@सतीश भोसले 9762064141
कलिंगड हे अत्यंत कमी कालावधीत, कमी खर्चात आणि जास्तीत जास्त नफा मिळवून देणारे वेलवर्गातले पीक आहे. कलिंगड हे भरपूर पैसे मिळवून देणारे एक नगदी पीक म्हणून परिचित झाले आहे. या पिकाचे उत्पादन व दर्जा वाढविण्याकडे गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत. आधुनिक व एकात्मिक पद्धतीने कलिंगडाचे उत्पादन व प्रत सुधारण्यासाठी लागवडीसंबंधीच्या सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे.
कलिंगड हे एक मोठे, हिरव्या रंगाचे आणि लाल पाणीदार गोड गर असणारे फळ आहे. शास्त्रीय नाव सिटरूलस लेनेटस (Citrullus lanatus) असे आहे. या वनस्पतीला संस्कृतमध्ये कालिन्द असे नाव आहे. तर्बुज (हिंदी), तर्मुज (बंगाली), तर्बुजि (तेलुगू), बचंग (कोंकणी), कलिंगड (मराठी) अशा विविध नावांनी हे फळ संबोधले जाते. कलिंगडाच्या गरात अन्नघटकांचे प्रमाण पुढीलप्रमाणे असते. पिष्टमय पदार्थ (शर्करा) सात टक्के, स्निग्ध पदार्थ 0.2 टक्के, प्रथिने एक टक्का, क्षार 0.2 टक्के व पाणी 91.6 टक्के. याशिवाय कलिंगडाच्या बियांमध्ये 20 टक्के स्निग्धांश असतो. तसेच कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरस ही खनिजे असतात. आरोग्याच्या बाबतीत हे बलवर्धक, शीतकारक, पौष्टिक आणि पित्तशामक आहे. बियांचा वापर लोक आवडीने खाण्यासाठी करतात. कडक उन्हाळ्यामध्ये कलिंगडाच्या फळातील गरामुळे मन आल्हाददायक व तृप्त होते. त्यामुळे शेतकरी आता उच्च तंत्रज्ञानाच्या आधारे बाराही महिने हे पीक घेऊ लागलेत. पीक पद्धतीमध्ये खरीप हंगामानंतर कलिंगडाची लागवड अलीकडे मोठ्या प्रमाणावर धुळे, जळगाव तसेच विदर्भातील काही भागांत नदीच्या पात्रात केली जाते. पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांत व कोकणात या पिकाची लागवड पाण्याचा योग्य निचरा होणार्या हलक्या ते भारी जमिनीत केली जाते. कमी कालावधी व कमी उत्पादन खर्च यामुळे सर्व शेतकर्यांना हे पीक घेणे शक्य असून थंडगार, गोड व स्वादिष्ट गरामुळे कलिंगड गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांचे आवडते व परवडणारे तसेच आकर्षित करणारे फळ आहे. त्यामुळे बाजारात कलिंगड हे भरपूर पैसे मिळवून देणारे एक नगदी पीक म्हणून परिचित झाले आहे. या पिकाचे उत्पादन व दर्जा वाढविण्याकडे गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत. आधुनिक व एकात्मिक पद्धतीने कलिंगडाचे उत्पादन व प्रत सुधारण्यासाठी लागवडीसंबंधीच्या सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे.
लागवड कालावधी
कलिंगड पिकास उष्ण तसेच कोरडे हवामान आणि भरपूर सूर्यप्रकाश मानवतो. कडक उन्हाळ्याचा व पावसाळ्याचा काळ सोडला, तर कलिंगडाची लागवड वर्षभर कधीही करता येते. वेलीच्या चांगल्या वाढीसाठी 24 ते 27 अंश सेल्सियस तापमान उपयुक्त ठरते. लागवड शक्यतो जानेवारी महिन्यात करावी म्हणजे उन्हाळ्याच्या तोंडावर याची फळे तयार होऊन त्यांना मागणी अधिक राहते. त्यामुळे बाजारभाव चांगले मिळतात.
दक्षिण महाराष्ट्रामध्ये कलिंगडाची लागवड ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांत करतात व ही फळे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तयार होतात. उत्पादन कमी येते; परंतु भाव चांगला मिळतो. या पिकासाठी मध्यम काळी आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी तसेच सेंद्रिय पदार्थ भरपूर असणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू 6.5 ते 7 असावा.
