आकर्षक द्वीपसमूह लक्षद्वीप

विवेक मराठी    08-Feb-2024
Total Views |
@डॉ. श्रीकांत कार्लेकर 9764769791
 
lakshadweep tourist places 
केरळमधील कोची शहरापासून अरबी समुद्रात 220 ते 440 किलोमीटर (साधारण दोनशे सागरी मैल) अंतरावर सुमारे 35 लक्षद्वीप बेटांचा एक विलक्षण सुंदर समूह आहे. यापूर्वी इथे 36 बेटे होती, मात्र पराळी 1 नावाचे मनुष्यवस्ती नसलेले एक बेट वर्ष 2017च्या सप्टेंबर महिन्यात सागरात बुडाले. या बेटांचे क्षेत्रफळ अवघे 32 चौरस किलोमीटर आहे. एकूण 35 बेटांपैकी केवळ 10 बेटांवर मानवी वस्ती आहे. कवरत्ती हे शहर लक्षद्वीपची राजधानी आहे.
 
 
अतिशय लहान आकाराची ही बेटे गेल्या महिन्यात चर्चेत आली ती माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळे. तेथे त्यांनी केलेल्या साहसी सागरी पर्यटनामुळे व त्यांच्या समाजमाध्यमांवरील फोटोंमुळे. मोदींच्या लक्षद्वीप भेटीमुळे मालदीवचे महत्त्व कमी होईल या भीतीने त्यानंतर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी समाजमाध्यमांवर काही आक्षेपार्ह टिप्पणी केली. त्यावर भारताच्या बाजूने अनेक क्षेत्रातून, विशेषत: पर्यटन क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया आली आणि शेवटी मालदीव सरकारकडून या तीन मंत्र्यांना निलंबित करण्यात त्याची परिणती झाली.
 
 
पंतप्रधान मोदींच्या या भेटीमुळे लक्षद्वीपकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे आणि तिथे जाऊन येण्याचे बेतही ठरविले जात आहेत. या निमित्ताने या बेटांविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली.
 
 
पूर्वीही येथे पर्यटन सुरू होतेच, मात्र आता त्याचे प्रमाण तसे मर्यादितच होते. जवळच्या मालदीवला पर्याय म्हणून ही बेटे आता उत्तम पद्धतीने विकसित होऊ शकतात. स्वच्छ, शांत समुद्रकिनारे, मनमिळाऊ आणि तिथे येणार्‍या सर्वांचे मनापासून स्वागत करणारे स्थानिक ही लक्षद्वीपची वैशिष्ट्ये मी जेव्हा तिथे भूशास्त्रीय अभ्यासासाठी गेलो होतो, तेव्हा मलाही खूप आवडली होती.
केंद्र सरकार यापुढे पर्यटनासाठी येथे उत्तम सुविधा निर्माण करण्याच्या योजना आखीत आहे. त्यामुळे भविष्यात जगभरातील पर्यटक लक्षद्वीपला येऊ शकतील. एका अर्थाने मोदींच्या भेटीने लक्षद्वीपचे भाग्य उजळले आहे, असे म्हणता येईल.
 
 
या बेटांची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 64 हजार असली, तरी ती आता एक लाखाच्या पुढे असण्याचा अंदाज आहे. लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेश असून येथून एक खासदार लोकसभेवर निवडून जातो. लक्षद्वीपमध्ये प्रामुख्याने मुस्लीम वस्ती आहे. ही बेटे केरळ उच्च न्यायालयाच्या आधिपत्याखाली येतात. दहा बेटांपैकी कवरत्ती, अगट्टी व मिनिकॉय ही तीन बेटे प्रामुख्याने प्रसिद्ध आहेत. येथे अगट्टी येथे एकच विमानतळ असून, बाकी सर्व वाहतूक कोचीहून समुद्रमार्गे चालते. लक्षद्वीपला जाण्यासाठी लक्षद्वीप प्रशासनाची पूर्वपरवानगी घेण्याची आवश्यकता असते.
 
