@वसन्त वाहोकार
8007731505
ज्येष्ठ कथाकार, कादंबरीकार सुप्रिया अय्यर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांची ग्रंथसंपदा बरीच मोठी आहे. ‘खुळी बोगनवेल’, ‘सोन्याचे दरवाजे’, ‘किनखापी मोर’; वर्हाडीत ‘सनान्र्ेऽऽ बोंद्य्रा’ हे कथासंग्रह गाजले होते. ‘चांदणचुरा’ आणि ‘काही शुभ्र कमळें’ ही ललित-स्तंभलेखनाची पुस्तके आहेत. ‘सा. विवेक’च्या दिवाळी अंकात त्यांनी लेखन केले होते. अनेक वाङ्मयीन पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा लेख..
दुर्दैव काय असू शकते? मला सुप्रिया अनंत अय्यर या लेखिकेबद्दल गौरवपर लेखन करायचे होते. त्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होतील आणि त्या गौरव ग्रंथात मी त्यांच्यावर लिहिले असेल, असे आमचे स्वप्न होते. अ. भा. नाही तर अन्य कोणत्याही संमेलनाचे अध्यक्षपद आपल्याकडे चालत यावे, अशी त्यांची मनोमन अपेक्षा होती. महामंडळ असो किंवा इतर अधिकारी संस्था मनमानी करतात, ही तक्रार होती. असे मानाचे अध्यक्षपद मिळण्याआधीच त्या न परतीच्या प्रवासाला निघून गेल्या; जेमतेम एखादा महिना दुर्धर आजारात घालवून...
दुर्दैव अजून, ’अभिव्यक्ती’ संस्थेसाठी जो कार्यक्रम त्यांनी निश्चित केला, अशोक नायगावकर यांना पाचारण केले, त्या कार्यक्रमालाही त्यांना अध्यक्ष या नात्याने खुर्चीत बसता आले नाही. आजाराचे निदान झाले. हॉस्पिटलमध्ये आयसोलेशनमध्ये जावे लागले आणि मग संपलेच सारे. आणि आता मला हे लिहिणे मनावर घ्यावे लागत आहे. क्रूर लेखन- मृत्युलेख.
आम्ही कौटुंबिक मित्र होतो. या मित्रमंडपाचे ‘तरुण भारत नागपूर’चे संपादक वामनराव तेलंग हे मुख्य स्तंभ होतेे. साहित्य - साहित्य व्यवहार - लेखन - वाचन - कथा-कादंबरी यातून आमची मैत्री झाली आणि मग ते कुटुंब झाले. एकमेकांचे आनंद - सुखदुःख - महत्त्वाचे प्रसंग यांचे साक्षीदार आणि वाटेकरी होत राहिलो. दीर्घ आजारात त्यांचे पती, आमचे मित्र अनंतराव गेले. मग कोरोनात अकस्मात तेलंंगसाहेबांनी ’राम’ म्हटला. वामनराव हे सुप्रियासाठी मार्गदर्शक आणि मित्र होते. अधिकाराचे नाते होते ते. वामनराव यांच्यानंतर स्वाभाविक अलिखित अशी ती रिश्तेदारी माझ्याकडे आली. मी माझ्यापरीने ती निभावली. आता इथे ती संपली. अशा ऐन वेळी आम्ही गावापासून- नागपूरपासून फार लांब असणे हेदेखील करंटेपणच.
विदर्भात ‘नागपूर तरुण भारत’चे वेगळे - वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. अग्रलेख आणि प्रासंगिक लेख, विविध स्तंभ यांचे वाचक भक्त आहेत. अन्य वृत्तपत्रांनाही ‘नागपूर तरुण भारत’चा तो अधिकार माहीत आहे, मान्य आहे. त्यांच्या ’मध्यमा’ या बुधवार पुरवणीत, एक वाचकांची प्रचंड लोकप्रियता लाभलेला स्तंभ होता. त्यात सुप्रिया अय्यर ही ’वर्हाडी’ लेखिका कथा लिहीत होती. ’बंडी उलार झाली’ ही ती कथा. विनोदी लेखन होते ते आणि ती त्यांची ओळख. त्यातून त्यांचे निवेदन आणि कथाकथन सुरू झाले. ते अतिशय लोकप्रिय झाले. गावोगावी साहित्य संमेलनांची आमंत्रणे येत राहिली. त्या वाचकप्रिय ठरल्या.
ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर सिरास संपादक होते. ’वामन प्रभू’ ही लेखकद्वय मराठी लेखक आणि वाचकांशी परिचित होते. त्यातले वामन म्हणजे वामन तेलंग हे ’तरुण भारत’ची साहित्यसंपदा असलेली ’विविध विषय विभाग’ या रविवार पुरवणीचे संपादन करीत होते. तेलंग आणि अय्यर यांच्या परिचयाची ती सुरुवात. मग त्यांच्या कथा ’विविध विषय विभाग’मध्ये आणि नंतर दिवाळी अंकातही नियमित येत राहिल्या. ती या लेखिकेची वेगळी आणि स्वतंत्र ओळख. विनोदी लेखिका आता गंभीर-कुटुंब-नातेसंबंधी- विशेषत: आरोग्य आणि स्त्री व्यथा-वेदनांना शब्द देणारी लेखिका म्हणून नावारूपास येत राहिली. तिथून पुढे वामन तेलंग हे मार्गदर्शक, परखड चिकित्सक - संपादक - कठोर मित्र अशा विविध नात्यांनी सुप्रिया अय्यर यांनी स्वीकारले.
सुप्रिया शासकीय नोकरीत होती. ’मेडिको सोशल वर्कर’. कौन्सिलर म्हणून अन्यत्र जात-येत होती. ते तिचे अनुभव फार वेगळे, नेहमीपेक्षा दुर्लक्षित आणि उपेक्षित होते. विशेषतः स्त्रियांचे आरोग्य, समस्या, घुसमट आणि सामाजिक चौकटीतून बाहेर पडण्याची पराकाष्ठा असे विविध स्तरांतले, समाजातले. ‘ते सारे लिहा. कथेत येऊ द्या’ असे बजावत तेलंगांनी त्यांना कथालेखनास प्रवृत्त केले, लिहून घेतले, छापले आणि ते लोकांसमोर-वाचकांसमोर आणले. वेगळ्या विशेष क्षेत्राची ओळख दिली आणि नंतर, ’आता इथे पुरे. बाहेर पडा... इतरांकडे लिहा... मोठे अवकाश तुमची वाट पाहते आहे’ म्हणून तिथून मोकळे केले. विदर्भाची लेखिका मग महाराष्ट्राची होत राहिली. तिला कथेसाठी मागणी येऊ लागली. ‘साप्ताहिक विवेक’सह अनेक दिवाळी अंकांमध्ये कथा प्रकाशित होऊ लागल्या. संपादकांना त्या कथांचे वेगळेपण जाणवत राहिले. ’आशा बगे थोर कथालेखिका आहेत. तशी कथा लिहिणे जमायचे नाही. त्या आदर्श आहेत’ हे अनेकदा ती बोलून दाखवत असे. ’मौज’कडे मात्र सुप्रियाची कथा कधी गेली नाही... कारण माहीत नाही. त्यावर आम्ही कधी फार बोललो नाही. वाचकप्रियता आणि संपादकमित्रांच्या मर्जीखातर तिने स्तंभलेखन केले आणि त्याची पुस्तकेही झाली.
या लेखिकेची ग्रंथसंपदा बरीच आहे. ’खुळी बोगनवेल’, ’सोन्याचे दरवाजे’, ’किनखापी मोर’; वर्हाडीत ’सनान्र्ेऽऽ बोंद्य्रा’ हे कथासंग्रह मला माहीत आहेत. ’चांदणचुरा’ आणि ’काही शुभ्र कमळें’ ही ललित-स्तंभलेखनाची पुस्तके आहेत. त्यांना विदर्भ साहित्य संघ आणि अन्य वाङ्मयीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ’गगनजुई’ हे त्यांच्या नव्या घराचे नाव, हे त्यांच्या स्तंभाचे नाव होते. कादंबर्या म्हणजे ’शुद्ध वेदनांची गाणी’, ’कन्याकोलम’ आणि ’अजन्मा’. त्यांना अनेक वाचक लाभले.
