धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथील चौधरी बंधूंनी तीन एकरांवर ड्रॅगन फ्रुटची यशस्वी लागवड केली आहे. हा जळगाव जिल्ह्यातला पहिला प्रयोग मानला जात आहे. जैन इरिगेशनच्या उच्च कृषी तंत्रज्ञानाचा व अत्याधुनिक ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करून वर्षाला एकरी तीन लाख रुपयांचे उत्पादन ते घेत आहेत.
जळगावजवळील पाळधीपासून साडेसात कि.मी. अंतरावर झुरखेडा हे एक छोटेसे गाव. येथील शेतकरी आजही पारंपरिक पद्धतीने शेती करतात; पण सुनील आणि विकास चौधरी या बंधूंनी जिल्ह्यात पहिल्यांदाच ड्रॅगन फ्रुटची लागवड केली आहे. विकास हे आयटी इंजिनीयर तसेच एम.बी.ए.पर्यंत शिकलेले आहेत. ते 2017 मध्ये जर्मनीमध्ये होते. या ठिकाणच्या मॉलमध्ये पहिल्यांदा त्यांनी ड्रॅगन फ्रुट पाहिले. किंमत विचारली असता दोन युरो म्हणजे त्या वेळचे भारतीय रुपयात सुमारे 160 रुपयांचे हे एकच फळ विकले जात होते. त्या वेळीच त्यांच्या डोक्यात ड्रॅगन फ्रुट लागवडीचा विचार आला.
दरम्यानच्या काळात ’भारत पे’मध्ये त्यांनी नोकरी केली; परंतु कोविड-19 मध्ये त्यांची नोकरी संपुष्टात आली. म्हणतात ना संकटे एकटी येत नाहीत, जणू संकटांची मालिकाच सुरू झाली. त्यातल्या त्यात महत्त्वाची गोष्ट अशी की, 2020 मध्ये त्यांचा विवाह ठरलेला होता. कोविडमुळे कमी खर्चात त्यांचा विवाह संपन्न झाला. त्यांची काही बचत (पाच-सहा लाख रुपये) शिल्लक होती. मोठे भाऊ सुनील यांना वडिलोपार्जित 40 एकर शेतीमध्ये ते मदत करू लागले. शेतीमध्ये नवे बदल घडवून आणण्यासाठी बंधूसमोर विचार मांडू लागले. यासाठी ‘खष र्ूेी छर्शींशी ईज्ञ, र्धेी ुळश्रश्र छर्शींशी ॠशीं!’ या म्हणीप्रमाणे ड्रॅगन फ्रुटबाबत विचारायला सुरुवात केली. इंटरनेटवर या फळाबाबतची इत्थंभूत माहिती करून घेतली. या फळात अधिक प्रमाणात पोषक तत्त्वे, अँटिऑक्सिडंट, फॉस्फरस व कॅल्शियमसारखी खनिजे तसेच विविध औषधी गुण आहेत. भारतामध्ये या फळाचे क्षेत्र, मागणी, निर्यात क्षमता, औषधी व पोषकमूल्य असलेले निवडुंग परिवारातील एक महत्त्वपूर्ण फळ असून फारशी देखभाल नसते. पाणीदेखील इतर फळबागेच्या तुलनेत कमी लागते.
अशातच चौधरी यांच्याकडे सर्व शेतीला पाणी देण्यासाठी एकच विहीर असून ऐन उन्हाळ्यात तीही आटून जाते. या परिस्थितीत कमी पाण्याचे एखादे पीक घ्यायचे असेल तर ड्रॅगन फ्रुटशिवाय पर्याय नाही. सुरुवातीला एक एकरात ड्रॅगन फ्रुट लावण्याचा प्रयोग करण्याचे त्यांनी ठरविले. नवख्या प्रयोगाला घरचेही विरोध करू लागले. कोविडसारख्या वाईट दिवसांमधून बाहेर पडण्यासाठी काही तरी नवीन करणे अत्यंत आवश्यक होते. त्यामुळे या फळाचा संपूर्ण अभ्यास त्यांनी करून ठेवला होता. 2021 मध्ये सुरुवातीला चुलत भाऊ सुनील धनराज चौधरी (योगायोगाने विकासच्या मोठ्या भावाचेही नाव सुनीलच आहे.) यांना सोबत घेतले. एका एकरात 500 पोल लागली. एका पोलला चार रोपे लावली. याप्रमाणे 2000 रोपांची लागवड केली.