 
अरबी समुद्रात अनेक वर्षांपूर्वी लक्षद्वीप-मालदीव-छागोस या बेटसमूहांची निर्मिती झाली. या बेटांच्या तळाशी समुद्रात पर्वतांची रांग लक्षद्वीप ते मालदीव अशी पसरलेली आहे. सातव्या शतकात बुद्धांच्या जातक कथांमध्येही या बेटांचा उल्लेख आढळतो. पुरातत्त्वीय संशोधनानुसार, या बेटांवर इ.स.पू. 1500च्या काळात प्रथम मानवी वस्ती झाली असावी. अलीकडच्या ज्ञात इतिहासानुसार, सातव्या शतकात मुस्लीम खलाशांनी सर्वप्रथम या बेटांवर वस्ती केली. मध्ययुगीन कालखंडात चेरा, चौल व कन्नूर या राज्यकर्त्यांनी या बेटांवर राज्य केले. वास्को-द-गामासोबत पोर्तुगीज खलाशी 1498मध्ये या बेटांवर प्रथम आले, मात्र त्यांना 1545च्या आसपास येथून हुसकावून लावण्यात आले. त्यानंतर अराक्कल या मुस्लीम शासकांनी येथे राज्य केले. नंतरच्या काळात टिपू सुलतानाच्या आधिपत्याखाली ही बेटे आली. इंग्रजांनी टिपूचा पराभव केल्यानंतर ही बेटेही इंग्रजांच्या ताब्यात आली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1 नोव्हेंबर 1956 रोजी अनेक राज्यांची व केंद्रशासित प्रदेशांची फेररचना झाली, तेव्हा ही बेटे केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आली.
 
 
भारतीय द्वीपकल्पाच्या दोन्ही बाजूंना लक्षद्वीप व अंदमान-निकोबार बेटे ‘जय-विजय’सारखी उभी राहिलेली दिसतात. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि काळ्या पाण्याची शिक्षा यामुळे अंदमान-निकोबार बेटे अधिक प्रसिद्ध आहेत.
 
 
यामुळेच महाराष्ट्रीय जनतेला अंदमानचे विशेष आकर्षण आहे आणि ते स्वाभाविकच आहे. त्या तुलनेत केरळ वगळता अन्य राज्यांतील जनतेचे लक्षद्वीप बेटांकडे आतापर्यंत फारसे लक्ष गेले नव्हते.
 
 
लक्षद्वीप बेटांवर जायचे असेल, तर कोचीहून पर्यटन परवाना घ्यावा लागतो. लक्षद्वीपला पोहोचण्याचा समुद्री मार्ग हा सर्वात सामान्य मार्ग आहे. लक्षद्वीपमध्ये लोकांना घेऊन जाणारी सात प्रवासी जहाजे आहेत. ते आहेत चत अरबी समुद्र, चत द्वीप सेतू, चत घर्रींरीरीींंळ, चत भारत सीमा, चत चळपळलेू, चत लक्षद्वीप समुद्र आणि चत आळपवर्ळींळ समुद्र. या जहाजांवरील प्रवास खूपच आल्हाददायक असतो. केरळमधील कोचीपासून या प्रवासाला 14 ते 20 तास लागतात.
 
 
मुंबई, चेन्नई, विशाखापट्टणम आणि कोचीन येथून क्रूझची सेवाही उपलब्ध आहे. विमानमार्ग हा लक्षद्वीपला पोहोचण्याचा एक जलद मार्ग असला, तरी या बेटांकडे जाणारी थेट उड्डाणे नाहीत. सर्वात जवळचे विमानतळ कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. लक्षद्वीपमध्ये फक्त एक विमानतळ आहे, जो आगट्टी बेटावर आहे. अगट्टी येथून जर तुम्हाला कावरत्ती या राजधानीच्या बेटावर जायचे असेल, तर तेथे हेलिकॉप्टर सेवा वर्षभर चालते. पावसाळ्यात, आगट्टीहून बांगारमला जाणे शक्य आहे. लक्षद्वीप हा बेटांचा समूह असल्याने तुम्हाला रस्त्याने एका बेटावरून दुसर्‍या बेटावर जाणे शक्य नसते. त्यासाठी नौका आणि फेरी किंवा हेलिकॉप्टर सेवा हेच पर्याय आहेत. आगट्टी बेटावर हवाई पट्टी असल्यामुळे त्या बेटाला लक्षद्वीपचे प्रवेशद्वार मानले जाते. कावरत्ती बेट हे लक्षद्वीपची प्रशासकीय राजधानी आणि हे सर्वात विकसित बेट आहे. कल्पेनी, बंगारम आणि कदमत ही इतर बेटे उत्कृष्ट पर्यटन स्थळे आहेत.
 
