‘परोपकारार्थ इदम् शरीरम्’ - भास्करराव सातारकर

विवेक मराठी    03-Feb-2024
Total Views |
@प्रा. श्रीकांत काशीकर
9423449341
vivek 
भाऊंच्या जीवनाचे प्रयोजन केवळ ‘स्वान्तसुखाय’ नव्हतेच. ज्या समाजात मी वाढलो, त्या समाजाचे मी काही देणे लागतो आणि त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काहीतरी करणे ही माझी जबाबदारी आहे, नव्हे, ते माझे नैतिक कर्तव्य आहे या संघसंस्काराचा परीसस्पर्श त्यांच्या जीवनाला झाला होता. त्यांनी आपल्या जीवनात संघकार्याला महत्त्वपूर्ण स्थान दिले.
परोपकाराय फलन्ती वृक्षा:।
 
परोपकाराय वहन्ती नद्या:।
 
परोपकाराय दुहन्ती गाव:।
 
परोपकारार्थ इदम् शरीरम्॥
 
 
या संस्कृत सुभाषिताचे साक्षात दर्शन म्हणजे भाऊ अर्थात भास्करराव सातारकर. या भावना एका जावयाने आपल्या सासर्‍यांबद्दल व्यक्त केल्या आहेत. आश्चर्य वाटले ना? ते जावई म्हणजेच मधुकरराव कुलकर्णी. खरेच भाग्यवान. भाऊ म्हणजेच भास्कर श्यामराव कुलकर्णी अर्थात सातारकर हे विश्व हिंदू परिषदेचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते होते. कुलकर्णी आडनाव असूनही सातारकर हेच त्यांचे आडनाव रूढ झाले.
 
 
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरालगतचे खंडोबा-सातारा हे भाऊंचे जन्मगाव. 1932 हे जन्मवर्ष. छ. संभाजीनगरला शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी बी.एस्सी. केले. नंतर मराठवाडा विद्यापीठातून बी.एड., एम.एड. या पदव्याही घेतल्या. प्रथम शिक्षक म्हणून नोकरीला प्रारंभ केला तो म्हैसा येथे. पुढे मग बदल्या होत गेल्या आणि जबाबदार्‍याही बदलत गेल्या. वासडी येथे राजपत्रित अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. नंतर पुण्यास ऑडिओ-व्हिडिओ शिक्षणपद्धतीचे शिक्षण घेऊन परत संभाजीनगरला आले. तुर्काबाद खराडी येथे मुख्याध्यापक, वैजापूरला भाग शिक्षणाधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले. मराठवाडा सायंटिफिक रिसर्च सेंटरमध्ये त्यांनी ट्रेनर या पदावरही काम केले. 1990ला जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी म्हणून ते निवृत्त झाले. मधल्या काळात त्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदावरही काही काळ काम केले. अशी भाऊंची सारी वाटचाल. यात ठरावीक टप्प्यावर विवाह, भावंडांचे विवाह, स्वत:ची तीन मुले व तीन मुली यांची शिक्षणे, त्यांचे संसार मार्गी लावणे या सार्‍या सांसारिक जबाबदार्‍या त्यांनी पार पाडल्या. तसे पाहिले तर एक सुखी, आनंदी असे त्यांचे कुटुंब होते. असे जीवन तर असंख्य लोक जगतात. हे जर एवढेच असते, तर मग या लेखाचे काही प्रयोजनच नव्हते. पण भाऊंच्या जीवनाचे प्रयोजन केवळ ‘स्वान्तसुखाय’ नव्हतेच. ज्या समाजात मी वाढलो, त्या समाजाचे मी काही देणे लागतो आणि त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काहीतरी करणे ही माझी जबाबदारी आहे, नव्हे, ते माझे नैतिक कर्तव्य आहे या संघसंस्काराचा परीसस्पर्श त्यांच्या जीवनाला झाला होता. साहजिकच त्यांनी आपल्या जीवनात संघकार्याला महत्त्वपूर्ण स्थान दिले. खरे तर तो काळ संघकार्याला अत्यंत प्रतिकूल होता. त्यातही शासकीय नोकरी, अन् हे कुलकर्णी - जानवेधारी ब्राह्मण. त्यामुळे एकूणच सारी अवघड परिस्थिती. पण तरीही भाऊंनी संघकार्य सोडले नाही. आवश्यक तेवढे जमणे कठीण होते, पण शक्य तेवढे संघकार्य करायचेच यावर ते ठाम होते. पुढे परिस्थिती बदलत गेली. आणीबाणीच्या अग्निदिव्यातून संघपरिवार बाहेर पडला तो पूर्णपणे नवे तेज घेऊनच.
 
