पुस्तक महोत्सव - पुण्याची नवी ओळख

विवेक मराठी    27-Dec-2024
Total Views |
@प्रा. आनंद काटीकर
समाजमाध्यमांचा योग्य वापर, तरुणाईचा उत्तम प्रतिसाद, सर्व समाजघटकांचा सहभाग, शहरातील सर्व महत्त्वाच्या संस्थांचे योगदान आणि तत्पर व प्रामाणिक कार्यकर्त्यांची फौज या कारणांमुळे हा ‘पुणे पुस्तक महोत्सव’ यशस्वी होत आहे. ‘पुणे पुस्तक महोत्सव’ पुण्याच्या वैभवात भर घालणारा आणि ‘सांस्कृतिक राजधानी’ ही पुण्याची ओळख सार्थ ठरवेल, असा विश्वास आहे.
 
Book Festival
 
पुणे! महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, देशाला दिशा देणारे शहर, बौद्धिक-सामाजिक-साहित्यिक-सांस्कृतिक उंची असणारी व्यक्तिमत्त्वे लाभलेले शहर. अशा या पुण्यामध्ये 2023च्या डिसेंबरमध्ये ’राष्ट्रीय पुस्तक न्यास’ या भारत सरकारच्या संस्थेच्या पुढाकाराने आणि फर्ग्युसन महाविद्यालयाच्या सहकार्याने पहिला ‘पुणे पुस्तक महोत्सव’ पार पडला. या पुस्तक महोत्सवाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे या वर्षीदेखील 14 ते 22 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये ‘पुणे पुस्तक महोत्सवा’चे दुसरे पर्व नुकतेच पार पडले. या दुसर्‍या पर्वाला पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. रोज अलोट गर्दीने फर्ग्युसन महाविद्यालयाचा परिसर भरून जात होता. लोक येत होते आणि पुस्तके खरेदी करत होते. सोबतीला विविध साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी तर होतीच; पण त्याचबरोबर खाद्यजत्राही असल्यामुळे पोटपूजाही उत्तम पद्धतीने पार पडत होती. विशेषतः साहित्य संमेलनाबाबतीत गर्दी फार होत नाही, पुस्तकांची विक्रीही फार होत नाही, अशी ओरड अलीकडे कायम होताना दिसते. त्या पार्श्वभूमीवर ‘पुणे पुस्तक महोत्सवा’चे यश डोळ्यांत भरणारे आहे. या अफाट प्रतिसादाचे कारण काय, असा प्रश्न मनात उभा राहतो. त्याची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न...
 
‘पुणे पुस्तक महोत्सवा’चे वेगळेपण
 
हा खर्‍या अर्थाने संपूर्ण पुण्याचा महोत्सव झाला आहे. ‘राष्ट्रीय पुस्तक न्यासा’ने पुढाकार घेऊन फर्ग्युसन महाविद्यालयाचे सहकार्य मिळवले. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे महानगरपालिका या दोन महत्त्वाच्या संस्थांनीही यात महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. या तीन संस्थांनी पुण्याची सीमा व्यापलेली आहे. त्यामुळे या तीन संस्थांच्या पुढाकाराने हा महोत्सव सर्व पुणेकरांना आपला वाटण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडलेले आहे.
 
 
पुण्यातील विविध सामाजिक संस्थांना सोबत घेऊन पुढे जाण्याचे संयोजक राजेश पांडे यांचे धोरण या पुस्तक महोत्सवाच्या यशस्वितेसाठी मोलाचे ठरलेले आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघ, रिक्षाचालक संघ, ग्रंथालये, विविध शाळा आणि महाविद्यालये या सगळ्यांचा सक्रिय सहभाग या महोत्सवात मिळवण्यात राजेश पांडे यशस्वी ठरले. त्यामुळे गर्दीचा उच्चांक नोंदवला गेला.
‘शांतता! पुणेकर वाचत आहेत!’
 
या अभिनव उपक्रमामुळे वाचनसंस्कृती आणि पुस्तकविक्री यांचे एक अतूट नाते निर्माण झाले. मागील वर्षीदेखील पुस्तक महोत्सवापूर्वी चार दिवस असाच उपक्रम झाला होता आणि त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. दीड लाख जण त्यात सहभागी झाले होते, तर या वर्षी सुमारे साडेचार लाखांहून अधिक नागरिकांनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवला. ‘राष्ट्रीय पुस्तक न्यासा’चे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद मराठे आणि संचालक युवराज मलिक यांनी सर्व चांगल्या गोष्टींना मनापासून पाठिंबा दिला.
 
