्यावर ठेका वाजायला लागला, की मन वेडे व्हायचे. पुढे शाळेत असताना तबल्याची ओळख झाली आणि कॉलेजच्या दिवसांत केव्हा तरी मी कै. पं. प्रकाश गोरे यांच्याकडे तबला शिकायला सुरुवात केली. तोपर्यंत तबलावादन क्षेत्रात झाकीर हुसेन या एका देखण्या तरुणाचे नाव आदराने घेतले जायला सुरुवात झाली होती. त्याचे वादनदेखील अतिशय तय्यार, सुस्पष्ट, तथापि त्या वेळच्या प्रचलित पठडीपेक्षा वेगळे होते. एरवी कुणा नवोदित होतकरू तबलावादकाचे फारसे कौतुक न करणारे आमचे मास्तरदेखील पुष्कळ वेळा त्याचे नाव कौतुकाने घ्यायचे. त्यामुळे नकळत मनात त्याच्याबद्दल जबरदस्त कुतूहल तयार झाले आणि बघता बघता कुठलीही ओळखपाळख नसलेला तो तरुण आमच्यासाठी (आज साठ-पासष्टीत असलेल्या पिढीसाठी) ‘झाकीरभाई’ झाले. त्यांच्याकडे काय नव्हते? भल्याभल्यांना संपूर्ण हयात घालवूनदेखील न येणारी संगीताची समज त्यांना तरुण वयातच आलेली होती. त्यात दुग्धशर्करा योग म्हणजे त्यांच्या अलौकिक गुणांना आकर्षक व्यक्तिमत्त्वाचीदेखील जोड होती. सर्व योग व्यवस्थित जुळून आले होते. अल्पावधीत झाकीरभाई आसेतुहिमाचल प्रसिद्ध झाले. संपूर्ण भारतवर्षातील तालवेड्या तरुणाईला त्यांनी वेड लावले. त्यांच्या एकल वादनाच्या मैफलींना लोक झुंडीने जाऊ लागले. सतार, संतूर, बासरी यांसारख्या वाद्यांना ते करत असलेली हजरजबाबी संगत ऐकायला गर्दी होऊ लागली. बघता बघता ते नायक झाले. त्यासाठी लायक तर ते होतेच. तबला त्यांनी घराघरांत नेला. संगीताशी कुठलाही संबंध नसलेल्या सर्वसामान्य घरातील मुलांना त्यांचे पालक झाकीरभाईर्ंचे कार्यक्रम ऐकवण्यासाठी नेऊ लागले. आपल्या मुलाने उत्तम शिक्षण तर घ्यावेच; पण सोबत कलाही जोपासावी, हा वेगळा दृष्टिकोन पालकांमध्ये दिसू लागला. याचे श्रेय बर्याच प्रमाणात झाकीरभाईंना जाते.
मैफली रंगवणे, हा एक वेगळाच विषय आहे. एखाद्या प्रचंड ज्ञानी आणि तय्यार उस्ताद किंवा पंडिताचादेखील मैफील रंगवण्यात हातखंडा नसतो. जमलेल्या रसिकांची जातकुळी कोणत्या प्रकारची आहे ते जाणून आणि त्यांना नेमके काय हवे आहे ते ओळखून त्याप्रमाणे आपली कला सादर करण्याची विलक्षण हातोटी झाकीरभाईंकडे होती. जमलेल्या हजार लोकांमध्ये तबल्याचे क्लिष्ट गणित कळणारे अगदी मोजकेच रसिक असतात आणि बाकीचे केवळ ताल आणि नादाचा आनंद लुटायला आलेले सामान्यजन असतात याची उत्तम जाण झाकीरभाईंकडे होती आणि म्हणूनच स्वत: उत्तम लयकार असूनही त्यांच्या एकल वादनात लयीचे खेळ मिठाप्रमाणे चिमूटभर, वादनाला चव येण्यापुरते असायचे. तबल्याचा टोन (नाद) या विषयात तर झाकीरभाई बादशाह होते. त्यांच्या ‘दाया’ (तबला) आणि ‘बाया’ (डग्गा) यात अधिक प्रभावशाली कोण होते हे ठरवणे अशक्य आहे. त्यांचे वादन बोलके आणि भावपूर्ण असायचे, कारण बाया (डग्गा) वर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. यावरून सहज आठवले की, टेनिसमधील जगज्जेता आणि महान खेळाडू रॉजर फेडरर याला एकदा एका पत्रकाराने विचारले होते की, तुझा फोरहँड अधिक चांगला आहे की बॅकहँड? त्यावर फेडररने अतिशय सुरेख उत्तर दिले होते. तो म्हणाला होता,
“मी संपूर्ण जगातला पहिल्या नंबरचा खेळाडू आहे. मला एक काही तरी प्रभावी ठेवून दुसरे कमजोर असणे परवडणारे नाही. दोन्ही समान ताकदवान हवेत आणि माझे ते तसे आहेत.”
