चिरतरुण बहुरूपी

विवेक मराठी    10-Feb-2024
Total Views |
ASHOK SARAF
 
@धनंजय कुरणे - 9325290079
अशोक सराफ यांचा चेहरा गेली जवळजवळ छप्पन्न वर्षं रसिकांसमोर आहे, तरीही ’अतिपरिचयात अवज्ञा’ न होण्याचं एकमेव कारण म्हणजे सतत काहीतरी वेगळं करण्याचा त्यांचा ध्यास. एका चित्रपटविषयक मासिकाच्या मुखपृष्ठावर अशोक सराफ यांचा फोटो होता आणि त्याखाली लिहिलेली ओळ होती, ‘याला कोणत्याही भूमिकेत टाका आणि त्या भूमिकेचं सोनं झालं म्हणून समजा!’ अशोकमामांच्या प्रत्येक चित्रपटागणिक वरील वाक्य शब्दश: खरं असल्याची प्रचिती येत राहते. या बहुरूपी ‘चिरतरुण’ अभिनेत्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सरकारने त्यांचा केलेला गौरव यथोचितच आहे.
 
सुमारे पंचेचाळीस वर्षांपूर्वीची एक अगदी छोटी आठवण माझ्या मनावर कायमची कोरली गेली आहे. माझं वय तेव्हा अवघं दहा -अकरा वर्षांचं होतं. एका नातेवाइकांकडे आम्ही गेलो होतो. तिथे टेबलावर एक चित्रपटविषयक मासिक ठेवलेलं होतं. त्याच्या मुखपृष्ठावर एका नटाचा फोटो छापलेला होता आणि फोटोखाली लिहिलं होतं, ’अशोक सराफ.. याला कोणत्याही भूमिकेत टाका आणि त्या भूमिकेचं सोनं झालं म्हणून समजा!’ त्या वेळी मी अशोक सराफ यांचा एकही चित्रपट पाहिलेला नव्हता. पण तो फोटो आणि ते वाक्य कायमचं स्मरणात राहिलं.
 
 
नंतरच्या चार दशकांत अशोक सराफ अभिनित अनेक चित्रपट पाहिले आणि लहानपणी केवळ योगायोगाने वाचलेलं ’ते’ वाक्य शब्दश: खरं असल्याची प्रचिती त्यांच्या प्रत्येक चित्रपटागणिक येत राहिली.
 
 
अशोक सराफ यांची जनमानसात आज असलेली प्रतिमा, प्रामुख्याने मराठी चित्रपटातील त्यांच्या प्रवासाने घडवली आहे. त्यामुळेच त्यांच्या अभिनययात्रेचा श्रीगणेशा संगीत नाटकातून झाला आहे, यावर चटकन विश्वास बसत नाही. त्यांच्या जीवनात ’मामा’ या सर्वनामाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज चित्रपट उद्योगात ’अशोकमामा’ या टोपणनावाने ते प्रसिद्ध आहेत. अनेक कलाकार अशोकमामांना अभिनयातले गुरू मानतात आणि गमतीची गोष्ट म्हणजे या ’मामांचे’ अभिनयातले गुरूदेखील त्यांचे सख्खे ’मामा’च होते. ’गोपीनाथ सावकार’ हे त्यांचं नाव! त्यांची स्वत:ची नाट्यकंपनी होती. घरातच नाट्यकंपनी असल्याने अभिनयाच्या टॉनिकवरच अशोक सराफ यांचं पोषण झालं. ’मी एकलव्याप्रमाणे मामांच्या प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करत असे’ असं अशोक सराफ यांनी लिहून ठेवलेलं आहे. पुढे स्वत:च्या अंगभूत गुणवत्तेला परिश्रमाची आणि कल्पकतेची जोड देऊन त्यांनी अभिनय क्षेत्रात फार मोठी उंची गाठली.
 
 
संगीत नाटकाकडून ते लवकरच व्यावसायिक नाटकाकडे आले. ’एक होता शिंपी’ या नाटकातून त्यांनी नव्या प्रकारचा फार्स रंगभूमीला प्रदान केला. पूर्वी संवाद व प्रसंग यावर विनोदाचा भर असायचा. पण अशोक सराफ यांनी या नाटकातून, प्रचलित विनोदाला ’देहबोली’ची जोड देऊन ’वाचिक व शारीर’ असा परिपूर्ण फार्स स्टेजवर आणला.
 
 
संवादाचं ’टायमिंग व प्लेसिंग’ या दोन्हीची उपजत देणगी त्यांना लाभली असावी. ’टायमिंग’ म्हणजे दुसर्‍या पात्राच्या संवादानंतर अथवा मध्येच आपला संवाद चालू करायचा क्षण अचूक साधणं! आणि ’प्लेसिंग’ म्हणजे संवादाची परिणामकारक फेक व त्यातली सर्वोत्तम लय!
 
 
एका नाटकातील त्यांच्या एका विशिष्ट वाक्याला हमखास हशा मिळत असे. काही दिवसांनी त्यांनी याच वाक्याचं प्लेसिंग वेगळ्या पद्धतीने केलं आणि वाक्याचे तीन भाग करून एका हशाच्या ठिकाणी तीन हशे मिळवायला सुरुवात केली. ही समज कुठल्याही अ‍ॅक्टिंग स्कूलमधून मिळत नाही, ती नैसर्गिकच असावी लागते.
 
