संघमय रामभाऊ

विवेक मराठी    16-Feb-2024
Total Views |
संघ हेच रामभाऊ बोंडाळे यांचे जीवन होते. त्यांनी स्वत:ला संघकार्याला समर्पित केले होते. आयुष्यभर प्रचारक म्हणून काम करता करता ते पूर्णपणे संघमय झाले होते. त्यांना स्वत:चे वेगळे अस्तित्व राहिले नव्हते. ‘असु अम्ही सुखाने पत्थर पायातील’ हा त्यांचा मनोमन भाव होता आणि इदं न ममं ही जाणीव होती. अशा रामभाऊंना विनम्र श्रद्धांजली.
 
rss
 
@प्रा. रवींद्र भुसारी
 
आमचे गाव चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी. माझा जन्म तिथलाच. रामभाऊंच्या प्रचारक जीवनाचा प्रारंभ ब्रह्मपुरीपासूनच. माझे आजोबा डॉ. भास्करराव भुसारी हे संघाचे तालुका संघचालक असल्यामुळे प्रचारकांचा निवास आमच्या घरी असे. त्यामुळे रामभाऊ ब्रह्मपुरीला असले की आमच्या घरी निवास करत असत. माझा जन्म 1957चा. त्या वेळी रामभाऊ जिल्हा प्रचारक होते. माझी आई एकदा सांगत होती, “तू पाळण्यात असताना रामभाऊ घरी आले, त्यांच्याजवळ तुला दिले.” मला वाटते की, ती माझी रामभाऊंची पहिली भेट होती. परवा दि. 9 फेब्रुवारी 2024 रोजी नागपूरमध्ये संघकार्यालयात मी त्यांच्या खोलीत गेलो. रामभाऊ पहुडले होते. मी “रामभाऊ..” असा आवाज दिला. त्यांनी डोळे उघडून पाहिले. इतका प्रदीर्घ 65 वर्षांचा सहवास दि. 11 फेब्रुवारी रोजी संपला.
 
 
जवळपास 1947 ते 1982पर्यंत रामभाऊ चंद्रपूर विभागात प्रचारक राहिले. 1982 ते 1986 या कालावधीत ते अकोला विभाग प्रचारक होते. मी अकोला जिल्हा प्रचारक होतो. त्या वेळची एक आठवण. एका तालुकास्थानी रक्षाबंधन उत्सवाचा कार्यक्रम होता. रामभाऊ वक्ता होते. संघात बौद्धिक वर्गापूर्वी वैयक्तिक गीत होत असते, अशी प्रथा आहे. त्या स्थानी कोणी गीतगायक नव्हता व कोणी गीत म्हणण्यास तयार नव्हते. रामभाऊंनी सांगितले, “गीताशिवाय मी बौद्धिक देणार नाही.” सगळ्यांचीच पंचाईत झाली. जिल्हा प्रचारक या नात्याने मी तिथे उपस्थित होतो. माझा आवाज गळ्यातून निघण्याऐवजी नरड्यातून निघतो, असे वाटते. रामभाऊंनी गीत गाण्यास मला सांगितले. प्रसंगाची आवश्यकता म्हणून मी वैयक्तिक गीत म्हटले. बहुधा ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद म्हणवल्याची प्रचिती सर्वांना आली असेल!
 
 
पुढे 1994पासून डॉ. हेडगेवार भवन, महाल, नागपूर हे रामभाऊंचे व माझे मुख्यालय झाले. तेव्हापासून आजपर्यंतच्या काळातील रामभाऊंच्या आठवणीने हृदय भरून येते, कंठ दाटून येतो, लेखणी अवरुद्ध होते. कुणी म्हणतात रामभाऊ मितव्ययी होते. पण रामभाऊ मुळात व्यय करीतच नसत. त्यामुळे त्यांच्या बाबतीत मित हा शब्द अयोग्य ठरतो.
 
रामभाऊंना महाल कार्यालयातून धरमपेठमध्ये एका कार्यकर्त्याच्या भेटीला जायचे होते. बसने जायचे असल्याने त्यांनी कार्यालय प्रमुखाकडे पन्नास रुपये मागितले. त्याने दिलेही. एक कार्यकर्ता तिथे उभा होता. तो रामभाऊंना म्हणाला, “मला तिकडेच जायचे आहे, तुम्हाला सोडतो.” त्याच्यासोबत रामभाऊ गेले. संबंधित कार्यकर्त्याच्या घरी जाऊन काम झाल्यावर रामभाऊ निघणार, तर त्याने “तुम्हाला कोठे जायचे आहे?” अशी विचारणा केली. रामभाऊंनी कार्यालयात, असे उत्तर दिले. त्यावर त्याने “मी तुम्हाला सोडतो” असे सांगितले. “तुला उगाच चक्कर पडेल आणि तुझा वेळही जाईल” असे सांगून रामभाऊंनी त्याला नकार दिला. त्याने ऑटोरिक्षा बोलावली, रामभाऊंना त्यात बसविले आणि ऑटोरिक्षा चालकाला शंभरची नोट दिली. “उरलेले पैसे यांच्याकडे द्या” म्हणून रिक्षाचालकाला सांगितले. ऐंशी रुपये बिल झाले, त्याने 20 रुपये रामभाऊंना दिले. कार्यालयात आल्यावर रामभाऊंनी कार्यालय प्रमुखाला पन्नास रुपये परत दिले आणि वरून वीस रुपये दिले. सर्व कथा सांगितली आणि संबंधितांना भेटल्यावर वीस रुपये परत द्यावेत, हेही सांगण्यास ते विसरले नाहीत.
 
