इही लक्षणी जाणिये योगीराणा!

विवेक मराठी    06-Feb-2024
Total Views |
@आशुतोष अडोणी 9370319789
चित्रपट हे समाजमन घडवण्याचं अतिशय प्रभावी माध्यम आहे. जगणं कसं आहे या वास्तवाचं चित्रण करतानाच ते कसं असायला हवं हा आदर्शवादही विविध व्यक्तिरेखांतून अलवारपणे रंगवता आला पाहिजे, याचं भान असणार्‍या पिढीचे दत्ताजी बिनीचे शिपाई होते. दत्ताजी आयुष्यभर कलेच्या मोहमयी क्षेत्रात वावरले. अशा ठिकाणी सर्वार्थाने नि:संग राहणं फारच कठीण असतं. पण दत्ताजी या चिखलात राहूनही कमलपत्रावत शुचिता सांभाळू शकले, ते केवळ त्यांच्यावरील संघसंस्कारांमुळे. आयुष्यभर केलेली संघसाधना हे दत्ताजींच्या निर्लेप, निरलस, प्रेरक जीवनप्रवासाचं अधिष्ठान आहे. म्हणूनच आभाळाएवढी उंची गाठूनही त्यांचे पाय कायम घट्टपणे जमिनीशी जुळले आहेत. प्रजासत्ताकाच्या पूर्वसंध्येला राजदत्त यांना जाहीर झालेला ‘पद्मभूषण’ पुरस्कार म्हणजे कलाक्षेत्रातील या योगतपस्व्याचा केलेला बहुमान आहे. त्यांचे या पार्श्वभूमीवर रेखाटलेले हे शब्दचित्र...
rajdutt films
 
उमलत्या वयात ज्ञानेश्वर माउलींचं पसायदान म्हणताना एक प्रश्न नेहमी अस्वस्थ करायचा. ‘चंद्रमे जे अलांछन’ आणि ‘मार्तंड ते तापहीन’ ही ईश्वरनिष्ठ सज्जन सोयर्‍याची लक्षणं खरंच कधी वास्तवात दिसू शकतील का? अलांच्छित चंद्र आणि तापहीन सूर्य हा केवळ माउलीच्या चिदाकाशाला स्पर्श करणार्‍या उत्तुंग प्रतिभेचा विलासच असेल ना?
 
 
चंद्र आणि कलावंत दोघेही सहोदर. त्यांच्या चारुतेला कुठल्यातरी लांछनाचा शाप असतो. तर सूर्य आणि प्रतिभावंत दोघेही समानशील. त्याची दाहकता त्यांना नकळत समाजविमुख करत असते. मात्र माउलींची ओवी सार्थ करणारा, चंद्र मे जे अलांछन आणि मार्तंड जे तापहीन असणारा एक अलौकिक नि:संग कलायोगी मराठी चित्रपटसृष्टीला गेली पन्नास वर्षं याची देही याची डोळा अनुभवायला मिळतो आहे. मार्तंडासारखं प्रतिभेचं लखलखीत तेज लाभूनही इतरेजनांसाठी तापहीन असलेला आणि चंद्राची शीतलता आणि चारुता लाभूनही चित्रसृष्टीच्या मायावी जगतात आपलं चारित्र्य स्फटिकवत अलांंच्छित राखलेला, कमळासारखा शुभ्र! कलासृष्टीतील या कैलास लेण्याचं नाव ‘राजदत्त’!
 
2005च्या डिसेंबर महिन्यातील गोष्ट. अकोला येथे संस्कार भारतीची विदर्भ प्रांत बैठक होती. मी बैठकस्थळी सकाळी 4च्या सुमारास पोहोचलो. निवासव्यवस्था एका मंगल कार्यालयात होती. दिवस उजाडायचा होता. कार्यालयाला जाग यायची होती. थोड्याच वेळात दरवाजा पुन्हा खटखटला. बाहेर चुरगळलेल्या कपड्यातील एक वृद्ध इसम उभा होता. ‘’बैठक इथेच आहे ना?” त्यांनी विचारणा केली. मी होकार देताच तो आत आला. त्यांना पाहून मी विस्मयचकित झालो. ते चक्क राजदत्त होते. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि संस्कार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष! मला काय बोलावं सुचेना. “पण दत्ताजी, माझ्या माहितीप्रमाणे तुमची व्यवस्था कुठल्यातरी हॉटेलमध्ये..” माझं वाक्य मध्येच तोडत ते म्हणाले, “हो, स्टेशनवर घ्यायला आलेल्या कार्यकर्त्यांनी तिकडेच नेलं होतं. पण मला तिथे गमेना.. म्हणून इकडे निघून आलो.. तुझ्या बाजूला सामान ठेवलं तर चालेल ना?” त्या अतिशय मृदू आणि आर्जवी प्रश्नावर मी काही बोलण्याआधीच त्यांनी आपली वळकटी माझ्या बाजूला ठेवलीसुद्धा आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी तब्बल 17 राष्ट्रपती पदकं मिळवलेला तो अलौकिक प्रतिभावंत क्षणभरातच चक्क एका सतरंजीवर आडवाही झाला.
 
