गुलजार हे नाव आपल्या सगळ्यांना चिरपरिचित आहे. एक सिद्धहस्त पटकथा लेखक, अद्भुत प्रतिभेचे गीतकार, ताक़दीचे दिग्दर्शक अशी त्यांची ओळख चित्रपटाविषयी आस्था असणार्या प्रत्येकाला आहेच. गुलजार यांचे चित्रपटबाह्य साहित्यही भरपूर आहे. गुलजार, एक संपूर्ण साहित्यिक आहेत. यंदाचा साहित्यासाठी दिला जाणारा सर्वोच्च भारतीय ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ अशा या साहित्यिकाला देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे.
गुलजार हे नाव आपल्या सगळ्यांना चिरपरिचित आहे. एक सिद्धहस्त पटकथा लेखक, अद्भुत प्रतिभेचे गीतकार, ताक़दीचे दिग्दर्शक अशी त्यांची ओळख चित्रपटाविषयी आस्था असणार्या प्रत्येकाला आहेच. गुलजार यांचे चित्रपटबाह्य साहित्यही भरपूर आहे. ‘रावी पार’, ‘दो लोग’, ‘रात पश्मिनेकी’, ‘पाजी नज्में’, ‘धुंआ’, ‘ऑटम मून’, ‘ढुे’, ‘पुखराज’, ‘जिया जले’, ‘ग़ालिब’, ‘खराशें’, ‘लकीरें’.. अशी अनेक पुस्तके, कथा, कविता, कादंबरी, चरित्र, पटकथेची पुस्तके, त्यांनी अनुवादित केलेली आणि त्यांची अनुवाद झालेली.. अशी अफाट सहित्यसंपदा.
आत्ताच्या पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील दिना गावी 18 ऑगस्ट 1936 रोजी संपूर्णसिंह कालरा - गुलजार यांचा जन्म झाला. फाळणीमुळे हे मोठे कुटुंब विभागले आणि विखुरले गेले. तेव्हा गुलजार भावाबरोबर मुंबईला आले. लेखक होण्याचे स्वप्न होते, वाचनाची प्रचंड आवड होती. शिक्षणात खंड पडला. एका मोटार गॅरेजमध्ये नोकरी पकडली. ज्या गाड्या दुरुस्तीला येत, त्यांच्या पेंटिंगसाठी कलर मिक्सिंगचे काम ते करत. कामाचे लोड खूप नसे, त्यामुळे वाचनाला भरपूर वेळ मिळे. तेव्हा त्यांना रहस्यकथा वाचायचा नाद होता. वाचनालयातून रोज एक पुस्तक वाचायला नेत. एके दिवशी वाचनालयाचा मालक वैतागला. त्याने शेल्फवर ठेवलेले एक पुस्तक गुलजारना काढून दिले आणि म्हणाला, “हे वाचून संपव आणि मगच ये!” त्या पुस्तकाने गुलजार यांच्या वाचनाची आणि आयुष्याची दिशाच बदलून गेली. ते पुस्तक होते रवींद्रनाथ टागोरांच्या ‘माली’ या बंगाली कादंबरीचे इंग्लिश भाषांतर - ‘गार्डनर’! टागोरांनंतर शरदचंद्र, काझी नझरुल यांचे भाषांतरित साहित्य वाचतानाच ते बंगाली भाषा शिकले. त्यांचे बंगालवर फार प्रेम. चित्रपटात पहिले मार्गदर्शक गुरू भेटले, तेही बंगाली - बिमल रॉय. गुलजार यांचे एकूणच भारतीय भाषांवर आणि साहित्यावर मन:पूर्वक प्रेम आहे. ते म्हणतात, “भारताइतके भाषावैविध्य दुसरीकडे नसेल कुठे.” साहित्य अकादमीमध्ये नोंद झालेल्या 28 भाषा आहेत. त्यांनी स्वत: वेगवेगळ्या 32 भाषांतील 274पेक्षा जास्त कवितांची हिंदीमध्ये भाषांतरे केली आहेत.
गुलजार यांचे गालिबप्रेम सर्वज्ञात आहे. त्यांचे शालेय शिक्षण उर्दूमधून झाले. शाळेत गालिब अभ्यासात असायचा. त्यांचे शिक्षक फार मनापासून शिकवायचे. पुढे दूरदर्शनसाठी गुलजारनी ‘मिर्ज़ा गालिब’ ही मालिका केली.
’जी ढूँढता है फिर वही फुरसतके रात दिन’ हा मूळचा गालिबचा शेर आहे. गुलजारनी मौसममध्ये त्याचे गाणे केले.
लेखन, कथा, कविता कशी सुचते? यावर गुलजार म्हणतात, ”आपण जे जगतो, आजूबाजूला पाहतो, शिकतो, वाचतो, ऐकतो, अनुभवतो तेच सारं आपल्या लेखनातून, कलाकृतीतून बाहेर पडतं. लेखन चांगलं होण्यासाठी, त्यातून नाव मिळवण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. फक्त आपण जे सांगतो ते आपलं, आपल्याला आवडलेलं, पटलेलं असावं.”