 
जनजागृती मोहीम, गंगामाता-भारतमाता यात्रा, धर्मस्थल मुक्तीची घोषणा, त्याअनुषंगाने निघालेल्या रामजानकी रथयात्रा, रामजन्मभूमी मुक्ती आंदोलन, त्यासाठी गावस्तरापर्यंतचे श्रीराम शिलापूजन, प्रत्यक्ष अयोध्येतली कारसेवा, बाबरी पतनानंतरची बंदी असा हा सारा काळ म्हणजे अगदी धुमश्चक्रीचा, संघर्षाचा. याच काळात भाऊंकडे विश्व हिंदू परिषदेचे काम आले. भाऊंनी या संधीचे सोने केले. कारण संघकार्यासाठी आपण फार वेळ देऊ शकलो नाही, विशेष जबाबदारी घेऊन काही काम केले नाही याची खंत मनात होतीच. त्यामुळे परिषदेच्या कामात त्यांनी स्वत:ला अक्षरश: झोकून दिले. छ. संभाजीनगर शहरस्तरापासून जिल्हा मंत्री, विभाग मंत्री, प्रांताची जबाबदारी असे त्यांचे कार्यक्षेत्र विस्तारत गेले. कार्यविस्तारासाठी आवश्यक बैठका, त्यासाठी प्रवासाचे नियोजन, निधी संकलनाकरिता मान्यवरांच्या भेटी या सार्‍या गोष्टी करतानाचा त्यांचा झपाटा पूर्णवेळ कार्यकर्त्यांना लाजवेल असा असायचा.
 
 
 
‘घरात असता कुठे, कार्यालयातच राहायला जा’ असे काही वेळा घरच्यांकडून ऐकावे लागे अशी परिस्थिती काही घरात असते. पण भाऊंच्या घरात तसे नव्हते. एवढेच काय, त्यांचा काळ हा कार्यालये असण्याचा नव्हताच, त्यामुळे कार्यकर्त्यांनी कार्यालयात जाण्याचा नव्हता, तर अनेक कार्यकर्त्यांनी घराचेच कार्यालय केलेले असे. त्यामुळे कामानिमित्त येणारे कार्यकर्ते, पूर्णवेळ प्रचारक यांच्या निवास, भोजन वगैरे सार्‍या व्यवस्था प्रमुख कार्यकर्त्यांच्या घरीच होत. भाऊंचे घर हे अशांपैकीच एक होते.
 
 
मी विश्व हिंदू परिषदेचा कोल्हापूर विभाग संघटन मंत्री म्हणून पूर्णवेळ काम करीत होतो, त्या काळात विदर्भ व मुंबई सोडून उर्वरीत सर्व भाग म्हणजे ‘महाराष्ट्र प्रदेश’ होता. त्याच काळात माझा भाऊंशी परिचय झाला. पुढे 1989च्या अखेरीस मी देवगिरी तरुण भारतच्या संपादकीय विभागातील नोकरीच्या निमित्ताने छ. संभाजीनगरला स्थायिक झालो. आमच्या मंगलमूर्ती संस्कार केंद्राच्या कार्याचे त्यांना खूप कौतुक होते. त्याबद्दल ते अनेकांना सांगत. केंद्राच्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभागही असे.
 
