तेजस्विनी महिला संमेलन - ज्योतीने तेजाची आरती

विवेक मराठी    08-Feb-2024
Total Views |
ठाणे :(नमिता श्रीकांत दामले )
नाना धर्म निगूढ तत्वनिचित यत संस्कृती राजते।
सेयं भारतभू: नितांत रुचिरा मातै: वन: सर्वदा॥
अशी प्रार्थना करून आणि सगळ्यांच्या अंतरंगातील तेजाला लीन भावाने वंदन करून ’भारतीय चिंतनामध्ये स्त्री’ या विषयाचा प्रारंभ करणार्‍या विदुषी धनश्री लेले यांनी संपूर्ण सभागृहाला आपल्या रसाळ वाणीने मंत्रमुग्ध केले.

Tejaswini Women's Conference 
 
राजमाता जिजाबाई ट्रस्ट आयोजित तेजस्विनी महिला संमेलन दि. 28 जानेवारी 2024 रोजी ठाण्याच्या काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात 1200 महिलांच्या सहभागासह साजरे झाले. त्यामध्ये धनश्रीताई प्रमुख वक्त्या होत्या. ‘कटाव’ या गायनप्रकारातून, विद्येची आणि चौसष्ट कलांची देवता गणेशाची स्तुती करणार्‍या अतिशय दमदार सादरीकरणाने संमेलनाची सुरुवात झाली. निकिता भागवत यांनी शब्दबद्ध केलेल्या आणि संस्कार भारतीच्या कलाकारांनी गायलेल्या संमेलन गीतामुळे आणि जीवन संवर्धनच्या मुलींनी सादर केलेल्या दशनमस्कारांमुळे वातावरण उत्साही आणि मंगलमय झाले.
दीपप्रज्वलनानंतर संयोजिका डॉ. अश्विनी बापट यांनी प्रास्ताविकात संमेलनाची भूमिका मांडताना “200हून अधिक संस्थांच्या प्रतिनिधींचा सहभाग यात असून अशी 270 महिला संमेलने विविध नगरांत झाली आणि समाजाच्या सर्व स्तरांतील चार लाखांपेक्षा जास्त महिला यातून जोडल्या गेल्या” अशी माहिती दिली.

Tejaswini Women's Conference
 
प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध अभिनेत्री संपदा जोगळेकर यांनी कोणाशीही स्पर्धा न करता स्वतेजाने तेजस्विनी होऊ या असा कानमंत्र सर्व सख्यांना दिला. तळागाळातील गरजूंसाठी आपली सर्व संपत्ती अर्पण करणार्‍या आणि हजारो कुटुंबांना मदतीचा हात देणार्‍या अनुश्री व आनंद भिडे या दांपत्याला मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्याचे थोर भाग्य या संमेलनाला लाभले.
डॉ. पल्लवी नाईक आणि सहकलाकार यांनी जयोस्तुते या अजरामर पद्यावर अप्रतिम नृत्याविष्कार सादर केला. मधुरिमा पाटकर या अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूचा सत्कार आणि त्यांचे मनोगत झाले. महिला खेळाडूंचा निरनिराळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांत पदक मिळवण्यात असलेला पुढाकार त्यांनी मांडला आणि पालकांनी आपल्या मुलींना खेळांसाठी प्रोत्साहन द्यावे अशी विनंती केली.
डॉ. उल्काताई नातू यांनी अध्यक्षीय भाषणात महिलांनी ध्यान, योग अंगीकारून तंदुरुस्ती राखण्याला प्राधान्य द्यायला हवे, असे आग्रहाने मांडले आणि सेवा, समर्पण आणि साधना यांचे महत्त्व विशद केले.
आत्मोन्नती, स्त्री-पुरोहित, मंदिर व्यवस्थापन क्षेत्रातील अमृतानंदमयी माता, साध्वी ऋतंभरा देवी, क्रीडा क्षेत्रातील मल्लेश्वरी, पी.व्ही. सिंधू, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. रखमाबाई सावे, डॉ. आनंदीबाई जोशी अशी अनेक उदाहरणे देत त्यांनी स्त्रियांचे विविध क्षेत्रांतील योगदान स्पष्ट केले. सामाजिक क्षेत्रातील राष्ट्र सेविका समिती, भारतीय स्त्रीशक्ती अशा संघटनांचा उल्लेख करून सॉफ्ट पॉवर क्षेत्र, साहित्य, नृत्य, संगीत, विणकाम-भरतकाम या कलांचे जतन, कलात्मक दृष्टी आणि वारसा असे कर्तृत्वाचे विविध आयाम नयनाताई सहस्रबुद्धे यांनी आपल्या भाषणातून मांडले.

Tejaswini Women's Conference 
 
स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील महिलांचा सहभाग त्यांनी निरनिराळे दाखले देत मांडला. आधुनिक भारताच्या निर्मितीत महिलांच्या यशाचा आणि सहभागाचा वाढता आलेख त्यांनी राममंदिर ते राष्ट्र मंदिर अशा संकल्पनांमधून स्पष्ट केला.
 
जयश्रीताई कुलकर्णी आणि वंदनाताई विद्वांस यांनी सूत्रसंचालनाची धुरा उत्तमपणे वाहिली. भोजनोत्तर संवादसत्रासाठी अ‍ॅड. माधवी नाईक, डॉ. अलका गोडबोले, सायबर क्राइमच्या नीता मांडवे आणि कळवा रुग्णालयाच्या नलिनी भोरे या तज्ज्ञ मान्यवर सहभागी झाल्या होत्या. वृंदाताई टिळक यांनी या संवादसत्रात श्रोत्यांचे निवडक प्रश्न मान्यवरांना विचारत सुंदर समन्वयन केले. तज्ज्ञ मान्यवरांनी महिलांसंबंधित प्रश्नांची थोडक्यात उत्तरे दिली. निरनिराळी व उपयुक्त माहिती देणे असे या सत्राचे स्वरूप होते.
संयोजकांची सूत्रबद्ध आखणी आणि कार्यकर्त्यांचा अपार उत्साह आणि मेहनत हा या संमेलनाच्या उत्तम आयोजनाचा कणा होता. पितांबरीसारख्या प्रायोजकांनी मोलाचा आर्थिक भार उचलला, ठाणे महानगरपालिकेने काशिनाथ घाणेकर सभागृह उपलब्ध करून दिले, या सर्वांचा ऋणनिर्देश येथे केला गेला.
या संमेलनातून नवीन तेज, नवीन ऊर्जा घेऊन आपापल्या क्षेत्रात जाऊन जोमाने काम करणे आणि आणि दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहाशी जोडून समर्थ करणे हेच या संमेलनाचे खर्‍या अर्थाने फलित ठरेल, म्हणूनच ’सर्वेपि सुखिन: संतु’ या शांतीमंत्राने संमेलनाचे सूप वाजले.
- नमिता श्रीकांत दामले