संघ जगणारा चित्रतपस्वी

विवेक मराठी    16-Feb-2024   
Total Views |
जीवनमूल्यांशी, संघनिष्ठेशी सहजपणे बांधील राहत चित्रपटसृष्टीत स्वकर्तृत्वाची ठसठशीत मोहोर उमटवणारे राजदत्तजी हे खर्‍या अर्थाने चित्रतपस्वी. स्वयंसेवक म्हणून ओळख कायम ठेवून या चित्रनगरीत वावरता येतं, नुसतं वावरताच येत नाही, तर यशस्वीही होता येतं. नुसतंच आकडेवारीतून दिसणारं यश मिळतं असं नाही तर आपल्या कलाकृतींचा जनमानसावर अमीट ठसा उमटवता येतो.
 
rss
 
ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांना नुकताच पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला. दत्ताजी संघनिष्ठ. संघदृष्ट्या तृतीय वर्ष प्रशिक्षित. प्रत्यक्ष संघकार्यात थेट सहभागी झालेले. आजही त्यांचं स्वयंसेवकत्व अबाधित आहे. चित्रपटाच्या दुनियेत वावरतानाही ते राखता येतं, हे त्यांनी जगण्यातून समोर ठेवलं. संघाचे स्वयंसेवक मनोरंजनाच्या दुनियेपासून लांब असतात, त्यांना या क्षेत्राचं वावडं आहे अशा अनेक आख्यायिकांना छेद देणारी दत्ताजींची कारकिर्द आहे.
 
संघविचारांच्या सोबतीने आणि स्वयंसेवक म्हणून ओळख कायम ठेवून या दुनियेत वावरता येतं, नुसतं वावरताच येत नाही, तर यशस्वीही होता येतं. नुसतंच आकडेवारीतून दिसणारं यश मिळतं असं नाही, तर आपल्या कलाकृतींचा जनमानसावर अमीट ठसा उमटवता येतो याचा वस्तुपाठ दत्ताजींनी आपल्या जगण्यातून समोर ठेवला. मुळात ते या दुनियेत आले तेही संघश्रेष्ठींना पूर्वकल्पना देऊन, त्यांची रीतसर परवानगी घेऊन. परवानगी देणार्‍यानेही ती नाइलाजास्तव दिली नाही, तर “यात परवानगी मागायची गरज काय? संघस्वयंसेवकाला जीवनाचं कोणतंही क्षेत्र वर्ज्य नाही. त्याच्या मनाचा कौल असेल त्या क्षेत्रात जाऊन त्याने आपलं कर्तृत्व सिद्ध करावं. मात्र हे करताना त्याने आपलं संघस्वयंसेवकत्वही जपावं” असं लेखी कळवून आप्पाजी जोशी यांनी जणू त्यांच्या चित्रपटसृष्टीतल्या प्रवेशाला शुभाशीर्वादच दिले. पत्राचा मजकूर आप्पाजींचा आणि त्यांच्या वतीने लिहिलं, माननीय बाळासाहेब देवरस यांनी. या आशीर्वादाच्या-सदिच्छांच्या साथीने दत्ताजींनी या क्षेत्रात प्रवेश केला. मनाजोगतं काम करत, स्वत:ची ओळख तयार करत असतानाही संघश्रेष्ठींनी केलेल्या उपदेशाचा त्यांनी स्वत:ला कधीही विसर पडू दिला नाही.
 
चित्रपटाच्या मोहमयी दुनियेत वावरतानाही संघ जपता येतो, संघ जगता येतो हे त्यांनी समोर ठेवलं. संघस्वयंसेवकाला या कलेचं वावडं असतं हा गैरसमज असल्याचं सिद्ध केलं. अभिव्यक्तीच्या दर्जाशी, आशयाशी आणि विचार देण्याच्या उद्देशाशी तडजोड न करता, कोणत्याही विचारधारेच्या सहकलाकारांबरोबर, तंत्रज्ञांबरोबर ते सहजतेने काम करू शकले. आपल्या व्रतस्थ जगण्यातून सर्वांच्या मनात आदराचं स्थान निर्माण करू शकले.
 
आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी तीसहून अधिक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. त्यातल्या एकवीसहून अधिक चित्रपटांवर राष्ट्रीय पुरस्कारांची मोहोर उमटली. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी त्यांना सोळाहून अधिक वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. चित्रपटांबरोबरच आठवणीत जपून ठेवाव्यात अशा दूरचित्रमालिका त्यांनी दिग्दर्शित केल्या. चित्रपटातलं विषयवैविध्य मालिकांच्या जगातही जपलं.
 