गुलजारनी फाळणीचा वार झेललाय, स्वत:च्या जन्मभूमीतून विस्थापित होण्याच्या आघात सहन केलाय. ते सांगतात, पुढे कितीतरी वर्षं त्यांना फाळणीची दु:स्वप्ने पडायची, अपरात्री झोपेतून जाग यायची. तीच उदासी, तेच सोसलेपण, तोच एकटेपणा त्यांच्या लेखनात अनेकदा दिसतो.
एक अकेला इस शहरमें...
दिन खाली खाली बर्तन है
किंवा
तुझसे नाराज नहीं ऐ जिंदगी हैरान हूं मैं
किंवा
आँखों में नींद न होती
आंसू ही तैरते रहते
ख़्वाबों में जागते हम रात भर..
सुरुवातीला गुलजार मुंबईत राहत, तिथे त्यांच्या आजूबाजूला लेखक होण्यासाठी पोषक वातावरण होते. सागर सरहदी, देबू सेन यांसारखे मित्र, कृष्णचंद्र, साहिर यांचा शेजार. PWA (प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशन), IPTA (इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन), बाँबे यूथ क्वायर अशा ठिकाणी भेटणारे शैलेंद्र, सलील चौधरी यांच्यासारखे साहित्यिक कलाकार. त्यामुळे चित्रपटात येण्याची आणि गाणी लिहिण्याची काहीच इच्छा नसताना ते त्याच क्षेत्राकडे ओढले गेले. गुलजार म्हणतात, “इच्छेविरुद्ध गेलो, पण ते वातावरण आवडलं म्हणून रमलोही. माणूस घडण्याचा प्रवास असतो. प्रवासात जिथे सावली मिळेल तिथे तो थांबतो.”
गुलजारना मराठी साहित्याविषयी आणि सहित्यिकांविषयी प्रचंड आदर आहे. त्यांनी कुसुमाग्रज, विंदा यांच्या कवितांचे अनुवाद केले आहेत. ते म्हणतात की माझे भाग्य मोठे म्हणून कुसुमाग्रज, विंदा, पुलं देशपांडे यांच्याशी माझी ओळख झाली. अरुण कोलटकर हेही त्यांचे आवडते कवी. एका मुलाखतीत ते म्हणालेत, “पंजाबी माझी मातृभाषा, बंगाली प्रेमाची भाषा, कारण माझी पत्नी राखी बंगाली आणि 16व्या वर्षांपासूनचे पुढचे सगळे आयुष्य मुंबईत गेले, त्यामुळे मराठी माझी ’रोजमर्रा’ की, व्यवहाराची भाषा आहे.”
त्यांना एक खंत होती की भारतात चांगले बालसाहित्य नाही. (मराठी, मल्याळी आणि बंगाली साहित्य त्याला अपवाद आहे, हेही ते नमूद करतात.) त्यानंतर लहान मुलांसाठी त्यांनी स्वत:च ‘अगर मगर’, ‘दुनियां मेरी’, ‘बोली रंगोली’, ‘जमीन हमको घुमाती हैं’, ‘आपा की आपडी’ ही पुस्तके लिहिली.
गुलजार यांच्या मते, पाश्चात्त्य चित्रपटाच्या तुलनेत भारतीय चित्रपट पूर्वी फक्त तांत्रिकदृष्ट्या थोडे मागे होते. भारतीय साहित्याला रामायण, महाभारत, पंचतंत्र अशा हजारो वर्षांची परंपरा असताना आशयात, कथा सांगण्यात भारतीय चित्रपट कधीच मागे नव्हता. प्रत्येक भारतीय माणसाला 2-3 तरी भाषा बोलता येतात. त्याहून वेगळ्या आणखी 2-3 भाषा रोज त्याच्या कानावर पडत असतात. त्यामुळे गाण्यात, संवादात मध्येच एखादा वेगळ्या भाषेतला शब्द सहज येऊन जातो. गुलजारनी रोजच्या वापरातले काही इंग्लिश शब्द इतक्या खुबीने आपल्या गाण्यात योजले आहेत की ते कानाला खटकत नाहीत. ‘खाली बोर दुपहरसे’, ‘सारा दिन सडकोंपे खाली रिक्शेसा’, ‘तेरी चाची बुलडोझर’, ‘आँखेभी कमाल करती है, पर्सनल से सवाल करती है’ ही हलकीफुलकी गाणी तर आहेतच, तसेच ‘पुराने नज्मोंके खोलनेसे होती है एलर्जी। जो शामें गुजर जाती थी किताबोंके साथ, वो अब गुजर जाती है कम्प्यूटर के परदोंपर’ अशा गंभीर कवितांमध्येही!
गुलजार, माझ्या मते कविता आणि चित्रपटगीत यातले अंतर कमी करणारा लेखक आहेत.