rss 
 
कार्यालयात रामभाऊंना भेटण्यास कोणी येत असे. शेवटच्या काही वर्षांत त्यांना विस्मरण होत असे. एकदम नाव-गाव आठवत नसे. पण सुहास्य वदनाने त्याचे स्वागत करत. केव्हा आलात? अशी विचारणा करत. चहाच्या वेळी चहा-नाश्ता, तर भोजनाच्या वेळी भोजन करण्याचा आग्रह करीत असत. हा नेम शेवटपर्यंत होता.
 
 
रामभाऊंना विस्मरण होत असे, पण भवतालाची जाण पक्की होती. पहिला प्रसंग - आम्ही आठ-दहा जण गप्पा मारत होतो, रामभाऊ ऐकत होते. एका वाक्यावर रामभाऊंनी काही प्रतिक्रिया दिली नाही. रामभाऊ शांत होते. त्यावर तो कार्यकर्ता गंमतीने म्हणाला, “रामभाऊ मौन तपस्वी आहेत.” रामभाऊंनी लगेचच उत्तर दिले, “मी मौन जरूर आहे, पण तपस्वी नाही!”
दुसरा प्रसंग मागील वर्षी 2023चा. त्यांचा वाढदिवस होता. ते 99व्या वर्षात पदार्पण करणार होते. पूजनीय सरसंघचालक कार्यालयात होते. चहानंतर सगळ्यांनी एकत्र यावे व रामभाऊंना अभीष्टचिंतन करावे, असे ठरले. मध्येच कोणी रामभाऊंच्या खोलीत गेले आणि सांगितले, “चला रामभाऊ, आज तुमचा वाढदिवस साजरा करायचा आहे.” रामभाऊंनी विचारले, “संघात प्रचारकाचा वाढदिवस साजरा करण्याची प्रथा केव्हा सुरू झाली?” त्यांनी येण्यास स्पष्ट नकार दिला. नंतर कार्यालय प्रमुखाने सर्व खुलासा केला की आपण कार्यालय निवासी सगळ्यांनी पू. सरसंघचालकांसोबत बसावयाचे आहे. सर्व जण सभागृहात आले. पूजनीय सरसंघचालकांनी रामभाऊंना शाल-श्रीफळ दिले व सर्वांनी अभिवादन केले.
 
 
पू. सरसंघचालकांनी ते पाच वर्षांचे असताना रामभाऊंनी त्यांना डॉ. हेडगेवार यांचा फोटो दाखवून डॉक्टरांची माहिती दिली, याची रोचक आठवण सांगितली. रामभाऊ चांगले गीतगायक असल्यामुळे त्यांना एक गीत गाण्याचा आग्रहही केला. वयाच्या 99व्या वर्षी व संघ शताब्दीला एक वर्ष बाकी असताना रामभाऊंनी कंठस्थ गीत म्हटले..
 
असु अम्ही सुखाने पत्थर पायातील
 
मंदिर उभविणे हेच आमुचे शील
 
 
भागवत कुटुंबाशी रामभाऊंचा सत्तर वर्षांपेक्षा अधिक काळाचा ऋणानुबंध होता. 1948 ते 1982 अशी 34 वर्षे चंद्रपूर हे रामभाऊंचे मुख्यालय होते. पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजींचे आजोबा स्व. नानासाहेब भागवत हे चंद्रपूर जिल्हा संघचालक होते, त्या वेळी रामभाऊ जिल्हा प्रचारक होते. नंतर वडील डॉ. मधुकरराव हे विभाग संघचालक होते, त्या वेळी रामभाऊ विभाग प्रचारक होते. त्या वेळी भागवत कुटुंबामध्ये अनेकदा रामभाऊंचा निवास असे. डॉ. मोहनजींच्या आई मालतीबाई या रामभाऊंना रक्षाबंधनाला राखी बांधत आणि भाऊबीजेला ओवाळत असत. असे भावा-बहिणीचे नाते होते.
 
