‘उज्ज्वल’ यशाची धनी

विवेक मराठी    01-Mar-2024
Total Views |
@अश्विनी विद्या विनय भालेराव - 8087042002
घरातील आर्थिक परिस्थितीला आव्हान म्हणून स्वीकारून त्यातून मार्ग काढणारी, व्यवसायात पाय रोवून उभी राहत स्वत:चे स्थान निर्माण करणारी नाशिकमधील उद्योजिका उज्ज्वला संजय टकले. नाशिकच्या नवीन सिडको परिसरातील जगताप नगर येथे त्यांचा ‘टकले बंधू फूड प्रॉडक्ट’ नावाने ’राजगिरा लाडू, चिक्की व बेकरी प्रॉडक्ट’ उत्पादनाचा कारखाना आहे.takale bnadhu
 
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात, बेताची आर्थिक स्थिती असलेल्या घरात उज्ज्वला यांचा जन्म झाला. त्यांचे वडील भगवानराव गोडसे बडोदा बँकेत शिपाई म्हणून नोकरीला होते. त्यांच्या पगारात घरखर्च भागवणे कठीण असल्याने आई संगमनेरातच भेळेची गाडी चालवायची. उज्ज्वला यांच्या आजी-आजोबांनी संगमनेरात अहमदनगर जिल्ह्याचे वैशिष्ट्य असलेल्या मटकी भेळेची पहिली गाडी सुरू केली होती. पुढे बिकट आर्थिक परिस्थितीत उज्ज्वलाच्या आई विमल गोडसे यांनी हा व्यवसाय सांभाळला आणि पुढे नेला.
 
 
उज्ज्वला या घरातील मोठे अपत्य असल्याने त्या लहानपणापासूनच अंगावर पडलेल्या जबाबदारीने त्यांना समजूतदार बनवले. लहान भावंडांना सांभाळणे, घरातील लहानसहान कामे करणे, घर सांभाळणे ही कामे लहान वयातच अंगावर पडली. सुट्टीच्या दिवशी शनिवार-रविवारी त्या आईला मदत करण्यासाठी भेळेच्या गाडीवर जात असत. इथेच त्यांच्यात व्यवसायाची बीजे रूजली. पाककलेची आवडही रुजली. एकीकडे शालेय शिक्षण चालू होते. इंग्लिश आणि गणित विषय सोडल्यास अभ्यासात हुशार होत्या आणि खेळांतही तरबेज होत्या. धावण्याच्या स्पर्धा, खो-खो, लंगडी, गोळाफेक, भालाफेक यांसारख्या विविध मैदानी खेळांच्या अनेक शालेय, आंतरशालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होत त्यांनी आपले नैपुण्य दाखवले. “या स्पर्धांमुळे माझ्यात जिद्द, महत्त्वाकांक्षा, लढाऊ वृत्ती विकसित झाली. याचा फायदा भविष्यात आलेल्या संकटांना सामोरे जाताना झाला. यामुळेच मी खर्‍या अर्थाने सक्षम झाले,” असे उज्ज्वला सांगत.
 

takale bnadhu 
 
गणित विषय कच्चा असल्याने, दहावीत असताना त्या गणित विषयात अनुत्तीर्ण झाल्या. यामुळे वाया जाणार्‍या वर्षात आता करायचे काय असा प्रश्न त्यांना पडला. त्याच वेळी संगमनेरात ‘वनस्थळी’ नावाचा एक अंगणवाडीचा कोर्स उपलब्ध असल्याचे आणि तो करण्यासाठी वयाची, शिक्षणाची अट नसल्याचे त्यांना मैत्रिणीकडून समजले. हाताशी असलेल्या वेळेचा सदुपयोग करण्याच्या हेतूने उज्ज्वला यांनी कोर्सला प्रवेश घेतला. महिलांमधील कौशल्ये विकसित करून त्यांना स्वावलंबी बनवणे, त्यातून रोजगार उपलब्ध करून देणे हा वनस्थळी कोर्सचा मूळ उद्देश होता. या सहा महिन्याच्या कोर्समध्ये महिलांना अंगणवाडी शिक्षिका, शिवणकाम, विविध कारकुनी कामे यांचे प्रशिक्षण दिले जात होते. यातील छंदवर्गामुळे उज्ज्वला यांना शिक्षणात आणि त्यातही गणित विषयात रस निर्माण झाला. या छंदवर्गातील नाटकांमध्ये, वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेतल्याने त्यांच्यातील संवादकौशल्य वाढायला लागले. त्याच दरम्यान त्या 10वीची पुरवणी परीक्षा पास झाल्या. पुढे पेटिट महाविद्यालयात प्रवेश घेऊन त्यांनी कला शाखेतील बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
 