 
विश्व हिंदू परिषदेच्या कामाप्रमाणेच त्यांनी श्री लक्ष्मी नृसिंह उपासना मंडळातही खूप योगदान दिले. या मंडळाच्या वतीने त्यांनी श्री लक्ष्मी नृसिंह मंदिराच्या उभारणीचे कार्यही केले.
 
 
संस्थांच्या वतीने सामाजिक कार्यात त्यांनी आपला सहभाग नोंदवलाच, तसेच व्यक्तिगतद़ृष्ट्या अनेक गरजू गरीब विद्यार्थी, नातेवाईक किंवा आप्तस्वकीय अशा अनेक गरजूंना आवश्यक ती मदत केली. पण या मदतीची कधी टिपणे केली नव्हती, कारण निरपेक्ष वृत्तीने ती मदत केलेली असे. परतीची अपेक्षाच नसे. भाऊंचे ज्येष्ठ चिरंजीव रवींद्र हे त्यांचा हा वारसा चालवतात. त्यांचा व्यवसाय मंगल कार्यालयाचा. संघपरिवारातले कार्यक्रम, कार्यकर्त्यांच्या बैठका, काही धार्मिक कार्यक्रम, आपल्याच समाजातील एखाद्या गरीब मुलीचे लग्न अशा कार्यक्रमांच्या वेळी व्यावसायिक वृत्तीपेक्षा भाऊंकडून आलेला सामाजिक सेवेचा संस्कार रवींद्र यांच्या मनात अधिक जागा असतो. नाममात्र दर लावणे, प्रसंगी मोफतही व्यवस्था करणे हे अगदी सहज घडून जाते. रवींद्र हे ह.भ.प. श्री अंमळनेरकर महाराजांच्या परंपरेचे पाईक असणे हाही एक महत्त्वाचा भाग त्यांच्या या कृतीत आहेच. संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीशी भाऊंचा व्यवहार अगदी सरळ, प्रेमळ असाच असे. अगदी त्यांना ज्यांच्याकडून त्रास झाला, त्यांच्याशीही ते मनात काही ठेवून कधीच वागले नाहीत. त्यांना वाचनाचा छंद होता. त्यांचा स्वत:चा पुस्तकसंग्रहही चांगला होता. नोकरीत मुख्याध्यापक असलेले भाऊ जीवन व्यवहारातही शिस्तीच्या बाबतीत मुख्याध्यापकच होते. त्यांच्याशी बोलताना अनेकांच्या मनात आदरयुक्त भीती असे.
 
 
निरंजन हा भाऊंचा नातू - मुलीचा मुलगा. आपल्या भावना व्यक्त करताना म्हणतो, “माझी कामे पाहायला भाऊ तुम्ही असायला हवे होते. तुमच्यासारखे आजोबा मिळणे ही माझ्या द़ृष्टीने भाग्याचीच गोष्ट. तुमचा लोकसंग्रह, सामाजिक कार्य या सार्‍या गोष्टी म्हणजे माझ्या द़ृष्टीने एक प्रकारचे सुरक्षाकवच होते. अनेक गोष्टींत तुमचे मार्गदर्शन मला लाभले. त्याचा दैनंदिन जीवनात मला उपयोग होतो. त्यामुळेच पदोपदी तुमची स्मृती मनात जागती असते.”
 
 
 
खरे तर भांऊचे कार्य असे मर्यादित शब्दांत लिहिणे ही सोपी गोष्ट नाही. पण त्यांच्याविषयी एखादा ग्रंथ करावा तर यांच्याविषयी सांगणारी त्यांच्याबरोबरची कार्यकर्ते मंडळीही आता नाहीत. शिवाय स्वत:बद्दल त्यांनी काही लिहूनही ठेवलेले नाही. दाण्याने भरलेले कणीस इतरांना मिळावे, म्हणून एक दाणा स्वत:ला जमिनीत गाडून घेतो. अशाच मनोवृत्तीने कार्य करणार्‍या पठडीतील भाऊंचा आदर्श घेऊन आपणही कार्यरत राहणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली!