स्वराज्य ज्योती संमेलन

विवेक मराठी    09-Feb-2024
Total Views |
Samelan
 
बुलढाणा - मातृत्वाचे महन्मंगल स्तोत्र म्हणजे जिजामाता यांचे हे सार्ध त्रिशताब्दी पुण्यस्मरण वर्ष, तसेच शिवराज्याभिषेकाचेही हे सार्ध त्रिशताब्दी वर्ष. या दोन्हीचे औचित्य साधत दि. 25 जानेवारी 2024 रोजी जिजामातेच्या जयंती दिनी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा या त्यांच्या जन्मगावी राष्ट्र सेविका समितीच्या देवगिरी प्रांत व विदर्भ प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वराज्य ज्योती संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. या संमेलनासाठी दोन प्रांतांच्या 29 जिल्ह्यांतील 1200हून अधिक सेविका, केंद्राधिकारी, क्षेत्राधिकारी, प्रांताधिकारी, प्रचारिका उपस्थित होत्या.
 
Samelan 
 
तीन सत्रांमध्ये आयोजित केलेल्या या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या, राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय सहकार्यवाहिका मा. चित्राताई जोशी यांनी विषयाची सखोल मांडणी केली. “जिजाऊ नसत्या, तर नसती अंगणी तुळस, नसता राहिला मंदिराला कळस” असे जिजाऊंचे महत्त्व अधोरेखित करत त्या पुढे म्हणाल्या, “जिजाऊंनी ध्यास घेऊन राज्याचा इतिहास भूगोल बदलविला. स्वत: अनेक गोष्टींत कुशल असल्याने त्यांनी शिवबालाही शस्त्र, शास्त्र, राजकारण अशा अनेक कौशल्यात पारंगत केले. अखंड सावधानता, मुत्सद्देगिरी, दूरदृष्टी अशा अनेक गुणांनी घडवत मोडकळीस आलेल्या हिंदवी साम्राज्याची पुन:उभारणी केली.”
 

vivek 
 
Samelan 
 
राष्ट्र सेविका समितीच्या देवगिरी प्रांत कार्यवाहिका रत्नाताई हसेगावकर यांनी प्रास्ताविक केले. उद्घाटनाच्या सत्रात राष्ट्र सेविका समितीच्या दिनदर्शिकेचे, तसेच विजयराव देशमुख (नागपूर) यांच्या ‘शककर्ते शिवराय’ या पुस्तकाच्या सहाव्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून छत्रपती शिवबा प्रतिष्ठानच्या स्मिताताई काटेकर, पश्चिम क्षेत्र कार्यवाहिका सुनंदाताई जोशी, विदर्भ प्रांत कार्यवाहिका रोहिणीताई आठवले उपस्थित होत्या. गौरी अशोक थोरात यांनी सादर केलेल्या ’साक्षात जिजाऊ’ या स्फूर्तिदायक एकपात्री नाटिकेने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. संमेलनस्थानी राजामाता जिजाऊंच्या जीवनातील काही महत्त्वपूर्ण प्रसंगांवर आधारित माहितीपूर्ण असे सचित्र प्रदर्शन लावण्यात आले होते.
 
राजमाता जिजाऊंना व शिवरायांना मानवंदना
 
राजामातेचा जन्म ज्या ठिकाणी झाला, त्या मातृतीर्थावरील लखोजीराजे जाधव यांच्या राजवाड्यात जिजाऊंना व शिवरायांना मानवंदना देण्यासाठी सेविका एकत्रित जमल्या. घोषवादनाने आणि गारद(ललकारी)द्वारे राजमाता जिजामातेला, छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली. नंतर सेविका इथून पथसंचलनासाठी मार्गस्थ झाल्या. सिंदखेडराजा नगरीतील नागरिकांनी जागोजागी पुष्पवृष्टी करून पथसंचलनाचे उत्साहात स्वागत केले.
 
Samelan 
 
 
संमेलनाची प्रेरणादायक सांगता
 
राष्ट्र सेविका समितीच्या अ.भा. सहकार्यवाहिका अलकाताई इनामदार संमेलनाच्या समारोप प्रसंगी प्रमुख वक्ता होत्या. अतिशय ओजस्वी, सुस्पष्ट वाणीत त्यांनी अभ्यासपूर्ण अशी विषयमांडणी केली. “या हिंदवी स्वराज्य प्रेरिकेच्या जन्मभूमी मातृतीर्थावरील माती आपल्या कपाळाला गंध म्हणून लावा आणि स्वराष्ट्र, स्वधर्म व स्वसंस्कृतीचे बीज पुढील पिढीत रुजवा. जिजाऊ होऊन शिवबा घडवा आणि आपले राष्ट्र हे रामराज्य म्हणून उदयास आणण्याचा संकल्प या पवित्र जन्मभूमीवर करा” असे त्यांनी संमेलन समारोप प्रसंगी आवाहन केले.
 
 
या वेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून राणीसाहेब छाया विजयसिंहराजे जाधव या लखोजीराव जाधव यांच्या वंशज उपस्थित होत्या. राष्ट्र सेविका समितीच्या स्वराज्य ज्योती या सार्ध त्रिशताब्दी संमेलनाचे त्यांनी कौतुक केले. संमेलनाच्या या सांगता समारंभाला पश्चिम क्षेत्र कार्यवाहिका सुनंदाताई जोशी, देवगिरी व विदर्भ प्रांताच्या कार्यवाहिका आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. परमपवित्र राष्ट्रगुरू भगव्या ध्वजास सघोष वंदन करून संपूर्ण वंदे मातरमने संमेलनाची सांगता झाली..
या संमेलनाला राष्ट्र सेविका समितीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. वयाची पंचाण्णव वर्षे पार केलेल्या समितीच्या माजी अ.भा. बौद्धिक प्रमुख सुशीलताई अभ्यंकर या पूर्ण वेळ उपस्थित होत्या, हे विशेेष.
 
- स्वाती राजीव जहागीरदार
 9421306834