योग्य वाणांची निवड
सध्याच्या हंगामात लागवड करण्यास ’सिंबा’, ’शुगरक्वीन’, ’सुपरक्वीन’, ’मेलोडी’, ’मॅक्स’, ’बाहुबली’, ’रशिका’, ’जिंगा गोल्ड’, ’ब्लॅक क्वीन’, ’सागर किंग’, ’नॉटी’ या जाती आहेत.तसेच इतरही अनेक वाण विकसित झाले आहेत. जसे की, शुगर बेबी, अर्का माणिक, अर्का ज्योती व असाही यमाटो या जातींचा वापर लागवडीसाठी केला जातो. तसेच खासगी कंपनीच्या अनेक नवनवीन जाती विकसित झाल्या असून त्यापैकी शुगरक्वीन, किरण 1, किरण 2, पूनम, ऑगस्टा यांसारख्या जातींची लागवड बर्याच प्रमाणात केली जाते. एकरी 350-400 ग्रॅम बियाणे लागतात.
लागवड पद्धत
लागवडीसाठी गादी वाफा/सारी वरंबा हा योग्य पर्याय आहे. अधिक उत्पादनांसाठी याची मदत होते. पाण्याचा निचरा होऊन पांढर्या मुळांच्या वाढीस मदत होते. गादी वाफा साधारणतः अर्धा फूट उंचीचा असावा. बेडवर लागवड करत असताना झिगझॅग पद्धतीचा अवलंब करावा.
लागवडीसाठीचे अंतर
चांगली भारी जमीन दोन सरींमधील अंतर आठ फूट दोन रोपांमधील अंतर 1.25 फूट, मध्यम जमीन 7 फूट 1.50 फूट, तर हलकी जमीन 5 फूट 1.50 फूट अंतरावर लागवड करावी. लागवड ही मल्चिंग पेपरवर केल्यास योग्य राहील. तसेच गादी वाफा/सारी वरंबा उत्तर-दक्षिण दिशेने ठेवावा म्हणजे सूर्यप्रकाश सर्व रोपांना समान प्रमाणात मिळेल व रोपांची एकसारखी संतुलित वाढ होईल.
योग्य मल्चिंग पेपरचा उपयोग
गादी वाफ्यावर ठिबक अंथरल्यावर कलिंगड लागवडीपूर्वी मल्चिंग पेपर (30 मायक्रॉन जाडीचा) अंथरावा. एकरी पेपरचे चार ते पाच रोल लागतात. रोपांची पुनर्लागवड करण्यासाठी ठिबक सिंचन लॅटरल आणि मल्चिंग पेपर अंथरल्यानंतर कलिंगड लागवडीसाठी वाफ्याच्या मध्यभागी 60 सें.मी. अंतरावर 10 सें.मी. व्यासाची छिद्रे तयार करावीत. गादी वाफा ओला करून घ्यावा. लागवड वापसा अवस्थेत करावी. रोप लावल्यानंतर कडेची माती चांगली दाबून घ्यावी. तीन दिवसांनी पाणी देऊन घ्यावे. पाणी नियमित द्यावे (जमिनीच्या पोतानुसार).
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन
पूर्वमशागत करताना जमिनीत 12 ते 14 गाड्या चांगले कुजलेले शेणखत द्यावे. गादी वाफे तयार करताना त्यामध्ये शिफारशीनुसार भूमी अमृत (अखाद्य पेंडीयुक्त सेंद्रिय खत) 100 किलो, डीएपी (18:46:00) 100 किलो, एमओपी 50 किलो, न्यूट्रिमॅगसल्फ (मॅग्नेशियम सल्फेट) 50 किलो, न्यूट्रीमिक्स ग्रेड-1 = 10 किलो, सिलअॅॅक्टिव्ह (सिलिकॉन) पाच किलो, सॉइल पॉवर-जी 10 किलो, फरटेरा चार किलो किंवा क्लोरो दाणेदार पाच किलो.
पाणी व्यवस्थापन
कलिंगडाच्या पिकाला योग्य मात्रेत व ठरलेल्या वेळी पाणी द्यावेच लागते. पाण्याची अनियमित वेळ व मात्रेमुळे फूल व फळांची गळ होऊ शकते, तसेच फळे तडकण्याचा संभव असतो. हे टाळण्यासाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाण्याची मात्रा व वेळ निश्चित करावी. फळ लागण्यास सुरुवात झाल्यास पाण्याचा ताण बसू देऊ नये. पाणी दुपारच्या वेळी देऊ नये. सुरुवातीच्या काळामध्ये पिकाची पाण्याची गरज कमी असते. पाच ते सहा दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. सकाळी 9 च्या आत पाणी द्यावे. पुढे पीकवाढीनुसार पाण्याची गरजही वाढत जाते. सुरुवातीच्या काळात पाण्याच्या पाळ्या अनियमित दिल्यास जसे की एकदम पाणी जास्त देणे, यामुळे रोपांची मुळे कुजतात, रोपांची मर होते, त्याचबरोबर नंतरच्या काळात पाण्याच्या पाळ्या अनियमित दिल्यास फूल व फळगळ होते. फळे तडकण्याचा किंवा त्यांचा आकार बदलण्याचा संभव असतो. जमिनीचा प्रकार आणि पीकवाढीचे टप्पे लक्षात घेऊन पाण्याचे योग्य नियोजन करावे. जमीन सतत वाफसा स्थितीत राहील याची काळजी घ्यावी.
