कुठे शिवाजी अन् कुठे औरंगजेब!

विवेक मराठी    05-Feb-2024
Total Views |
‘छत्रपती शिवाजी महाराजांमुळे भारतातल्या परक्या मोगल राजवटीला यशस्वी सुरुंग लावून हिंदुपदपातशाहीची मंगल स्थापना झाली’ असे सावरकरांनी सांगितले. वर्तमानात छ. शिवाजीराजांच्या राज्याभिषेकास साडेतीनशे वर्षे पूर्ण होत आहेत व याच वर्षी प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मभूमीवर भव्य मंदिराचे पुनर्निर्माण झाले आहे. या पृष्ठभूमीवर शिवाजी महाराज व पापी औरंग्या यांच्यातले गहिरे अंतर सप्रमाण विशद करणे अतीव आवश्यक आहे, यासाठी हा लेखनप्रपंच.

shivaji maharaj
 
सा. विवेकचे कार्यकारी संपादकपद भूषविणार्‍या अश्विनी मयेकर यांनी लिहिलेला ‘राजमाता - राष्ट्रमाता जिजाऊ’ या शीर्षकाचा लेख (पाहा - सा. विवेक, दि. 8 जानेवारी 2024 ते 14 जानेवारी 2024) मला मनस्वी आवडला. विशेषत: या लेखातले दोन अभिप्राय मला भावले, म्हणून त्यांच्या लेखाला पूरक असा लेख लिहिण्यास मी सज्ज झालो आहे. हे दोन अभिप्राय ज्या परिच्छेदात वाचण्यास मिळतात, तो परिच्छेद असा - ‘जिजाऊसाहेबांनी महाराजांना केवळ पुण्याची जहागीर राखण्यासाठी तयार केले नाही, तर त्यांच्यासमोर हिंदवी साम्राज्याचे मोठे उद्दिष्ट ठेवले. त्यासाठी शिवरायांना स्वत:च्या सुखावर तुळशीपत्र ठेवावे लागेल, जिवाची बाजी लावावी लागेल याची जिजाऊंना कल्पना होती. पोटी जन्माला आलेल्या सहा मुलांपैकी दोनच जगलेले. त्यातला थोरला मारला गेलेला. अशा वेळी सर्वसमान्य बाई असती, तर ती राहिलेल्या एकुलत्या एका मुलाला अशी स्वप्ने दाखवती ना! पण हेच जिजाबाईंचे वेगळेपण होते. म्हणूनच इतिहासाला त्यांचे कधी विस्मरण झाले नाही. यापुढेही होणार नाही.’
 
 
हा परिच्छेद आपणास सांगतो की, एकतर जिजाबाईंनी शिवाजीराजांसमोर हिंदवी साम्राज्याचे उद्दिष्ट ठेवले आणि स्वत:च्या आगळ्यावेगळ्या जीवनरेखेतून त्यांनी त्यांच्या सुपुत्राला घडविले! हे दोन अभिप्राय वाचकांना सांगतात की औरंगजेबाशी तुलना केली, तर शिवाजी महाराज अक्षरार्थाने हिमालयसदृश भासतात आणि औरंगजेब शिवछत्रपतींसमोर स्वत:च्या दिवाळखोरीमुळे धुळीस मिळालेला मोगल बादशहा ठरतो. पण अश्विनी मयेकर वाचकांना सुचवितात की, शिवछत्रपतींच्या असाधारण पुरुषार्थाची बीजे त्यांच्या शैशवातच त्यांच्या जन्मदात्रीने पेरली.
 
