तेजस्विनी महिला संमेलन - समर्थ महिला शक्ती

विवेक मराठी    08-Feb-2024
Total Views |
- सुनेत्रा जोशी, रत्नागिरी
 Women 
 
रत्नागिरी - कर्तृत्व, नेतृत्व आणि मातृत्व यांनी परिपूर्ण नारी.. रत्नागिरी येथील रेणुका प्रतिष्ठानने तीन सत्रांत एकदिवसीय संमेलनाचे आयोजन केले होते. संमेलनास जवळपास 1100 महिला उपस्थित होत्या. शिल्पाताई पटवर्धन संमेलनाच्या उद्घाटक होत्या, तसेच प्रेरणाताई क्षीरसागर प्रमुख वक्त्या आणि प्रमुख पाहुण्या सुरेखाताई पाथरे होत्या.
प्रथेनुसार दीपप्रज्वलन आणि भारतमातेला पुष्पार्चन करून संमेलनाला सुरुवात झाली. सगळ्या मान्यवरांना सुगंधी गजरा, अत्तर कुपी देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले. संयोजिका नेत्राताई राजेशिर्के यांनी संमेलनाचे प्रास्ताविक केले. पल्लवी शिंदे यांनी ‘चले निरंतर चिंतन मंथन’ हे गीत सादर केले. यानंतर संमेलनाच्या उद्घाटक मा. शिल्पाताई यांचे प्रेरणादायक विचार त्यांच्या भाषणातून विशद झाले. संमेलनाच्या प्रमुख पाहुण्या सुरेखाताईंनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख वक्त्या प्रेरणाताई क्षीरसागर यांनी ‘स्त्रीविषयक भारतीय चिंतन’ हा विषय स्पष्ट करताना इतिहासातले आणि पुराणातले विविध दाखले देऊन, स्त्री कधीच अबला नव्हती हे सोदाहरण पटवून दिले. पहिल्या सत्रात प्रत्येक तालुक्यातील विशेष कार्य करणार्‍या काही निमंत्रित महिलांचे सत्कार करण्यात आले.
 
 Women
 
‘महिलांच्या शैक्षणिक, आरोग्यविषयक, कायदेविषयक स्वावलंबन’ या विषयासंबंधीच्या गटश: चर्चेने दुसर्‍या सत्राचा प्रारंभ झाला. प्रत्येक तालुक्यातील महिलांनी विविध कला सादर करून सांस्कृतिक गुण प्रदर्शित केले.
 
 
तिसरे सत्र हे समारोपाचे सत्र. या सत्रासाठी प्रमुख पाहुण्या पूनमताई चव्हाण आणि प्रमुख वक्त्या अश्विनीताई मयेकर मान्यवर म्हणून लाभल्या. रेणुका प्रतिष्ठानच्या सचिव मानसी डिंगणकर यांनी प्रतिष्ठानविषयी माहिती दिली. नेहाताई जोशी यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. पूनमताईंनी त्यांचे मार्गदर्शक विचार व्यक्त केले. प्रमुख वक्त्या अश्विनीताईंनी भारताच्या विकासात महिलांची भूमिका यावर आपले विचार मांडले. आभारप्रदर्शनाची धुरा रुचीताई महाजन यांनी सांभाळली. शांतीमंत्र, तसेच संपूर्ण वंदे मातरम गायनाने संमेलनाची सांगता झाली. सुनेत्रा जोशी यांनी या संपूर्ण संमेलनाचे सूत्रसंचालन केले.
 
 Women