 

rajdutt films
 
राजदत्तांची माझी जाणत्या वयातील ही पहिली आठवण! मनात नेहमीसाठी कोरून गेलेली. खूप काही शिकवून गेलेली. एका श्रेष्ठ कलावंतातील नितांत साधं, सालस, निगर्वी माणूसपण अनुभवाला आणून देणारी. ‘मीपण ज्यांचे पक्व फळापरी गळले हो, जीवन त्यांना कळले हो’ या काव्यपंक्तीची सार्थकता पटवून देणारी !
 
 
पुढे दत्ताजींच्या सहवासाचं भाग्य अनेक प्रसंगांतून लाभलं. त्यातून त्यांच्या असामान्यत्वाचे, विलक्षण प्रतिभेचे, ऋजू, सात्त्विक, नर्मविनोदी स्वभावाचे अनेक पैलू मनात घर करीत गेले. पण प्रत्येक वेळी ठाव घेत गेला तो त्यांचा हा जगावेगळा आत्मविलोप, कमालीची संवेदनशीलता आणि चित्रपटासारख्या मोहमयी जगतालाही डागाळता न आलेली त्यांची कमलवत शुचिता!
 
 
संवेदनशीलतेवरून आठवलं. काही वर्षांपूर्वी दत्ताजींनी पंजाबराव देशमुखांवर एक चित्रपट केला होता. अमरावतीच्या शिवाजी शिक्षण संस्थेने या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी त्यांना गळ घातली होती. वयाच्या 82 व्या वर्षी दत्ताजींना दिग्दर्शन करताना बघणं हा वेगळाच आनंद योग होता. त्यांच्यातील असामान्य प्रतिभेचे ते मनोहारी उन्मेष केवळ अनुभवण्यासारखे होते. छोटा पंजाब सकाळच्या न्याहारीसाठी चुलीसमोर आपल्या माय जवळ बसला आहे.. त्या चंद्रमौळी झोपडीतील कौलातून निथळणार्‍या उन्हाची तिरीप छोट्या पंजाबच्या चेहरा उजळून टाकते आहे.. ती तिरीप हवी तशी आणि हवी तेवढी सेट होईपर्यंत दत्ताजी अस्वस्थ होते. त्यांची चाललेली तगमग त्यांच्यातील सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकाच्या प्रतिभेचं विहंगम दर्शन आम्हाला घडवीत होती. या आणि अशाच अनेक प्रसंगात याही वयात सलग सहा तास उभे राहून काम करणारे दत्ताजी त्यांच्या लखलखत्या चंदेरी यशामागे केवढे मोठे परिश्रम आणि तपस्या उभी आहे याचा जणू वस्तुपाठच आम्हाला देत होते. दिवसभराचं काम आटोपून दत्ताजी रात्री उशिरा केव्हातरी त्यांच्या निवासाची व्यवस्था असलेल्या शिवाजीच्या अतिथीगृहात पोहोचत, त्या वेळी तिथे कोणीच नसे. कारण “मी येईपर्यंत तू उगाच कशाला जागतोस? त्यापेक्षा घरी जाऊन आराम कर. माझी काळजी करू नको” म्हणून दत्ताजींना तिथल्या चौकीदाराला कायमची सुट्टी दिलेली असे.. बाळंतपणाला आलेल्या त्याच्या लेकीला त्याला वेळ आणि सहवास देता यावा, म्हणून.
स्वभावातील हे कनवाळू, मायाळूपण ही दत्ताजींची खरी ओळख. नुसती आठवण आली, तरी त्यांचा हात आपल्या पाठीवरून फिरतो आहे याची अनुभूती व्हावी असं हे ‘मायाळू’पण दत्ताजींना आईवडिलांच्या कुशीतूनच प्राप्त झालंय. त्यांचं आडनावच मायाळू. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव या छोट्या गावी 1934 साली दत्ताजींची जन्म झाला. वडील रेल्वेमध्ये नोकरीला असल्यामुळे विदर्भातील विविध ठिकाणी त्यांचं वास्तव्य झालं. अगदी लहानपणीच संघसंस्काराचं बाळकडू मिळालं. वर्ध्याला आप्पाजी जोशी यांच्याशी निकटचा संबंध आला आणि संघ हा त्यांच्या आयुष्याचा श्वास- नि:श्वास झाला तो आजन्म. वर्ध्याला रामनगर शाखेतील सवंगडी रामभाऊ मेंढेवार, अनंतराव गुजर, अण्णाजी घरोटे, मोदा देशमुख यांच्यासह त्यांनी काही नाटकांचं सादरीकरण केलं. संघसंस्कारांतून त्यांच्या मनात देशभक्ती, कठोर शिस्त आणि सामाजिक संवेदनशीलता यांचं बीजारोपण झालं. याच संवेदनशीलतेमुळे दत्ताजींचा भाऊसाहेब माडखोलकरांशी संबंध आला आणि त्याच संबंधातून पुढे सिनेसृष्टीची वाट अलगद आणि अवचित त्यांच्यापुढे उभी ठाकली.
चित्रपटसृष्टीला मोठं योगदान देणार्‍या या कलातपस्व्याच्या आयुष्याची चित्तरकथाही एखाद्या चित्रपटासारखीच आहे, रंजक, पण खूप वाटा-वळणांची. कधी काट्या-खळग्यांची, कधी मानसन्मानाची.
 