विकास चौधरी सांगतात, सिमेंट पोल शेतात आणण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. ट्रॅक्टरने पोल आणत असताना ट्रॉली उलटली. यामध्ये 25 टक्के पोल तुटले. हताश न होता जळगावच्या मातीत नव्या फळपीक पद्धतीचा अंगीकार केला. पश्चिम बंगालमधून रोपे आणली. पैसे वाचावे म्हणून सुरुवातीला लोकल कंपनीची ठिबकची नळी टाकली. ’सस्ता रोए बार बार, महंगा रोए एक बार’ या म्हणीची प्रचीती आली. उन्हामुळे नळ्या ढिल्या पडल्या, त्यांना तडे जाऊन बर्याच ठिकाणी तुटल्या. पहिल्या वेळी अनुभव नव्हता. त्यामुळे असे झाले. यापुढे जैन इरिगेशनचे पाइप, ठिबक महाग असले तरी ते वापरायचे, हा विचार प्रत्यक्षात आणला. जैन इरिगेशनची गुणवत्तेची 16 एम.एम.ची. ठिबक सिंचन यंत्रणा बसवून घेतली. तीन वर्षे झाली, ठिबकबाबत काहीच तक्रार नाही. गुणवत्तेबाबत अत्यंत सरस ठरलेला असून इतक्या उन्हात 16 एम.एम.च्या या ठिबक सिंचनाच्या नळ्या आहेत तशा चांगल्या असून अजून कमीत कमी सात वर्षे तरी त्या सुस्थितीत राहतील. ही एकाच वेळची गुंतवणूक असली तरी परवडणारी आहे. त्यामुळे ठिबक सिंचन हे उत्तम सोल्युशन आहे.
पावसाळ्यामध्ये रोपांची लागवड झाली असेल, तर फक्त खते सोडण्यासाठी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी देण्यात येते. हिवाळा व उन्हाळा या दोन ऋतूंमध्ये नियमित अंतराने आवश्यकतेनुसार पाणी द्यावे लागते व त्या पद्धतीने नियोजन चौधरी बंधूंनी केले.
अमेरिकन ’ब्युटी’ वाण
प्रामुख्याने ड्रॅगन फ्रुटचे पाच प्रकार जगभरात लावले जातात. त्यापैकी भारतामध्ये लाल साल व पांढरा गर आणि लाल साल व लाल गर प्रकारची लागवड जास्त प्रमाणात आहे. सध्या लाल गराच्या ड्रॅगन फ्रुटला मागणी व दर जास्त मिळत आहे. विकास यांनी अमेरिकन ब्युटी या वाणाची निवड केली. 40 रुपये प्रति रोप अशा पद्धतीने पश्चिम बंगाल येथून त्यांनी रोपे आणली.
ड्रॅगन फ्रुटचे अर्थशास्त्र
या फळपिकाचे अर्थशास्त्र कसे आहे? या संदर्भात माहिती देताना विकास म्हणाले, या फळासाठी पूर्वमशागत करावी लागते. एकरी शेणखताच्या चार ट्रॉल्या टाकल्या. 10 बाय 8 या अंतरावर सिमेंटचे पोल बसवून घेतले. त्या वेळी 160 रुपयांना एक याप्रमाणे तीन एकरांत 1125 पोल उभे केले. 1 लाख 80 हजार रुपये लागले. एका पोलला चार रोपे अशी एकूण 4,500 रोपे 40 रुपये प्रति रोप याप्रमाणे 1 लाख 80 हजार रुपये लागले. टायर आणि इतर खर्च 60 हजार रुपये ही एकाच वेळी झालेली गुंतवणूक आणि साधारण ठिबक सिंचनासाठी दीड लाख रुपये इतका खर्च झाला. दर वर्षी एकरी चार ट्रॉली शेणखत, मजुरी, तोडणी, औषध फवारणी व अन्य अस्थायी खर्च होतो. असा खर्च असला तरी त्यातून पुढील 20 वर्षे ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन मिळत राहणार आहे. पहिल्या वर्षी प्रति पोल दीड किलो, दुसर्या वर्षी तीन ते साडेतीन किलो आणि तिसर्या वर्षी सहा किलोच्या वर व नंतरच्या काळात फळ उत्पादनाचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे आधुनिक काळातले चांगले उत्पादन देणारे हे ड्रॅगन फ्रुट ठरलेले आहे.
असे करावे व्यवस्थापन
विकास चौधरी म्हणाले, पावसाळ्यामध्ये लागवड केल्यानंतर नियमित पाऊस असेल, तर खते सोडण्याव्यतिरिक्त सहसा पाण्याची आवश्यकता खूप कमी लागते; परंतु हिवाळा व उन्हाळा या दोन ऋतूंमध्ये नियमित अंतराने आवश्यकतेनुसार पाणी द्यावे; परंतु पाण्याची मात्रा एकाच वेळेस खूप जास्त राहणार नाही याची दक्षता घ्यावी. योग्य वाढ झालेल्या बागेमध्ये एप्रिल व मे महिन्यांमध्ये पाण्याचा योग्य ताण दिल्याने अधिक प्रमाणात फुलधारणा होण्यास मदत होते. ड्रॅगन फ्रुटची मुळे खूप जास्त खोलवर जात नसल्याने सूक्ष्म सिंचन प्रणालीचा वापर करावा.