ASHOK SARAF 
 
’पांडू हवालदार’ हा त्यांचा गाजलेला पहिला चित्रपट! त्याआधीही त्यांनी दोन चित्रपटांत भूमिका केल्या होत्या. पण स्वत:चाच अभिनय आवडला नाही, म्हणून त्यांनी चार वर्षं विचार करण्यात घालवली आणि 1975 साली ’पांडू हवालदार’मधून धमाकेदार पुनरागमन केलं. ’राम राम गंगाराम’मधील त्यांची ’म्हमद्या’ची भूमिका विलक्षण लोकप्रिय झाली. यानंतर अशोक सराफ मराठी चित्रपटसृष्टीचे ’स्टार’ झाले.
 
 
’गोंधळात गोंधळ’ या चित्रपटामुळे ते नायक म्हणून प्रस्थापित झाले. ’एक डाव भुताचा’मधल्या त्यांच्या ‘प्रेमळ’ भुताने संपूर्ण चित्रपटभर प्रेक्षकांना हसवलं आणि शेवटच्या दृश्यात याच प्रेक्षकांना अक्षरश: रडवलं. नायक झाले, तरी खलनायकाची भूमिका स्वीकारायला त्यांनी नकार दिला नाही. ’अरे संसार संसार’मध्ये त्यांनी साकारलेला दुष्ट सावकार हा संस्मरणीय खलनायकांपैकी एक आहे. स्टार झाल्यावरही त्यांनी आपल्या भूमिकेच्या लांबीचा कधीच विचार केला नाही व अनेकदा छोट्या भूमिकाही स्वीकारल्या. ’अष्टविनायक’मध्ये, शेवटच्या आठ कडव्यांच्या गाण्यातल्या अवघ्या एका कडव्यापुरती भूमिकाही त्यांनी स्वीकारली आणि या एका मिनिटातही आपल्या अभिनयसामर्थ्याची झलक दाखवली. ऐंशीच्या दशकात वर्षाला तेरा-चौदा चित्रपट करण्याएवढे ते व्यग्र झाले. अधूनमधून हिंदीतही त्यांची मुशाफिरी चालू राहिली. मराठी-हिंदी मिळून सुमारे 240 चित्रपट त्यांच्या नावावर जमा आहेत. अभिनय करताना काही स्वयंस्फूर्त जागा ते घेत असत, पण नेहमीच दिग्दर्शकाच्या अनुमतीने! ’धुमधडाका’मधला ’वाख्खा विख्खी वुख्खू’ हा सुप्रसिद्ध खोकला ही अशोकमामांचीच कल्पना!
 
 
अनेक समकालीन अभिनेत्यांबरोबर त्यांचं समीकरण उत्तम जुळलं. ’डार्लिंग डार्लिंग’ या नाटकात त्यांचे आदर्श असलेल्या राजा गोसावी यांच्यासह, तर चित्रपटात निळू फुले, रंजना, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन अशा सहकार्‍यांसह त्यांची केमिस्ट्री अतिशय सुरेख जमली. अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे हे दोघे जबरदस्त क्षमतेचे विनोदवीर! ही जोडी म्हणजे कुरघोडी न करता परस्परपूरक विनोदनिर्मिती कशी करावी याचं उत्तम उदाहरण! निरनिराळ्या काळातल्या अनेक सहकार्‍यांबरोबर असं ट्युनिंग जुळणं हे यशाची हवा डोक्यात न गेल्याचंच द्योतक आहे.
 
 
’हम पांच’ या दीर्घ हिंदी मालिकेमुळे अशोक सराफ देशाच्या घराघरात जाऊन पोहोचले. ’सिंघम’ चित्रपटात नायक व खलनायक यांच्या व्यक्तिरेखा फारच प्रभावी आहेत, तरी त्यातला अशोकमामांचा हेड कॉन्स्टेबल सर्वांच्या लक्षात राहतो.
 
 
अशोक सराफ यांचा चेहरा गेली जवळजवळ छप्पन्न वर्षं रसिकांसमोर आहे, तरीही ’अतिपरिचयात अवज्ञा’ न होण्याचं एकमेव कारण म्हणजे सतत काहीतरी वेगळं करण्याचा त्यांचा ध्यास!
 
 
दिग्दर्शक राजदत्त यांनी त्यांच्या या यशाचं गमक नेमकेपणाने सांगितलं आहे - “अशोक विनोदी भूमिका करतानाही त्या व्यक्तिरेखेची वेदना अधोरेखित करतो. आपल्या भूमिकेला असलेले पदर उलगडून दाखवत असतो. एक अस्सल अनुभव देत असतो!”
 
 
म्हणूनच हा बहुरूपी ’चिरतरुण’ आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सरकारने त्यांचा केलेला गौरव यथोचितच आहे.
 
 
अशोक सराफ यांचं मन:पूर्वक अभिनंदन!