 
कोरोना काळातील एक प्रसंग आहे. मोहनजींचे धाकटे बंधू डॉ. रवींद्र भागवत यांना नातू झाला. भागवतांची पाचवी पिढी पाहावी, अशी रामभाऊंची खूप इच्छा झाली. त्यांनी मोहनजींना ती बोलून दाखविली व म्हणाले की, “तुम्ही जेव्हा जाल, तेव्हा मी सोबत येईन.” मा. मोहनजींनी मला बोलाविले व हे सर्व सांगून म्हणाले, “तू रामभाऊंना घेऊन जा. डॉ. चिन्मयचा मुलगा चि. युवांश याला रामभाऊंनी पाहिले की, भागवतांच्या पाचव्या पिढीचा आणि रामभाऊंचा ऋणानुबंध जुळेल.” रामभाऊंना घेऊन चंद्रपूरला भागवतांच्या घरी गेलो. दोन दिवस मुक्काम झाला आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. रामभाऊंच्या निधनाची वार्ता कळताच मा. मोहनजींची लहान बहीण लिहिते - आमच्या घरातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती दुरावली. लहानपणापासूनच आई-बाबांबरोबरच घरात रामभाऊसुद्धा असायचे. भागवत कुटुंबीय आणि रामभाऊंचा एक घट्ट बंध होता.
 
 
पू. श्रीगुरुजींच्या जन्मशताब्दीपूर्वी ‘समग्र श्रीगुरुजी, 12 खंड’ प्रकाशित करण्याचे ठरले. त्याची जबाबदारी स्व. रंगा हरिजी यांच्यावर सोपविली. त्यांच्या टीममध्ये रामभाऊ होते. कार्य पूर्ण झाल्यावर सर्व टीम संघकार्यालयात गोळा झाली. हरिजींनी आपल्या संबोधनात कार्य कसे घडले याची माहिती दिली. त्यात रामभाऊंचे वर्णन करताना ते म्हणाले, “घरात मंगलकार्य असते, त्या वेळी आजी जशी योग्य वस्तू अचूक वेळी आपल्याला काढून देते, तशी या सर्व कार्यात रामभाऊंची भूमिका होती.”
 
बोंडाळे कुटुंब हे कोकणातील देवगड येथील. तेथे त्यांची वडिलोपार्जित शेती, आंब्याच्या बागा होत्या. रामभाऊंना तीन भाऊ. वीस वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. रामभाऊंच्या मोठ्या भावाने त्यांना पत्र लिहिले की, आता आपल्या वडिलोपार्जित संपत्तीचे वाटप करावे आणि आपण त्यात उपस्थित राहावे. निर्लेप रामभाऊंनी त्यांना कळविले की, संघ बैठका आणि अन्य कामामुळे मला येता येणार नाही. मी प्रचारक आहे व त्यामुळे मला याची आवश्यकता नाही. आपण जे कराल ते मला मान्य आहे.
 
 
तीन भाऊ जमले. कुटुंबात पुढे कोणी शेती करणार नाही, म्हणून जमीन विकली व आलेल्या पैशाचे चार समान भाग केले. एका भागाच्या रकमेचा चेक आणि सोबत एक पत्र नागपूरला रामभाऊंना पाठवून दिले. रामभाऊंनी त्या वेळी लाखोंचा असलेला चेक प्रांत प्रचारकांच्या स्वाधीन केला. ते म्हणाले, “मी नाही म्हणालो, तरी भावांनी चेक पाठविला. मी संघ प्रचारक असल्याने यावर संघाचा हक्क आहे.” प्रांत प्रचारकांनी विचारले की, “या रकमेचे काय करायचे?” रामभाऊ म्हणाले, “आपण प्रांत प्रचारक आहात, आपण ठरवावे.” त्या रकमेचे काय केले विचारणे दूर, रामभाऊंनी पुन्हा त्या विषयाचा साधा उच्चारही केला नाही. धन्य ते रामभाऊ आणि धन्य ते बोंडाळे घराणे!
 
 
अयोध्या येथे श्रीरामजन्मस्थानी उभारलेल्या भव्य मंदिरात दि. 22 जानेवारी रोजी बालकरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. रामभाऊंनी टीव्हीसमोर बसून तो पूर्ण सोहळा पाहिला. त्या वेळी त्यांच्या चेहर्‍यावर समाधान आणि आनंद काही वेगळेच होते. संघ हेच त्यांचे जीवन होते. त्यांनी स्वत:ला संघकार्याला समर्पित केले होते. आयुष्यभर प्रचारक म्हणून काम करता करता ते पूर्णपणे संघमय झाले होते. त्यांना स्वत:चे वेगळे अस्तित्व राहिले नव्हते. त्यामुळे त्यांनी कधी धनसंचय केला नाही आणि रिक्षाच्या भाड्यातून उरलेले वीस रुपये असो किंवा वडलोपार्जित संपत्तीचा मिळालेला लाखो रुपयांचा वाटा असो, सर्व काही संघाला अर्पण केले. श्रीगुरुजींपासून मा. मोहनजींपर्यंत सर्व सरसंघचालकांबरोबर कार्य करण्याचे भाग्य रामभाऊंना लाभले. संघाच्या सर्वच वरिष्ठ पदाधिकार्‍यांशी त्यांचा वैयक्तिक परिचय आणि स्नेहभाव होता. पण त्याचाही ते कधी उल्लेख करत नसत. ‘असु अम्ही सुखाने पत्थर पायातील’ हा त्यांचा मनोमन भाव होता आणि इदं न ममं ही जाणीव होती. रामभाऊंना विनम्र श्रद्धांजली.