मोहीम तलाव पुनरुज्जीवनाची

विवेक मराठी    01-Mar-2024
Total Views |
@चारुदत्त कहू  9922946774
 
 
shalu
गोंदिया येथील शालू जगदीश कोल्हे यांच्या प्रयत्नांमुळेच मामा तलावाने मोकळा श्वास घेतलाच, त्याचबरोबर 63 तलावांचे पुनरुज्जीवन झाले आहे. तसेच शालूताईंनी महिलांना मासेमारी क्षेत्रात आणून या क्षेत्रातील पुरुषांची मक्तेदारी मोडून काढली. यासाठी त्यांनी महिलांना मासे पकडण्यापासून ते बाजारात त्यांची विक्री करण्यापर्यंत आवश्यक ते प्रशिक्षण दिले. त्यामुळे आज तलाव पुनरुज्जीवनासाठीच्या प्रयोगांसाठी शालूताईंचे नाव केवळ भंडारा, गोंदियातच नव्हे, तर राज्यभरात आदराने घेतले जात आहे. अशा शालूताईंच्या प्रेरणादायक कार्याविषयीचा लेखाजोखा..
  
ही कहाणी आहे निमगाव, मोरगाव अर्जुनी तालुका, जिल्हा गोंदिया येथील शालू जगदीश कोल्हे या 33 वर्षीय रणरागिणीची. एक महिला सबला झाली तर ती काय कमाल करू शकते, हे बघायचे असेल तर आपल्याला भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील ढिवर समाज वर्षानुवर्षांच्या कर्मजंजाळातून कसा मुक्त झाला, याचा अभ्यास करावा लागेल. शालू कोल्हे गेल्या नऊ वर्षांपासून फीड (FEED) या संस्थेच्या माध्यमातून माजी मालगुजार तलावांच्या पुनरुज्जीवनाचे काम करीत आहेत. त्यांच्या नऊ वर्षांच्या अथक परिश्रमातून परिसरातील 63 तलावांचे पुनरुज्जीवन झाले असून, या तलावांमधील बेशरमाची झाडे नामशेष झाली आहेत. शालू कोल्हे म्हणतात, “केवळ पाणी आणि माती असणे यास तलाव जिवंत आहे, असे म्हणता येत नाही. जीवविविधता, प्राणी, पक्षी, जनावरांसाठी चारा व लोकोपयोगी वनस्पती जर तलाव परिसरात विपुल असेल तरच तो तलाव जीवनदायक ठरतो.” शालूताईंनी या क्षेत्रात काम करायला प्रारंभ केला, तेव्हा त्या 23 वर्षांच्या होत्या आणि त्यांचे शिक्षण होते फक्त बारावी उत्तीर्ण. सुरुवातीला चार लोकांशी बोलायचे कसे असा प्रश्न पडलेल्या या नारीने परिसरातील अठरापगड जातीच्या महिलांना आपल्या पायावर उभे राहण्याची कला शिकविली आणि आपणच या परिसरातील नारायणी असल्याचे सिद्ध करून सर्वांपुढे एक आदर्श निर्माण केला.
 
 
आज महाराष्ट्रातील अनेक तलावांमध्ये बेशरम अस्ताव्यस्त वाढलेली दिसते. थोडीही ओल मिळाली की ही वनस्पती सुसाट वाढते, तिच्या वाळलेल्या काडीलाही कोंब फुटतात. कोणतेही जनावर चारा म्हणून बेशरमचा पाला खात नाही, विषारी असल्यामुळे नाइलाज असेल तरच सरपणासाठी तिचा उपयोग केला जातो. शालूताई सांगतात, “भंडारा, गोंदिया जिल्ह्यात पारंपरिक मामा (माजी मालगुजार) तलाव मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यात बेशरमचे कायमचे वास्तव्य यात नवे काहीच नव्हते. या वनस्पतीला भोवरी, सदाफुली, सदासावली, कानबैरी, रम या नावांनीही ओळखले जाते. तलावांमध्ये बेशरम वाढली की, अत्यावश्यक स्थानिक पाणवनस्पती नष्ट होतात. साखळ्या चिला, शेमळ्या, गाद, हरदोली, पांढरे कमळ, सिमणी फूल, देवधान, चौरा तसेच कंदमुळे नष्ट झाल्यामुळे पाणपक्ष्यांना, मासोळ्यांना खाद्य मिळत नाही. स्थानिक माशांच्या जाती नष्ट होतात, तसेच तलावांमधील माशांचे उत्पन्नही कमी होते. पाळीव प्राण्यांना तसेच लगतच्या जंगलातील वन्यजिवांना मिळणार्‍या चार्‍याचे प्रमाणही कमी होते. परिणामी पशुधानासाठी चारा उपलब्ध होत नाही, यातूनच मासेमारी व्यवसायावर उदरनिर्वाह करणार्‍या ढिवर समुदायाच्या उपजीविकेलाही बाधा पोहोचते. झाडू बनविण्यासाठी वापरले जाणारे आसेरा नामक गवतही नष्ट झाल्याने महिलांच्या रोजगारावर त्याचा थेट परिणाम होतो.
 

