‘कलासाधक संगम’ - सामाजिक समरसतेचा वेध घेणारा

विवेक मराठी    09-Feb-2024
Total Views |
 @उदय शेवडे 

kala sadhak sangh bengaluru
बेंगळुरू येथे श्री श्री रविशंकर यांच्या जीवन कला केंद्रात सांस्कृतिक क्षेत्रातल्या अग्रगण्य अशा संस्कार भारती या संस्थेचा ‘कला साधक संगम’ चा 1 ते 4 फेब्रुवारी असा चार दिवसीय कार्यक्रम झाला. चारही दिवस होणार्‍या कार्यक्रमांची मध्यवर्ती संकल्पना होती ‘सामाजिक समरसता’. समाज एकसंध राहावा यासाठी कला आणि कलाकार यांनी काय केले आहे, आगामी काळात काय करू शकतो, याचा विचार प्रामुख्याने करण्यात आला.
कलेसाठी जीवन की जीवनासाठी कला? हा आदिकाळापासून सुरू असलेला प्रश्न अजूनही बरेचदा विचारला जातो. त्यावर भरपूर लिखाण झाले आहे. प्रश्न असा आहे की कलेमुळे समाज साधतो की दुभंगतो? साधत असेल तर कलेचा हेतू सफल झाला असे म्हणता येईल, दुभंगत असेल तर कलेच्या हेतूबद्दल शंका निर्माण होऊ शकतात.
 
 
पुणे आणि बेंगळुरू या दोन शहरांत बर्‍याच बाबतीत साम्य! सांस्कृतिकदृष्ट्या, विद्येचे माहेरघर म्हणून, शिवाय दोन्हीही माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या दृष्टीने महत्त्वाची शहरे. असे असूनसुद्धा या दोन्ही शहरांत सांस्कृतिकदृष्ट्या परस्परविरोधी घटना घडल्या.
 
 
कला समाज घडवते की बिघडवते? यावर वाद होऊ शकतो, पण प्रभाव मात्र निश्चित होतो, हे लक्षात घेतले पाहिजे. कला हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून कलेला जर विचार आणि संस्कार यांची जोड दिली, तर ती प्रभावी ठरतेच, शिवाय कलेचा उद्देश सफल होतो.
 
 
kala sadhak sangh bengaluru
 
पहिली घटना मनाला अतिशय वेदना देणारी, ती म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ललित कला केंद्राच्या नाट्यविभागात झालेला प्रकार. त्यावर सर्व माध्यमांत (मुद्रित, दृक-श्राव्य, सामाजिक) दोन्ही बाजूंनी वाद-प्रतिवाद भरपूर झाला आहे, सुरू आहे, तो लवकर थांबण्याची चिन्हे नाहीत. त्यांच्या कारणमीमांसेत जाणे हा या लेखाचा हेतू नाही. कारण अशातून हातात काही लागत नाही, अभिनिवेश दिसतो, रचनात्मक काही घडत नाही.
 
अशा घटना सामाजिक आणि सांस्कृतिक जगतात होत असतात आणि होतीलही. काही प्रमाणात दुर्लक्ष करून जे चांगले घडतेय त्याकडे लक्ष द्यावे, हे श्रेयस्कर.

 
उपरोक्त प्रकार सुरू असताना बेंगळुरू येथे श्री श्री रविशंकर यांच्या जीवन कला केंद्रात सांस्कृतिक क्षेत्रातल्या अग्रगण्य अशा संस्कार भारती या संस्थेचा ‘कलासाधक संगम’ हा भव्य कार्यक्रम ही ती दुसरी घटना, अर्थात ही घटना म्हणण्यापेक्षा चार दिवसांचा कार्यक्रम होता. चारही दिवस होणार्‍या कार्यक्रमांची मध्यवर्ती संकल्पना होती ‘सामाजिक समरसता’! समाज एकसंध राहावा यासाठी कला आणि कलाकार यांनी काय केले आहे, आगामी काळात काय करू शकतो, याचा विचार प्रामुख्याने इथे केला गेला.
 
 
kala sadhak sangh bengaluru
 
अंतराने दूर असल्याने असेल कदाचित आणि चारही दिवस त्याच परिसरात असल्याने, मराठी समाजमनात या कलासाधक संगमाची किती दखल घेतली गेली, याची कल्पना नाही. सध्याच्या माध्यम मानसिकतेमुळे अशा रचनात्मक आणि अल्प बातमीमूल्य असलेल्या कार्यक्रमाकडे लक्ष कसे जाणार? हाही प्रश्न मनात आला.
 
