सावित्रीबाई जोतिबा फुले

काळापुढच्या..

विवेक मराठी    01-Mar-2024   
Total Views |
@सुधीर जोगळेकर - 9820016674
 
काळापुढच्या..
केदार शिंदेचा ‘बाईपण भारी देवा‘ पाहिला आणि एक नवा भुंगा डोक्यात घुमायला लागला.
 
2023च्या लोकसंख्या दिनाचं, त्या दिवसाचं आणि त्या वर्षाचं बोधवाक्य होतं - ‘स्त्री-पुरुष समानतेची शक्ती उंचावणं - जगाच्या रंगमंचावरील अनंत शक्यता प्रत्यक्षात आणू पाहणार्‍या महिलांचा आणि मुलींचा आवाज बुलंद करणं.’
स्त्री-पुरुष समानतेची शक्ती भारताला नवी नाही.
 
जीवनाच्या रंगमंचावर पुरुषी वर्चस्वाला आव्हान दिलेल्या भारतीय महिला अनेक, त्यांचा एकत्र परिचय करून देणारं लेखन हाच तो नवा भुंगा.
 
बाई असूनही समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांत भारतीय स्त्रियांनी गाठलेली उत्तुंग यशाची ‘भारी‘ शिखरं ही भारतीय इतिहासाला नवीन नाहीत.
 
जे जे क्षेत्र या महिलांनी निवडलं, त्या त्या क्षेत्रातील पुरुषप्रधानतेला आव्हान देत, पुरुषी वर्चस्व झुगारून देत या महिलांनी सुस्थापित स्वत:चं स्वतंत्र अस्तित्व जगाला दाखवून देणारे नवनवे विक्रम केले.
 
कंबर कसून, पाय घट्ट रोवून उभ्या राहत, ज्यांनी इतिहास घडवला अशा या स्त्रिया एका अर्थाने त्या त्या क्षेत्रातल्या ‘पहिलटकरणी‘ ठरल्या.
 
एका अर्थाने त्या ‘काळापुढच्या स्त्रिया‘ ठरल्या.
 
अशा काही निवडक स्त्रियांचा हा परिचय.
 
 
उणेपुरे सहासष्ट वर्षांचे आयुष्य सावित्रीबाई फुले यांना लाभले, त्या आयुष्यात त्यांनी जे उत्तुंग कार्य केले, ते त्यांच्या निधनाला सव्वाशेहून अधिक वर्षे उलटूनही आजदेखील मार्गदर्शक ठरते आहे. नुकत्याच होऊन गेलेल्या त्यांच्या 127व्या पुण्यतिथी निमित्ताने..
 

savitribai phule biography
 
स्त्री स्वातंत्र्य औषधालाही नसलेल्या काळात सातारा जिल्ह्याच्या खंडाळा तालुक्यातील नायगाव गावात लक्ष्मीबाई आणि खंडोजी नेवसे पाटील यांच्या पोटी सावित्रीबाईंचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी, म्हणजे 1840 साली 13 वर्षे वयाच्या जोतिबा फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. जातीयतेचे चटके लहानपणापासून बसलेल्या आणि अस्पृश्यांचे हाल पाहून काळीज पिळवटून निघालेल्या जोतिबांनी तत्कालीन हिंदू समाजातील अमानुष रूढी-परंपरांविरोधात आणि कर्मकांडाविरोधात जो लढा दिला, त्यात जोतिबांच्या मनातील पेटत्या सुधारणाविषयक ज्योतीला प्रज्वलित करण्याचे काम सावित्रीबाईंनी केले, आणि त्या सामाजिक क्रांतीची ज्योत बनल्या.
 
 
सावित्रीबाईचे सासरे गोविंदराव फुले हे मूळचे कटगुणचे गोरे, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली, म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले. महात्मा जोतिबा फुले यांच्याबरोबर सावित्रीबाईंनी भारतातील महिलांचे अधिकार स्थापित होण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच सावित्रीबाईंना ‘भारतीय स्त्रीवादाची जननी’ मानले जाते. महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात. जातीवर आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी त्यांनी काम केले. फुले दांपत्याने विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संपदेखील घडवून आणला.
 
 
जोतिरावांची मावस आत्या सगुणाऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकार्‍याकडे त्यांच्या मुलाची दाई म्हणून काम करायच्या. त्यामुळे त्यांना इंग्लिश कळू लागले आणि मोडकेतोडके बोलताही येऊ लागले. त्यांच्यामुळेच जोतिराव शिक्षणाकडे आकृष्ट झाले. सावित्रीबाईंना एका ख्रिश्चन मिशनर्‍याने लग्नापूर्वी एक पुस्तक दिले होते, ते घेऊन त्या सासरी आल्या होत्या. त्यावरून जोतिरावांनी सावित्रीबाईंना आणि सगुणाऊंना शिकवले. 1 मे 1847 रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागास वस्तीत एक शाळा काढून दिली. पुढे ही शाळा मध्येच बंद पडली. त्यानंतर 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात जोतिराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली.
 