जग जिंकणार्यांचे असेच असते! त्यांची कुठलीच बाजू कमकुवत नसते.
साथसंगत असो किंवा एकल वादन, झाकीरभाईंनी तबल्याला दिलेले योगदान आभाळाएवढे मोठे आहे. संगत कशी करावी, संगत कशी असावी याचा पाया त्यांच्या वडिलांनी म्हणजे उस्ताद अल्लारखा खांसाहेबांनी पंडित रविशंकर, अली अकबर खांसाहेब या सर्वांसोबत शेकडो यशस्वी मैफली वाजवताना घालून दिलाच होता. झाकीरभाईंनी पंडित शिवकुमार शर्मा, पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची साथ करताना त्यावर अक्षरश: कळस चढवला. ‘हाजीरजवाबी’ म्हणजे काय याचा वस्तुपाठ म्हणजे झाकीरभाईंची संगत! गंमत म्हणजे याच झाकीरभाईंचा हात ख्यालगायकीची संगत करताना अतिशय समजूतदार आणि संयमी व्हायचा. मोजक्या जागा भरून वाजवण्यापलीकडे गायकाला त्रास होईल असे काही ते करत नसत. मात्र ठुमरी, दादरा किंवा गझल वाजवायची वेळ आली की त्यांनी लावलेल्या लग्ग्या केवळ लाजवाब असत. रसिकांनी यूट्यूबवर जाऊन झाकीरभाईंनी पूर्वी सवाई गंधर्व संमेलनात कै. पंडित वसंतराव देशपांडे यांना ‘सावरे अज्जैयो’ला केलेली साथ किंवा हरिहरन यांच्या गझलला केलेली साथ आवर्जून ऐकावी (ऐकल्या नसतील तर). सर्व प्रकार लीलया हाताळण्याची ‘तबियत’ जन्मत: देऊनच बहुधा अल्लाने त्यांना खाली पाठवले होते.
झाकीरभाईर्ंनी समस्त तबलाजगतात अतिशय लोकप्रिय केलेली एक गोष्ट म्हणजे ‘पेशकार’ आणि त्याचा विस्तार व बढत! ‘पेशकार’ हा तबल्याच्या एकल वादनात सुरुवातीलाच वाजवतात. ख्याल गायनात जशी सुरुवातीला आलापी असते तसाच काहीसा हा प्रकार असतो, असे म्हणायला हरकत नाही, मात्र यात तबल्याच्या कायद्यात असते तशी चाकोरी किंवा चौकट नसते. कलाकाराला आपली प्रतिभा दाखवण्याची पूर्ण मुभा यात आहे. आजवर जगात अनेक मोठमोठे तबलजी झाले असतील, मात्र फक्त पेशकारात रसिकांना गुंगवून ठेवणारे झाकीरभाई हे एकच. पेशकार वाजवताना लयीचे, चालींचे आणि तिहायांचे वेगवेगळे फुलोरे दाखवून दर वेळी ते इतके सुरेख पद्धतीने समेवर यायचे की, तोंडातून ‘क्या बात है’ची दाद आपोआप बाहेर यायची. अगदी संथ लयीत सुरू झालेला त्यांचा पेशकार चक्राकार जिन्याची एक एक पायरी चढत जावे तशी बढत करत पुढे जायचा. गुंडाळलेला गालिचा अलगद उलगडावा तशी एकामधून एक गोष्ट उलगडत जायची आणि मग शेवटी एखादी दमदार तिहाई घेऊन त्याचा शेवट व्हायचा. त्यांचा संपूर्ण पेशकार म्हणजे एका अलौकिक प्रतिभावंताचा सिलसिलेदार असा आनंददायी प्रवास असायचा, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
आज झाकीरभाई आपल्यात नाहीयेत हे मनाला समजावताना कठीण जातंय. काही वर्षांपूर्वी लतादीदी गेल्या तेव्हाही असंच काही तरी आपल्यापासून तुटल्यासारखं वाटलं होतं.
