शरद पवारांच्या भेटी आणि त्यांचे संवाद नेहमीच राजकीय स्वार्थातूनच असतात हे वारंवार सिद्ध झाले. आजवर अशाच प्रकारचे अविश्वासार्ह राजकारण केल्यामुळे त्यांना साडेतीन जिल्ह्यांपुरतेच मर्यादित राहावे लागले आहे. देशाचे पंतप्रधान होता आले नाही. राज्यात शंभरपेक्षा जास्त जागा निवडून आणता आल्या नाहीत. आता वयाची 80 वर्षे पूर्ण केली आहेत तरी राजकीय स्वार्थ साधण्याची एकही संधी सोडत नाही.
देशात आता राजकारण निवडणुकीपुरते मर्यादित राहिले नाही. देशात घडणार्या घटनेचा वा परिस्थितीचा आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल याचे कौशल्य राजकीय व्यक्तीला हवे असते. मग त्यावर आवाज उठवणे, आंदोलन करून त्यानुसार वर्तन करणे आणि आपला राजकीय स्वार्थ साधून घेणे, हा सध्याच्या राजकारणातील शिष्टाचार झाला आहे. महाराष्ट्रातील अशा राजकारणाचे जनक शरद पवार आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पवारांचे राजकारण ना विरोधकांना समजले ना कधी त्यांच्या सहकारी पक्षांना समजले. त्यामुळे ‘एक अविश्वासू राजकीय व्यक्तिमत्त्व’ अशीच प्रतिमा पवारांची निर्माण झाली आहे.
विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. शरद पवारांनी दुसर्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. सर्वच पराभूत राजकीय पक्षांनी ईव्हीएमवर खापर फोडले; पण पवारांनी सांगितले, मी आढावा घेऊन भूमिका मांडतो. काही दिवस पवार शांत राहिले; पण ती वादळापूर्वीची शांतता होती. आतून काही तरी शिजत होते. काही दिवसांतच सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या पुण्यातील ईव्हीएमबाबतच्या उपोषणाआडून आपले ईव्हीएमविरोधातील पहिले शस्त्र त्यांनी बाहेर काढले. त्यांनाही माहीत होते, आढाव हे शस्त्र जास्त टिकणार नाही; पण थोडी फार वातावरणनिर्मिती केली गेली. त्यानंतर काही काळ ते शांत राहिले. मारकडवाडी येथील घटनेची व्याप्ती पाहून राजकारण करायला सुरुवात केली. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, असा आग्रह ग्रामस्थांनी धरला होता. त्यांच्या प्रत्यक्ष कृतीला आपला पाठिंबा दर्शवला. आपल्या राष्ट्रवादी गटाचे आमदार जानकर यांना हाताशी धरून एक कुटिल डाव रचला, ग्रामस्थांकडून आंदोलन करून घेतले. तेथील सभेला स्वत: हजर राहून ईव्हीएमविरोधात जहाल भाषण केले. त्यामुळे देशभरात ईव्हीएमवर संशय व्यक्त होऊ लागला. मराठी मीडियातूनही त्याला वारेमाप प्रसिद्धी दिल्याने आंदोलनाची दखल नॅशनल मीडियानेसुद्धा घेतली. त्यामुळे देशभरात महाराष्ट्रातील निवडणुकीत ईव्हीएमचा गैरवापर केला गेला, हे नॅरेटिव्ह पेरले गेले.
दुसरी घटना...
काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील साखर उद्योग संकटात आला आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी साखरेच्या किमान विक्री दरात तातडीने वाढ करावी, अशी मागणी केली. दुसरीकडे सभागृहात काँग्रेस व इतर मित्रपक्ष अमित शाह यांच्याडॉ. आंबेडकरांविषयी विधानाचा विपर्यास करून आंदोलन करण्यात दंग होते. त्याच वेळेत पवारांनी मोदींची भेट घेऊन मित्रपक्षालाही संभ्रमित केले. पवारांचे हे कृत्य अचंबित करणारे असले तरी अनाकलनीय मात्र नव्हते. शत्रू आणि मित्र यांना एकाच वेळी संभ्रमित करण्याची कला त्यांची फार जुनी आहे.
तिसरी घटना...
परभणी आणि बीडमधील घटना संवेदनशील आहे. या दोन्ही घटनांचा उपयोग शरद पवार राजकारणासाठी करून घेणार नाहीत तर पवार कसले. कारण बीडमध्ये राष्ट्रवादीचा खासदार हा मराठा समाजाच्या पाठिंब्यावर निवडून आला आहे, ही वस्तुस्थिती आहे. तेथे मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू आहे. त्यामुळे त्यांनी संतोष देशमुख हत्येचा घरातून निषेध वगैरे करण्यापेक्षा थेट बीड गाठले. बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांना पवारांनी सांगितले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांनी विधानसभेत, तर खासदारांनी लोकसभेत हा विषय मांडून न्यायाची मागणी केली. पवारांनी येथील ग्रामस्थांशी संवाद साधला व संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे आश्वासन दिले. पवारांनी एकंदरीत अगदी अचूक वेळ साधून भेट घेतली; पण परभणीमध्ये भेट देऊन अशा प्रकारचे अश्वासन दिले. पण आपल्या पक्षाचा आवाका आणि अनुकूलता या सगळ्याचा विचार करून त्यांनी बीडमध्ये जास्त आक्रमक झाल्याचे दिसले. पुढे बीडचे प्रकरण शांत झाले, की पवार काही दिवसांनी परभणीतसुद्धा दुसरा नॅरेटिव्ह पेरतील, असे बोलले जाते.
शरद पवारांच्या भेटी आणि त्यांचे संवाद नेहमीच राजकीय स्वार्थातूनच असतात हे वारंवार सिद्ध झाले. आजवर अशाच प्रकारचे अविश्वासार्ह राजकारण केल्यामुळे त्यांना साडेतीन जिल्ह्यांपुरतेच मर्यादित राहावे लागले आहे. देशाचे पंतप्रधान होता आले नाही. राज्यात शंभरपेक्षा जास्त जागा निवडून आणता आल्या नाहीत. आता वयाची 80 वर्षे पूर्ण केली आहेत तरी राजकीय स्वार्थ साधण्याची एकही संधी सोडत नाही.