 
लक्षद्वीप हा अरबी समुद्रात असलेल्या लहान प्रवाळ बेटांचा समूह आहे. या केंद्रशासित प्रदेशात 11 लोकवस्ती असलेली बेटे, 15 निर्जन संलग्न बेटे, 4 नव्याने तयार झालेली बेटे आणि 5 जलमग्न प्रवाळ खडक आहेत. ही बेटे सामान्यत: उथळ सरोवराच्या (ङरसेेप) सभोवतालच्या कमी उंचीच्या बेटांची एक साखळी आहे. या बेटांवर जुन्या प्रवाळ चुनखडीच्या वर सर्वत्र अलीकडील गाळाचा थर आहे. आगट्टी, अमिनी, आंद्रोथ, बंगाराम, बित्रा, चेतलाट, कदम, कल्पेनी, कावरत्ती, किल्तान आणि मिनीकॉय ही वस्ती असलेली बेटे आहेत. चेतलाट, किल्तन आणि कदमट ही बेटे द्वीपसमूहाच्या उत्तरेकडील भागात जवळ जवळ आहेत, तर कल्पेनी बेट समूहाच्या पूर्व-मध्य भागात आहे आणि मिनीकॉय बेट सर्वात दक्षिणेकडील भागात आहे आणि इतर बेटांपासून खूप दूर आहे. आंद्रोथ हे 4.84 चौ.कि.मी. क्षेत्रफळ असलेले सर्वात मोठे बेट आहे, तर 0.1 चौ.कि.मी. क्षेत्रफळ असलेले बित्रा हे सर्वात लहान बेट आहे. ही लक्षद्वीप-छागोस या समुद्रातील पर्वतरांगेची उत्तरेकडील बेटे आहेत. या भागामध्ये 12 प्रवाळ, 3 खडक आणि 5 बुडालेले किनारे आहेत. 9ओ चॅनेलद्वारे मिनीकॉय बेट उर्वरित बेटांपासून पासून वेगळे केले जाते.
 
 
मुख्यत: प्रवाळ खडक असलेली आणि क्षेत्रफळ काही चौरस कि.मी.पेक्षा जास्त नसलेली ही सर्व बेटे कमी उंचीची असून आजूबाजूला समुद्रात प्रवाळ (उेीरश्री) वाढलेली आहेत. या बेटांवर नारळ ही लागवड केलेली एकमेव वनस्पती आहे. काही भाजीपाला आणि बागायती वनस्पती कोचीजवळच्या मुख्य भूभागातून आणल्या जातात. उथळ सरोवरालगतचा किनारा वालुकामय आहे आणि तिथे वाळूच्या टेकड्यांवर वाढणार्‍या वनस्पती आढळून येतात. समुद्रकिनारी भाग खडकाळ आहे. कावरत्ती बेटावरील वादळनिर्मित समुद्रकिनारा रेडिओ कार्बन डेटिंगनुसार सुमारे 6000 वर्षांपूर्वीचा आहे - म्हणजे हा किनारा तसा नवीनच आहे. निर्जन बेटांपैकी काही बेटे प्रवाळ खडकांवरील फक्त वाळूची बेटे (उरू) आहेत, त्यापैकी एक समुद्रपक्ष्यांसाठी एक महत्त्वाचे निवासस्थान आहे.
 
इथली सर्व बेटे सपाट आहेत आणि क्वचितच दोन मीटरपेक्षा जास्त उंचीची आहेत. वादळ आणि समुद्र धूप यांपासून ती खूपच असुरक्षित आहेत. ती बेटे मुख्यत: प्रवाळजन्य पांढरी स्वच्छ वाळू आणि दगड-धोंडे यांच्या एकत्रीकरणातून निर्माण झालेल्या वालुकाश्मांची (डरपवीीेंपशची) बनलेली आहेत.
 
 
या बेटांवर उबदार आर्द्र हवामान आहे (हवेचे तापमान 170 ते 380 से., आर्द्रता 70%). पृष्ठभागावरील पाण्याचे तापमान 280 ते 310 सेल्सियसदरम्यान आढळते. पाण्याची क्षारता 34 ते 37%पर्यंत असून भूजल जमिनीच्या पृष्ठभागापासून केवळ दोन मीटर खाली आढळते आणि जून ते सप्टेंबर या काळातील नैर्ऋत्य मान्सूनमुळे होणार्‍या सुमारे 150 सें.मी. वार्षिक पावसाने भूजल पातळी आणखी वर येते.
 
 
अँड्रॉट येथील एक सपाट मंचसदृश प्रवाळ खडक (झश्ररींषेीा ीशशष) वगळता इतर बेटे कंकणाकृती प्रवाळ खडक (ईेंश्रश्र) आहेत. जवळजवळ सर्व प्रवाळ बेटे ईशान्य-नैर्ऋत्य दिशेत पसरली असून त्यांच्या पूर्व बाजूला बेटाचा सखल भाग आहे. पश्चिमेला एक रुंद विकसित प्रवाळ खडक आहे आणि मध्यभागी एक उथळ सरोवर असून ते एक किंवा अधिक प्रवाहमार्गांनी मोकळ्या महासागराशी जोडलेले आहे.
 
