आरक्षणाच्या आडून जातवाद?

विवेक मराठी    27-Feb-2024   
Total Views |
मनोज जरांगे-पाटील यांनी जातीचे घाणरेडे राजकारण करू नये. देवेंद्र फडणवीस ब्राह्मण असल्यामुळे राजकारणात नाहीत, ते स्वकर्तृत्वाने आहेत. स्वकर्तृत्वाने राजकारणात येण्याचा मौलिक अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेने दिलेला आहे. भारतातील कोणत्याही पहिल्या श्रेणीचा राजकारणी खुनाखुनीचे राजकारण करीत नाही. ती कम्युनिस्ट राज्यकर्त्यांची पद्धती आहे. बंगाल आणि केरळमध्ये त्याचे ‘लाँग शॉट’ झालेले आहेत. तशी महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रातील राजकीय लढाई सदैव वैचारिक लढाई असते. टिळक-आगरकर यांचा संघर्ष वैचारिक आहे. काँग्रेस-भाजपा यांचा संघर्षदेखील वैचारिक आहे. अशा लढ्यात ‘येथ जातिवर्ण सर्वचिगा अप्रमाण’ या पंरपरेचे मनोज जरांगे-पाटील यांनी पालन केले पाहिजे.

reservation
 
मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. मराठा समाज मागासलेला आहे, म्हणून त्याला आरक्षणाच्या कक्षेत आणले पाहिजे, हा विषय कोरोना काळ येण्यापूर्वीपासून सुरू आहे. ‘लोकांनी लोकांकरवी लोकांसाठी चालविलेले राज्य’ अशी लोकशाहीची व्याख्या केली जाते, म्हणून समाजातील खूप मोठ्या वर्गाची एखादी मागणी असेल तर लोकांसाठी चालविलेल्या राज्याने त्या मागणीची दखल घेणे आणि तिची घटनात्मक पूर्तता करणे हे राज्यकर्त्यांचे कर्तव्य ठरते. केलेली मागणी योग्य आहे की अयोग्य आहे, सिद्धान्तत: ती बरोबर आहे की चूक आहे, याची बौद्धिक चर्चा करण्याचे स्वातंत्र्य सर्वांना आहे. राज्य आपल्या घटनेप्रमाणे चालते आणि या सर्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाला करावा लागतो. यासाठी लोकशाहीतील लढे दीर्घ मुदतीचे आणि दमाचे असतात, हे लक्षात घ्यावे लागते.
 
 
मनोज जरांगे यांना खूप घाई झालेली आहे. मी म्हणतो तेच करा, इतर कुठल्या गोष्टी मला मान्य नाहीत अशी त्यांची भूमिका आहे. ज्याने आंदोलन सुरू केले, अशा नेत्याला अशी टोकाची भूमिका घेता येत नाही. अशी भूमिका घेतली, तर तो अयशस्वी होतो. महाराष्ट्रातील अनेक आंदोलनांचा इतिहास त्यासाठी अभ्यासला पाहिजे, मुंबईतील गिरणी कामगारांच्या संपाचाही अभ्यास केला पाहिजे.
 
 
आंदोलन करणार्‍या मनोज जरांगे यांच्याविषयी पुरेसा आदर बाळगूनही असे विधान करावे लागते की, त्यांची भाषा मराठा समाजाला न्याय देणार्‍या नेत्याच्या तोंडी शोभत नाही. ही गोष्ट खरी आहे की, आंदोलन करणार्‍या नेत्याला थोड्या कडक भाषेत बोलावे लागते. परंतु कडक भाषा म्हणजे बिनबुडाचे भन्नाट आरोप करण्याची भाषा नव्हे. घटनात्मक मार्गाने सत्तेवर बसलेल्या नेत्यांविरुद्ध एकेरी भाषेचा प्रयोग करणे नव्हे. आणि एकाच नेत्याला लक्ष्य करून त्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करून त्यांच्यावर गलिच्छ आरोप करणे नव्हे.
 
 देवेंद्र फडणवीस ब्राह्मण असल्यामुळे राजकारणात नाहीत, ते स्वकर्तृत्वाने आहेत.
reservation
 
मनोज जरांगे-पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप त्यांच्याच भाषेत असे आहेत, “माध्यमांनी देवेंद्र फडणवीस यांना घाबरू नये. जनता तुमच्या सोबत आहे. आम्ही न्यायालयाचा सन्मान केला. सलाइन घेतलं. शांततेत रस्ता रोको केला. तरी...ह्या **ने आमच्यावर गुन्हे दाखल केले. इतकं भयाण षड्यंत्र याने रचलं आहे. सरकार आणायचं असेल तर या जरांगेचा काटा काढा. औषधातून विष टाकून काटा काढा किंवा याला गोळ्या घाला, एन्काउंटर करा. मला मुख्यमंत्री राहायचं असेल तर जरांगेचा काटा काढावाच लागेल.
 