shalu 
 
माजी मामलेदार (मामा) तलाव पूर्वी अतिशय समृद्ध होते आणि त्यावर गावातील लोकांचा उदरनिर्वाह सहज होत होता. कालांतराने बंगाली अर्थात परदेशी माशांचे बीज तलावामध्ये टाकले गेले आणि त्यानेच सारा घात केला. उत्पन्नवाढीसाठी ढिवर समाजातीलच काही व्यावसायिकांनी हे समीकरण स्वीकारले आणि तेच त्यांच्या, समाजाच्या आणि पर्यायाने गावकर्‍यांच्या जिवावर उठले. गार्सकाप, सिपनस, रोहू, कतला, तेलापी, वागूळ, रूपचंद्र या माशांमुळे प्रारंभी उत्पन्नवाढ झाली. पण त्यांनी जीवविविधता नष्ट करण्यात बेशरम वनस्पतीबरोबर हातभार लावला. परदेशी मासे त्यांच्या वजनाच्या चौपट अन्न खातात आणि वनस्पती हेच त्यांचे मूळ खाद्य असते. त्यामुळे तलावातील ही वनस्पती संपली, हे अभ्यासात लक्षात आले. एकीकडे बेशरमचे संकट आणि दुसरीकडे बंगाली माशांचा उपद्रव यातून मामा तलावांचा श्वास कोंडला. हीच कोंडी फोडण्यासाठी शालू कोल्हे, त्यांचे मार्गदर्शक मनीष राजनकर यांच्या साथीने उभ्या झाल्या. यात त्यांना कुटुंबाची, पतीची, आई-वडिलांची आणि सासू-सासर्‍यांचीही उत्तम साथ मिळाली. प्रारंभी खरोखरीच तलावांच्या पुनरुज्जीवनाची गरज आहे का? असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला. गावकर्‍यांची चर्चा केली, ढिवर समाजातील जाणकारांची मते जाणून घेतली असता, हे काम प्राधान्याने हाती घ्यावे लागेल हे मनोमन पटले.
 
 
शालूताईंनी सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी येथील सहकारी संस्थांना एकत्र केले आणि लोकसहभागातून गोंदिया जिल्ह्यातील 45 मालगुजारी तलावांचे शास्त्रीय पद्धतीने पुनरुज्जीवन करण्यात त्या यशस्वी ठरल्या. तलावांचे पुनरुज्जीवन झाल्यामुळे 59 स्थानिक माशांच्या जातींचे संरक्षण व संवर्धन झाले, त्याचबरोबर निरनिराळ्या 214 वनस्पतींनाही बहर आला. तलाव जीवित झाल्यामुळे जीवविविधतेत भर पडली. आता तलाव परिसरात 66 प्रकारचे पक्षी विहरताना दिसत आहेत. हा प्रकल्प तलावांमधील माशांच्या वृद्धीसाठीही कारणीभूत ठरला. त्यामुळे स्थानिक माशांची संख्या तर वाढलीच, शिवाय त्यांचे वजनही दोन ते अडीच पटींनी वाढले. ढिवर समाजातील कुटुंबांचे उत्पन्न वाढून, त्यांचा जीवनस्तरही उंचावला.
 
 
shalu
 
यशाचा हा टप्पा गाठला असला, तरी ध्येय सहज नव्हते. तलाव जिवंत करण्यासाठी त्यात बंगाली मासे सोडायचे नाहीत, असा संकल्प व्यावसायिकांकडून करून घेण्यात आला. प्रारंभी एका तलावाची प्रयोगासाठी निवड केली गेली. जिल्ह्यातील प्रत्येकच तलावात बेशरमचे साम्राज्य पसरले होते. बेशरम हटविण्यासाठी ग्रामपंचायत, बचत गटाच्या महिला आणि मासेमारांनी तलावात श्रमदान केले. बेशरमचे झाड वाळले की ते जाळून टाकायचे अशी योजना झाली. सरकारी अधिकारी म्हणत, बेशरम कधीच मरत नाही आणि ते खरेही होते. पण गावातील महिलांच्या निर्धाराने बेशरम संपवून दाखविली, असे शालूताईंनी अभिमानाने सांगितले. सरकारी योजनेनुसार मोठ्या मशीन्स लावून तलावातील बेशरम काढली जात असे. पण त्याने तलावात मोठमोठे खड्डे पडून जीवविविधता नष्ट होत असे. त्यामुळे सरकारकडे रोजगार हमीच्या नियोजनात सदाफुली (बेशरम) काढायच्या कामाचा समावेश करण्याचा, तसेच ही वनस्पती यंत्राने न काढता मजुरांच्या हाताने काढण्याचा आग्रह केला गेला. काही तलावांमध्ये जेसीबीने ही वनस्पती काढली जात होती. त्या वेळी शालूताई जेसीबीला आडव्या आल्या आणि यंत्राचे काम थांबविले.
 