अशी घेतात बागेची काळजी
साधारणपणे बागांमध्ये खोड कूज (Stem rot), कँकररोग (Canker), क्षतादिरोग (अँथ्रॅक्नोज - Anthracnose) यांसारखे रोग व फळमाशीसारखे कीटक आढळून येतात. यासाठी एकात्मिक रोग व कीड व्यवस्थापन ते करतात. यामध्ये निरोगी रोपे निवडणे, छाटणीनंतर बुरशीनाशकांची फवारणी, निर्जंतुक केलेल्या कात्री वापरणे, उन्हाळ्यामध्ये झाडांचे अति उन्हापासून संरक्षण करणे, रोगनियंत्रणासाठी व फळमाशी सापळे, बागेतील वाळलेल्या गवताची योग्य विल्हेवाट लावणे व आवश्यकतेनुसार योग्य कीटकनाशकांचा वापर करणे कीड नियंत्रणासाठी फायदेशीर ठरते. ड्रॅगन फ्रुटमध्ये वाळवीचा प्रादुर्भाव काही भागांमध्ये आढळून येतो. त्याबाबतची प्रतिबंधात्मक उपाय चौधरी बंधू करत असतात.
चौधरी परिवार गुंतले ड्रॅगन फ्रुटच्या शेतीत
चौधरी परिवाराकडे वडिलोपार्जित 40 एकर शेती आहे. गजानन नारायण चौधरी हे भारत पेट्रोलियममध्ये नोकरीस होते. भाऊ सुनील गजानन चौधरी हेदेखील खासगी नोकरी करत होते. तीन वर्षांपूर्वी प्रायोगिक तत्त्वावर केलेली ही शेती यशस्वी ठरली आणि संपूर्ण चौधरी परिवार या शेतीमध्ये गुंतलेला आहे.
वर्षाला तीन लाखांचे उत्पन्न
2021 मध्ये लावलेल्या ड्रॅगन फ्रुटला 2022 साली फुले व फळे आली. पहिल्या वर्षी जून ते नोव्हेंबर असा पहिला बहर आला होता. यामध्ये प्रति झाड दीड ते दोन किलो ड्रॅगन फ्रुट लागले. त्यातून आलेल्या पैशांमधून पुन्हा बागेचे दोन एकर क्षेत्र वाढविले. आता या बागांमध्येदेखील फळे येऊ लागली आहेत. जूनपासून ऑक्टोबर- नोव्हेंबरपर्यंत ड्रॅगन फ्रुट बागेला फुले येतात. परागीकरणापासून साधारणपणे एक ते सव्वा महिन्यात फळाची वाढ पूर्ण होते. तीन वर्षांचा यशाचा आलेख विचारात घेतला असता ज्या शेतात वडील वर्षाला फक्त तीन हजार रुपये कमाई काढत होते, त्याच शेतात वर्षाला प्रयत्नांमुळे तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. विकास यांनी 2024-25 या वर्षासाठी साडेसात ते आठ टनांचे उत्पादन मिळेल असा अंदाज बांधला आहे. सध्या त्यांनी साडेतीन-चार टन उत्पादन काढले आहे. अजून अडीच महिने हंगाम सुरू असेल. एकेका झाडाला भरपूर फुले, कळ्या दिसत आहेत. नोव्हेंबरपर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण केलेले असेल, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.
ड्रॅगन फ्रुटसाठी जैन इरिगेशनचे सहकारी ग्राहक
पहिल्या वर्षी व्यापार्याकडे आपला माल न विकता त्यांनी अत्यंत ताजा माल हा संपूर्ण हंगामात बांभोरी प्लास्टिक पार्क येथील जैन इरिगेशनच्या सहकार्यांना विकला. एक एक किलोची पाकिटे बनवून दररोज दीडशे रुपये किलो याप्रमाणे सुमारे 80 किलो फळांची विक्री सुनील चौधरी करत होते. जैन इरिगेशनव्यतिरिक्त काव्यरत्नावली चौकात ते वाहनातून फळांची विक्री करत होते. या वर्षीदेखील त्यांनी याच पद्धतीने विक्री व्यवस्थापन केले आहे. किरकोळ विक्रीपेक्षा व्यापार्याला चांगल्या किमतीत त्यांनी हा माल विकलेला आहे.
स्थानिक मजुरांना रोजगार
या फळांच्या मशागतीसाठी आणि काढणीसाठी घरच्या व्यक्तींसह स्थानिक मजुरांची कामासाठी आवश्यकता असते. या परिसरातील स्थानिक मजुरांना यानिमित्ताने रोजगारदेखील उपलब्ध झालेला आहे. साधारणपणे जून ते नोव्हेंबरदरम्यान फळे काढली जातात त्या वेळी येथील लोकांना रोजगाराची संधी मिळते.
चौधरी बंधूंनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर जळगाव जिल्ह्यात ड्रॅगन फ्रुट शेतीचा पहिला यशस्वी प्रयोग करून दाखविला आहे. ही प्रेरणादायी बाब इतर शेतकर्यांना उद्युक्त करत आहे.