 
मी आता चालत सागर बंगल्यावर जातोय. तिथे उपोषण करेन. जर रस्त्यात मी मेलो, तर मला देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर नेऊन टाका. आता मी एकतर मराठा आरक्षणाचा गुलाल तरी घेऊन येतो, नाहीतर देवेंद्र फडणवीसांना माझा बळी तरी देतो. फडणवीस, या वेळी तुमचा सुपडा साफ होणार.”
 
 
जीवे मारण्याचा कट रचल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. यामागेही देवेंद्र फडणवीसच असल्याचा दावा त्यांनी केला आहे. “मला सलाइनमधून विष पाजून मारण्याचा कट रचला. त्यामुळेच मी सलाइन घेणंही बंद केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचा हा बामणी कावा आहे.” असा निर्वाणीचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. या वेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यवर टीकास्त्र सोडले.
 
देवेंद्र फडणवीस यांची जात काढून त्यांच्याविरुद्ध आणि त्यांच्या जातीविरुद्ध आहे? महाराष्ट्रातील या राजकारणाचे शिल्पकार आहेत शरदचंद्र पवार, म्हणून काही जणांनी आरोप केला की, मनोज जरांगे-पाटील यांचे बोलविते धनी शरद पवार आहेत.
reservation 
 
मनोज जरांगे यांचे हे आरोप वाचल्यानंतर मराठा आरक्षणाविषयी सहानुभूती असणार्‍या आमच्यासारख्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, मनोज जरांगे-पाटील यांचे आंदोलन मराठा आरक्षणासाठी आहे की, देवेंद्र फडणवीस यांची जात काढून त्यांच्याविरुद्ध आणि त्यांच्या जातीविरुद्ध आहे? महाराष्ट्रातील या राजकारणाचे शिल्पकार आहेत शरदचंद्र पवार, म्हणून काही जणांनी आरोप केला की, मनोज जरांगे-पाटील यांचे बोलविते धनी शरद पवार आहेत. खरे-खोटे शरद पवार आणि मनोज जरांगे-पाटील जाणोत.
हे एका जातीविरुद्धचे राजकारण महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा मुडदा पाडणारे आहे. जातीय जाणीवा जागृत करून जातिमुक्त समाज निर्माण होणार नाही, जातीनिर्मूलन होणार नाही, जातिअंतदेखील होणार नाही. पुन्हा एकदा आपण जातीच्या डबक्यामध्ये बेडूक बनून राहू. महाराष्ट्रातील जातिअंताचा संघर्ष सर्व जातींतील संतांनी केलेला आहे. ‘तुका झालासे कळस’ हा या लढ्याचा कळस आहे. त्या कळसाचे शेवटचे टोक संत गाडगेबाबा आहेत. सामाजिक स्तरावर महर्षी शिंदे, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, आदी वंदनीय पुरुषांनी हा संघर्ष केला. मनोज जरांगे-पाटील यांनी याचे स्मरण ठेवावे.
 
 
मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणाचे आंदोलन जरूर करावे, तो त्यांचा घटनात्मक अधिकार आहे आणि त्याने जर मराठा समाजाला न्याय मिळवून दिला, तर चांगलीच गोष्ट होईल. त्याने लोकशाहीदेखील बळकट होईल. परंतु मनोज जरांगे-पाटील यांनी जातीचे घाणरेडे राजकारण करू नये. देवेंद्र फडणवीस ब्राह्मण असल्यामुळे राजकारणात नाहीत, ते स्वकर्तृत्वाने आहेत.
स्वकर्तृत्वाने राजकारणात येण्याचा मौलिक अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेने दिलेला आहे. भारतातील कोणत्याही पहिल्या श्रेणीचा राजकारणी खुनाखुनीचे राजकारण करीत नाही. ती कम्युनिस्ट राज्यकर्त्यांची पद्धती आहे. बंगाल आणि केरळमध्ये त्याचे ‘लाँग शॉट’ झालेले आहेत. तशी महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रातील राजकीय लढाई सदैव वैचारिक लढाई असते. टिळक-आगरकर यांचा संघर्ष वैचारिक आहे. काँग्रेस-भाजपा यांचा संघर्षदेखील वैचारिक आहे. अशा लढ्यात ‘येथ जातिवर्ण सर्वचिगा अप्रमाण’ या पंरपरेचे मनोज जरांगे-पाटील यांनी पालन केले पाहिजे. नाहीतर लोक म्हणू लागतील की, नाव मराठा आरक्षणाचे आणि लढाई जात काढून देवेंद्र फडणवीस यांच्याशी. अशी प्रतिमा चालेल का, याचा मनोज जरांगे-पाटील यांनी विचार करावा.
 

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.