 
लग्नाच्या वेळी सावित्रीबाई निरक्षर होत्या. जोतिरावांनी सावित्रीबाईंना त्यांच्या घरीच शिक्षण दिले. जोतिरावांकडे त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जोतिरावांचे मित्र सखाराम यशवंत परांजपे आणि केशव शिवराम भवाळकर यांनी पुढील शिक्षणाची जबाबदारी पार पडली. त्यांनी स्वत:ला दोन शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमातही सहभागी करून घेतले. पहिला कार्यक्रम अहमदनगरमधील अमेरिकन मिशनरी सिंथिया फरार यांनी चालविलेल्या संस्थेचा होता, तर दुसरा पुण्यातील एका सामान्य शाळेत होता. त्यांचे हे प्रशिक्षण पाहता, सावित्रीबाई या पहिल्या भारतीय महिला प्रशिक्षित शिक्षिका आणि मुख्याध्यापिका ठरल्या, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
 
 
जुलै 1887मध्ये जोतिरावांना पक्षाघाताचा आजार झाला, त्या आजारातच 28 नोव्हेंबर 1890 रोजी त्यांचे निधन झाले. अंत्ययात्रेच्या वेळेस प्रेतापुढे जी व्यक्ती टिटवे धरते, तिला वारसा हक्क प्राप्त होतो अशी प्रथा त्या काळात रूढ होती. हा वारसा हक्क मिळविण्यासाठी जोतिबांचे पुतणे पुढे झाले आणि त्यांनी जोतिबांचे दत्तकपुत्र यशवंत यांना विरोध केला. पुतण्याचा हा डाव लक्षात आल्याने स्वत: सावित्रीबाई पुढे झाल्या आणि त्यांनी टिटवे धरले. त्या स्वत: अंत्ययात्रेच्या अग्रभागी चालल्याच, तसेच त्यांनी स्वत:च्या हाताने अग्नी देण्यासही मागेपुढे पाहिले नाही.
 
 
1897 साली पुण्यात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला असताना पीडितांची सेवा करण्यासाठी सावित्रीबाई पुढे सरसावल्या, त्यातच त्यांना स्वत:ला प्लेग झाला आणि त्यांचे निधन झाले. सहासष्ट वर्षांचे आयुष्य सावित्रीबाईंना लाभले, त्या आयुष्यात त्यांनी जे उत्तुंग कार्य केले, ते त्यांच्या निधनाला सव्वाशेहून अधिक वर्षे उलटूनही आजदेखील मार्गदर्शक ठरते आहे. 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात जोतिरावांनी मुलींची शाळा काढली. या शाळेत शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंची नेमणूक करण्यात आली. यामुळे सावित्रीबाईंना पहिल्या भारतीय शिक्षिका म्हटले जाते. 1848 ते 1852पर्यंत त्यांनी एकूण 18 शाळा काढल्या.
 
 
शाळा सुरू करण्याबरोबरच 28 जानेवारी 1863 रोजी त्यांनी स्वत:च्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून एक प्रसूतिगृहही सुरू केले. बालहत्या प्रतिबंधक गृह जोतिरावांनी सुरू केले असले, तरी त्याच्या देखरेखीची संपूर्ण जबाबदारी सावित्रीबाईंवर होती. 1876-77च्या दुष्काळातदेखील त्यांनी खूप कष्ट केले. जोतिराव गेल्यानंतर तीन वर्षांनी 1893 साली सासवड येथे भरलेल्या ‘सत्यशोधक परिषदे’चे अध्यक्षपद सावित्रीबाईंनी भूषविले.
 
 
1896 साली महाराष्ट्रात पडलेल्या भीषण दुष्काळात सावित्रीबाईंनी सामाजिक सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणार्‍या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला. स्वत:च्या दत्तक पुत्राच्या विवाहाचा प्रश्न उभा राहिला, तेव्हा विधवेच्या मुलाला कुणीही मुलगी देण्यास तयार होत नव्हते, ते पाहून सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते ज्ञानोबा ससाणे यांच्या राधा नामक मुलीशी त्यांनी यशवंतचा विवाह लावून दिला आणि आंतरजातीय विवाहाची प्रथा महाराष्ट्रात रूढ केली.
 
 
 3 जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्तिदिन म्हणून साजरा केला जातो. 10 मार्च 1998 रोजी भारत सरकारने सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रसिद्ध केले. 2015मध्ये, पुणे विद्यापीठाचे नामकरण ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असे करण्यात आले.
 
 
सावित्रीबाईंची एकूण चार पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यात काव्यफुले (काव्यसंग्रह), सावित्रीबाईंची गाणी, सुबोध रत्नाकर आणि बावनकशी यांचा समावेश आहे. सत्यशोधक चळवळीचा मूर्तिपूजेला, देवाधर्माला विरोध होता असे सांगितले गेले, परंतु सावित्रीबाईंच्या ‘काव्यफुले’ या कवितासंग्रहात शिवप्रार्थना, शिवस्तोत्र, ईशस्तवन आणि सरस्वतीवंदना या शीर्षकाच्या कविता आहेत, हे ही टीकाकार मंडळी सोयीस्कररित्या विसरताना दिसतात. काव्यफुले हा कवितासंग्रह ‘सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय‘ या शीर्षकाखाली प्रकाशित झालेल्या साहित्य संग्रहात अंतर्भूत आहे आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने डॉ. मा.गो. माळी यांच्या संपादकत्वाखाली तो प्रसिद्ध केला आहे.

सुधीर जोगळेकर

  सुधीर जोगळेकर हे ज्येष्ठ पत्रकार आहेत..