 तरुण दत्ताजींना खरं तर पत्रकार व्हायचं होतं. शिक्षण संपल्यानंतर भाऊसाहेबांच्या प्रेरणेने मुंबईला पोटापाण्यासाठी गेलेले दत्ताजी एका वर्तमानपत्रात रुजूही झाले.
एका शालेय ट्रिपमध्ये बल्लारशाच्या कोळसा खाणीतील एका कामगाराच्या विदारक जीवनावर बाल दत्ताजींनी लिहिलेला करुण निबंध शाळेतल्या शिक्षकांनी तरुण भारताला पाठवला. भाऊसाहेब माडखोलकरांना तो खूपच भावला. त्यातून त्यांच्याशी स्नेह जुळला. तरुण दत्ताजींना खरं तर पत्रकार व्हायचं होतं. शिक्षण संपल्यानंतर भाऊसाहेबांच्या प्रेरणेने मुंबईला पोटापाण्यासाठी गेलेले दत्ताजी एका वर्तमानपत्रात रुजूही झाले. पण काही कालावधीतच ते बंद पडलं. पुढे काय हा प्रश्न होता. भाऊसाहेबांच्याच शिफारशीने ते मद्रासच्या चांदोबा मासिकात रुजू झाले. हा त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट होता. चांदोबाच्या मराठी आवृत्तीचं आपलं काम आटोपलं की ते जवळच्या फिल्म स्टुडिओत जाऊन बसत. तिथेच राजा परांजपे यांच्याशी भेट झाली आणि दत्ता मायाळूचा राजदत्त म्हणून पुनर्जन्म झाला.
 
 
चांदोबाची सुरक्षित नोकरी सोडून दत्ताजींनी राजा परंजपेंसोबत पुन्हा मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला. एका मध्यमवर्गीय, वैदर्भीय तरुणाचं ते किती मोठं धाडस होतं. सर्वार्थाने अपरिचित क्षेत्रात, भल्याभल्यांना भुलवणार्‍या मायानगरीत, समोर सारीच अनिश्चितता उभी असताना स्वत:ला झोकून देणं हे एक अग्निदिव्यच होतं. पण राजा परांजपे यांचा परीसस्पर्श झाला आणि त्या अग्निपरीक्षेतून त्यांचं जीवन चकाकून बाहेर आलं.
 
 ‘राजा परांजपे’तील ’राज’ आणि दत्तात्रय मायाळू यातील ’दत्त’ यातून सिनेसृष्टीला असामान्य दिग्दर्शक राजदत्त मिळाला.
 