 
प्रस्तुत लेखाचे शीर्षक वाचून कुणालाही सुप्रसिद्ध मराठी म्हण आठवेल - ‘कुठे इंद्राचा ऐरावत नि कुठे श्यामभटाची तट्टाणी!’ मोजून एकशे एक वर्षांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘हिंदुपदपातशाही’ हा प्रबंध प्रसिद्ध केला व ज्या काळात मुसलमानांच्या तुष्टीकरणासाठी ‘शिवाजी, राणा प्रताप व गुरू गोविंदसिंह म्हणजे वाट चुकलेले देशभक्त’ हे समीकरण सगळ्यांच्या हृदयांवर बिंबवण्याची खटपट चालू होती, त्याच काळात ‘नेमक्या याच देशभक्तामुळे आणि खास करून शिवाजी महाराजांमुळे भारतातल्या परक्या मोगल राजवटीला यशस्वी सुरुंग लावून हिंदुपदपातशाहीची मंगल स्थापना झाली’ हे सावरकरांनी सांगितले. वर्तमानात शिवाजीराजांच्या राज्याभिषेकास साडेतीनशे वर्षे पूर्ण होत आहेत व याच वर्षी प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मभूमीवर भव्य मंदिराचे पुनर्निर्माण झाले आहे. या पृष्ठभूमीवर शिवाजी महाराज व औरंग्या पापी यांच्यातले गहिरे अंतर सप्रमाण विशद करणे अतीव आवश्यक आहे.
 
 
केवळ जन्म आणि मृत्यू या निकषांवर या दोन व्यक्तिमत्त्वांची तुलना कुणी करण्याचे योजिले, तर त्यांच्या लक्षात येईल की औरंग्या महालात जन्माला आला असेल व जन्मापासून मृत्यूपर्यंत त्याने कैक ऐशआराम भोगले असतील, पण मृत्यू आला तो विमनस्क मन:स्थितीत अन् पराभवाच्या गर्तेत! याउलट शिवप्रभूंचा जीवनक्रम आहे - जिजामाता गर्भवती होती, तेव्हा तिला रानोमाळ भटकावे लागले. शिवाजीराजे जन्माला आले, पण त्यांच्या शैशवात जिजामातेेने अपार कष्ट उपसून वनाचे नंदनवन केले. मोगल बादशहा आणि दख्खनचे सुलतान अडीच तपे सत्तेसाठी आपापसात झुंजत होते आणि या टकराटकरीत पुणे प्रांताची केवढी नासाडी झाली होती. जिजाऊसाहेबांनी दादोजी कोंडदेवांच्या साहाय्याने पुण्याचा कायापालट करण्याचा निर्धार खरा करून दाखविला. शिवाजी महाराजांचा जीवनक्रम या अडीअडचणींतून वाट काढत विजयाच्या दिशेने उलगडत गेला. औरंगजेबाचा जीवनक्रम मात्र विजयाकडून पराजयाकडे, वैभवाकडून पराभवाकडे, उत्कर्षाकडून उद्विग्नतेकडे उलगडत गेला. शिवाजीराजांनी लहानपणीच अनुभवले की, शहाजीराजांना आदिलशहाने अटक केली आहे व फत्तेखानाच्या नेतृत्वाखाली शिवाजीराजांचा पराभव करण्यासाठी फौज रवाना केली आहे. पण लहान वयातच थेट शहाजहान बादशहाशी संगनमत करून शिवप्रभूंनी आदिलशहावर मात केली. नंतर उभ्या आयुष्यात कधी शक्तीच्या, तर कधी युक्तीच्या बळावर विसंबून शिवप्रभू स्वराज्यस्थापना करून कृतार्थ झाले. औरंगजेब मात्र सर्व गमावून बसला. ज्या महाराष्ट्रात तो भगव्याला नेस्तनाबूत करण्यासाठी आला, त्याच महाराष्ट्रात नगरमुक्कामी दु:खीकष्टी अवस्थेत तो स्वत:च नेस्तनाबूत झाला. त्याच्या मुलाने त्याला अहमदाबादेहून तेव्हा पत्र पाठवून विचारणा केली - ‘तुमची सेवा करायला नगरला येऊ का?’ औरंगजेबास आठवले, त्याने त्याच्या तीर्थरूपांची सेवा कशी केली होती.. आपला चिरंजीव आपलीही सेवा याच शैलीने करील, हे त्याला जाणवले अन् त्याने कळविले, ‘तू येऊ नकोस!’ याउलट शिवाजी महाराज केवढ्या सुखासमाधानात स्वर्गवासी झाले, हे आठवून पाहा. काबुल ते तुंगभद्रा या लांबलचक प्रदेशात आलमगीर म्हणून दिमाखात राहिलेला औरंगजेब भणंग अवस्थेत कबरीखाली गाडला गेला. शिवाजी महाराजांच्या शवयात्रेत जो जो मावळा सहभागी झाला असेल, त्याला राजा दिलीप यांच्या शवयात्रेतला एकेक नागरिक काय म्हणाला असेल त्याचे स्मरण झाले असेल - ‘स पिता पितरस्तासां केवलं जन्महेतव:’ (मृत झालेला हा राजाच आमचा पिता आहे. घरी आहेत ते केवळ आमचे जन्मदाते.)
 
