चला ‘ब्ल्यू मॉरमॉन’ पाहायला

विवेक मराठी    03-Feb-2024
Total Views |
@सुहास बारटक्के 9423295329
महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू असलेलं ‘ब्ल्यू मॉरमॉन.’ कोकणात हे फुलपाखरू हमखास पाहायला मिळतं. खाडीकाठी व समुद्रकाठी पाणथळ भागात अनेक जागा आहेत, त्यापैकीच एक चिपळूणजवळचं भिले बंदर! इथे साठलेल्या खाडीच्या पाण्याकाठी उगवणार्‍या, फुलपाखरांच्या आवडीच्या झुडुपांवर ही ‘ब्ल्यू मॉरमॉन’ जातीची फुलपाखरं पाहायला मिळतात.
 
Blue Mormon
 
महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू म्हणून 2015 साली घोषित झालेलं ‘ब्ल्यू मॉरमॉन’ अर्थात राणी पाकोळी सध्या हमखास कुठे पाहायला मिळेल बरं?
 
अर्थात कोकणात!
 
कोकणात हे फुलपाखरू हमखास पाहायला मिळेल अशा खाडीकाठी व समुद्रकाठी पाणथळ भागात अनेक जागा आहेत. त्यापैकीच एक चिपळूणजवळचं भिले बंदर! इथे साठलेल्या खाडीच्या पाण्याकाठी उगवणार्‍या, फुलपाखरांच्या आवडीच्या झुडुपांवर ही ‘ब्ल्यू मॉरमॉन’ जातीची फुलपाखरं सध्या जथ्याजथ्याने पाहायला मिळत आहेत.
 
 
नववर्षाच्या प्रारंभी आम्ही काही निसर्गप्रेमी मित्रांनी मालदोली येथील खाडीत भटकंती आयोजित केली होती. खाडीकाठच्या मगरी पाहून झाल्यावर आम्ही थेट ‘रामचंद्र वासुदेव मराठे’ न्यासामार्फत चालवल्या जाणार्‍या मालदोली येथील आनंदाश्रम (वृद्धाश्रम) प्रकल्पाला भेट दिली. या वाड्याचं वर्णन करायचं तर स्वतंत्र लेख लिहावा लागेल, इतका तो सुंदर आहे. तिथून परत चिपळूणकडे निघालो असता वाटेत भिले गाव लागलं. गाडीत ‘सकाळ’मध्ये फोटोग्राफीचं सदर चालवणारे पराग वडके म्हणाले, “भिले बंदरावर भरपूर फुलपाखरं आलीयत.”
 
गाडी तत्काळ भिले बंदरावर गेली. गाडीतून उतरून पायी अर्धा किलोमीटर गेलो न गेलो, तोच उजव्या बाजूला खाजणाच्या पाण्याकाठी उगवलेल्या झुडुपांवर असंख्य फुलपाखरं भिरभिरताना पाहायला मिळाली. फुलपाखरांच्या अक्षरश: झुंडीच्या झुंडी विशिष्ट झुडुपांभोवतीच फिरत होत्या. त्या इवल्याशा झुडुपांनी त्यांना अक्षरश: वेडं केलं होतं आणि ती जवळपास सर्वच फुलपाखरं होती ‘ब्ल्यू मॉरमॉन’ जातीची. त्यांचे व्हिडिओ काढता काढता दोन तास कसे गेले, ते कळलेच नाही.
 

Blue Mormon 
 
खरं तर हा सीझनच फुलपाखरं पाहण्याच्या. सध्या जगभर सर्वत्र ‘बटरफ्लाय गार्डन्स’ तयार करून फुलपाखरांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु नैसर्गिक वातावरणात फुलणारी असंख्य फुलपाखरं पाहणं निव्वळ भाग्याचं! सर्वसाधारणपणे पावसाळा संपला आणि उन्हं पडू लागली की फुलपाखरांचा हंगाम सुरू होतो. यातील ‘ब्ल्यू मॉरमॉन’ तर इतकं देखणं असतं. त्याच्या निळ्या-काळ्या-पांढर्‍या रंगांची एक वेगळीच जादू भिरभिरताना पाहायला मिळते.
 
