पालखी

सदर - भावड्याची चावडी

विवेक मराठी    28-Feb-2024   
Total Views |
 
palkhi
 अर्कचित्र - अमोघ वझे
 जस्सा सुप्रीच्या बापाचा म्येना हालत डुलत पुतळ्याजवळ आला, तस्सा जित्या मुच्छडनं मिश्या बाजूला सारत तुतारीला त्वांड लावलं. छाती भरून हवा फुकली तरीबी ‘पुंई’ यवडाच आवाज आला. त्यो आयकून श्येजारी हुबा आसल्याला आद्या फिस्कण हासला. जित्याणं आपले बटाटे डोळे आजून म्होट्टे करूण आद्याला गबसवला.
  
सक्काळ सक्काळ पंचायतीच्या शेजारच्या साळंच्या मयदाणावं शिवाजी म्हाराजांचा पुतळा धुन्याचं काम चालल्यालं. येनारी जानारी पब्लिक ‘शिवजयंती आली कायनु परत’ म्हनून दुर्लक्ष करून जात हुती.
 
 
हिकडं सुप्री नट्टापट्टा करूण बापाला तय्यार करूण पडवीत यून बसल्याली. र्‍होयत्या आन् बाकीच्या पोरांणी येक म्येनाबी सजवून तयार ठिवल्याला. लोकंडी मेन्यावं सुप्रीच्या बापाच्या बुडाला टोचू नै म्हनून लो बजेट गाद्या टाकल्याल्या. त्यो ओप्पण म्येना आन् त्या तांबड्या पिवळ्या गाद्या पाहून सुप्रीचं टाळकंच हाललं. पन त्येवड्यात सुप्रीचा बाप मागनं आला आन् मेन्यात जाऊन बसला. सुप्रीणं कप्पाळाला हात मारला आन् जित्याला ‘उचला’ आशी खून क्येली. जित्या मुच्छडनं गोदामातले च्यार-सा हमाल धरून आनल्याले. इश्यारा भेटताच मैद्याची पोती उचलावी तसा त्यो म्येना त्यांनी उच्यालला.
 
 
हिकडं साळंच्या मयदाणावं आद्या, आद्याचा बाप आन् रश्मिआक्का आदीच यून थांबल्याले. आद्या हातात संज्याणं प्येटवून धिल्याली मश्याल गच्च धरून हुबा र्‍हायल्याला. पाटीमागं आंधार्‍याची करिश्मा त्येलाची बाटली हातात धरून थांबल्याली. मश्याल इझाया आली की आगीत त्येल वतायच्या कामावं तिची नेमनुक झाल्ती. जस्सा सुप्रीच्या बापाचा म्येना हालत डुलत पुतळ्याजवळ आला, तस्सा जित्या मुच्छडनं मिश्या बाजूला सारत तुतारीला त्वांड लावलं. छाती भरून हवा फुकली तरीबी ‘पुंई’ यवडाच आवाज आला. त्यो आयकून श्येजारी हुबा आसल्याला आद्या फिस्कण हासला. जित्याणं आपले बटाटे डोळे आजून म्होट्टे करूण आद्याला गबसवला. आद्याणं हिरमुसून रश्मिआक्काकडं पाह्यलं. हातात जळती मश्याल धरल्येला आद्या मश्यालीच्या धगेनं घामाघुम झाल्ता. घाम चस्म्यावरणं घरंगळून नाकावर यून खाली टापकू लागल्याला. रश्मिआक्काणं ‘उगी उगी’ करूण रूमालाणं त्येचं णाक पुसलं आन् ‘बयाऽऽऽ’ करूण त्वांड वाकडं क्येलं आन् पुतळ्याच्या म्हागंच रूमाल टाकून हात झटकून पुन्ना मिरवनुकीकडं पाह्यला लागली.
 

vivek 
 
हमालांनी म्येना पुतळ्याजवळ ठिवला. सुप्रीच्या बापाणं जिमिनीवं पाय ठिवताच साऊथच्या हिरोवानी चारी दिशांला धूळ उडंन आशी चोंग्यांची आपेक्षा हुती. पन देव्यानं सरावाप्रमानं म्हाराजांच्या पुतळ्याभवती सडा घालून ठिवल्याला. त्यामुळं त्यो शो फ्लॉप झाल्याला बगून सुप्रीचा बाप वयतागला. तरीबी उस्नं आवसान आनून म्हाराजांच्या पुतळ्याखाली जाऊन हुबा र्‍हायला.
 
 
सत्तेतल्यांच्या बुडाखाली मश्यालीनं जाळ लावनार आणि शत्रू आगीत भस्म झाला की तुतारी वाजवून विजयोस्तव साजरा करनार आशी स्कीम हुती. त्याच्या डेमोकरता आद्या कवाधरनं प्येटती मश्याल धरून घामाघुम झाल्ता. सुप्रीच्या बापाणं इशारा करताच जित्या मुच्छडनं पुन्ना जोर लावला आन् छाती भरूण हावा तुतारीत फुकली. आवाज या टायमाला बी आला न्हाईच, पन त्यानं फुकलेल्या हवेमुळं शेजारी हुब्या आसल्याल्या आद्याची मश्याल इझाया आली. त्ये पाहून आंधार्‍याची करिश्मा घुशीवानी फुडं आली आनी तिनं हातातल्या बाटलीतनं त्येल मश्यालीवं फव्वारलं. जित्यानं पुन्ना तुतारी फुकल्यावं त्येलानं उडाल्याल्या भडक्यानं आगीचा लोळ झाला आन् समुरच्या म्येन्यावं जाऊन पल्डा. म्येना प्येटल्याला बगून समुर मज्जा बगत हुबे र्‍हायल्याले देव्या, दाढी आन् दाद्या मयदानावं पानी मारायच्या झार्‍या घिऊन म्येन्याकडं धावले.
 
 
हिकडं आद्या प्येटती मश्याल संज्याच्या हातात दिऊन रश्मिआक्काच्या पदराम्हागं लपाया ग्येला तं तिथं आधीच घुसल्येल्या आद्याच्या बापाणं त्येला भाईर ढकाललं. तुतारी फुकनारा जित्या तुतारीचं त्वांड आगीकडं करून म्हनून पुन्ना छाती भरून फुकाया लागला. या टायमाला जरा जास्तीचा जोर लागल्याणं त्येच्या प्यांटचं बक्कल तुटलं आन् प्यांट खाली आली. ती सावरन्यासाटी त्येनं हातातली तुतारी सोडली ती थेट सुप्रीच्या बापाच्या पायावं पल्डी. सुप्रीचा बाप बोंबलंत जाऊन म्हाराजांच्या पुतळ्यम्हागं लपला. त्याला बगून सुप्री, सुप्रीला बगून रश्मिआक्का आनि तिच्या पदराखालचा आद्या आन् आद्याचा बाप, सम्दी म्हाराजांच्या पुतळ्याम्हागं लपली. समूर म्येना प्येटला हुता आन् देव्या, दाढी आनी दाद्या त्यो इझवित हुते.
 
म्हाराजांचा पुतळा जरा गालात हसल्यागत झाल्याला काही जनांनी पाह्यला!
 

केदार दिवेकर

केदार अच्युत दिवेकर
व्यावसायिक संगीतकार म्हणून १४ वर्षे कार्यरत.
 
‘मीरा’ या आगामी मराठी चित्रपटासाठी कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि संगीत अशा जबाबदाऱ्या सांभाळणारा कलाकार.