जन्मानंतर मृत्यू येणे हे तर अगदी ठरलेले
राजे, योगी, महंत कोणी पाहिलेत का उरलेले?
असं कुणी तरी म्हटले आहे. तत्त्व म्हणून हे सर्व अगदी खरे असले तरी एखादा महावृक्ष उन्मळून पडल्यावर तेवढा परिसर अगदी भकास होऊन जातो. पुन्हा पालवी फुटून पुन्हा महावृक्ष तयार होण्यात अनेक तपे जातात. झाकीरभाई हे असाच एक महावृक्ष होते. त्यांचे वडील आणि गुरू अल्लारखा खांसाहेबांनी आयुष्यभर फक्त पंजाब घराण्याची ध्वजा फडकावत ठेवली; परंतु झाकीरभाई यांनी ती चौकट मोडून झेप घेतली आणि विशेष म्हणजे अल्लारखा खांसाहेबानी त्यांना तशी घेऊ दिली. संगीतातील पुरोगामित्वाचे यापेक्षा अधिक चांगले उदाहरण मिळणे मुश्कील आहे. झाकीरभाई हे एखाद्या दीपस्तंभासारखे होते. त्यांच्याकडे पाहत, त्यांना ऐकत, त्यांना आदर्श मानत अनेक तबलावादकांनी आपला तबला पुढे नेला, यापुढेही नेतील. तरुण तबलावादकांनी झाकीरभाईंची सदैव तबल्याचा शिष्य बनून राहण्याची वृत्ती अंगीकारायला हवी. ज्या क्षणी ‘बनचुके’ झालात त्या क्षणी सगळे संपते. एकदा झाकीरभाईंना कुणी तरी विचारले होते की, आप दिन मे कितने घंटे रियाझ करते हो? त्यावर झाकीरभाई म्हणाले की, वो तो आतीजाती सांस जैसा अंदर चलते ही रहता है! त्यांच्या यशाचे गमक हेच होते. त्यांच्यातले आणि तबल्यातले द्वैत केव्हाच विरून गेले होते.
झाकीरभाई आपल्या कलेने खूप काही मागे ठेवून गेले आहेत. ते एवढे आहे की, अभ्यास करायचा म्हटला तर एका माणसाचा संपूर्ण जन्म जावा. नवोदित, होतकरू तबलावादकांना त्यातून बरेच काही मिळू शकेल. फक्त रियाझ करायची ताकद आणि मनोनिग्रह हवा. आता तंत्रज्ञान फारच पुढे गेले असल्याने माहिती मिळवणे, रियाझ करणे तुलनेने सोपे झाले आहे. त्यामुळे उद्या कदाचित झाकीरभाईंपेक्षा मोठा तबलिया निर्माण होईल; तथापि झाकीरभाई पुन्हा होणे नाही. तबलावादनात त्यांचे स्थान ध्रुवतार्यासम अढळ आहे.
(लेखात तबलावादन संबंधाने काही तांत्रिक अथवा सांगीतिक चुका आढळल्यास गुस्ताखी माफ करावी, ही विनंती.)