 
पुढचे शिक्षण घेणे घरातील आर्थिक परिस्थितीमुळे शक्य नव्हते. त्यांच्या भावंडांच्या शिक्षणाचा खर्चदेखील वाढायला लागला होता. तेव्हा उज्ज्वला यांनी परिस्थितीची गरज म्हणून नोकरी करण्याचे ठरवले. ’वनस्थळी’ संस्थेतच त्यांना 1995 साली नोकरी लागली. या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील गाव-खेड्यात जाऊन त्यांनी काम केले. अंगणवाडी शाळेत, प्राथमिक शाळेत शिकवले. याच कालखंडात उज्ज्वला यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बदलायला सुरुवात झाली.
 
 

takale bnadhu
 
1998 साली चाळीसगावच्या संजय टकले यांच्याशी लग्न झाल्याने त्यांना नोकरी सोडून द्यावी लागली. त्यांच्या सासरीदेखील परिस्थिती बेताचीच होती. त्यामुळे नवा संघर्ष, नवी सुरुवात वाट्याला आली. त्यांच्या यजमानांची टायपिंग इन्स्टिट्यूट होती. तिच्यातून उत्पन्न खूप कमी येत होते. उज्ज्वला त्यांना मदत करायला जायच्याच, शिवाय घरातील चिक्कीच्या व्यवसायातदेखील मदत करायच्या. व्यवसाय घरगुती असल्याने त्यातून फार उत्पन्न मिळत नव्हते. त्यांचे सासू-सासरे म्हणजेच प्रभावती आणि दत्तात्रय टकले अतिशय उत्तम दर्जाची शेंगदाण्याची, डाळीची चिक्की बनवत असत. उज्ज्वला त्यांच्याकडून चिक्की बनवण्याचे कसब शिकल्या. दरम्यान संसारही वाढत होता. वर्षे पुढे सरकत होती. संजय यांच्या टायपिंग इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांचे प्रमाण हळूहळू अत्यल्प झाले आणि एका क्षणी त्यांचा व्यवसाय एकदम बंद पडला. अर्थार्जनासाठी आता करायचे काय? हा प्रश्न टकले दांपत्यासमोर उभा राहिला. त्यातच घरगुती वादामुळे त्यांना चाळीसगाव सोडण्याची वेळ आली. अर्थार्जनासाठी त्यांनी नाशिकला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. संजय यांच्या मित्राच्या मदतीने उभयतांनी नाशिकला आपला संसार नव्याने थाटला. या काळात दोघांनीही वेगवेगळ्या लहान-मोठ्या नोकर्‍या, व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. शिवाय त्यांचा चिक्कीचा व्यवसाय नाशकात घरगुती स्वरूपात सुरू केला. नाशिकमध्ये राजगिरा लाडवालादेखील मागणी असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी जाणकारांकडून राजगिरा लाडू तयार करण्याचे कसब शिकून घेतले. या उत्पादनाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेत, 2006 साली नाशिकमधील अंबड एमआयडीसीत संजय यांनी शेंगदाणा चिक्की, राजगिरा चिक्की बनवण्याचा कारखाना टाकला. त्याच वेळी कर्ज घेऊन मोठे घरही घेतले. या फॅक्टरीच्या माध्यमातून 15 महिलांना रोजगार मिळवून दिला. गाडी योग्य मार्गावर धावत असतानाच, मार्केटिंगसाठी कामाला असलेल्या मुलाने मोठा आर्थिक दगाफटका केल्यामुळे आर्थिक नुकसान झाले. तेव्हा उज्ज्वला यांनी स्वत: मार्केटिंगची जबाबदारी स्वीकारली. यातून बाजारातील अनेक गोष्टी जवळून अनुभवायला आणि शिकायला मिळाल्या. या कामासाठी उज्ज्वला रोजच्या रोज टू-व्हीलरवर उन्हातान्हात फिरत असत. बाजारातील गरज आणि मागणी ओळखून उज्ज्वला यांनी चिक्की, राजगिरा लाडू याबरोबरच, वेगवेगळ्या प्रकारचे पापड, फरसाण आदी गोष्टी विकण्यास सुरुवात केली. या कामाने त्यांना खर्‍या अर्थाने व्यवसायासंबंधीचे ज्ञान, अनुभव दिले. मात्र व्यवसाय भरभराटीला येत असताना फॅक्टरीत कामगारांचे प्रमाण अधिक आणि उत्पादन कमी झाल्याने व्यवसाय तोट्यात गेला. यात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी त्यांना हक्काचे घर विकून व्यवसायिक देणी फेडावी लागली. होती-नव्हती ती सगळी पुंजी यात खर्ची पडली. आधीच्या तुलनेत कैक पटीने जास्त संघर्ष समोर उभा ठाकला आला. या परिस्थितीने न डगमगता उज्ज्वला यांनी नवा डाव मांडण्याचा निर्णय घेतला आणि त्या जिद्दीने उभ्या राहिल्या.
 
