सिद्ध साधक - डॉ. वसंतराव कुंटे

विवेक मराठी    09-Feb-2024
Total Views |

kunte
महाराष्ट्र प्रांताचे सेवा कार्य प्रमुख म्हणून आणि प्रचारक म्हणूनही काही वर्षे कार्य करणारे व कार्यमग्न कार्यकर्ता कसा असावा याचे आदर्श प्रतीक असलेले डॉ. वसंतराव कुंटे यांचे शनिवार दि. 27 जानेवारी 2024 रोजी दु:खद निधन झाले. मृत्युसमयी ते पुण्यात मुलाच्या घरी वास्तव्यास होते. त्यांच्या संदर्भातील जुन्या आठवणींना उजाळा देणारा लेख.
काही माणसे, त्यांचे नाव, त्यांचे शिक्षण, त्यांचा व्यवसाय यापैकी काहीही माहीत नसले, तरी नुसत्या दर्शनानेच प्रभाव निर्माण करतात. अशा व्यक्तींचे दिसणे, त्यांची प्रसन्नता, त्यांचे हास्य आपल्याला इतके लपेटून घेते की त्यांचे बाकी काहीही असणे गौणच असते.
 
 
माझी डॉ. वसंतराव कुंटे यांच्याशी भेट झाली, तेव्हासुद्धा त्यांची उंच शरीरयष्टी, गोरापान रंग, निळसर घारे डोळे, पांढरेशुभ्र केस आणि पांढर्‍या मिशा, नितळ आश्वासक हास्य यामुळे मी भारावून गेलो होतो. त्यांना सगळेच डॉक्टर म्हणत असत. ते डॉक्टर असावेत असे मानण्याशिवाय ते डॉक्टर असण्याचे कोणतेही भौतिक चिन्ह मला दिसले नव्हते. त्यांचा दवाखाना नव्हता, त्यांच्या गळ्यात स्टेथास्कोप नसायचा, इतर डॉक्टरांसारखा त्यांचा बडेजाव नसायचा, कोणीही आजारी भेटले की त्याला तपासून औषध देण्याची हिरिरी त्यांच्यात दिसली नाही. आणि सगळ्यात विशेष म्हणजे ते नेहमीच सायकलवर फिरत असायचे!
 
 
मी पार्ल्यात नवीन गेलो, तेव्हा एका कार्यकर्त्याबरोबर पायी चाललो असताना, डॉक्टर समोरून सायकलवरून पुढे गेले. माझी त्यांची जुजबी ओळखच झाली होती. माझ्याबरोबरचा कार्यकर्ता मला म्हणाला, “ते बघ, पार्ल्यातल्या 50 सामाजिक संस्था सायकलवरून चालल्या आहेत!” आणि खरे म्हणजे, नंतर माझ्या लक्षात आले की यात एका शब्दाचीही अतिशयोक्ती नव्हती!
वसंतराव एमबीबीएस झाले, पण त्यापूर्वीच ते संघाचे स्वयंसेवक झाले होते आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झाले होते. स्वाभाविकच ध्येयासाठी झोकून देण्याच्या तारुण्यातील ऊर्मीमुळे त्यांनी संघाचे काम पूर्णवेळ करण्याचे ठरवले. ते संघाचे प्रचारक झाले आणि त्यांनी थोडीथोडकी नव्हे, तब्बल 10 वर्षे संघाचे पूर्णवेळ काम केले आणि नंतर त्यांनी गृहस्थाश्रमात प्रवेश करून मुंबईमधील पार्ले येथे संसार थाटला.
 
 
डॉक्टरांनी पार्ले, नेहरू रोड येथे डॉक्टरी व्यवसायाला प्रारंभ केला. त्यांची प्रॅक्टिससुद्धा छान चालू लागली. डॉक्टरांच्या नुसत्या दर्शनानेच पेशंट बरे झाले असते. औषधाची आवश्यकताच वाटली नसती. डॉक्टरांकडे गर्दी वाढू लागली. मुंबईत पेशंट डॉक्टरकडे सकाळी आणि सायंकाळी जातात. रात्री उशिरापर्यंत गर्दी चालूच असे. मात्र या सार्‍या कामात डॉक्टरांना संघाचे काम करताच येईना. संघकामासाठी महत्त्वाचा असणारा वेळ दवाखान्यात रुग्णांच्या गराड्यात जाऊ लागला. डॉक्टरांच्या कार्यकर्ता मनोवृत्तीला हे मानवेना. त्यांची फार कुचंबणा होऊ लागली. अशा परिस्थितीत शांत बसतील ते डॉक्टर कसले? एका दिवशी त्यांनी ठरवून टाकले - प्रॅक्टिस बंद करायची! मोठा अजब आणि चमत्कारिक वाटणारा निर्णय होता. विशेष म्हणजे काकूंनीही त्यांना साथ दिली. तशा त्यासुद्धा शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करीत होत्याच. पण चालता गाडा बंद करायचा म्हणजे विचित्रच!
डॉक्टरांच्या घरापासून आंतरराष्ट्रीय विमानतळ फार जवळ होते. सायकलवरून फार तर 10 मिनिटे. त्यांनी विमानतळावर विविध विमान कंपन्यांना वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा द्यायला सुरुवात केली. त्या वेळी बरीच आंतरराष्ट्रीय उड्डाणे पहाटे किंवा रात्री असत. त्यामुळे त्या त्या फ्लाइटपूर्वी 2 तास सगळ्या ’क्रू’ची वैद्यकीय तपासणी अनिवार्य असे. ही वेळ डॉक्टरांना जमणारी होती. ते पहाटे चारलाच विमानतळावर जात आणि सकाळी सहा वाजता त्यांचे काम संपलेले असे! मग प्रभात शाखा, सायम शाखा, भेटीगाठी, संघाची अन्य कामे दिवसभर चालू राहत. सर्वांना डॉक्टर सतत संघाचे काम करताना दिसत. ते पोटापाण्यासाठी काय करतात, असा कितीतरी जणांना प्रश्न पडे! वरील कामातून जे पैसे मिळतील त्यातच संसार करावयाचा, हे त्यांचे ठरलेले होते. विशेष म्हणजे त्यांचा संसार अत्यंत सुरळीत पार पडला. मुलगा इंजीनियर झाला, मुलगी एम.डी. पूर्ण करून डॉक्टर झाली, संघकार्य, समाजकार्य सारेच उत्तम झाले. यात काकूंचा खूप मोठा वाटा असणार, हे नक्की.
 