 
काही उपाययोजना करून तलावाच्या पुनरुज्जीवनास प्रारंभ झाला. पण त्यातील नाहिशी झालेली जीवविविधता आणायची कुठून? हा प्रश्न होता. तो सोडविण्यासाठी पहिल्या पावसानंतर तलावात नांगरणी केली गेली. पतीराम तुमसरे आणि नंदलाल मेश्राम यांच्या मार्गदर्शनात तलावात पाणी भरू लागताच गाद, चिला, पाज, देवधान, पोवन, कमळ, चौरा, राजोली, खस आदी वनस्पती लावण्यात आल्या. या तलावांमध्ये मासेमारीसाठी मोठे जाळे वापरण्यास बंदी घातली गेली. मासेमारांनीही लहान जाळे वापरण्याची सूचना तंतोतंत पाळली. सहा महिन्यांत परिणाम मिळाले. सदाफुली अर्थात बेशरम नामशेष झाली. इतरही वनस्पती तलाव आणि परिसरात दिसू लागल्या. 51 प्रकारचे मुलकी मासे आढळून आले. मुलकी मासे वैशिष्ट्यपूर्ण यासाठी की, ते वर्षभर मासेमारांना दररोज उत्पन्न देतात. हे मासे 200 ते 700 रुपये किलोप्रमाणे विकले जातात. विशेष म्हणजे या माशांचे बीज बंगाली माशांप्रमाणे दर वर्षी टाकावे लागत नाही. मुलकी मासे भाजून आणि कच्चे दोन्ही प्रकारे विकले जातात. या प्रयोगातून ढिवर समाजातील लोकांचे उत्पन्न वाढले आणि तलावही जीवविविधतेने समृद्ध झाले.
 
 
shalu
 
यानंतर शालूताईंनी महिलांच्या मासेमारीचा नवा प्रयोग आरंभिला. मासेमार महिलांचे बचत गट तयार केले. पैसे कमावणे हा एकमेव उद्देश त्यामागे नव्हता. समाजातील महिलांना मान नव्हता, तो मिळविण्यासाठीचा त्यांनी लढा उभारला. शालूताईंचे सारे शिक्षण अनुभवातूनच झाले आहे. हळहळू त्यांनी ग्रामपंचायती गाजविल्या. तेथे महिलांचे प्रश्न मांडले. सरकारी योजना खेचून आणल्या. पूर्वी चार लोकांपुढे उभे राहण्याचीही भीती वाटायची. पण आज त्या स्वत:चे प्रश्न तर मांडतातच, तसेच समाजातील महिलांच्या समस्यांनाही उच्चरवात वाचा फोडतात. महिला सक्षमीकरणाचे त्यांचे प्रयत्न आता 63 गावांपर्यंत पोहोचले आहेत. मुलकी माशांचे लोणचे हा नवा उपक्रम त्यांनी हाती घेतला, तोही यशस्वी ठरला. सध्या पाच गावांत प्रत्येकी 16 विविध समाजातील महिला हा उपक्रम राबवीत असून, त्याला मोठी मागणी येत आहे.
 
 
शालूताईंनी महिलांना मासेमारी क्षेत्रात आणून या क्षेत्रातील पुरुषांची मक्तेदारी मोडून काढली. सुरुवातीला महिलांना मासे पकडताच येईनात. हळूहळू प्रयत्नपूर्वक मासे पकडणे त्या शिकल्या. मग ते बाजारात नेणे, स्वच्छ धुऊन, कापून ग्राहकांना देणे यासाठी बाजारातील ओटेही त्यांनी काबीज केले. सर्व कामे महिलांनी केली आणि पुरुषांना तोंडात बोटे घालायला भाग पाडले. या उपक्रमाची सुरुवात त्यांनी स्वत:च्या गावापासून केली. हा उपक्रम यशस्वी होऊन त्यावर सरकारचीही पसंतीची मोहर उमटत आहे. या उपक्रमासाठी तलाव लीजवर घेतले गेले किंवा सोसायट्यांच्या तलावात मुसंडी मारली गेली. महिला मासेमारीचा प्रयोगही सफल झाला. तलावांमध्ये योग्य त्या उपाययोजना केल्यामुळे अडीच ते चार किलोचे मासे विकसित होत आहेत. आधी लोक महिला मासेमारांची टर उडवत. पण आता त्यांचा प्रयोग बघण्यासाठी आणि राज्याच्या इतर भागातही त्याची अंमलाजावणी करण्यासाठी नागपूरपासून मुंबईपर्यंतच्या अधिकार्‍यांनी शालूताईंचे गाव गाठले आणि त्यांच्यापासून यशाचा कानमंत्र घेतला. तलाव पुनरुज्जीवनासाठीच्या प्रयोगांसाठी शालूताईंचे नाव केवळ भंडारा, गोंदियातच नव्हे, तर राज्यभरात आदराने घेतले जात आहे. शालूताईंच्या प्रयत्नांमुळेच मामा तलाव मोकळा श्वास घेऊ लागले, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.