आले, आले, ओले काजूगर

विवेक मराठी    11-Mar-2024
Total Views |
@प्रा. सुहास द. बारटक्के -  9423295329
फेब्रुवारी आणि मार्च हे दोन महिने कोकणी माणसाला खर्‍या अर्थानं ‘श्रीमंती’ बहाल करणारे. कारण याच महिन्यात कोकणी माणसाच्या जेवणात अवतरते ती ओल्या काजूगराची उसळ! टेसदार, मस्त आणि जिभेवर चव रेंगाळत राहावी अशी! म्हणूनच ते ‘श्रीमंती’ खाणं होय!
 
kaju
खरं तर पांढरेशुभ्र मोठ्या आकाराचे चविष्ट सुके काजूगर हे श्रीमंती खाणं. जगात कुठेही जा काजूगराला, खाद्यान्नात उच्च दर्जा दिलेला दिसतो. काजूच्या बोंडाच्या बाहेर चिकटलेल्या सुकलेल्या बीपासून हे शुभ्र काजूगर बनतात. ते टिकतातही वर्ष-दोन वर्षं. परंतु काजूची बोंडं रसाळ होण्यापूर्वीच त्याला चिकटलेल्या हिरव्या बीचा गर म्हणजे ओला काजूगर. काजूचं बोंड (फळ) तयार व्हायच्या आत ही हिरवी बी झाडावरून काढली जाते. ती सोलली की आत मिळतो तो ओला काजूगर! त्याची चवच न्यारी!
 
 
अगदी सुक्या काजूगरापेक्षा ही चव सर्वस्वी वेगळी आणि जिभेला सुखावणारी असते. मात्र त्यासाठी ओले काजूगरच हवे असतात, जे फक्त फेब्रुवारी व मार्च या दोनच महिन्यांत मिळू शकतात, कोकणात यादरम्यान ओल्या काजूगराचे वाटे घेऊन बाजाराच्या ठिकाणी खेडूत या काजूगराची विक्री करण्यासाठी उभे असतात. त्यांच्याशी फार घासाघीस न करता हे ओले काजूगर मिळवावे लागतात. ते कोमट पाण्यात तासभर ठेवून त्यांच्यावरचं पातळ आवरण (साल) काढून टाकायचं. मग जो निव्वळ पांढराशुभ्र गर मिळतो, त्याची उसळ करायची. या उसळीची चव इतकी सुंदर असते की कोकणात येणारा पै-पाहुणा अग्रक्रमाने तिचीच मागणी करतो. कोकणात मांसाहारींनी यायचं ते मासे खायला आणि शाकाहारींनी यायचं ते काजूगराची उसळ खायला.
 
अर्थात, ही उसळ दोन-चार प्रकारांनी करता येते. त्यातील मसाला घातलेली व वाटण लावलेली झणझणीत काजूगर उसळ चक्क मटणापेक्षा उत्तम स्वाद देणारी असते. या उसळीच्या रश्श्याला काजू बीमधल्या प्रोटीन्सचा एक वेगळाच स्वाद असतो.
 
 
रस्साविरहित आणि नुसतं ओलं खोबरं किसून घातलेली काजूची बिनतिखटाची (थोडी ओली मिरची लावलेली) उसळही भन्नाट लागते. काही ठिकाणी तिखट वा मिरची अजिबात न घालता उपासाची काजू उसळ करतात. त्याचीही एक वेगळी चव आहे. एकूण काय, काजूगर हा मुळात चविष्ट पदार्थ असल्याने तो कसाही बनवा, सुंदरच लागतो.
 
kaju
 
हं, मात्र ही उसळ वारंवार खाणं परवडत नाही. कारण ओल्या काजूगराचा भाव सुक्या काजूगरापेक्षाही अधिक असतो - म्हणजे सुके काजूगर एक हजार रुपये किलो असतील, तर ओले काजूगर 1400 ते 1500 रुपये किलोने विकले जातात. (हाच सध्याचा भाव आहे.) म्हणजे ही उसळ श्रीमंताचंच खाणं म्हणायला हवं ना? परंतु गरीब कोकणी माणूसही वर्षाकाठी चार-दोन वेळा काजूगराची उसळ खातोच. कारण ती पुन्हा वर्षभर मिळत नसते. कारण ओले काजूगर हे फक्त सीझनमध्येच मिळतात व ते फार काळ टिकतही नाहीत. सोलल्यानंतर लगेचच 1-2 दिवसांत त्याची उसळ करावी लागते. अर्थात, आजकाल बर्‍याच ठिकाणी हे ओले गर उन्हात सुकवूनही ठेवतात. वर्षभर सणासुदीला वापरता येतात. हे गर पाण्यात बुडवून भिजत घातले की झालं. पुन्हा ओले काजूगर तयार! परंतु ताज्या काजूगराची उसळ अप्रतिमच असते. आता हे काजूगर इतके महाग का? तर नारळ स्वस्त पण शहाळं महाग, तसं याचं आहे. कोणताही पदार्थ कच्चा कोवळा खाणं यात वेगळा स्वाद असावा.
 
उन्हात वाळवून डब्यात भरून ठेवलेले हे काजूगर वर्षभर मटणात किंवा कटाच्या आमटीत घातले जातात. कटाच्या आमटीची चव त्यामुळे सुंदर लागते. कोकणात मार्च महिन्यात शिमगा मोठ्या प्रमाणावर साजरा करतात. या वेळी होळीसाठी केलेली पुरणाची पोळी व डाळीच्या उरलेल्या पाण्यापासून बनवलेली झणझणीत कटाची आमटी व त्यात मुबलक ओले काजूगर असं ते खरं पक्वान्न असतं. कटाच्या आमटीत काजूगर नसणं म्हणजे आमटीची चव बिघडवणं असाच घेतला जातो. आमटी भुरकून खाताना मध्ये मध्ये दाताखाली काजूगर यायला हवाच.
 
kaju 
 
सध्या ओल्या काजूचा हंगाम सुरू आहे. काजू हे दर वर्षी नेमाने येणारं फळ आहे. (आंब्यासारखं एक वर्षाआड नव्हे.) त्यामुळे कितीही महागले तरी कोकणी माणूस गर विकणार्‍या बायकांकडून मूठभर ओले काजू मिळवणारच आणि त्याची उसळ-आमटी करणारच!