 
‘पॅपिलिओ पॉलिम्नेस्टर’ - ब्ल्यू मॉरमॉन जातीचं हे फुलपाखरू दक्षिण भारत व श्रीलंका येथील डोंगरपायथ्याला व खाडीकाठी आढळतं. सह्याद्रीच्या पायथ्याशी नदीच्या वा खाडीच्या कडेला जास्त प्रमाणात आढळतं. नराचे पंख सुंदर मखमाली काळे निळे असतात. पंखाचा वरचा भाग वरून पांढरा, तर खालून अर्धवर्तुळाकार असा राखाडी रंगाचा असतो. अँटेना व डोकं, छाती, पोट काळसर तपकिरी असतं. मादीसुद्धा अशाच रंगाचं सौंदर्य ल्यालेली असते. किंचित फिकट राखाडी रंगाचा वापर निळ्या रंगाच्या तुलनेत कमी असतो. फुलपाखरांचे पंख दोन भागात विभागलेले असतात. छोटा भाग मोठ्या भागाखाली थोडा दडलेला असतो. याच भागावर (पट्टीवर) आंतरिक रेषा असतात.
 
 
Blue Mormon
 
किनारपट्टीवर कोकण ते गुजरातपर्यंत याचा आढळ आहे. लिंबूवर्गीय वनस्पती या फुलपाखराला प्रिय आहेत. पानांच्या वरच्या पृष्ठभागावर जमिनीपासून 8-10 फुटांवर झुडुपांच्या फांदीवरील पानावर मादी अंडी घालते. गोलाकार व हिरवट रंगाची इवली इवलीशी अंडी पानाला चिकटलेली असतात. अंड्याचं कवच हेच नवजात सुरवंटाचं पहिलं खाद्य असतं. नंतर तो पानांच्या कडा कुरतडू लागतो. ब्ल्यू मॉरमॉनचा सुरवंट वेगळा ओळखता येतो. जन्माला आलेलं फुलपाखरू पानांच्या खालच्या भागाला लोंबकळू लागतं.
 
 
ब्ल्यू मॉरमॉनचे पंख 120 ते 150 मि.मी. एवढ्या आकाराचे असतात. त्यामुळे उडताना ते विलक्षण सुंदर दिसतं. तसं ते भारतातलं चौथ्या क्रमांकाचं मोठं फुलपाखरू आहे, पण सुंदरतेच्या बाबतीत कदाचित पहिलं असेल. फुलपाखराचं आयुष्य साधारणपणे 2 आठवडे (14 दिवस) इतकंच असतं. या कालावधीत ते अनेक फळझाडांसाठी परागीभवन करतं. श्रीलंकेत वेलदोड्याचं परागीभवन सोपं व्हावं, म्हणून ‘पॅपिलिओ पॉलिम्नेस्टर’ची संख्या वाढवण्यासाठी खास प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी लिंबूवर्गीय झुडुपं लावण्यात आली. अगदी आज आम्ही जो मराठे वाडा पाहिला, त्याच्या सभोवार आंब्या-काजूची झाडं आहेत. या झाडांना चांगली फळधारणा व्हावी म्हणून दोन झाडांच्या मध्ये फुलपाखरांना आकर्षित करणारी खुरी, सोनचाफा यांसारखी फुलझाडं लावली आहेत. खाडीकाठी उगवणार्‍या विशिष्ट झुडुपांची लागवड मात्र पाणथळ जागेतच होऊ शकते. असं म्हणतात की, जर फुलपाखरं आपल्या किनार्‍यावरून नाहीशी झाली, तर हवामान बदलामुळे मानवी जीवनच धोक्यात येईल.
 
 
..शेवटी निघताना लक्षात राहिलं ते खाडीकाठचं आपल्या अंगाखांद्यावर फुलपाखरं खेळवणारं इवलंसं झुडूप व पाण्यात प्रतिबिंब पाहणारं बाबूंचं बेट.