वंचित महिलांची ‘आरोह’मार्गी अर्थसमृद्धी

विवेक मराठी    28-Dec-2024
Total Views |
@चारुदत्त कहू  9922946774
 
नागपुरातील ‘आरोह’ ही स्वयंसेवी संस्था आणि या संस्थेचा ‘रंगरेषा’ हा सामाजिक उपक्रम खरोखर आगळावेगळा म्हणायला हवा. वंचित महिलांना अर्थसमृद्ध करण्याचा आणि त्यांच्यासाठी उपजीविकेचा शाश्वत मार्ग शोधून त्यांना दिशा देण्याचा ‘आरोह’ मार्ग म्हणूनच अनुकरणीय ठरावा.
NGO AROHA
 
वंचित महिलांच्या उत्थानाच्या बाता बरेच जण मारताना दिसतात. राजकीय पक्षांचे नेते महिला सक्षमीकरणाबाबत सातत्याने बोलत असतात. अनेक तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये महिलांच्या अर्थसमृद्धीबाबत बोलण्याची चढाओढ दिसते; पण प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात जाऊन, परिस्थितीचा अभ्यास करून, वंचित महिलांची गरज लक्षात घेऊन त्यांना उन्नत करण्याचे काम किती संघटना आणि व्यक्ती करीत असतील, याबाबत न बोललेलेच बरे! नागपुरातील ‘आरोह’ ही स्वयंसेवी संस्था आणि या संस्थेचा ‘रंगरेषा’ हा सामाजिक उपक्रम मात्र याहून आगळा म्हणायला हवा. वंचित महिलांना अर्थसमृद्ध करण्याचा आणि त्यांच्यासाठी उपजीविकेचा शाश्वत मार्ग शोधून, त्यांना दिशा देण्याचा ‘आरोह’ मार्ग म्हणूनच अनुकरणीय ठरावा. या संस्थांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून अनेक वंचित महिलांनी निरंतर अर्थार्जन केल्याने आज त्या सक्षम पावले टाकत कुटुंबाचा आधार झाल्या आहेत. रोजगारांच्या अत्यल्प संधी असलेल्या विदर्भातील मेळघाट आणि गडचिरोलीसारख्या आदिवासी पट्ट्यांमधील या महिलांचा आणि त्यांना आधार देणार्‍या रंगरेषेचा ‘आरोह’ म्हणूनच आसमंतात निनादत आहे.
 
 
नागपूरस्थित विशाखा राव-जठार आणि शर्मिष्ठा गांधी या दोन कॉर्पोरेट सल्लागारांना महाराष्ट्रातील गरीब आदिवासी महिलांच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर, त्या महिलांना सन्मानाचे जीवन जगण्यास मदत करण्याची प्रेरणा मिळाली आणि 2004 मध्ये या उपक्रमांची सुरुवात झाली. पूर्वीची कुठलीही ओळख नसलेल्या या दोघी एका कार्यशाळेच्या निमित्ताने एकत्र आल्या आणि समविचारांच्या अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून त्यांनी हा मार्ग निवडला. गडचिरोलीतील कोरची ब्लॉगमधील आदिवासी महिलांमध्ये कामाला सुरुवात झाली. हातसडीचा तांदूळ हे या संस्थेचे पहिले प्रॉडक्ट. पांढर्‍या तांदळातून सर्व सत्त्व निघून जाते, त्यामुळे सत्त्वयुक्त हातसडीच्या तांदळाचे ‘अरण्यक’ या नावाने ब्रँडिंग करून तो बाजारात आणला गेला. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. ही संकल्पना डॉ. उदय बोधनकर आणि जयश्री पेंढरकर यांनी उचलून धरली.
 
