महाराष्ट्र आता थांबणार नाही!

06 Dec 2024 17:48:23
आर्य चाणक्याने वर्णन केलेला ‘विचक्षण’ राजनेता प्रत्यक्षात पाहायचा असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच पाहावे लागते. ही फडणवीसांची अंगभूत कलाच आहे. पाच वर्षांपूर्वी युतीला बहुमत मिळूनही उद्धव ठाकरे यांच्या विश्वासघातकी काव्यामुळे मुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पडण्याऐवजी अनपेक्षितपणे विरोधी पक्षनेत्याच्या आसनावर फडणवीस यांना बसावे लागले. अडीच वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीसच एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रीपदावर बसतील असे वारे वाहत असताना अनपेक्षितपणे त्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले; पण या घटनांनी फडणवीस डगमगले नाहीत. त्यांनी केवळ वर्तमानकाळ घडविण्यावर भर दिला, वेळप्रसंगी बोचरी टीका आणि थिल्लर शेरेबाजी व कुचाळक्या ऐकूनही धीरोदात्तपणे त्यांची वाटचाल सुरूच राहिली. महाविजय हाच या वाटचालीचा शेवटचा नव्हे तर महत्त्वाचा थांबा त्यांनी गाठला व दमदारपणे आश्वासक वाक्य उच्चारले - ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही!’
 
devendra fadnavis
 
तिसर्‍यांदा मुख्यमंत्रीपदी आरूढ झालेल्या देवेंद्र फडणवीसांनी ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही!’ अशी घोषणा करून आपल्या नवीन पर्वाची सुरुवात केली आहे, त्यामुळे या सरकारला गतिमान वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ही वाटचाल कशी होणार आहे, याबद्दल अनेक जण तर्कलढवीत आहेत आणि प्रत्येकाचे तर्क त्यांच्या-त्यांच्या स्वभावधर्माला अनुसरूनच असणार आहेत. येथे सहजच आर्य चाणक्यांचे एक सूत्र आठवते- ‘नैकं चक्रं परिभ्रमयति।’ केवळ एकाच चाकावर रथ चालू शकत नाही. याचा अर्थ हाच की, हे महायुतीचे सरकार असून सहमती आणि सहकार्याच्या बळावरच आता महाराष्ट्राची जोमदार वाटचाल सुरू राहणार आहे. महाशपथविधीच्या कार्यक्रमातून महाराष्ट्राला हेच दिसून आले आहे. कोणाकोणाचे शपथविधी होणार, या विषयावर धुके जमा होत असताना प्रत्यक्ष कार्यक्रमात मात्र महायुतीची महाशक्ती दिसून आली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली व सर्व शंकासुरांचे समाधान करीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुळात हे कसे घडून आले? याचे उत्तरही आर्य चाणक्याच्या ‘नीतिसूत्रा’त दडलेले आहे. आर्य चाणक्य सांगतात -
 
गतं शोको न कर्तव्य भविष्यतो नैव चिन्तयेत।
वर्तमानेन कालेन प्रवर्तन्ते विचक्षणा:॥
 
म्हणजेच जे घडून गेले आहे त्याचा शोक करू नये आणि भविष्यात काय होईल याची चिंता करत बसू नये, कारण बुद्धिमान मनुष्य वर्तमानकाळासोबतच वाटचाल करीत असतो. घडलेल्या गोष्टींवर अवास्तव शोक करत बसू नये आणि भविष्यात घडू पाहणार्‍या गोष्टीने भयभीत होऊ नये. आपण वर्तमानकाळ घडविण्यावर भर दिला तर आपोआपच भविष्य आकाराला येते. हे सूत्रच देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सर्व विरोधक यांच्यातील भेदाची ठळक रेषा आहे. लोकसभेच्या पराभवाने देवेंद्र अंतर्मुख झाले; पण हादरले नाहीत. उलट त्यांनी वर्तमानकाळाचे भान राखत योग्य ती पावले उचलण्यावर भर दिला आणि त्यातून महायुतीच्या अभूतपूर्व विजयाचे सुंदर भविष्य साकारले.
 