राजा परांजपे यांना गुरू मानून एका चित्तथरारक प्रवासाला सुरुवात झाली आणि ‘राजा परांजपे’तील ’राज’ आणि दत्तात्रय मायाळू यातील ’दत्त’ यातून सिनेसृष्टीला असामान्य दिग्दर्शक राजदत्त मिळाला.
 
 
1960-61मध्ये जगाच्या पाठीवर या चित्रपटात राजा परांजपे यांच्यासोबत सहदिग्दर्शक म्हणून दत्ताजींनी काम केलं. तो काळ मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगाचा होता. अनेक नवे प्रयोग होत होते. मराठी चित्रपट त्या वेळी कात टाकीत होता. स्वातंत्र्योत्तर सुखासीन समाजजीवनाचे आणि त्यातील विविध उन्मेषांचे पडसाद रुपेरी पडद्यावर साकारायला सुरुवात झाली होती.
 
rajdutt films
 
दत्ताजींनी स्वत: दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट मधुचंद्र. त्यातील कथानक, गाणी, सोज्वळ अभिनय सार्‍यांनाच रसिकांनी डोक्यावर घेतलं. एका सरस चित्रपटाची निर्मिती करून दत्ताजी या मायावी जगात प्रतिष्ठित झाले. मधुचंद्र खूप गाजला. या चित्रपटाने त्यांना स्वतंत्र ओळख मिळवून दिली. त्या वेळचा एक गमतीदार किस्सा दत्ताजी नेहमी सांगतात. आपला एक स्वयंसेवक चित्रपट जगतात नावलौकिक कमावतो आहे, याचं आप्पाजी जोशींना खूप कौतुक वाटत होतं. आपणही हा चित्रपट बघावा अशी त्यांची खूप इच्छा. आप्पाजी कर्मठ संघकार्यकते. प्रणयकथा असलेला ’मधुचंद्र’ आप्पाजींना कसा दाखवावा, याचा दत्ताजींना खूप आदरयुक्त संकोच वाटत होता. अखेर आप्पाजी गमतीने म्हणाले, “अरे, माझंही लग्न झालंय आणि मधुचंद्रही. तेव्हा संकोच करू नकोस. मला तुझी कलाकृती बघायची आहे. तू संघस्वयंसेवक या नात्याने योग्य तेच दाखवलं असेल हा माझा विश्वास आहे.” आप्पाजींचा हा विश्वास दत्ताजी आजतागायत सांभाळत आहेत, म्हणूनच त्यांचा कोणताही सिनेमा सवंगतेला थारा देणारा नाही, तर निखळ रंजनाबरोबर नकळत कौटुंबिक प्रबोधन करणारा ठरला आहे. नवरसांची, रंग, नाद, लावण्य, शृंगार या सगळ्यांची नयनरम्य उधळण पडद्यावर करताना अभिरुचिहीन असं काहीही त्यातून झळकलं नाही. चित्रपट हे समाजमन घडवण्याचं अतिशय प्रभावी माध्यम आहे. जगणं कसं आहे या वास्तवाचं चित्रण करतानाच ते कसं असायला हवं हा आदर्शवादही विविध व्यक्तिरेखांतून अलवारपणे रंगवता आला पाहिजे, याचं भान असणारी ती पिढी होती. दत्ताजी त्या पिढीचे बिनीचे शिपाई होते.
 
मधुचंद्र या पहिल्याच चित्रपटाने त्यांचा नावलौकिक झाला, पण पुढे सात-आठ महिने कोणतंही काम मिळेना. जगण्याचा प्रश्न भेडसावू लागला. परत जाऊन पुन्हा पत्रकारिता वा शिक्षकी पेशात शिरावं, हा विचार प्रबळ होऊ लागला. त्याच वेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीमती सुलोचनाबाई मदतीला धावून आल्या. सुलोचनाबाईंनी खास राजदत्तांसाठी ’घरची राणी’ या सिनेमाची निर्मिती केली. त्याला उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर राजदत्तांना मागे वळून बघाव लागलं नाही. मधुचंद्र, घरची राणी, अपराध, झेप, देवमाणूस, धाकटी बहीण, चंद्र आहे साक्षीला, वर्‍हाडी वाजंत्री, या सुखांनो या, भालू, देवकीनंदन गोपाला, राघू मैना, अर्धांगिनी, अष्टविनायक, अरे संसार संसार, हेच माझे माहेर, शापित, पुढचं पाऊल, माझं घर माझं माहेर, माझं घर माझा संसार, आपलेच दात आपलेच ओठ, सर्जा, आनंदीआनंद, संघसंस्थापक प.पू. डॉ. हेडगेेवार यांचं जीवनचरित्र दर्शवणारा ‘केशव : संघनिर्माता’ अशा अनेक दर्जेदार कलाकृती त्यांच्या उत्तुंग प्रतिभेतून साकार झाल्या.
 