 
सामाजिक समरसता ही मध्यवर्ती संकल्पना असल्याने सर्व कार्यक्रमांची रचनाही त्याच अनुषंगाने होती. विविध कलाप्रकारांचा दोन स्तरांवर विचार केला गेला - एक म्हणजे दृक-श्राव्य पद्धतीने आणि दुसरा म्हणजे वैचारिक अंगाने समरसतेचा वेध घेण्याचा अतिशय यशस्वी आणि सकारात्मक प्रयत्न केला गेला.
 
 
दृक-श्राव्य प्रकारात विविध प्रदर्शने होती. प्रदर्शनाचे नावच मुळी ‘सौहार्द’ असे विषयानुरूप होते. त्याची एकूण मांडणी अतिशय आकर्षक अशी होती. यात भूअलंकरण म्हणजे रांगोळी, यातही दोन प्रकार होते - एकात सामाजिक समरसता प्रस्थापित व्हावी म्हणून ज्या संत, महापुरुष, स्त्रिया यांनी प्रयत्न केले, त्यांची अतिशय सुंदर अशी चित्रे विविध राज्यांतल्या रांगोळी कलाकारांनी काढली होती, तर दुसर्‍या प्रदर्शनात देशाच्या विविध भागात (राज्य) रांगोळी कशी काढली जाते, त्याचे प्रकार विशद केले होते. रांगोळी कलाकारांची तळमळ आणि घेतलेले कष्ट हे पाहताना दिसत होते.
 
 
छायाचित्र, भित्तिचित्रे आणि मोठी चित्रे यांचे प्रदर्शन होते, त्यात विविध राज्यांतील मंदिरे, शिल्पे, गुंफा, संत-महापुरुषांच्या जीवनातील प्रसंग होते. यात सामाजिक समरसता म्हणून कसा विचार केला आहे, याचे दर्शन होते. अतिशय देखणी अशी ही प्रदर्शने आणि साजेशी अशी माहिती इथे होती. उत्कृष्ट हा एकच शब्द यासाठी यथार्थ आहे.
 

kala sadhak sangh bengaluru 
 
भारतीय चित्रपटांमध्ये सामाजिक समरसता कशी दाखवली आहे, त्याचा आढावा एका लघुपटातून सुंदर पद्धतीने घेण्यात आला. तरीही ह्या माध्यमाने हवी तशी दखल घेतली नाही, असे नम्रपणे म्हणावेसे वाटते.
 
 
अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांत नृत्य, नाट्य, गीते आणि साहित्य या चारही प्रकारांतून अनुक्रमे विविध नृत्यशैली आणि त्याचे प्रकार, नाटकातून समरसतेची कारणमीमांसा व त्यावर उपाय आणि विविध संघगीतांतून समरस भाव व्यक्त करणारी गीते सादर केली गेली. देशाच्या विविध भागांतून आलेल्या कवींनी समरसतेवरील कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या चारही प्रकारांनी कलेच्या अंगाने समरसतेचा घेतलेला वेध स्तिमित करणारा होता.
 
 
आशुतोष अडोणी संपादित ‘कलादधिची योगेंद्रजी’, ‘कलानीतिज्ञ अमीरचंद’ आणि ‘समरसता बोधकथा’ ही समयोचित आणि प्रेरणादायक पुस्तके प्रकाशित झाली.
 
 
सामाजिक समरसता पुष्ट करण्यासाठी कला आणि साहित्य यांचे योगदान आणि त्याचा प्रभाव यावर एक परिसंवाद घेण्यात आला. रवींद्र किरकोळे (अ.भा. संयोजक, समरसता गतीविधी) यांनी त्याचे बीजभाषण केले, तर डॉ. अनिल सायकिया यांनी लोककला आणि रंगमंचीय कला, डॉ. अदिती पासवान यांनी दृश्य कलाद्वारा, डॉ. इंदुशेखर यांनी साहित्याच्या अंगाने या परिसंवादाला न्याय दिला. पद्मश्री मालिनी अवस्थी यांनी या परिसंवादाचा समयोचित अध्यक्षीय समारोप केला. हा परिसंवाद ऐकणार्‍यांना एक वेगळी वैचारिक दृष्टी निश्चित मिळाली असेल, असा विश्वास आहे.
 
 
किन्नर समाज हा सामाजिक जीवनात उपेक्षेचा आणि हेटाळणीचा विषय. पण या साधक संगमाच्या एक उद्घाटक म्हणून पद्मश्री मंजम्मा जोगती या होत्या, तर रेशमा यांनी ‘भारतातील किन्नर’ ह्या विषयावर अतिशय अभ्यासपूर्ण आणि उत्कंठावर्धक असे झेुशी झेळपीं झीशीशपींरींळेप सादर केले, त्यांचा विषय होता ‘भारतीय पुराणातील किन्नर विचार आणि समरस भाव’.
 