 
आर्य चाणक्याने वर्णन केलेला ‘विचक्षण’ राजनेता प्रत्यक्षात पाहायचा असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच पाहावे लागते. ही फडणवीसांची अंगभूत कलाच आहे. पाच वर्षांपूर्वी युतीला बहुमत मिळूनही उद्धव ठाकरे यांच्या विश्वासघातकी काव्यामुळे मुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पडण्याऐवजी अनपेक्षितपणे विरोधी पक्षनेत्याच्या आसनावर फडणवीस यांना बसावे लागले. अडीच वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीसच एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रीपदावर बसतील असे वारे वाहत असताना अनपेक्षितपणे त्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले; पण या घटनांनी फडणवीस डगमगले नाहीत. त्यांनी केवळ वर्तमानकाळ घडविण्यावर भर दिला, वेळप्रसंगी बोचरी टीका आणि थिल्लर शेरेबाजी व कुचाळक्या ऐकूनही धीरोदात्तपणे त्यांची वाटचाल सुरूच राहिली. महाविजय हाच या वाटचालीचा शेवटचा नव्हे तर महत्त्वाचा थांबा त्यांनी गाठला व दमदारपणे आश्वासक वाक्य उच्चारले - ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही!’ विरोधकांचा घातपातही महाराष्ट्राचा प्रगतिरथ आता थांबवू शकणार नाही, कारण अजूनही देवेंद्र फडणवीस यांच्या वाटचालीचे मर्म जाणून त्यांचे सूत्र विरोधकांना आपलेसे करावेसे वाटत नाही. आपल्या नाकर्तेपणाने ओढवलेल्या अपयशाचे खापर ईव्हीएम आणि पर्यायाने निवडणूक आयोगावर फोडून त्यांचे अरण्यरुदन थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. पराजयाचे सुतक असल्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी स्वत: दूरभाष करूनही त्यांच्या आमंत्रणाचा अनादर करून विरोधकांनी शपथविधी समारंभापासून कोसो दूर राहणेच पसंत केले. हा केवळ महायुतीचा अवमान नव्हे, तर ज्या जनमानसाने हे स्थिर सरकार आणण्याचा चंग बांधून मतदान केले, त्या जनभावनेचाच अनादर होय. फडणवीसांनी मोठे मन दाखवून विरोधकांना क्षमा केली तरी जनमानस मात्र या लोकांना क्षमा करणार नाही; पण ‘बुडत्याचा पाय खोलात’ ही उक्ती खरी करण्याचे ज्यांनी ठरविले असेल त्यांना कोणीही वाचवू शकत नाहीत.
 
 
या महाशपथविधीला विविध राज्यांचे मुख्यमंत्री, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री आणि दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. हा केवळ एका राज्याच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी होता; पण जनतेने दाखविलेला विश्वास आणि मतपेटीतून भरभरून व्यक्त केलेले प्रेम याबद्दल आदरभाव व्यक्त करण्यासाठी त्यांनी नम्रभावाने मान झुकवून जनसागराला दंडवत घातले. लोकनेता असतो तो असा... आणि तोच आदर्श समोर ठेवून वाटचाल करणारे देवेंद्र फडणवीस या लोकादराला पात्र झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या एकाच कृतीने या शपथविधी सोहळ्याचे कौतुकसोहळ्यात रूपांतर झाले. लोकशाहीत जनता हीच सर्वोच्च आहे, हे पंतप्रधानांनी त्यांचेच खरोखर कौतुक करून कृतीने दर्शवून दिले. त्यांचा कित्ता गिरवीत देशभर जल्लोषाचे वातावरण असताना कर्तव्यभावनेने देवेंद्र यांनी जनतेला पूर्णपणे ग्वाही दिली आहे - ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही!’
 
देवेंद्रजी, ज्या जनसेवकासोबत जनता विश्वासाने वाटचाल करत असते, तो प्रवास कधीच थांबू शकत नाही. आपल्या या कर्तृत्वशाली वाटचालीला पुनश्च खूप खूप शुभेच्छा!!
 
‘शुभास्ते पंथान: सन्तु।’
Powered By Sangraha 9.0