चांद, सूरज, समय, हवा, खुशबू, सांसे या त्यांच्या आवडत्या प्रतिमा. त्यातही ‘चांद‘वर फार प्रेम. तो एका स्वतंत्र लेखाचा विषय होईल. गुलजार म्हणतात की कविता गाणे लिहिताना मी स्वत:ला (किंवा नायक/नायिकेला) चांदशी आयडेंटिफाय करतो. आता गाण्यात प्रसंग असा की आपण चोरून भेटायचे पण कुठे, कसे, केव्हा? तर -
शाम को जब चोरी चोरी नंगे पांव चांद आएगा...
इम्लीसे पेडसे चढ़के खिड़कीपे चांद आएगा
म्हणजे मीच तुला तेव्हा तसा भेटायला येईन!
गुलजारचे पहिले चित्रपटगीत, एक स्वतंत्र कविता वाटावी असे. त्यात नायिका चंद्रालाच ‘तोहे राहू लागे बैरी, मुस्काए जी जलाए के’ असा शाप देतेय.
तर त्यांचा पहिला चित्रपट ‘मेरे अपने’, त्यात तर चंद्राला रात्रीच्या भिक्षापात्राची उपमा दिली आहे -
रोज अकेली आएं रोज बेचारी जाएं
चांद कटोरा लिये भिखारन रात..
तर त्यांच्या एका नज्ममध्ये त्यांनी चंद्राला ’रात्रीने दिलेली भिक्षा’ अशी उपमा दिली आहे -
सारा दिन बैठा, मैं हाथमें लेकर खाली कसा
रात जो गुजरी, चांद की कौड़ी डाल गयी उसमें
सूदखोर सूरज कल मुझसे येभी मांगेगा!
गुलजारना आधी चाल बांधलेल्या गाण्यावर शब्द लिहिण्यात कमीपणा वगैरे वाटत नाही. त्यांच्या मते उलट एक नवे मीटर, नवीन स्वरबंध संगीतकारांकडून तयार मिळतो शब्दांचे प्रयोग करायला.
‘त्रिवेणी’ हा काव्यबंध गुलजारने प्रथम वापरला. गंगा-यमुनेसारख्या दोन ओळी, ज्यांचे वाचताना अर्थ लागतात आणि गुप्त सरस्वतीसारखी तिसरी ओळ, जी त्यात लपलेला अर्थ सांगणारी. तीनच ओळींची छोटीशी कविता.
तमाम सफ़हे किताबोंके फड़फड़ाने लगे
हवा, धकेलके दरवाजा आ गयी घरमें
कभी हवा की तरह तुमभी आयाजाया करो!
लेखन करण्याला वेळ मिळावा, म्हणून 1999 साली ‘हुतूतू’ या चित्रपटानंतर गुलजारनी दिग्दर्शन करण्याचे थांबवले. कविता, गीतलेखन, कथा, कादंबरी, अनुवाद अशा अनेक साहित्यप्रकारात ते रमले. पण त्यांच्या लेखी काव्याचे महत्त्व किती? ते त्यांनी या आशावादी कवितेत सांगितले आहे -
थोडेसे करोड़ो सालोंमें
सूरज की आग बुझेगी जब
और राख उड़ेगी सूरजसे
जब कोई चांद ना डूबेगा
और कोई जमीन ना उभरेगी
तब ठंडे बुझे कोयलेसा
टुकड़ा एक जमींका
उड़ेगा भटका भटका
जाकर गिरेगा सूरजपे
मैं सोचता हूँ उस् वक़्त अगर
कागजपे लिखी एक नज्म
उड़ते उड़ते सूरज में गिरे
और सूरज फिर जलने लगे!!
कागदावर लिहिलेल्या काव्यपंक्तींमधली आग विझणार्या सूर्यालाही ऊब द्यायला सक्षम आहे!
चित्रपटासाठीचा सर्वोच्च भारतीय सन्मान - ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ दिग्दर्शक-पटकथा लेखक गुलजारना मिळालाय. गीत लेखनासाठीचा आंतरराष्ट्रीय ऑस्कर पुरस्कार मिळालाय. आणि या वर्षी साहित्यासाठी दिला जाणारा सर्वोच्च भारतीय सन्मान ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ही त्यांना संस्कृत लेखक रामभद्राचार्य यांच्या जोडीने मिळालाय. संस्कृत आणि उर्दू या भाषांना एकाच वर्षी हा सन्मान मिळणे ही महत्त्वाची गोष्ट आहे.
लेखक, कलाकार संवेदनशील असतात. त्यांना त्यांची स्वतंत्र मते असतात. राजकीय विचारांनी डावा असो की उजवा, त्याचा कल आपल्या डोळ्याला खुपू नये इतक्या उंचीवर मात्र जरूर असावा. या वर्षीचे दोन्ही पुरस्कार विजेते माझ्यामते अशाच उंचीवर आहेत. आपल्यासाठी त्यांचे काम हीच ज्ञान-पीठे आहेत!