 
प्रवाळ खडकाच्या बाहेर समुद्राची खोली वाढते आणि ती 1500 ते 3000 मीटरपर्यंत पोहोचू शकते. अँड्रॉट हे 4.84 चौ.कि.मी. क्षेत्रफळ असलेले सर्वात मोठे बेट आहे आणि एकमेव असे बेट आहे, ज्यामध्ये उथळ सरोवर नाही. 0.10 चौरस कि.मी. क्षेत्रफळ असलेले बित्रा हे जमिनीच्या क्षेत्रफळात सर्वात लहान बेट आहे, परंतु तयार कदाचित सर्वात भव्य सरोवर आहे. सर्व बेटांमधील अंतर 11 कि.मी. ते 378 कि.मी.च्या अंतरात असल्याचे दिसून येते.
 
 
ही बेटे हिमानी (ॠश्ररलळरश्र) कालखंडानंतरच्या काळात समुद्रपातळीतील बदलानुसार वरच्या दिशेने वाढत आहेत. सर्व लक्षद्वीप बेटे समुद्रसपाटीपासून फक्त काही फूट उंच उचलल्या गेलेल्या कंकणाकृती प्रवाळांचे अवशेष आहेत. 15000 वर्षांपूर्वी समुद्र आजच्या पातळीपेक्षा सुमारे 120 मीटर कमी होता आणि 7000 वर्षांपूर्वी तो सध्याच्या पातळीपेक्षा सुमारे 20 मीटर खाली होता. या काळात समुद्राच्या पातळीत होणारा बदल हळूहळू झाला असावा. जर ही प्रक्रिया अचानक झाली असती, तर ही प्रवाळ बेटे अस्तित्वात राहिली नसती, कारण प्रवाळ फक्त उथळ पाण्यात वाढू शकतात. सध्याच्या समुद्रसपाटीशी संबंधित या आधुनिक प्रवाळ बेटांची वाढ 5000 वर्षांपूर्वी सुरू झाली असावी, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.
 
 
समुद्रसपाटीपासून बेटांवरच्या जमिनीची उंची सुमारे 1-2 मीटर आहे. कधीकधी उथळ सरोवरांच्या बाजूने जुने वाळूचे ढिगारे आणि बेटांच्या समुद्राच्या बाजूने वादळ किनारे 8 मीटर उंचीपर्यंत वाढतात. भरतीच्या वेळी सर्व बेटांवर समुद्राचे पाणी उथळ सरोवरात आणि प्रवाळ खडकावरील खुल्या समुद्रामध्ये येते.
 
 
1998च्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या प्रवाळ विरेचनानंतर इथल्या प्रवाळ जीवविविधतेत गंभीर घट झाली आहे. किनार्‍याची धूप आणि गाळ यामुळे प्रवाळांचे आवरण हळूहळू नष्ट होत प्रवाळ प्रजातींच्या विपुलतेतही घट होत आहे.
 
 
लक्षद्वीप बेटांवरची परिसंस्था अत्यंत नाजूक असून तिथे गोड्या पाण्याचे स्रोत अगदी मर्यादित आहेत. जरी बेटांवर जास्त पाऊस पडत असला, तरी जमिनीवर गोड्या पाण्याच्या साठवणीचा अभाव आणि मर्यादित भूजल साठवण क्षमता यामुळे पिण्यायोग्य पाणी ही अतिशय मौल्यवान वस्तू झालेली आहे. इथे ताजे पाणी खार्‍या पाण्यावर तरंगत असलेल्या लहान थराच्या स्वरूपांत आढळते. जमिनीखालील जलधारक स्तरांची सच्छिद्रता जास्त असल्यामुळे समुद्राच्या पाण्यामध्ये गोड्या पाण्याचे मिश्रण सहजपणे होऊ शकते.
 
 
बेटांचा पूर्व बाजूकडील विकास आणि वाढ अनेक घटकांद्वारे नियंत्रित केली जाते. पूर्वेकडील चक्रीवादळांनी पूर्वेकडील खडकावर प्रवाळांचा ढीग जमा केलेला दिसतो. नैर्ऋत्य मोसमी पावसाळ्यात दर वर्षी निर्माण होणार्‍या अत्यंत उंच लाटा बेटांना धडकतात आणि त्यामुळे बेटावरील प्रवाळ खडक आधी खडबडीत आणि नंतर बारीक गाळात परिवर्तित होतात. हा प्रवाळ गाळ नंतर पूर्वेकडील बाजूस वाहत जातो .
 
 
या प्रक्रियेद्वारे गाळाच्या हळूहळू वाढीमुळे बेटांची वाढ झाली आहे. किल्टन आणि चेतलाट यासारख्या बेटांची उंची वाढली असून बेटावरील उथळ सरोवरे पुढील दशकात किंवा त्यापेक्षा जास्त काळात गाळांनी भरली जाऊ शकतात.
 
 
असा एक विलक्षण सुंदर आणि अभिमानास्पद भूशास्त्रीय वारसा असलेली ही बेटे आज जबाबदार पर्यटकांची आतुरतेने वाट पाहत आहेत, हे मात्र नक्कीच!