Book Festival 
 
सर्व वयोगटांचा समावेश
 
या वेळी खास आयोजित केलेल्या बालचित्रपट महोत्सवामुळे तर खूपच मजा आली. हा प्रयोग मुलांना मनापासून आवडला आणि शिक्षकांनीसुद्धा अतिशय सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. जागतिक कीर्तीचे छोटे छोटे माहितीपट आणि चित्रपट यामुळे मुलांचे विश्व विस्तारले. पुस्तक महोत्सवाला प्रत्येक वयोगटातील व्यक्ती यावी आणि त्या व्यक्तीला आपला वेळ सत्कारणी लागला, असे वाटावे, अशा पद्धतीने कार्यक्रमांची रचना होती. यामध्ये अभिराम भडकमकर यांनी लिहिलेल्या ’इन्शाल्ला’ या नाटकाचे अभिवाचन, विविध कवींनी लिहिलेल्या कवितांच्या सादरीकरणाचा कार्यक्रम, शालेय मुलांसाठी गोष्टी सांगणे, विविध कृती करून घेणे तसेच चित्रकला, हस्तकला इत्यादी विविध उपक्रम, विविध पुस्तकांचे प्रकाशन, लेखकाची भेट, संगीताच्या तालावर थिरकणार्‍या तरुणाईसाठी विविध बँड, फोक आख्यान ह्या लोकसाहित्याचे अप्रतिम सादरीकरण करणारा कार्यक्रम आणि शेवटचे तीन दिवस बौद्धिक मेजवानी देणारा साहित्य महोत्सव (लिट-फेस्ट) या सगळ्यांमुळे वय वर्षे दोनपासून वय वर्षे 80 पर्यंत सर्व वयोगटांतील माणसांना हा महोत्सव आपला वाटला. लिट-फेस्टमध्ये शिव खेरा, अक्षत गुप्ता, हरीश भिमानी, गोविंद ढोलकिया, चंद्रप्रकाश द्विवेदी, अरुणा ढेरे, प्रकाश खांडगे, वैशाली करमरकर, दीपक करंजीकर, सदानंद मोरे, विनय सहस्रबुद्धे, इंद्रजित भालेराव, सदानंद देशमुख, श्रीकांत उमरीकर, विश्वास पाटील अशी इंग्लिश-हिंदी-मराठीतील मान्यवर लेखक मंडळी यात सहभागी होती.
 
 
 
टीम वर्क
 
हे सांघिक काम होते. एका 60 जणांच्या मोठ्या गटाने हे सगळे नियोजन केले आणि सुरळीत पार पडले. त्यामागे शेकडो स्वयंसेवक आणि व्यवस्थापकांच्या हजारो हातांचे योगदान होते. पाणी, स्वच्छता, कार्यक्रम, व्यासपीठ, सांस्कृतिक कार्यक्रम, शालेय वयोगटासाठी विविध खेळ, पुस्तक प्रकाशने, उभारणी, कार्यालय, शासकीय परवानग्या, भोजन कक्ष असे अनेक खातेप्रमुख कार्यरत होते. त्यांच्या सातत्यपूर्ण कार्यामुळे हा गोवर्धन सहज उचलला गेला.
 
Book Festival 
 
उत्कृष्ट व्यवस्था
 
विनाकारण भाषणबाजी नसणारे कार्यक्रम ही पण या उत्सवाची खासियत. उद्घाटनाला मुख्यमंत्री येऊनही केवळ सवा तासात संपलेला उद्घाटनाचा कार्यक्रम आणि समारोपाला दोन मंत्री आणि रघुनाथ माशेलकरांसारखा शास्त्रज्ञ असूनही तासाभरात संपलेला कार्यक्रम, ही त्याची अतिशय उत्तम उदाहरणे आहेत. लोक आपल्या सोईनुसार संपूर्ण परिसर फिरत. त्यांना आवडतील ती पुस्तके घेत. बाजूला असणार्‍या खाद्यजत्रेचा आस्वाद घेत आनंदी होऊन जात. त्यामुळे सर्वांच्याच बौद्धिक भुकेला योग्य तो प्रतिसाद देणारा आणि चालना देणारा हा उत्सव ठरला. संपूर्ण परिसरात गालिचे पसरलेले असल्यामुळे कुठेही धुळीचे लोट नव्हते. पुस्तकांच्या भव्य विक्रीकेंद्रांमध्ये पंखे होते. त्यामुळेही या पुस्तकांच्या सान्निध्यात राहणे आनंददायक होते.
 
शालेय विद्यार्थ्यांसाठी खास
 
71 शाळा-महाविद्यालयांतील 3658 विद्यार्थ्यांनी खास सहलीद्वारे या पुस्तक महोत्सवाला भेट दिली. पुस्तक महोत्सवाला भेट दिलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक पुस्तक मोफत देण्यात आले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शालेय विद्यार्थ्यांच्या कल्पनांना गोष्टीरूप देऊन त्याचे पुस्तकही तयार करण्यात आले आणि अखेरच्या दिवशी त्याचे प्रकाशनही करण्यात आले. ‘पुस्तकवारी’ या नावाने रोज एक दैनिक निघत राहिले आणि त्यात विविध उपक्रमांची नियमित नोंद घेण्यात आली.
 