 
शिवाजीराजे अधिकाराचे प्रतिनिधित्व करतात. औरंगजेब ‘सत्ता’ प्रतिबिंबित करतो. त्याग, समर्पण, वैराग्य अशा गुणसंपदेवर अधिकार अवलंबून असतो, सत्ता ज्या आसनावर तुम्ही बसलेले आहात, त्या आसनावर अवलंबून असते, म्हणूनच अधिकार स्वयंप्रकाशी, तर सत्ता परप्रकाशी असते. अधिकार चिरंजीव तर सत्ता अल्पजीवी! साडेतीनशे वर्षे उलटल्यावरही शिवरायांचा राज्याभिषेक चैतन्यदायक व नवी ऊर्जा उत्पन्न करणारा.. औरंगजेबाचे नावही कुठल्या शहराला व रस्त्याला देऊ नका. ‘परक्यांची या टाका पुसुनि अवघी नावनिशाणी’ हेच सर्वसामान्य भारतीय आज सांगतोय.
 
 
शिवाजीराजांनी स्वप्ने पाहिली, ती अवघी भारतभूमी मोगलांच्या जोखंडातून मुक्त करण्याची अन् शिवरायांच्या मृत्यूनंतर सतरा वर्षे त्यांच्या अनुयायांनी औरंगजेबाचा घाम काढला. म्हणता म्हणता सन 1770नंतर मोगलाई भारतात निष्प्रभ झाली.
 
 
हिंदुपदपातशाहीच्या मार्गातली एक विरोधी प्रभावी शक्ती म्हणून तिचा विचार करण्याचे आता कारण राहिले नाही.’ (पाहा - वीर सावरकर लिखित ‘हिंदुपदपातशाही’.)
 
 
औरंगजेब सर्व काही गमावून बसला. शिवाजीराजांची कमाई शुक्लपक्षातल्या चंद्रकलेप्रमाणे विकसित होत गेली. एक जण भारताच्या सर्व मूल्यकल्पनांना धुळीस मिळवून परकी सत्ता इथे दृढमूल करण्यासाठी निघाला होता. त्याची स्वत:चीच धूळधाण होेणे अटळ होते. दुसरा याच मातीतल्या मौलिक मूल्यांची गुढी उंच उभारण्यासाठी वाट्टेल ते कष्ट उपसण्याला सिद्ध झाला अन् ही गुढी उभारूनच तो देवाघरी परतला. कविवर्य नानाराव पालकरांनी किती मार्मिक शब्दांमधून शिवछत्रपतींच्या इच्छा-आकांक्षा व्यक्त केल्या आहेत, पाहा -
 
 
किल्ल्यांचे वळले दिल्लीकडे दरवाजे।
श्रीशिवरायांची इच्छा त्यांना उमजे।
ते दूर न उरले आता काश्मीर सिंध।
धुमधडाम धुम हो रायगडावर नाद॥
 