takale bnadhu 
 
भाड्याचे घर घेऊन घरगुती स्वरूपात चिक्कीचा व्यवसाय सुरूच ठेवला. त्या जिथे राहत होत्या, तिथे शेजारच्या फ्लॅटमध्ये काही बॅचलर मुले राहण्यास आली. त्यांनी आपल्या परिसरात कुठे जेवणाची मेस आहे का? अशी उज्ज्वला यांच्याकडे विचारणा केली. त्या वेळी, ‘भुकेल्याचे पोट भरले जाईल आणि गाठीशी दोन पैसेदेखील मिळतील’, या विचाराने घरगुती स्वरूपात खानावळ सुरू करण्याचा निर्णय उज्ज्वला यांनी घेतला. अंगभूत पाककौशल्याने 2 मुलांपासून सुरू झालेले डबे 25 मुलांपर्यंत वाढले. त्यातही कुणी पैसे बुडवले, तर कुणी जेवणाचे कौतुक केले. त्यातून पुढे जात व्यवसाय करत असतानाच त्यांनी सिडकोतील हेडगेवार चौक परिसरातील महावितरण वीज भरणा केंद्रात नोकरी सुरू केली.
 
 
या काळातही सीझन आणि ऑर्डरनुसार तिळाचे लाडू, चिक्की तयार करत होत्या. एकदा अशाच सुट्टीच्या दिवशी चिक्कीची ऑर्डर देण्यासाठी गेल्या असता, सरकारी निविदा भरणार्‍या व्यक्तीशी त्यांची गाठ पडली. त्यांनी त्यांच्या संस्थेसाठी उज्ज्वला यांना राजगिरा लाडू आणि चिक्की बनवून द्याल का? असे विचारले. उज्ज्वला यांनी त्यांच्या या प्रस्तावाचा विचार करून, पाच हजार चिक्की-लाडवांचे सॅम्पल तयार करून दिले. हे पदार्थ संबंधितांना इतके आवडले की, त्या व्यक्तीस आणि अर्थातच त्यांच्या संस्थेस कायमस्वरूपी पोषण आहाराचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले. या कामातून उज्ज्वला यांनाही चांगले पैसे मिळणार असल्याने त्यांनी 2015 साली नोकरी सोडली आणि पुन्हा एकदा पूर्णवेळ आपल्या मूळ व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि व्यवसाय विस्तार करण्याचे ठरवले.
 
 
उज्ज्वला यांचा देवावर प्रचंड विश्वास आहे. त्या नियमितपणे समर्थ रामदास स्वामींच्या बैठकीला जात असत. पुन्हा एकदा व्यवसायाची उभारणी करत असताना उज्ज्वला यांनी समर्थांसमोर साकडे घातले की, ‘देवा किती काळ आमची परीक्षा घेत राहणार आहेस? या वेळी तरी आमच्या व्यवसायाची घडी नीट बसू दे, अखंडपणे व्यवसाय सुरू राहू दे.’ आपण ज्या वेळी मनापासून देवाची प्रार्थना करतो, त्या वेळी देवही तथास्तु म्हणतो. देवाने प्रार्थना ऐकली. कोरोनाचा अपवाद वगळता मागील 6 वर्षांपासून त्यांचा व्यवसाय अखंडपणे आणि उत्तमरित्या सुरू आहे.
 
 

vivek


 
उज्ज्वला यांचा व्यवसाय 2018 साली खर्‍या अर्थाने उभा राहिला. त्यासाठी त्यांनी युनियन बँकेचे कर्ज घेतले आणि रीतसर व्यवसाय प्रशिक्षणही घेतले. या कर्जामधून त्यांनी पाटील नगर परिसरात सिडकोचे भाड्याचे घर आणि आवश्यक मशिनरी, कच्चा माल विकत घेतला. याव्यतिरिक्त मालाची वाहतूक करण्यासाठी सेकंड हँड छोटा टेंपोदेखील घेतला आणि त्याचवेळी ‘टकले बंधू फूड प्रॉडक्ट’ नावाने फॅक्टरीची अधिकृत नोंदणीही केली.
 
 
अगदी कमी काळात त्यांच्या व्यवसायाचे चांगले बस्तान बसले. सुरुवातीला फॅक्टरीत राजगिरा लाडू आणि शेंगदाणा चिक्कीचे वेगवेगळे प्रकार तयार होत होते. मग ती जागा अपुरी पडायला लागल्याने त्यांनी नवीन सिडकोच्या जगताप नगर परिसरात मोठी जागा भाड्याने घेऊन फॅक्टरी सुरू केली आहे. या जागेत त्यांनी राजगिरा भाजण्यासाठी आणि गाळण्यासाठी, राजगिरा लाडवाचे पॅकेजिंग, चिक्कीचे पॅकेजिंग अशा वेगवेगळ्या कामांसाठी एकूण सहा यंत्रे विकत घेतली आहेत. अतिशय खडतर परिस्थितीत उभारलेल्या आपल्या व्यवसायात त्यांनी 12 महिलांना आणि एका मुलाला रोजगार दिला आहे. त्यांच्या फॅक्टरीचे वैशिष्ट्य म्हणजे फॅक्टरीत अतिशय स्वच्छता तर असतेच, शिवाय काम करणार्‍या महिला हातमोजे आणि डोक्यावर टोपी घालूनच दिवसभर काम करतात. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे उज्ज्वला आणि संजय स्वत: जातीने लक्ष घालून, गरज पडेल तिथे स्वत: उभे राहून या स्त्रियांच्या बरोबरीने काम करतात. त्यांचा मुलगा वैष्णवदेखील शक्य तेव्हा मार्केटिंगमध्ये मदत करत असतो.
 
 
आजच्या घडीला त्यांच्या फॅक्टरीत दिवसाला कमीत कमी 5000 लाडू तयार होतात. शिवाय ऑर्डरनुसार शेंगदाणा चिक्कीचे विविध प्रकार - मावा चिक्की, क्रश चिक्की, चॉकलेट फ्लेवर आणि कोकोनट फ्लेवर चिक्की तयार होतात. याव्यतिरिक्त ड्रायफ्रूट चिक्की, राजगिरा चिक्की, डाळीची चिक्की आणि मुरमुरा लाडूचेही उत्पादन घेतले जाते. आता पुढची पायरी म्हणून बेकरी उत्पादने तयार करून विकण्याचा विचार आहे. लादी पाव, टोस्ट अशी विविध बेकरी उत्पादने बनवण्याचे ओव्हन, ट्रे अशी आवश्यक ती सामग्री विकत घेतली असून आता प्रायोगिक स्वरूपात ही उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली आहे. शिवाय फॅक्टरीच्या पुढील भागात त्यांनी टकले फूड प्रॉडक्ट्सची सगळी उत्पादने विकण्यासदेखील ठेवली आहेत.
 
 
उज्ज्वला यांनी कष्टाची शिंपण करून उभा केलेला ‘टकले बंधू फूड प्रॉडक्ट’ व्यवसाय आज दिमाखात उभा आहे. व्यवसायाची वार्षिक उलाढाल 3 कोटींच्या घरात जाऊन पोहोचली आहे. या यशात उज्ज्वला यांच्याइतकाच त्यांचे पती संजय आणि मुलगा वैष्णव, यांचा संपूर्ण कुटुंबाचादेखील वाटा आहे. या यशस्वी उद्योजिकेचा प्रवास पाहिल्यावर, कुठल्याही स्त्रीच्या मागे भक्कमपणे साथ देणारा नवरा आणि कुटुंब असेल, तर ती स्त्री जिद्दीने, हिंमतीने यश मिळवू शकते, कर्तृत्व गाजवू शकते, हेच अधोरेखित होते. उज्ज्वला यांच्या जिद्दीला, कर्तृत्वाला सलाम आणि त्यांच्या कुटुंबीयांचे कौतुक!