 
विशेष दालने
 
अहिल्यादेवींच्या जन्माची त्रिशताब्दी साधून फर्ग्युसन महाविद्यालयाच्या इतिहास विभागाने साकारलेले विशेष दालन, वंदे मातरम् या राष्ट्रगीताच्या निर्मितीची दीडशे वर्षे झाल्याबद्दल मिलिंद सबनीस यांनी परिश्रमपूर्वक तयार केलेले विशेष दालन, भारतीय संविधानाची 75 वर्षे झाल्याबद्दल सर्वांना पाहण्यास ठेवलेली मूळ संविधानाची प्रत आणि मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे फर्ग्युसन महाविद्यालयाचा मराठी विभाग आणि मराठी अभ्यास परिषदेने अभ्यासपूर्ण रीतीने मांडणी केलेले विशेष दालन, ही चार आकर्षणे या पुस्तक महोत्सवात होती आणि हजारो लोकांनी या दालनांना भेट देऊन आपल्या माहितीत अनमोल भर घातली.
 
Book Festival 
 
कल्पक नियोजन
 
राजेश पांडे यांनी आपल्या कल्पकतेने पुणे महानगरातील सर्व जणांना हा उत्सव आपला वाटावा यासाठी प्रयत्न केले. पुस्तक महोत्सवाची घोषणा होण्यापूर्वी चार महिने समाजातील विविध व्यक्ती आणि संस्थांचा सहभाग मिळवण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले.उद्घाटनाच्या दिवशी निघालेली, 101 महाविद्यालयांचा उत्साहपूर्ण सहभाग असणारी ग्रंथदिंडी हेदेखील महत्त्वाचे आकर्षण ठरले. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या संपूर्ण परिसरात विविध वेगवेगळ्या आरेखनांनी साकारलेली शिल्पे लावलेली होती, त्यामध्ये वाचन करणार्‍या आकृत्या, पु.ल. देशपांडे, झाडांच्या फांद्यावर लटकलेली पुस्तके होती, तर विविध ठिकाणी केलेली पुस्तकरूपी आकर्षक बाकांची रचनाही सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. विविध पुस्तकांनी साकारलेले भारतीय संविधानाच्या पुस्तकाचे पुस्तक शिल्प हा जागतिक विक्रम हेदेखील या उत्सवाचे एक वेगळेपण ठरले. पुणे श्रमिक पत्रकार संघाने लावलेले बातमीसोबतच्या छायाचित्रांचे प्रदर्शनही लोकांना आवडले.
 
विश्वविक्रमाचा मान
 
या पुस्तक महोत्सवातही काही विश्वविक्रम करण्यात आले. त्यामध्ये पुस्तकांनी साकारलेले सरस्वती यंत्र, एकाच लेखकांनी लिहिलेली 481 पुस्तके एकाच दालनात उपलब्ध असणे, पुस्तकांनी साकारलेले संविधानाच्या मूळ प्रतीचे मुखपृष्ठ, अकरा लाखांहून अधिक पुस्तकांच्या मुखपृष्ठांचा ऑनलाइन अल्बम हे चार विश्वविक्रम झाले.
 
ही सगळी वैशिष्ट्ये कायम ठेवून ’पुणे पुस्तक महोत्सव’ पुण्याच्या वैभवात भर घालेल आणि ’सांस्कृतिक राजधानी’ ही पुण्याची ओळख सार्थ ठरवेल, असा विश्वास आहे. विश्वास पाटील या सुप्रसिद्ध लेखकांच्या मते, पन्नास वर्षांनंतर पाठ्यपुस्तकात मुलांना पुण्यामध्ये ‘महापुस्तक उत्सव’ कोणी सुरू केला? असा प्रश्न हमखास विचारला जाईल. ‘राष्ट्रीय पुस्तक न्यासा’चे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे आणि संचालक युवराज मलिक यांनी राजेश पांडे आणि मंडळींना मनापासून साथ दिली, त्यामुळेच तर पाच-दहा नव्हे, तर 35 ते 40 कोटींच्या ग्रंथविक्रीचा पल्ला या महोत्सवाने गाठला.
 
 
थोडक्यात, समाजमाध्यमांचा योग्य वापर, तरुणाईचा उत्तम प्रतिसाद, सर्व समाजघटकांचा सहभाग, शहरातील सर्व महत्त्वाच्या संस्थांचे योगदान आणि तत्पर व प्रामाणिक कार्यकर्त्यांची फौज या कारणांमुळे हा पुस्तक महोत्सव यशस्वी झाला. यापुढेदेखील या पुस्तक महोत्सवाच्या आधारे पुणे शहर आपली नवीन ओळख जपत राहील आणि आपल्या शिरपेचात नवनवीन रत्ने खोचत जाईल याची खात्री वाटते.
 
लेखक फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे मराठी विभागाचे प्राध्यापक आहेत.