NGO AROHA 
 
ग्रामीण आणि शहरी झोपडपट्ट्यांमधील आर्थिकदृष्ट्या वंचित बहुतांश महिलांकडे योग्य कौशल्ये नसतात, त्यामुळे त्यांना सन्मानाचे जीवन जगता येत नाही. व्यावसायिक प्रशिक्षण दिले आणि त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळवून दिली, तर त्या आपल्या कुटुंबाचा आधार बनू शकतील, ही बाब मी आणि शर्मिष्ठा गांधी यांनी अभ्यासाअंती ओळखली, असे विशाखा राव-जठार यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ‘आरोह’ने हीच बाब ध्यानात घेऊन स्थापनेपासूनच विविध व्यवसायांमध्ये कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याचा धडाका लावला. काही क्षेत्रांमध्ये ‘आरोह’च्या व्यावसायिक हस्तक्षेपाने या महिलांकडे असलेल्या पारंपरिक कौशल्यांना बळकटी मिळाली आणि त्यांची उत्पादने विक्रीयोग्य पातळीवर आणली गेली. ज्या महिलांकडे अथवा समूहांकडे पारंपरिक कौशल्ये नाहीत, अशांना मूलभूत स्तरापासून प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आणि आज त्यातील अनेक महिला कुशल कारागिरांच्या मांदियाळीत येऊन बसल्या, हे ‘आरोह’चे यशच म्हणायला हवे.
 
 
विशाखा राव-जठार सांगतात, या महिलांना रोजगारासाठी आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रोत्साहित करणे, हे अत्यंत जिकिरीचे काम आहे. महिलांना नवीन कौशल्ये शिकवण्यासाठी फॅब्रिकआधारित उत्पादनांच्या प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित केले. महिलांना हॅण्डमेड पेपर, सुती कापड, ज्यूट आणि नैसर्गिक तंतूंपासून तयार होणार्‍या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. मूलभूत आणि प्रगत टेलरिंग, भरतकाम, स्क्रीन प्रिंटिंग, पारंपरिक ब्लॉक प्रिंटिंग यातून भारतीय संस्कृती जतन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. रंगरेषा उपक्रमात महिला घर सांभाळून फावल्या वेळेत काम करीत आहेत आणि कुटुंबालाही हातभार लावत आहेत. महिलांना कामगार बनविणे, हा संस्थेचा हेतू नाही. कौशल्य प्रशिक्षण, डिजिटल मार्केटिंग, झूम मीटिंग आणि क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून स्त्री सक्षमीकरणाचे काम संस्थेने हाती घेतले आहे. संस्थेची तीन प्रशिक्षण केंद्रे असून, त्याद्वारे आजवर 24 हजारांहून अधिक महिलांच्या जीवनात बदल घडून आल्याचा अनुभव आहे. रंगरेषाच्या माध्यमातून शाश्वतता, परंपरा आणि संवर्धनाची सांगड घालण्यात आलेली आहे. आज जागतिक दर्जाला पुरून उरतील अशा फाइल्स, फोल्डर्स, बॅग,पर्सेस, होम डेकोर, बेबी वेअर, स्कूल युनिफॉर्म, रंगीबेरंगी आकर्षक आकाशदिवे अशी 85 उत्पादने संस्थेद्वारे बाजारात आणली गेली आहेत. सध्या 300 महिला संस्थेच्या कामातून आपापल्या कुटुंबाची आर्थिक बाजू सावरत आहेत.
 
NGO AROHA
 
2007 मध्ये ‘आरोह’ने पर्यावरणाच्या क्षेत्रात पाऊल टाकले. विशाखाताई मूळच्या कोकणातील असल्याने त्यांची निसर्गाशी जवळीक होतीच आणि केवळ चळवळीत काम केल्याने हाती काहीच लागत नाही, याचेही भान आले होते. त्यातूनच शाळकरी विद्यार्थी आणि संस्थांसोबत जैवविविधता वाढवण्यास प्रारंभ केला. मुलांना झाडे लावण्यास प्रोत्साहित केले. त्यांच्यासाठी ‘ग्रीन फिंगर अ‍ॅवॉर्ड’ सुरू केला. तब्बल 10 वर्षे हा उपक्रम राबविला. महापालिकेच्या शाळांसह कर्णबधिर शाळेत छोटेखानी उद्यानांची निर्मिती केली. अनेकदा अडचणी आल्या; पण त्यावर मात केली. या उपक्रमांना एचसीएल फाऊंडेशन आणि ओसीडब्ल्यू या कंपन्यांची साथ मिळाली आहे.
 