अचूक (सेटिंग) व्यवस्थापन
कलिंगड हे पीक सेटिंगसाठी खूपच संवेदनशील आहे. या काळात मधमाशीचा वावर असणे आवश्यक असते. त्यासाठी मधमाशीला त्रास होईल अशी कीटकनाशके आणि बुरशीनाशके फवारणीसाठी या काळात वापरू नये. नरकळी ही मादीकळीमध्ये रूपांतरित होण्यासाठी आवश्यक वातावरण तयार होणे गरजेचे असते. मधमाशी याचे कार्य करते तसेच काही हार्मोन्सही आवश्यक असतात. त्याचा वापर गरजेनुसार कृषितज्ज्ञ व्यक्तीच्या सल्ल्यानुसार करावा.
एकात्मिक रोग आणि कीड नियंत्रण
कलिंगडावर केवडा रोग, भुरी रोग, फळमाशी, रस शोषणार्या किडींचा प्रादुर्भाव होत असतो. त्यासाठी एकात्मिक रोग व कीड व्यवस्थापनात बीज प्रक्रिया, नैसर्गिक नियंत्रण, जैविक नियंत्रण, सेंद्रिय नियंत्रण, सापळा पद्धतीने नियंत्रण, रासायनिक नियंत्रण या पद्धतींचा अवलंब केल्यास कमी खर्चात जास्त व दर्जेदार उत्पादन मिळवणे शक्य आहे. पिकामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी पिवळे चिकट सापळे एकरी 15 प्रमाणे लावले आहेत. फुलांचे फळांत रूपांतर होण्याच्या काळात फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येतो. फळमाशी फळांवर डंख मारते आणि त्याचा परिणाम फळ पक्व झाल्यानंतर दिसून येतो. त्यासाठी फळमाशीचा प्रादुर्भाव पाहून वेळीच नियंत्रणासाठी उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक असते.
काढणी व्यवस्थापन व उत्पादन
फळे लागल्यानंतर फळांचा पाण्याशी संपर्क येणार नाही, याची काळजी घ्यावी. पाण्याशी फळांचा संपर्क आल्यास फळे सडतात. फळांचा आकार गोलसर व मध्येे फुगीर तयार होऊन देठ सुकल्यानंतर बोटांच्या मागच्या बाजूने पक्व फळावर वाजवल्यावर डबडब असा आवाज येतो, तर अपक्व फळांचा टणटण असा आवाज येतो. कलिंगडाच्या देठाजवळील बाळी सुकते. साधारणपणे बियाणे लागवडीपासून जातीनिहाय 80 ते 90 दिवसांमध्ये फळे काढणीस तयार होतात. साधारणतः जातीनिहाय एकरी 30 ते 40 टन उत्पादन मिळते.
विक्री व्यवस्थापन
तयार कलिंगड उत्पादनाचे विक्री व्यवस्थापन करणे हीदेखील अतिशय महत्त्वाची बाब आहे. मार्चमधील कलिंगड लागवड ही साधारणपणे एप्रिलअखेर ते मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काढणीस तयार होते. कलिंगडांची विक्री ही पश्चिम बंगाल, दिल्ली, गुजरात आणि उत्तर प्रदेश येथील बाजारपेठेत केली जाते. व्यापारी जागेवरच मालाची खरेदी करतात.
एकूणच कलिंगड हे अत्यंत कमी कालावधीत, कमी खर्चात जास्तीत जास्त नफा मिळवून देणारे वेलवर्गातले पीक आहे. त्याला उन्हाळ्यात भरपूर मागणी असते. ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून ते थेट मे-जून महिन्यांपर्यंत विक्रीला आलेली कलिंगडे आणि त्याच्या लाल लाल फोडी रस्त्यावरून जाणार्यांना भुरळ पाडतात.
लेखक ’देवअमृत अॅग्रोटेक प्रा. लि’चे
मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.