 
त्यांनी चित्रपटांबरोबरच दूरदर्शनसाठी अनेक संस्कारक्षम मालिकांची निर्मिती केली. मन वढाय वढाय, कथास्तू, कल्याणी, एक चिरंतन ज्योती, गोट्या, मर्मबंध, विनायक दामोदर सावरकर अशा त्यांच्या अनेक मालिका गाजल्या. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सत्तावीस चित्रपटांपैकी एकवीस चित्रपटांना सर्वश्रेष्ठ चित्रपटांचे पुरस्कार मिळाले, या एकाच गोष्टीवरून त्यांच्या कर्तृत्वाची कल्पना येते. शापित या चित्रपटाला फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड, पुढचं पाऊल, शापित, सर्जा यांना राष्ट्रीय पुरस्कार, तर तेरा चित्रपटांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला. सांस्कृतिक आणि चित्रपट जगतातील अनेक प्रतिष्ठित पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले.
 
 
चित्रपट जगतातील अनेक प्रथितयश कलावंतांशी राजदत्तांचे अतिशय आत्मीय संबंध आहेत. गानसम्राज्ञी लता मंगेशकर असो की नाना पाटेकर, डॉक्टर श्रीराम लागू असो की रामानंद सागर, मुकेश खन्ना असो की भीमराव पांचाळ.. या सार्‍या विख्यात कलावंतांना संस्कार भारतीच्या मंचावर आणून त्या कार्याशी त्यांचा परिचय करून देण्याचं श्रेय राजदत्तांचंच. नाना पाटेकर तर त्यांना गुरुस्थानीच मानतात. सुबोध भावे ते स्पृहा जोशीपर्यंतच्या आजच्या आघाडीच्या सर्व कलावंतांचे ते आधारवडच आहेत. या सर्वांसाठी दत्ताजींचा शब्द किती प्रमाण असतो, त्याचा अनुभव आम्ही अनेकदा घेतला आहे.
 
 
जीवनाशी आणि कलेशी अव्यभिचारी निष्ठा हे दत्ताजींच्या व्यक्तित्वाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य. आपल्या उत्तुंग प्रतिभेच्या बळावर दत्ताजी खोर्‍याने पैसा ओढू शकले असते. पण मूल्यांशी आणि तत्त्वांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. जो विचार पटला आणि जो आचार भावला, त्याच्याशी एकनिष्ठ राहून ते पूर्ण समर्पित भावनेने कलाक्षेत्रात वावरले. या मायावी जगताने अनेक कडू-गोड प्रसंग त्यांच्या पदरात टाकले, पण त्याचा त्यांनी कधीही विषाद बाळगला नाही. अनेकांनी त्यांचा नितांत चांगुलपणाचा गैरफायदा घेतला, पण कधीही कोणाबद्दल अनादर वा अधिक्षेपाचा वावगा, टोकदार शब्दही उच्चारताना आजतागायत दत्ताजींना कुणीही बघितलेलं नाही. कशी साधली असेल ही स्थितप्रज्ञता? सर्वसामान्य माणसाला जगताना जो अडचणींचा सामना करावा लागतो, तो त्यांनाही करावा लागला. पण कधीही त्यासाठी कोणापुढे याचनेचे हात त्यांनी पसरले नाहीत. जे जे वाट्याला आलं, ते ते अत्यंत समाधानाने स्वीकारलं. कुठून प्राप्त झालं असेल हे सुखदु:खाचं समत्व? दत्ताजींच्या नुसत्या चेहर्‍याकडे बघितलं, तरी योगित्वाची लक्षणं सांगणारी माउलीची ओवी डोळ्यापुढे तरळून जाते.
 