 
औरंगजेब अपयशी ठरला, कारण त्याने जमविलेले सैन्य स्वार्थात, स्वत:च्या हौसमौजेत गर्क होते. शिवरायांनी मात्र असे मावळे एकत्र केले, जे भगव्या ध्वजाखाली स्वत:च्या प्राणांच्याही आहुती देण्यास सिद्ध होते. औरंगजेबाचा मामा म्हणजे शाहिस्तेखान. हा भाच्याच्या हुकमावरून पुण्यास आला. तीन वर्षे तो पुण्यनगरीत राहिला. या तीन वर्षांत त्याने मुलीच्या लग्नाचा थाटमाट साजरा केला, मेजवान्या झोडल्या, तेव्हा त्याला कुणी सवाल केला, “खानसाहेब, आलमगीर बादशहाने तुम्हाला पुण्याला पाठविले ते शिवाजीला पकडण्यासाठी अन् तुम्ही तर तो आदेश विसरून मौजमजा करीत आहात?” शाहिस्त्याने दिलेले उत्तर उद्धृत करण्याजोगे आहे. “भल्या माणसा, माझ्या भाच्याला मी चांगला ओळखतो. समजा, मी शिवाजीला पकडून थेट माझ्या भाच्यासमोर उभे केले, तर तो इरसाल आलमगीर तुला, मला व माझ्या सर्व सहकार्‍यांना काबुल-कंदाहारला पाठवेल. त्या थंडीत कुडकुडत मरायचे का?” शिवरायांकडे बाजीप्रभू देशपांडे होते, तानाजी मालुसरे होते, हिरोजी फर्जंद होते. स्वत: शिवप्रभू अफजलखानाला सामोरे गेले, औरंग्याला भेटले अन् मरणप्राय संकटांवर मात करून विजयी झाले, हा आदर्श त्यांच्या अनुयायांसमोर होता, म्हणून तर एकेक वीर भीमपराक्रम करून धन्य झाला. कुठे बेवड्याची बाटली अन् कुठे अमृताची कुपी!
 
 
औरंगजेब त्याच्या पंथाचा प्रसार करण्यासाठी अनंत अपराध करीत मरण पावला. शिवाजी महाराजांना धर्म प्रिय होता, म्हणूनच न्याय व माणुसकी ही तत्त्वे रुजवीत त्यांनी सज्जन अहिंदूंनाही हृदयाशी कवटाळले व मशिदी बांधून दिल्या. त्यांनी औरंगजेबाला पत्र लिहून कळविले की हिंदुमात्रावर जिझिया कर लादणे अल्ल्याच्याही मर्जीतून उतरणारे कृत्य आहे. जिजामातेने आपल्या लाडक्या लेकाला रामायण-महाभारतातली कथानके सांगितली. कुणाचाही त्याच्या उपासना पंथावरून कधी द्वेषमत्सर करू नये अशा आशयाचे महान मार्गदर्शन मातेने केले व या मार्गदर्शनामुळेच शिवाजी महाराजांचे राज्य रामराज्याची स्मृती जागविणारे ठरले!
औरंगजेबाला आयुष्याच्या संध्याकाळी पश्चात्ताप झाला. ‘आपण शिवाजीराजांना आग्य्राच्या तुरुंगातून मुक्त होऊन महाराष्ट्रात परतण्याची संधी दिली. या इरसाल दुश्मनाला वेळीच पायबंद घालण्यात आपण अपयशी ठरलो.’ असे पश्चात्तापदग्ध उद्गार औरंगजेबाने काढले, तर शिवाजीराजांच्या निधनानंतर ‘एक कर्तृत्वसंपन्न माणूस आता मरण पावला’ या शब्दांत औरंगजेबानेच आपल्या दुश्मनाचे तोंडभरून कौतुक केले. औरंगजेब मरण पावला व मोगल राजवटीला शेवटची घरघर लागली. म्हणता म्हणता मराठी वीरच दिल्लीचे भवितव्य ठरवू लागले. डॉ. पु.ग. सहस्रबुद्धे यांनी या संदर्भात मराठ्यांच्या सुयशाचे मनोज्ञ समालोचन वा रसग्रहण करताना शिवरायांची केलेली प्रशंसा उल्लेखनीय आहे, ती अशी - ‘अखिल भारतातून मुस्लीम सत्तेची पाळेमुळे खणून काढण्यात मराठ्यांना यश आले, याचे एक कारण हे की प्रारंभापासूनच त्यांचा संकल्प तसा होता. पंधराव्या वर्षीच शिवछत्रपती ‘हिंदवी स्वराज्याचे’ स्वप्न पाहत होते आणि छत्रपतींपासून पाटीलबाबांपर्यंतच्या दीडशे वर्षांच्या काळात प्रत्येक मराठ्याच्या मनापुढे हिंदुपदपातशाहीचे हेच भव्य स्वप्न सारखे उभे होते. दिल्ली सर करावयाची आहे, अवनिमंडल निर्यवन करायचे आहे हाच मराठ्यांना ध्यास होता. या भव्य आकांक्षेमुळेच त्यांना अटकेपासून म्हैसूरपर्यंत आणि अहमदाबादेपासून जगन्नाथपुरीपर्यंत मराठा साम्राज्याची स्थापना करता आली.’ (पाहा. हिंदू समाज - संघटना आणि विघटना, पान क्र. 140.)
 