 
चहा हे संघटनेचे पेय आहे. चहाच्या पेल्यावर छान गप्पा होतात. निरनिराळे विषय बोलले जातात. समोरच्या माणसाला जाणून घेण्याची संधी मिळते. खरे म्हणजे चहाचा कप हातात आला आणि एक घोट घसा जाळत खाली उतरला, म्हणजे माणूस मोकळा व्हायला सुरुवात होते. त्यामुळेच बहुधा डॉक्टरांसारख्या कुशल संघटकाची अतिशय आवडती गोष्ट कोणती असेल, तर ती म्हणजे चहा! डॉक्टरांना दिवसातील कोणत्याही वेळी, कुठेही आणि कसाही असला तरी चहा चालत असे. मुंबईतील काही घरात वेळी-अवेळी चहा घेण्याची पद्धत नसे आणि अर्थात पाहुण्यालाही देण्याची पद्धत नसे. अशा एखाद्या घरात चहाची पद्धत नसेल, तर डॉक्टर त्या घरी जाऊ लागल्यावर ती पद्धत बदलत असे. किमान डॉक्टर आल्यावर तरी त्या पद्धतीला मुरड घातली जात असे आणि काही ठिकाणी डॉक्टर अधिकारवाणीने त्या कुटुंबाच्या सवयी बदलत असत.
 
 
डॉक्टरांचे दर्शन जसे प्रभावी, तसे त्यांचे बोलणेसुद्धा प्रभावी असे. पार्ल्यातल्या भल्याभल्या व्यक्तींच्या घरात डॉक्टरांचा सहज वावर असे. संघाच्या कामासाठी कोणालाही जाऊन भिडणे, आपल्या कामासाठी भीड घालणे ते सहज करत आणि त्यांना कोणी नाही म्हणू शकत नसे. पार्ल्यातील अगदी डॉ. नीतू मांडकेंपासून ते अभिनेते विक्रम गोखले, गायिका आशाताई खाडिलकर यांच्यापर्यंत आणि अनेक राजकीय कार्यकर्ते, नगरसेवक, विविध वस्त्यांतील पुढारी, गुंड-पुंड डॉक्टरांच्या शब्दाबाहेर नसत. एकदा तर एका कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी आम्ही सचिन तेंडुलकरच्या घरी त्याचे वडील कवी रमेश तेंडुलकर यांच्याकडे गेल्याचेसुद्धा आठवते. संघाच्या कामापासून कोणी दूर राहता कामा नये, सर्वांना त्यांच्या आवडीच्या विषयात संघकामाशी संबंधित काम करता यावे अशी रचनाच ते करीत आणि त्यामुळे विविध कार्यक्रमात सर्वच जण समरसून काम करीत. अशा प्रकारे त्यांनी पार्ल्यात अनेक संस्था आणि उपक्रम उभे केले.
 
 
हे सारे काम करत असताना डॉक्टरांनी नुसत्याच संस्था उभ्या केल्या नाहीत, तर त्यामागे त्यांचे काही चिंतन असे, काही प्रयोग केलेले असत आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन संघाच्या ज्येष्ठ अधिकार्‍यांना काय अपेक्षित आहे याचे विचारमंथन केलेले असे.
त्या वेळी माननीय शेषाद्रीजी संघाचे सरकार्यवाह होते. सेवा हा विषय संघात मोठ्या प्रमाणात हाती घेतला गेला होता. माननीय शेषाद्रीजींच्या प्रवासात मुंबईत त्यांची एक बैठक झाली होती. आम्ही सर्वच जण त्या बैठकीत होतो. दुसर्‍या दिवशी डॉक्टर संघकार्यालयात एक वही घेऊन आले. त्यांनी मला जवळ बसवले आणि विचारले, “कालच्या बैठकीत काय काय विषय झाले, हे लक्षात आहे का?” मी एक-दोन विषय सांगितले. त्यांनी वही उघडली. त्यात ओळीने 25-30 विषय लिहिलेले होते. ते म्हणाले, “हे सारे विषय शेषाद्रीजींच्या कालच्या बोलण्यात आले. यासंबंधी आपल्याला काय काय करता येईल?” आणि त्यांनी चक्क एकेका विषयासमोर, करायच्या कामांची यादीच लिहून काढली. त्यात व्यक्तिगत पातळीवर काय करायचे, संघ म्हणून काय करायचे, विविध संस्थांच्या माध्यमातून काय करायचे हे लिहिले.
 