मनोरंजन ही माणसाची गरज आहे आणि प्रबोधनाचं एक सशक्त माध्यमही, हा त्यांचा या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन आहे, हा विचार त्यांना संतपरंपरेने दिला. “मनोरंजन ही माणसाची गरज आहे हे संत एकनाथांनी ओळखलं आणि त्यातूनच त्यांनी भारुडाची निर्मिती केली. सुदृढ समाजबांधणीसाठी गरजेचे असलेले अनेक विषय त्यांनी भारुडाच्या नाट्यमय सादरीकरणातून सर्वसामान्यांच्या गळी उतरवले. एकनाथांनी जे भारुडांच्या माध्यमातून केलं, त्यासाठी मी चित्रपट हे माध्यम निवडलं” असं दत्ताजी सांगतात, तेव्हा ते थेट संतपरंपरेशी नातं सांगतात. मनोरंजनाच्या या माध्यमातून प्रबोधन करताना थेट उपदेश करायचा नाही, तर फक्त दिशादर्शन करायचं. संवेदनशील प्रेक्षक त्यातून नेमकं काय ते टिपतो. त्याचा प्रभाव जितका खोलवर पोहोचतो, तितका तो त्या व्यक्तीच्या जगण्यावर, विचारसरणीवर सकारात्मक परिणाम करतो, ही दत्ताजींची श्रद्धा आहे.
 
जीवनमूल्यांशी, संघनिष्ठेशी सहजपणे बांधील राहत चित्रपटसृष्टीत स्वकर्तृत्वाची ठसठशीत मोहोर उमटवणारे राजदत्तजी हे खर्‍या अर्थाने चित्रतपस्वी. दत्ताजींचं साधेपण हे अंतर्बाह्य आहे, स्वाभाविक आहे, म्हणूनच मंच कोणताही असला तरी त्यांची वेशभूषा, बोलणं यात बदल होत नाही. प्रदीर्घ अनुभवाचं अधिष्ठान असलेलं आणि चिंतनाची भक्कम बैठक असलेलं त्यांचं शांंत स्वरांतलं, ठाम लयीतलं सावकाश बोलणं.. एक एक शब्द विचारपूर्वक वेचलेला. ऐकणार्‍याच्या मनावर खोलवर परिणाम करतानाच त्याला विचारप्रवण करणारं हे बोलणंं ऐकणं ही पर्वणीच असते. निरहंकारी व्यक्ती ही कविकल्पना नाही, याची प्रचिती त्यांना भेटलं की येते.
 
 
वयाने नव्वदीचा उंबरा ओलांडून 3 वर्षं झाली, तरी जातिवंत कलावंताचं असमाधान त्यांच्यात आहे. संत गाडगेबाबांच्या आयुष्यावर देवकीनंदन गोपाला चित्रपट त्यांनी केला, शिक्षणतज्ज्ञ पंजाबराव देशमुखांचं आयुष्य एका चित्रपटातून दाखवता आलं. आता संत तुकडोजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर चित्रपट करण्याची त्यांची इच्छा आहे. “हे काम होईल की नाही माहीत नाही. पण इच्छा मात्र आहे. कलाकाराने समाधानी असू नये कधी. तो समाधानी झाला की प्रवास थांबतो. तेव्हा असमाधान ही कलाविष्काराची ओढ जिवंत असल्याचं लक्षण आहे. ते जपायला हवं..” असं त्यांनी जेव्हा सांगितलं, तेव्हा त्यांनी विवेक फिल्म्ससाठी जणू मंत्रच दिला.
 
 
‘विवेक फिल्म्स’च्या मुंबईतील अंधेरी येथील कार्यालयाचा शुभारंभाचा अगदी छोटेखानी, अनौपचारिक कार्यक्रम झाला. दत्ताजींना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानिमित्ताने या वेळी विवेक समूहातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला. आपल्या प्रत्येक आयामात संघविचारधारा जपणारा विवेक समूह हे चित्रपट माध्यमातही काम सुरू करतो आहे, याचा दत्ताजींना मनस्वी आनंद झाला. तो त्यांनी बोलूनही दाखवला. या वाटेवरून वाटचाल करता येते, ती यशस्वीपणे करता येते याचा विश्वास सर्वांच्या मनात जागवत दत्ताजींनी सर्वांचा निरोप घेतला.
 
 
सुरुवातीच्या टप्प्यांत आशीर्वादाची-सदिच्छांची त्यांनी दिलेली शिदोरी, बरोबर असल्याचा दिलेला विश्वास विवेक समूहासाठी खूप महत्त्वाचा आहे. विवेकच्या विस्तारण्याच्या आकांक्षेला नवं बळ देणारा आहे.

अश्विनी मयेकर

https://twitter.com/AshwineeMayekarमुंबई तरुण भारतमध्ये रविवार पुरवणी संपादक म्हणून पत्रकारितेला सुरुवात. दूरदर्शन- सह्याद्री वाहिनीवर वृत्त विभागात काम. गेली काही वर्षं साप्ताहिक विवेकची कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी. भारतीय स्त्री शक्ती तसेच ज्ञान प्रबोधिनी या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सामाजिक कामात सक्रिय सहभाग.