नसे गर्व अंगी सदा वितरागी
क्षमा शांती योगी,दया दक्ष योगी
नसे लोभ ना क्षोभ ना दैन्य वाणा
इही लक्षणी जाणिये योगीराणा
 
 
दत्ताजी आयुष्यभर कलेच्या मोहमयी क्षेत्रात वावरले. जगण्यातील सार्‍या ईषणा तिथे उजळ माथ्याने वावरत असतात. एका वेगळ्याच झिंगेत आणि झगमगाटात समोर येईल त्याला आलिंगन द्यायला उत्सुक असतात. अशा ठिकाणी सर्वार्थाने नि:संग राहणं फारच कठीण असतं. घसरण्याचा एखादा क्षणच भल्याभल्यांची आयुष्यभराची तपस्या मातीमोल करण्यासाठी टपून बसलेला असतो. पण दत्ताजी या चिखलात राहूनही कमलपत्रावत शुचिता सांभाळू शकले, ते केवळ त्यांच्यावरील संघसंस्कारांमुळे.
 
तप तपस्या के सहारे इंद्र बनाना तो सरल है
 
स्वर्ग का ऐश्वर्य पाकर मद भूलाना ही कठीण है
 
साधना का पथ कठीण है. . . !
 
आयुष्यभर केलेली संघसाधना हे दत्ताजींच्या निर्लेप, निरलस, प्रेरक जीवनप्रवासाचं अधिष्ठान आहे. म्हणूनच आभाळाएवढी उंची गाठूनही त्यांचे पाय कायम घट्टपणे जमिनीशी जुळले आहेत. एखाद्या मोठ्या माणसाने किती साधं आणि सालस असावं? एका कार्यकर्त्याच्या घरातील लग्नकार्याला पोहोचण्यासाठी मिळेल त्या वाहनाने प्रवास करणार्‍या या कलामहर्षीने केवळ आपल्या अवेळी पोहोचण्याचा त्रास कोणाला होऊ नये, म्हणून चक्क नागपूर बस स्थानकाच्या बाकड्यावर एक रात्र काढावी? दंतकथा वाटाव्यात अशा अनेक सत्यकथा देशभरातील संस्कार भारतीच्या कार्यकर्त्यांनी अनुभवल्या आहेत. कार्यकर्ते, मित्र, सुहृद यांच्याबद्दलची ओथंबून वाहणारी अपार अकृत्रिम माया हीच त्याच्या तळाशी आहे. याच ऊबदार स्नेहसूत्राने दत्ताजींनी संस्कार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कलासाधकांची अखिल भारतीय संघटना बांधताना माझ्यासारख्या देशभरातील शेकडो कार्यकत्यांना, कलाकारांना बांधून टाकलं. ‘शुद्ध सात्त्विक प्रेम अपने कार्य का आधार है’ हा संघटनशास्त्राचा मूलमंत्र त्यांनी आपल्या वागण्यातून अलगद शेकडो कार्यकर्त्यांच्याही ओटीत घातला.
 
 
दत्ताजी कार्यकर्त्यांसमोर फार बोलत नाहीत. त्यांचं भाषण म्हणजे अतिशय हळुवारपणे साधलेला हृद्यसंवाद असतो. ये हृदयीचे ते हृदयी साधणारा. भाषेचा फुलोर, वैचारिक अभिनिवेश यापैकी काहीही त्यात नसतं. त्याची गरजही नसते. खरं तर त्या संवादाला शब्दांचीही गरज नसते. त्यांचे नुसते निश्वासही समोरच्यांना जगण्याचं आणि काम करण्याचं अतुलनीय बळ प्रदान करणारे, आयुष्यभराची प्रेरणा देणारे असतात. कारण एक लखलखीत चारित्र्य आणि धगधगीत तपस्या त्या निश्वासांमागे तारण म्हणून उभी असते.
 
 
तुकडोजी महाराजांनी त्यांच्या ग्रामगीतेत कलावंताची लक्षणं अतिशय समर्पक शब्दात सांगितली आहेत.
 
 
कमीत कमी गरजात राहिला,
अधिकात अधिक उपकार केला,
समाजाशी समरस झाला,
तोची खरा कलावंत।
ही जीवनकला ज्यांना गवसली,
त्यांची मानवता विकास पावली,
मानवी देव पदवी लाभली,
सात्त्विक कलावंतासी।
दत्ताजी, तुमच्या रूपाने असा मानवी देव प्रत्यक्ष अनुभवायला मिळणं हे आमचं केवढं मोठं भाग्य!
 
(पूर्वप्रकाशित - नागपूर तरुण भारत)