 
पंधराव्या वर्षी शिवबाराजे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहात होते. कारण त्यांची जन्मदात्री जिजाईमाउली स्वत:ही याच वेडाने झपाटलेली होती.
 
 
जदुनाथ सरकार यांनी या मायलेकरांवर केवढी प्रशंसापुष्पे उधळली आहेत, पाहा - शिवप्रभूंच्या उदयापूर्वी (खरे म्हणजे या मायलेकरांच्या उदयापूर्वी) मराठा समाज अनंत सवत्यासुभ्यांमुळे छिन्नभिन्न झाला होता. त्यांना संघटित करून शिवरायांनी त्याचे एक राष्ट्र घडविले आणि दिल्लीचे मोगल, विजापूरचे पातशहा, गोव्याचे पोर्तुगीज व जंजिर्‍याचे हबसी या सत्तांशी मुकाबला करून त्यांची आक्रमणे निर्दाळून त्याने हे साधले हे विशेष. ... हिंदुजात ही राष्ट्र निर्माण करू शकते, सेना व आरमार निर्माण करू शकते व स्वराज्य स्थापून ते यशस्वी करू शकते, हे शिवाजीराजांनी सिद्ध करून दाखवले. हिंदुत्व हा वठलेला वृक्ष नसून अनेक शतकांच्या पारतंत्र्यानंतरही तो फुटू शकतो, शाखापल्लवांचा त्याला अजूनही बहर येणे शक्य आहे आणि अनेक शतकांच्या अत्याचारानंतरही पुन्हा उठून गगनाला भिडण्याचे सामर्थ्य त्याच्या ठायी आहे, हे शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले. (पाहा - शिवाजी अँड हिज टाइम्स, पाचवी आवृत्ती, पाने 385-86.)
 
 
शिवाजीराजांपासून प्रेरणा घेऊनच भारताचे पुनर्निर्माण करून प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीवर भव्य मंदिर उभे राहिले आहे. शिवरायांच्या राज्याभिषेकाला जेव्हा साडेतीनशे वर्षे पूर्ण होत आहेत, तेव्हाच पाचशे वर्षांचा कलंक ठरलेला बाबरी ढांचा दूर करून भगवान श्रीराम त्यांच्या जन्मस्थानी उत्साहपूर्ण वातावरणात विराजमान झाले आहेत. आपल्या पिढीचे भाग्य असाधारण, असामान्य आहे.