 
या दोहोंचे विचार ऐकल्यावर, समाजातील हा घटक उपेक्षेचा आणि हेटाळणीचा का व्हावा? या समाजातील काही जण भीक मागत का जगतात? उर्वरित समाज त्यांना आपुलकीची वागणूक का देत नाही? असे काही प्रश्न अस्वस्थ करून गेले.
 
 
कलेचा आद्य प्रणेता ऋषी भरतमुनी यांच्या नावाने संस्कार भारतीने यंदापासून भरतमुनी सन्मान देण्याचे घोषित केले. सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि रोख रक्कम 1,51,000 असे या सन्मानाचे स्वरूप आहे. दर वर्षी दोन कलाप्रकारांतील कलाकारांना हा पुरस्कार घोषित करण्यात येणार आहे. यंदा लोककला या प्रकारात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळी गावातील गणपत सखाराम मसगे यांना, तर दृश्य कलाप्रकारात मुंबईचे सुप्रसिद्ध चित्रकार विजय आचरेकर यांना पू. सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार स्पर्धा म्हणून देण्यात आलेला नाही, हे आयोजकांनी स्पष्ट केले, ते महत्त्वाचे वाटले.
 
 
या सर्व कार्यक्रमांचा कळसाध्याय म्हणजे शेवटच्या दिवशी निघालेली शोभायात्रा! आपल्या महाराष्ट्रात वारीला अनेक शतकांचा इतिहास आहे. कोणत्याही प्रकारचा भेद नसलेली ही वारी म्हणजे समरसतेचे एक जिवंत प्रतीक होय. तसा प्रत्येक राज्यात असा काही ना काही प्रकार आहेच, ज्यातून स्थानिक जनता समरसतेचा अनुभव घेत असते आणि त्याला प्रदीर्घ अशी परंपरा आहे. अशा सर्व राज्यांच्या स्थानिक ठिकाणी निघणार्‍या यात्रा इथे शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या.
 
 
भाषा, प्रांत, वय याचा विसर पडावा अशी अनुभूती या शोभायात्रेने दिली. आपापल्या प्रांतातील सण, उत्सव, चालीरिती यांचा विचार करून त्या त्या वेशभूषेसह कलासाधक संगमाला आलेले कलाकार आणि कार्यकर्ते उत्साहाने सामील झाले. उत्साह, आनंद, चैतन्य यांनी रसरसलेली यात्रा खर्‍या अर्थाने समरसतेचा अनुभव देऊन गेली.
 
 
संगमाचे उद्घाटक म्हैसूरचे राजे यदुवीर वडियार आणि विजयनगरचे राजे कृष्णदेवराय राय, पद्मश्री मंजम्मा जोगती, तबला वादक रवींद्र यागवगल, संस्कार भारतीचे अध्यक्ष वासुदेव कामत, उपाध्यक्ष म्हैसूर, नितीश भारद्वाज, महामंत्री अश्विन दळवी या सर्वांनी व्यक्त केलेले विचार आणि मार्गदर्शन सदैव लक्षात राहील.
 
 
संघाचे सरसंघचालक पू. मोहनजी भागवत यांचे दोन दिवसांचे वास्तव्य उपस्थितांचा हुरूप वाढवणारे होते. त्यांनी दिलेले पाथेय, यात त्यांनी कलेतून मनोरंजनाबरोबर संस्कार आणि स्वचा बोध देणारा वैचारिक विमर्श प्रस्थापित करण्याचे आवाहन केले आणि श्री श्री रविशंकर यांनी आपल्या आशीर्वचनात जीवन कला केंद्र आणि संस्कार भारती यांची स्थापना एकाच वर्षी झाल्याने ह्या संस्था या जुळी भावंडे आहेत असे सांगून शक्ती (संघटन), भक्ती (राष्ट्र आणि समाज), युक्ती (कलाकारांनी एकसूत्रतेने विचार करणे) आणि मुक्ती (षड्रिपूंपासून) या अंगाने कलेचा विचार करायला सांगितले.
 
 
आनंद, उत्साह, चेतना, ऊर्जा, प्रतिभा, संशोधन वृत्ती, प्रेरणा, वैविध्य आणि विचार या सगळ्यासाठी घेतलेले भरपूर परिश्रम चार दिवस ठायी ठायी दिसत होते. हे संचित सर्व उपस्थितांना आपापल्या ठिकाणी काम करताना उपयोगी पडेल.
 
 
इथे सादर होणार्‍या सर्व प्रकारच्या कार्यक्रमांतून उपस्थित कलावंत, रसिक आणि कार्यकर्ते यांनी सांस्कृतिक आणि वैचारिक असा अमूल्य ठेवा आपल्या हृदयात जपून आणि द्वैत विसरून, नव्या उमेदीने आपापल्या प्रांतात जोमाने कार्य करण्यासाठी मार्गस्थ झाले.