 
जाता जाता म्हणाले, “आपल्या अधिकार्‍यांचे बौद्धिक वर्ग नुसतेच ऐकायचे नसतात, त्यातून दिशा घ्यायची असते, ते अंमलात आणायचे असतात” आणि खरोखरच पुढच्या काळात त्यातील अनेक विषय त्यांनी वेगवेगळ्या मार्गांनी अंमलात आणले. त्यात बालगोकुलमसारखे काम उभे केले, स्वामी विवेकानंदांच्या विश्वविजयी भाषणाच्या शताब्दीचा कार्यक्रम घडवून आणला, वस्त्यांमधून समाजमंदिरे उभी केली, त्यात विविध कामे चालू केली. महिलांसाठी रोजगार सुरू केला आणि पार्ल्यात राजकीय परिवर्तनही घडवले!
 
 
पण त्या बैठकीत दिली गेलेली सर्वात महत्त्वाची एक सूचना होती, ती म्हणजे समाजात ’समरसता’ हवी असेल, तर स्वत:च्या घरापासून सुरुवात करायला हवी! डॉक्टरांनी दिवाळीच्या फराळासाठी आपल्या घरी, इमारतीला झाडू मारणारी बाई, कचरा उचलणारा महापालिका कर्मचारी, रोजचा इस्त्रीवाला, दूधवाला अशा अनेकांना सहकुटुंब आपल्या घरी बोलावून सर्वांसोबत बसून फराळाचा कार्यक्रम केला!
 
 
सर्वसाधारणपणे बहुतांश सामाजिक कार्यकर्त्यांच्या घरात दिव्याखाली अंधार अशी परिस्थिती असते. तो कार्यकर्ता कामात मग्न असतो. त्याचे घराकडे काही प्रमाणात दुर्लक्षच होते आणि स्वाभाविक त्याची प्रतिक्रिया म्हणून घरातील माणसांचा त्या सामाजिक कामाकडे पाहण्याचा दृष्टीकोन दूषित बनतो. पण एकूणच संघकामात आपला विचार पुढील पिढीकडे कसा संक्रमित करता येईल याचा नेहमीच विचार केला जातो. डॉक्टरांच्या बाबतीतही या गोष्टीमध्ये कुठलीही कसूर झाली नाही. त्यांनी आपल्या कार्याचा, विचारांचा वसा पुढच्या पिढीकडे यशस्वीपणे सोपवला. त्यामुळे घरातील वातावरण नेहमीच संघविचाराने भारलेले राहिले. याचा परिणाम म्हणून बारावीत असतानाच त्यांच्या मुलाचा - तेजेशचा, स्वत:चे इएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर संघ प्रचारक म्हणून 5 वर्षे पूर्णवेळ काम करण्याचा निर्णय झालेला होता आणि तो त्याने प्रत्यक्षातही आणला. इतकेच काय, तर एम.डी. झालेल्या त्यांच्या कन्येनेसुद्धा काही काळ दुर्गावाहिनीचे काम मोठ्या जोमात केले. पण खरी गम्मत तर पुढेच आहे. आपला मुलगा प्रचारक असताना, डॉक्टरांचा पूर्णवेळ संघकाम करण्याचा विचार पुन्हा उफाळून आला आणि त्यांनीही काही वर्षे महाराष्ट्र प्रांताचे सेवा कार्य प्रमुख म्हणून पूर्णवेळ काम केले. वडील आणि मुलगा दोघांनी एकाच वेळी संघाचे पूर्णवेळ काम करणे हे अत्यंत दुर्मीळ ध्येयवेडाचे उदाहरण म्हणजे हे कुंटे कुटुंब!
 
 
संघटनेचे काम करण्यासाठी संपूर्ण आयुष्याची दिशा बदलणे आणि त्यात सार्‍या कुटुंबाला सहभागी करून घेणे हे सोपे काम नाही. याला आजकाल आपण ’संघानुकूल जीवनरचना’ असा भलामोठा शब्द वापरतो. मात्र आपल्या ध्येयासाठी आयुष्याची घडी अशा प्रकारे विस्कटून आणि नंतर पुन्हा नीट बसवणे आणि हे करत असताना आपण काही विशेष करत आहोत असा भाव मनातसुद्धा न येऊ देणे हे एखाद्या सिद्ध साधकाचेच लक्षण असू शकते. डॉक्टर मला नेहमी अशा साधनामस्त साधकाप्रमाणेच वाटतात.