 
नागपूरच्या ट्रिपलआयटीमध्ये 18 एकर जागेत शहरी जंगल विकसित करण्याचा प्रकल्प संस्थेला मिळाला आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपल्याला तापमानवाढीचा सामना करावा लागत आहे. वाहनांमुळे प्रदूषणही वाढले आहे. तसेच जमिनीत पाणी न मुरण्याची समस्याही भेडसावतच आहे. या समस्या ध्यानात घेऊन ट्रिपलआयटीच्या ओसाड जागेत पाच तळी, दोन हजार चौरस फुटांत मियावाकी (जपानी भाषेनुसार अतिशय घनदाट अरण्य), फुलपाखरू उद्यान आणि ज्ञानकेंद्राची स्थापना केली आहे. शहरी जंगलाचा हा प्रकल्प इतका यशस्वी झाला की, येथे अनेक पक्षी दूरदुरून निवासाला यायला लागले आणि त्यांना एक कायमचा अधिवास मिळाला. वातावरणनिर्मितीमुळे कुठूनसे एक कासवही तेथे प्रकट झाले. हा प्रकल्प इतका यशस्वी झाला की, त्याचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीपर्यंतचे विद्यार्थी येत आहेत.
 
 
NGO AROHA
 
संस्थेचे प्रतिबंधात्मक आरोग्यसेवांवरदेखील लक्ष केंद्रित
 
नवजात शिशू आणि मातांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे आणि त्यांना कपडे वितरित करण्याची एक मोहीम संस्थेने सामाजिक जबाबदारीपोटी हाती घेतली आहे. ‘बाळंतविडा’ या प्रकल्पाची सुरुवात संस्थेच्या विश्वस्त अलका जोग यांच्या पुढाकाराने झाली. याअंतर्गत आदिवासी महिला आणि त्यांच्या नवजात शिशूंना कपडेवाटप केले जाते. अतिशय गरिबीमुळे आदिवासी महिलांकडे कपडेच उपलब्ध नसतात, स्वेटर्स असणे ही तर दूरची बात. त्यांची ही निकड लक्षात घेऊन आजवर स्वेटर्स, ब्लँकेट, पंचा, आईचे गाऊन, बाळांच्या लंगोटी अशा 26 कपड्यांचा समावेश असलेले 3500 बाळंतविड्यांचे संच प्रकाश आमटे यांचा हेमलकसा प्रकल्प, सतीश गोगुलवार यांच्या ’आम्ही आमच्या आरोग्यासाठी’, डॉ. आशीष सातव यांचा महान प्रकल्प आणि डॉ. राणी व डॉ. अभय बंग यांच्या सर्च संस्थेमार्फत वितरित केले गेले आहेत. एका संचाचा खर्च 1500 रुपये येतो, त्यासाठी संस्थेतर्फे देणगी स्वीकारली जाते. अनेकांनी आपल्या प्रियजनांच्या स्मृतीप्रीत्यर्थ अशा दानासाठी पुढाकार घेतला आहे.
 
 
संस्थेने विकसित केलेल्या संकेतस्थळामार्फतही (www.rangresha.com) रंगरेषा या ब्रँडच्या उत्पादनांची मागणी नोंदविता येते. कोविडकाळात संस्थेतर्फे प्रशिक्षित एका महिलेने तब्बल 50 हजार मास्क शिवले आणि तिच्या नवर्‍याने बाजारात जाऊन त्याची विक्री केली. महिला सक्षमीकरणाच्या आमच्या प्रयत्नांना यापेक्षा वेगळी पावती काय मिळू शकते, असा प्रश्न विशाखाताईंनी उपस्थित केला. कोविडकाळात संस्थेने ट्रेनर्स आणि मास्टर ट्रेनर्सद्वारे प्रशिक्षित महिलांकडून पीपीई किटदेखील शिवून घेतल्या आणि त्यांच्याकडे विविध रुग्णालये आणि सरकारी संस्थांकडून आलेल्या मागण्यांची पूर्तता केली. संस्थेने मागणीनुसार ‘वर्धिनी’ आणि ‘अरण्यक’ हे ब्रँड विकसित करून देण्याचे कामही यशस्वीपणे केले आहे. या सर्व कामांत उच्चशिक्षित संचालक मंडळाचाही हातभार लागत आहे. महिला सशक्तीकरण, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्यरक्षणाच्या या कार्याची दखल घेऊन विविध सामाजिक संस्थांनी संस्थेच्या उभय संस्थापिकांना विविध पुरस्कारांनी सन्मानितही केले आहे. आपणही या संस्थेच्या कार्यात हातभार लावून त्यांच्या यशात आपला खारीचा वाटा उचलू या!
 
संपर्क : शर्मिष्ठा गांधी
9096019086
मुख्य कार्यकारी अधिकारी, संस्थापक विश्वस्त सदस्य.