मराठी साहित्य व्यवहारातील साचलेपण, कंपूशाही आणि राजकारण याविषयी त्यांना तीव्र नाराजी होती, ठसठस होती. राज्य साहित्य संस्कृती मंडळ, पुरस्कार समितीवर त्या सदस्य म्हणूनही कार्यरत होत्या. स्थानिक संस्थेत कवयित्री सुलभा हेर्लेकरांचेदुःखद निधन झाले आणि विदर्भ-महाराष्ट्रात सुविख्यात अशा महिला संस्थेचे- ’अभिव्यक्ती’चे अध्यक्षपद चालून आले तेव्हा त्यांनी ते स्वीकारले. कारभार हाती घेतला आणि सगळ्यांची मने राखत पुढे नेला. विविध कार्यक्रमांचे नियोजन - आयोजन केले. सगळ्यात विशेष हे की, संस्था आर्थिक बाजूने पुढे नेत सक्षम केली. भरपूर आर्थिक पाठबळ मिळवले. शासनाचे आर्थिक योगदान प्राप्त केले. हे सारे आपल्या नावलौकिकावर केले. लेखिका म्हणून जी प्रतिमा होती, त्या भरवशावर मराठी माणसांना साद घातली, आपलेसे केले. गेल्या 2022 मधील ’अभिव्यक्ती लेखिका संमेलन’ त्याची साक्ष आहे. भव्य जरी नसले तरी लक्षवेधी हे आयोजन होते. लेखिका संपादक मोनिका गजेंद्रगडकर आणि ज्येष्ठ कवयित्री नीरजा या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होत्या. आज नागपुरात दोन्ही मराठी साहित्य संस्था- ‘विदर्भ साहित्य संघ’ आणि ’अभिव्यक्ती’ मानाचा तुरा लेवून विराजमान आहेत. ’अभिव्यक्ती’ला सुप्रियामुळे उंची प्राप्त झाली आहे, हे नि:संशय.
जबर इच्छाशक्ती, प्रचंड आत्मविश्वास आणि लेखननिष्ठा असणारी ही लेखिका नंतर हरली, पराभूत झाली. ’मी थकते, माझ्याने होत नाही, उत्साह वाटत नाही, आता तब्येत साथ देत नाही’ अशी कुरकुर वाढत चालली होती. काही शस्त्रक्रिया, काही आजार, व्याधी असे वर्षानुवर्षे साहत देह शिणून गेला होता. लेखिका संमेलनानंतर गुढघे बदलले. ‘आता मी ठणठणीत आहे. मै सीधे चल सकती हूं. ताठ उभी राहीन. देखो’ म्हणत. नेहमीच्या ग्रुपमध्ये प्रभात फेरी, टपरीवरचे खाणे, चहा होई. आम्ही हिंदी-इंग्रजी संवाद करीत असू. त्या अन्यत्र, संस्थांमध्ये पाहुण्या, व्याख्याता म्हणून, अतिथी म्हणून जाऊ लागल्या होत्या. माझ्या घरच्या समारंभात आवर्जून उपस्थित राहून सारखी चेष्टामस्करी करीत होत्या. सारे आनंदात सुरू होते. नवे संकल्प, पुस्तकांचे प्रकाशन, प्रकाशकांशी बोलणी असे सारेच. विशेष म्हणजे आमच्या कुटुंबातली ठरलेली दुपार. अंगतपंगत. भोजन संवाद. परंतु? नियतीने डाव साधला. आकाश कवेत घेणारी ही पक्षिणी मुक्त झाली.
’गगनजुई’ची थरथर सुरू आहे आता.